Home LATEST NEWS ताजी बातमी निर्मल पुर्जा : ब्रॉड पीक हिमस्खलनात मृत्यू झालेले प्रसिद्ध गिर्यारोहक

निर्मल पुर्जा : ब्रॉड पीक हिमस्खलनात मृत्यू झालेले प्रसिद्ध गिर्यारोहक

3
0

Source :- BBC INDIA NEWS

लष्करी सेवेतून गिर्यारोहणाकडे

फोटो स्रोत, @nimsdai

Published

वाचन वेळ: 5 मिनिटे

सध्याच्या काळातील सर्वात प्रसिद्ध गिर्यारोहकांपैकी एक अशी ओळख असलेले ब्रिटिश-नेपाळी गिर्यारोहक निर्मल पुर्जा यांचा ब्रॉड पीक हिमस्खलनात मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यांच्या ‘एलिट एक्सपेड’ या संस्थेने एका इन्स्टाग्राम पोस्टद्वारे या बातमीली दुजोरा दिला आहे.

या अपघातात मोहीम पथकातील इतर सदस्यांचाही मृत्यू झाल्याचं,निर्मल यांच्या संघटनेनं सांगितलं.

एलिट एक्सपेडच्या माहितीनुसार, या दुर्घटनेत निर्मल पुर्जा यांच्यासोबत त्यांचे विश्वासू गिर्यारोहण सहकारी आणि मार्गदर्शक पुर बहादूर गुरुंग (युक्ता) आणि निमा शेर्पा यांचाही मृत्यू झाला.

“जगाने एक महान गिर्यारोहक गमावला आहे. त्यांनी आपल्या धैर्य, नम्रता आणि दृढनिश्चयाने लाखो लोकांना प्रेरणा दिली. आपल्या कामगिरीतून निर्मल पुर्जा यांनी जगाला दाखवून दिले की मोठी स्वप्ने पाहून आणि आपल्या मर्यादांना आव्हान देऊन, अशक्य वाटणारी ध्येये देखील साध्य करता येतात,” असं त्यांच्या संस्थेनं इन्स्टाग्रामवर लिहिलं.

गुरुवारी काराकोरम पर्वतरांगेतील 8047 मीटर उंच शिखरावर हिमस्खलन झाल्याच्या वृत्तानंतर त्या पथकासाठी शोध आणि बचाव मोहीम सुरू करण्यात आली होती.

निर्मल पुर्जा यांनी अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

त्यांचा सर्वात प्रसिद्ध पराक्रम 2019 मधील होता. जगातील सर्वाधिक उंचीच्या 14 शिखरांवर अवघ्या सहा महिन्यांहून थोड्या अधिक कालावधीत चढाई करण्याची कामगिरी त्यांनी केली होती. तेव्हा सर्व 14 शिखरं सर्वात कमी वेळात सर करणाऱ्या गिर्यारोहकाचा विक्रम त्यांनी नावावर केला होता.

निम्स दाई या नावानंही ओळखले जाणारे पुर्जा गुरुवारी पाकिस्तान प्रशासित गिलगिट-बाल्टिस्तान भागातील 8047 मीटर (26,400फूट) उंच ब्रॉड पीक पर्वतावर झालेल्या हिमस्खलनानंतर बेपत्ता झालेल्या 10 गिर्यारोहकांमध्ये होते.

लष्करी सेवेतून गिर्यारोहणाकडे

निर्मल पुर्जा (43 वर्ष) यांचा जन्म नेपाळच्या डोंगराळ भागातील म्याग्दी जिल्ह्यात एका छोट्या गावात झाला होता. हे गाव समुद्रसपाटीपासून सुमारे 1600 मीटर उंचीवर आहे.

ते गोरखा कुटुंबातील होते. गोरखा हे नेपाळी सैनिकांचं जगप्रसिद्ध दल असून त्यांनी ब्रिटिश सैन्यासह विविध देशांच्या सैन्यात सेवा बजावली आहे.

वडील आणि मोठ्या भावांच्या पावलावर पाऊल ठेवत निर्मल यांनी 2003 मध्ये गोरखा रेजिमेंटमध्ये प्रवेश केला. तेव्हा ते अवघे 18 वर्षांचे होते. त्यानंतर 2009 मध्ये ते यूके स्पेशल फोर्सेसमध्ये दाखल झाले.

ब्रिटिश सैन्यात १६ वर्षांच्या सेवेदरम्यान त्यांना गिर्यारोहणाची आवड निर्माण झाली.

2012 मध्ये ते एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत गेले होते. त्यानंतर नियोजनाप्रमाणे काठमांडूला परतण्याऐवजी त्यांनी गिर्यारोहण शिकायचा निर्णय घेतला, असं संकेतस्थळावर म्हटलं आहे.

त्यांनंतर कमी कालावधीत त्यांनी 6119 मीटर उंचीचं लोबुचे ईस्ट शिखर सर केलं. संकेतस्थळानुसार गिर्यारोहण करून सर केलेलं हे त्यांचं पहिलं शिखर होतं.

लष्करी सेवेतून गिर्यारोहणाकडे

फोटो स्रोत, @nimsdai

अचानक साहस स्वीकारण्याची ही वृत्ती त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग होती आणि तीच ब्रॉड पीक मोहिमेतही ती दिसून आली.

सोमवारी एक्स (X) वर केलेल्या त्यांच्या शेवटच्या पोस्टमध्ये पुर्जा यांनी लिहिलं की, सुरुवातीला त्यांचा ब्रॉड पीक सर करण्याचा कोणताही विचार नव्हता.

“आधी फक्त गॅशरब्रुम II (G2) सर करण्याचं ठरलं होतं,” असं त्यांनी लिहिलं होतं. गॅशरब्रुम II हेही काराकोरम पर्वतरांगेतील एक शिखर आहे.

पण, पाकिस्तानला रवाना होण्यापूर्वी त्यांना जाणवलं की, त्यांनी त्याच वेळी ब्रॉड पीकही सर केलं तर ऑक्सिजनशिवाय जगातील सर्व 18 आठ-हजार उंचीची शिखरं दोनदा सर करणारे इतिहासातील पहिले व्यक्ती होण्यासाठी त्यांना फक्त आणखी एक शिखर पार करायचं शिल्लक असेल.

जगात 8000 मीटरपेक्षा जास्त उंच असलेली केवळ 14 शिखरं आहेत आणि ती सर्व हिमालय आणि काराकोरमच्या पर्वतरांगांमध्ये आहेत.

“हे ठरलेलं नव्हतं. संधी कधीच आरडा ओरडा करत नाहीत. त्या शांतपणे मेहनत करणाऱ्यांच्या कानात कुजबुजतात,” असं पुर्जा यांनी लिहिलं होतं.

“ब्रॉड पीक, मी तुझ्याकडं काहीही मागत नाही, फक्त वर जाण्यासाठी आणि सुरक्षितपणे परत येण्यासाठी मार्ग मागतो. कोणतेही शिखर मी कधीच गृहीत धरत नाही,” असंही त्यांनी लिहिलं होतं.

14 शिखरे

फोटो स्रोत, @nimsdai

21 जुलै रोजी त्यांनी गॅशरब्रुम II यशस्वीरित्या सर केलं. एक्सवरील पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं की, ते त्यांचं आठ-हजार फूट उंचीच्या शिखरावरील 57 वं यशस्वी आरोहण होतं.

त्यांची लोकप्रियता वाढत गेली तसतशी त्यांच्यावर टीकाही झाली. त्यांच्या वर्तनाबाबत काही गंभीर आरोपही झाले होते आले.

2024 मध्ये न्यूयॉर्क टाइम्समधील एका वृत्तात दोन महिलांनी त्यांच्यावर केलेल्या लैंगिक स्वरुपाच्या आरोपांचा उल्लेख करण्यात आला. एका महिलेनं 2023 मध्ये हॉटेलच्या खोलीत त्यांच्याकडून लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप केला होता.

तर दुसऱ्या महिलेनं 2022 मध्ये K2 मोहिमेदरम्यान त्यांच्यावर अश्लील प्रस्ताव दिल्याचा आरोप केला होता. त्यांच्या वकिलामार्फत पुर्जा यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते.

14 शिखरांची मोहीम

निर्मल पुर्जा यांना गिर्यारोहणातील कामगिरीबद्दल 2018 मध्ये ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या हस्ते MBE (Member of the Order of the British Empire) हा नागरी सन्मान देण्यात आला होता.

त्यानंतरच्या वर्षी त्यांनी आतापर्यंतचं सर्वात महत्त्वाकांक्षी आव्हान स्वीकारलं. जगातील 14 सर्वोच्च शिखरं सर्वात कमी वेळात सर करण्याचा विक्रम. याआधीचा विक्रम जवळपास आठ वर्षांचा होता. पण पुर्जा यांनी 2019 मध्ये सहा महिने आणि सहा दिवसांत ही कामगिरी पूर्ण केली.

नॉर्वेच्या गिर्यारोहक क्रिस्टिन हरिला यांनी ही 2023 मध्ये १४ शिखरं तीन महिने आणि एका दिवसात सर करून त्यांचा विक्रम मोडला होता.

पुर्जा यांच्या या प्रवासाला Project Possible असं नाव देण्यात आलं होतं. त्यावर 14 Peaks: Nothing is Impossible हा माहितीपट तयार करण्यात आला होता.

हा माहितीपट पाहून लोकांनी आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करावा, अशी त्यांची इच्छा होती.

“हा माहितीपट फक्त गिर्यारोहणाबद्दल नाही; तो आपल्या ध्येयांचा पाठपुरावा करण्याबद्दल आहे,” असं माहितीपट प्रदर्शित झाला तेव्हा त्यांनी BBC शी बोलताना म्हटलं होतं.

निर्मल पुर्जा

फोटो स्रोत, @nimsdai

ही मोहीम उभारणं सोपं नव्हतं. 14 शिखरांवर मोहिमा पूर्ण करण्यासाठी निधी उभारण्यासाठी त्यांना स्वतःचं घर पुन्हा गहाण ठेवावं लागलं. या संपूर्ण प्रवासात त्यांची पत्नी सुची यांनी त्यांना साथ दिली.

ही मोहीम अत्यंत धोकादायक आणि शारीरिकदृष्ट्या कठीण असली तरी त्यात आनंद घ्यायला ते विसरले नाहीत, असंही त्यांनी BBC ला सांगितलं होतं.

त्यांच्या मते, एव्हरेस्ट, ल्होत्से आणि मकालू ही तीन शिखरं ते पाच दिवसांऐवजी तीन दिवसांत सर करू शकले असते. पण मध्ये दोन रात्री त्यांनी “ड्रिंक्ससाठी” थांबण्याचा निर्णय घेतला होता.

प्रकृती खराब झालेल्या गिर्यारोहकांना वाचवण्यापासून ते जागतिक विक्रमाच्या शर्यतीपर्यंत, पुर्जा आणि त्यांचे सहकारी रात्री बेसवर पार्टीही करत असत.

माहितीपटात दाखवल्याप्रमाणे त्यांनी एक शिखर हँगओव्हरमध्ये सर केलं होतं.

मे 2019 मध्ये एव्हरेस्टच्या शिखराजवळ पोहोचताना त्यांनी शिखर गाठण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या गिर्यारोहकांचा एक फोटो काढला.

निर्मल पुर्जा

फोटो स्रोत, AFP via Getty Images

एव्हरेस्टवरील या “ट्रॅफिक जॅम”चा फोटो जगभर व्हायरल झाला आणि जगातील सर्वोच्च शिखरावरील धोकादायक गर्दीबाबत मोठी चर्चा सुरू झाली. Project Possible यशस्वी झाल्यानंतर पुर्जा नेपाळमध्ये एका सुपरस्टार गिर्यारोहकाच्या रूपात परतले.

त्यानंतर त्यांनी गिर्यारोहण मोहिमा आयोजित करणारी एक कंपनी आणि गिर्यारोहणासाठीचे कपड्यांचा एक ब्रँड सुरू केला.

वाढलेल्या लोकप्रियतेचा उपयोग त्यांनी नेपाळी पर्वत मार्गदर्शकांच्या (माउंटन गाईड्स) कामाला अधिक मान्यता मिळावी यासाठीही केला. परदेशी गिर्यारोहकांच्या मोठ्या मोहिमांमध्ये नेपाळी मार्गदर्शकांचे योगदान अधिक मान्य केले जावे, अशी त्यांनी सातत्याने मागणी केली.

एक्सवरील शेवटच्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं होतं, “ही मोहीम मला इथपर्यंत आणणाऱ्या प्रत्येकासाठी समर्पित आहे. समर्थक असो किंवा टीकाकार, सर्वांसाठी. दोन्ही नसतील तर जिद्दीची आग पेटत नाही. त्यामुळे मनापासून तुमचे आभार.”

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC