Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, ANI
1 तासापूर्वी
पहलगाम हल्ल्यानंतर उफाळून आलेल्या भारत-पाकिस्तान संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच देशाला संबोधित करणार आहेत. त्यामुळं पंतप्रधान या मुद्द्यावर नेमकं काय बोलणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं असेल. पंतप्रधान मोदी हे रात्री आठ वाजता देशाला संबोधित करणार आहेत असं ANI वृत्तसंस्थेनी म्हटलं आहे.
भारतानं 7 मे च्या पहाटे पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या लष्करी तळांवर कारवाई केली होती. त्यात 100 हून अधिक दहशतवाद्यांचा मृत्यू झाल्याचं भारतीय लष्करानं रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.
या कारवाईनंतर 8 आणि 9 मे रोजी पाकिस्ताननं भारतावर ड्रोनच्या माध्यमांतून हल्ले करण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय एअर डिफेन्स सिस्टिमनं हे हल्ले निकामी केल्याचं भारतीय लष्कराकडून सांगण्यात आलं.
हल्ले आणि प्रत्युत्तराचे सत्र सुरू असताना या दरम्यानच 10 मे रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी तयार असल्याची घोषणा केली.
नंतर पाकिस्तान आणि भारतानंही याला दुजोरा दिला. या घोषणेनंतरही पाकिस्तानकडून काही हल्ले झाल्याचं समोर आलं. रविवार पहाटेनंतर मात्र दोन्ही बाजूंकडून शांतता असल्याचं पाहायला मिळत आहे.
भारतीय लष्कराच्या वतीनं काय घडत आहे याबाबत सातत्यानं माहिती दिली जात होती.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी संघर्षानंतर हा पाकिस्तानचा ऐतिहासिक विजय असल्याचं म्हटलं होतं. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मात्र याबाबत काहीही बोललं गेलं नाही.
त्यामुळं सोमवारी मोदी काय बोलणार याकडं आता लक्ष लागलेलं आहे. मोदी रात्री 8 वाजता देशाला संबोधित करणार असल्याचं एएनआय या वृत्त वाहिनीनं म्हटलं आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी शनिवारी (10मे) मध्यरात्री देशाला उद्देशून भाषण केलं. “कोणी स्वातंत्र्याला आव्हान दिलं तर आम्ही आमच्या संरक्षणासाठी काहीही करू,” असं म्हणत त्यांनी भाषणाची सुरुवात केली.
पाकिस्तानवर विनाकारण आरोप केले जात असून, त्याची चौकशी व्हावी असं ते म्हणाले. गेल्या काही दिवसांत पाकिस्तावर ड्रोन हल्ले झाल्याचा आरोप त्यांनी केला. त्यात मशिदींचं नुकसान झालं असून निरपराध लोक मारले गेल्याचा आरोपही त्यांनी केला.
शरीफ यांनी पाकिस्तानच्या लष्करानं याचा कसा सामना केला याबाबतही माहिती दिली. “आपल्या मूल्यांचं रक्षण करण्यात देश यशस्वी झाला आहे. संपूर्ण पाकिस्तानी यशस्वी झाले आहे, आपण जिंकलो आहोत. हा विजय आहे,” असं ते म्हणाले.
हा पाकिस्तानसाठी ऐतिहासिक विजय असल्याचं म्हणत शरीफ यांनी कौतुक केलं. त्यांनी पाकिस्तानच्या सैन्यातील अधिकाऱ्यांची नावं घेत त्यांचं अभिनंदन केलं. देशातील विरोधी पक्षांचेही शरीफ यांनी आभार मानले.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अमेरिका आणि चीनसह मध्यस्थी करणाऱ्या देशांचे आभार मानले.

सर्वांच्या हितासाठी शस्त्रसंधी केली आणि त्यासाठी सकारात्मक असल्याचंही शरीफ म्हणाले. “मी राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांचे आभार मानतो. अमेरिकेने यात महत्त्वाची भूमिका बजावली,” असंही ते म्हणाले.
मध्यस्थी करणाऱ्या सौदी अरेबिया, तुर्कीये आणि कतारसह इतर राष्ट्रांचेही च्यांनी आभार मानले. ब्रिटनच्या सल्ल्याबद्दलही त्यांनी आभार मानले.
तसंच प्रिय आणि विश्वासार्ह मित्र असा उल्लेख करत चीनचं कौतुक केलं. पाकिस्तानला गरज असताना चीन पाठिशी उभा राहिला असं ते म्हणाले.
पाणी वाटपासह, काश्मीर आणि इतर सर्व वादग्रस्त मुद्दे सुटण्याची आशा व्यक्त करत त्यांनी भाषण संपवलं.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
SOURCE : BBC