Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, Getty Images
नागपूर शहरातील एका हॉर्स रायडींग अकॅडमीमध्ये घोडीच्या पिल्लासोबत शारीरिक संबंध ठेवल्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
नागपुरातील गिट्टीखदान पोलीस ठाण्यामध्ये रविवारी (18 मे) ही तक्रार नोंदवण्यात आली.
एका 30 वर्षीय व्यक्तीनं घोडीच्या पिल्लासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची तक्रार प्राप्त झाली असून आरोपीचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
नेमकं काय घडलंय?
नागपूरमधील प्रमोद संपत लाडवे (31) यांनी यासंदर्भात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
ते नागपुरात टीव्ही टॉवर बालाजी मंदिराजवळ स्वत:ची हॉर्स रायडींग अकॅडमी चालवतात. त्यांच्या या अकॅडमीमध्ये एकूण 17 घोडे आहेत. त्यापैकी 9 नर आणि 8 मादी आहेत.
त्यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे की, त्यांच्या या अकॅडमीमध्ये काम करणाऱ्या रुस्तम नावाच्या सिक्योरिटी गार्डनं त्यांना 17 मेच्या रात्री साडेअकरा वाजता फोन केला.

फोटो स्रोत, Getty Images
सिक्योरिटी गार्डनं माहिती दिली की, सूरज उर्फ छोट्या खोब्रागडे (30) यानं अकॅडमीमध्ये चोरी केली असून त्यानंतर तो फरार झाला आहे.
यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 18 मे रोजी सकाळी अकॅडमीतील कोणत्या गोष्टी चोरीला गेल्या आहेत, हे पाहण्यासाठी प्रमोद लाडवे यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले.
सूरज खोब्रागडे यानं अकॅडमीतील 2 हजार रुपये किंमत असणारे चार लोखंडी अँगल्स चोरी केले आणि त्यानंतर तो पसार झाला असल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलं.
घोडीसोबत लैंगिक संबंध
तक्रारदार प्रमोद लाडवे यांनी सूरज खोब्रागडेवर चोरीसोबतच आणखी एक गंभीर आरोप केला आहे.
या आरोपांनुसार, सुरजनं त्यांच्या अकॅडमीतील इरा नावाच्या घोडीच्या पिल्लासोबत जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याचा आरोप त्यांनी केला.

फोटो स्रोत, Getty Images
त्यानं घोडीला शारीरिक यातना देऊन क्रूर वागणूक दिली असल्याचं एफआयआरमध्ये नोंदवण्यात आलं आहे.
भारतीय न्याय संहिता, 2023 च्या कलम 303 (2) तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम, 1960 च्या कलम 11 (1) अ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
प्रमोद लाडवे यांच्यासोबत बीबीसी मराठीने संपर्क साधला.
बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, “मानवता नगरमध्ये राहणारा हा मुलगा आहे. त्याने हे कृत्य केल्याचं माझ्या सीसीटीव्हीमध्ये दिसतंय.”
“तो इथे कामाला नव्हता, पण तो इथेच कामाला असल्याचं सोशल मीडियावरुन पसरत आहे. मात्र, तसं काही नाहीये. यामुळे, आमच्या अकॅडमीची विनाकारण बदनामी होत आहे. त्याला शिक्षा व्हावी, यासाठी पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. पण, अद्यापही त्याला अटक झालेली नाही.”
पोलिसांनी काय म्हटलं?
घोडीच्या पिल्लावर लैंगिक अत्याचार झाल्याप्रकरणी गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी चेतन बोरखेडे यांच्याशी बीबीसीने संपर्क साधला.
त्यांनी म्हटलं, “या घटनेतील आरोपीवर कलम 11 अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 18 मे रोजी ही तक्रार दाखल झाली होती. पण, अद्याप आरोपीला अटक झालेली नाही.”
“आम्ही आरोपीचा शोध घेत आहोत,” अशीही माहिती त्यांनी दिली.
याआधी 2022 मध्ये, पुण्यात पाळीव कुत्रीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर पोलिसांनी अनैसर्गिक अत्याचाराच्या गुन्ह्याची नोंद केली होती.
त्याआधी, पश्चिम महाराष्ट्रातील चांदोली वनपरिक्षेत्रात घोरपडीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली होती.
प्राण्यांच्या बाबतीत न्याय देणारे कायदे कोणते?
भारतात सुरुवातीला वन्य पक्षी व प्राणी संरक्षण कायदा 1912 नुसार कारवाई होत होती. त्यानंतर 1972 साली भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा अस्तीत्वात आला. तर पाळीव प्राण्यांबाबत 1960 साली प्राण्यांचा छळ प्रतिबंध हा कायदा तयार झाला.
पण प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत कायद्यात कठोर तरतूद नसल्याचं प्राणीमित्राचं म्हणणं आहे.
प्राण्यांची शिकार किंवा छळवणुकीबाबत अभ्यास करणारे आणि लढा देणारे वकिल बसवराज होसगौडर सांगतात, “माणसांवर होणाऱ्या छळाची दखल घेतली जाते. मात्र प्राण्यांवर होणारा छळ पोलीस किंवा वनविभाग यांच्याकडून दखल घेण्याला होणारी दिरंगाई हा मोठा प्रश्न आहे. खरी लढाई ही दखलपात्र होण्यापासून करावी लागते.”
पाळीव प्राण्यांच्या बाबत असलेल्या कायद्यानुसार अतिशय कमी शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे. प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1960 नुसार पाळीव प्राण्यांना जीवे मारणे, छळ करणे यासाठी केवळ 3 महिने शिक्षा आणि 50 रुपये दंडाची तरतूद आहे.

फोटो स्रोत, Getty Images
तर वन्यजीव संरक्षण कायदा 1972 नुसार 3 ते 7 वर्षं शिक्षा आणि 25 हजार रुपये दंड अशी कायद्यात तरतूद आहे. गेली कित्येक वर्षं यात बदल घडलेला नाही.
वकिल बसवराज होसगौडर सांगतात, “काळानुसार या बाबत शिक्षेचा कालावधी आणि दंडाची रक्कम वाढवण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षांत प्राण्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना पाहता कायद्यात बदल होणं गरजेचं आहे.”
“यासाठी देशभरातल्या स्वयंसेवी संस्था प्रयत्नशील आहेत. त्यानुसार अॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाकडे याबाबतचा पाठपुरावा सुरू आहे.”
सरकारकडे केलेल्या मागणीनुसार वन्यजीव प्रतिबंध कायद्यानुसार शिक्षेचा कालावधी हा 10 ते 14 वर्षं शिक्षा करावी. तसेच दंडाची रक्कम देखील 50 हजार ते 1 लाख इतकी करण्यात यावी, असं होसगौडर यांचं म्हणणं आहे.
इतक्या वर्षांत कायद्यात बदल नाही. कमी शिक्षा आणि किरकोळ दंड असल्यानं लोकांमध्ये कायद्याचा धाक नाही. त्यामुळं वारंवार प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना घडत असतात. याला रोखण्यासाठी कायदे कडक करणे तसंच कडक शिक्षेची तरतूद ही काळाची गरज आहे, असं प्राणीमित्रांचं म्हणणं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC