Home LATEST NEWS ताजी बातमी नेपाळ पूर : मृतांची संख्या 332 वर पोहोचली, जवळपास 1000 लोक बेपत्ता

नेपाळ पूर : मृतांची संख्या 332 वर पोहोचली, जवळपास 1000 लोक बेपत्ता

6
0

Source :- BBC INDIA NEWS

भूस्खलनानंतरचे दृश्य

फोटो स्रोत, Reuters

Published

वाचन वेळ: 7 मिनिटे

नेपाळ पोलिसांनी ताज्या अपडेटमध्ये सांगितले आहे की, नेपाळच्या रसुवा जिल्ह्यातील ‘भोटे कोशी’ नदीला अचानक आलेल्या पूर आणि भूस्खलनामुळे देशात आतापर्यंत 332 जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, नेपाळच्या नॅशनल डिझास्टर रिस्क रिडक्शन अँड मॅनेजमेंट अथॉरिटी (NDRRMA) नुसार, पुरानंतर 910 जण बेपत्ता असून त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.

या बेपत्ता व्यक्तींमध्ये 517 परदेशी नागरिक, नेपाळ लष्कराचे 44 सदस्य आणि नेपाळ पोलिसांचे 28 अधिकारी यांचा समावेश आहे.

एनडीआरआरएमएने सांगितले की, आतापर्यंत 258 मृतदेह सापडले आहेत. तर 351 जणांना वाचण्यात यश आलंय.

नेपाळ पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर दिलेल्या माहितीनुसार, रसुवा जिल्ह्यात मृत्यू झालेल्या आणि अद्याप ओळख पटू न शकलेल्या व्यक्तींबाबत माहिती मिळवण्यासाठी पोलिसांच्या वेबसाइटवर तपासणी करता येईल.

26 ऑगस्ट 2026 रोजी नेपाळमधील नुवाकोट येथे त्रिशूली नदीकाठी आलेल्या महापुरानंतर आणि भूस्खलनानंतरचे दृश्य.

फोटो स्रोत, Safal Prakash Shrestha/NurPhoto via Getty Images

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांनी बेपत्ता पर्यटकांमध्ये 34 ऑस्ट्रेलियन नागरिक असल्याचं म्हटलं आहे.

नेपाळ पर्यटन बोर्ड आणि विविध ट्रॅव्हल एजन्सींनी दिलेल्या माहितीनुसार, रसुवा जिल्ह्यातील भोटे कोशी नदीला आलेल्या पुरामुळे अनेक नागरिक बेपत्ता झाले असून त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.

नेपाळ पर्यटन बोर्डनं स्पष्ट केलंय की, संपर्क तुटलेल्या लोकांमध्ये भारतीयांचा गट सर्वात मोठा असून त्यात 133 भारतीय नागरिकांचा समावेश आहे.

नेपाळमधील पुरामुळे बिहारमधील अनेक जिल्ह्यांना ‘हाय अलर्ट’वर ठेवण्यात आले आहे. नेपाळमधील अनेक भागांची सीमा बिहारला लागून आहे.

नेपाळच्या ‘नॅशनल डिझास्टर रिस्क रिडक्शन अँड मॅनेजमेंट अथॉरिटी’ने म्हटले आहे की, रसुवामधील भोटे कोशी नदीला आलेला पूर हा तिबेटमधील ‘हिमनदीच्या भूस्खलना’मुळे (glacial landslide) आला आहे.

नेपाळ पूर

फोटो स्रोत, Shaktimaya Tamang

बीबीसी नेपाळीच्या वृत्तानुसार, संबंधित प्राधिकरणाने सांगितलंय की, उपग्रह प्रतिमांच्या विश्लेषणावर आधारित प्राथमिक अभ्यासातून असं दिसून आले आहे की, नेपाळ-चीनमधील रसुवागढी सीमा ओलांडण्याच्या ठिकाणापासून ईशान्येला सुमारे 20 किलोमीटर अंतरावर या पुराची सुरुवात झाली होती.

अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, “नेपाळ-चीन सीमेवर झालेल्या दरडी कोसळण्याच्या घटनेमुळे लेंडे नदीचा प्रवाह ढिगाऱ्यामुळे अडवला गेला आणि पुराचे पाणी तिमुरेमार्गे त्रिशूली नदीत शिरले.”

गेल्या वर्षी आलेल्या भीषण पुरामुळे तिबेटच्या सीमेलगतच्या भागातील ‘लेंडे’ नदीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

दरम्यान, ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माउंटेन डेव्हलपमेंट’ (ICIMOD) च्या तज्ज्ञांनी असाही अंदाज व्यक्त केला आहे की, हा भीषण पूर कदाचित हिमस्खलनामुळे आला असावा.

‘कैलास मानसरोवर’साठी गेलेले भारतीय भाविक बेपत्ता

नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे 130 हून अधिक भारतीय बेपत्ता आहेत. यात कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या भाविकांची संख्या जास्त आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, काठमांडूमधील भारतीय दूतावासासह तामिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्याच्या सरकारांनी हेल्पलाइन सुरू केल्या आहेत.

सम्राट टूर्स अँड ट्रॅव्हल या एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता भारतीयांमध्ये किमान 59 जण कैलास मानसरोवरचे यात्रेकरू आहेत. परंतु, नेपाळमधील संपर्क व्यवस्था मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाल्याने बेपत्ता भारतीयांबाबत अद्याप सविस्तर माहिती समजू शकलेली नाही.

(ड्रोनमधून घेतलेलं छायाचित्र) पुरानंतर दुथडी भरून वाहणाऱ्या त्रिशूली नदीच्या काठावरील नुकसानग्रस्त इमारती आणि पायाभूत सुविधांचं हवाई दृश्य. तिबेटच्या हद्दीतील ल्हेंदे नदीच्या वरच्या भागात बर्फ आणि खडकांचं हिमस्खलन झाल्यामुळे हा अचानक पूर आला.

फोटो स्रोत, Getty Images

तामिळनाडूचे 37 पर्यटक अजूनही बेपत्ता

तामिळनाडू सरकारच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातून नेपाळला गेलेल्या 57 पर्यटकांपैकी 37 जणांबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. तर 20 पर्यटकांचा शोध लागला आहे. हे पर्यटक हिमालयातील एका मंदिराकडे जात होते, असं सांगण्यात येत आहे.

कोइम्बतूर येथील ईशा फाउंडेशननेही त्यांचे 80 सदस्य नेपाळमधील एका इमिग्रेशन सेंटरमध्ये होते, असा दावा केला आहे. परंतु, पुरानंतर त्यांच्याशी संपर्क झालेला नाही.

ईशा फाउंडेशनचे संस्थापक सद्गुरू यांनी सांगितलं की, इमिग्रेशन कार्यालयात असलेल्या लोकांबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. फाउंडेशनचे 495 जण मात्र सुरक्षितपणे परतले आहेत.

पुरामध्ये आपल्या समुहातील 80 जण बेपत्ता झाल्यानंतर सद्गुरूंनी संबंधित अधिकारी आणि प्रशासनाकडे घटनास्थळी जाण्याची परवानगी मागितली आहे.

पश्चिम बंगालच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कोलकात्याहून कैलास मानसरोवर यात्रेला गेलेला 32 जणांचा गटही पुरानंतर बेपत्ता आहे. या गटात 30 भाविक आणि 2 टूर मॅनेजर आहेत.

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पूर आल्यानंतर या 32 जणांपैकी कोणाशीही संपर्क होऊ शकलेला नाही. बचाव पथकं बाधित भागात त्यांचा शोध घेत आहेत.

पुराच्या आधीची आणि नंतरची सॅटेलाईट छायाचित्रं

पुराच्या आधी आणि नंतरची परिस्थिती
पुराच्या आधीची आणि नंतरची परिस्थिती, उपग्रहाद्वारे घेतलेली छायाचित्रं
पुराच्या आधीची आणि नंतरची परिस्थिती, उपग्रहाद्वारे घेतलेली छायाचित्रं

नेपाळच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितलं पुराचं कारण

नेपाळचे परराष्ट्रमंत्री शिशिर खनाल यांनी देशाच्या प्रतिनिधी सभेला संबोधित केलं.

रसुवामधील आपत्तीची परिस्थिती भूकंपासोबत झालेल्या हिमस्खलनामुळे निर्माण झाली असून, याबाबत अधिक माहिती घेतली जात असल्याचं त्यांनी म्हटलं.

सकाळी सुमारे 8:40 वाजता रसुवामधील भोटेकोशी नदीला आलेल्या पुरामुळे रसुवा आणि नुवाकोट जिल्ह्यांतील अनेक भाग प्रभावित झाले. तिमुरे, स्याफ्रुबेसी, बेत्रावती, त्रिशूली, बत्तर आणि देवीघाटसह अनेक भागांमध्ये मोठं नुकसान झालं आहे.

सकाळी 8:37 वाजता झालेल्या भूकंपामुळे हा पूर आला असून, भोटेकोशी आणि त्रिशूली नद्यांच्या किनारी भागांमध्ये अजूनही धोका कायम असल्याचं त्यांनी सांगितलं.

नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांच्याशी चर्चा केली आहे.

नेपाळच्या उत्तरेकडील भागात अचानक आलेल्या पुरामुळे प्रभावित झालेल्या जलविद्युत प्रकल्पासमोर चिखल आणि वाळूचा ढिगारा.

फोटो स्रोत, Shaktimaya Tamang

पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याबाबत माहिती देताना म्हटलं आहे, “पंतप्रधान बालेन शाह यांच्याशी चर्चा केली. नेपाळमध्ये पुरामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल संवेदना व्यक्त केल्या. या कठीण काळात भारतातील लोक नेपाळमधील आपल्या बंधू-भगिनींसोबत ठामपणे उभे आहेत.”

ते पुढे म्हणाले, “भारत नेपाळला शक्य ती सर्व मदत करण्यास तयार आहे. मदत आणि बचावकार्यांसाठी आमची पथकं नेपाळच्या अधिकाऱ्यांसोबत मिळून काम करत आहेत.”

नदी किनाऱ्याच्या भागांपासून दूर राहण्याचं आवाहन

नेपाळच्या गृह मंत्रालयाने निवेदन प्रसिद्ध करून सांगितलं आहे की, सेना आणि खासगी हेलिकॉप्टरांच्या मदतीने रसुवागढी, तिमुरे, स्याफ्रुबेसी आणि मैलुंग या प्रभावित भागांमध्ये बचाव मोहीम सुरू आहे.

सरकारने पुराचा फटका बसलेल्या जिल्ह्यांना तीन महिन्यांसाठी ‘आपत्तीग्रस्त क्षेत्र’ घोषित करण्याचाही निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.

परराष्ट्रमंत्री खनाल यांनी म्हटलं की, रसुवामध्ये आलेल्या पुरामुळे ‘राष्ट्रीय आपत्तीची परिस्थिती’ निर्माण झाली आहे.

भोटेकोशी आणि त्रिशूली नद्यांच्या किनारी भागांमध्ये अजूनही धोका कायम असून, नुवाकोट, धाडिंग, गोरखा आणि चितवन जिल्ह्यांतील नदीकाठच्या भागांमध्ये राहणाऱ्या लोकांनी अत्यंत सतर्क राहावं, असं आवाहन त्यांनी केलं.

खनाल यांनी सांगितलं की, सर्व यंत्रणांना नागरिकांच्या बचाव आणि मदतकार्यात तातडीने सहभागी होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सरकार विविध मंत्रालयं आणि सैन्याच्या मदतीने जखमींना मोफत उपचार देत असून, संकटात अडकलेल्या लोकांना वाचवून सुरक्षित ठिकाणी पोहोचवत आहे.

परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आपत्कालीन बैठक घेतल्यानंतर नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं, “वैद्यकीय पथकं, स्काउट्स आणि रेड क्रॉस यांच्या समन्वयाने आवश्यक पावलं उचलण्याचं काम सुरू झालं आहे.”

राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी म्हटलं आहे की, रसुवा आणि नुवाकोटमधून वाहणाऱ्या भोटेकोशी आणि त्रिशूली नद्यांना आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची बातमी ऐकून त्यांना तीव्र दुःख झालं आहे.

26 ऑगस्ट 2026 रोजी नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरानंतर नुकसान झालेली मालमत्ता आणि पाण्याखाली गेलेले रस्ते.

फोटो स्रोत, Reuters

2015 च्या भूकंपानंतर नेपाळमध्ये आलेली ही सर्वांत भीषण आपत्ती मानली जात आहे. त्या भूकंपात सुमारे 9,000 लोकांचा मृत्यू झाला होता.

नेपाळ-चीन सीमेवरील अनेक सखल जिल्हे या पुरामुळे प्रभावित झाले आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जीवित आणि मालमत्तेचं मोठं नुकसान झालं आहे, मात्र अद्याप नुकसानीचा स्पष्ट अंदाज लावता आलेला नाही.

भोटेकोशी नदीकाठावरील रसुवा आणि नुवाकोट जिल्ह्यांतील अनेक वस्ती सर्वाधिक प्रभावित झाल्या आहेत. या भागात लोकसंख्या कमी असली तरी येथील रस्ते नेपाळ-चीन व्यापारासाठी महत्त्वाची जीवनवाहिनी आहेत. या परिसरातील जलविद्युत प्रकल्प, महामार्ग आणि पूल यांसह महत्त्वाची पायाभूत सुविधा नष्ट झाली आहे.

गेल्या वर्षी याच भागात अचानक आलेल्या पुरात 18 जणांचा मृत्यू झाला होता आणि 6 अब्ज नेपाळी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झालं होतं.

नेपाळमधील भारतीय दूतावासाकडून मदतीसाठी आपत्कालीन क्रमांक जारी

नेपाळमधील भारतीय दूतावासानं पूरपरिस्थितीत अडकलेल्या भारतीय नागरिकांना मदत करण्यासाठी आणि संबंधित माहिती देण्यासाठी आपत्कालीन क्रमांक जारी केलेले आहेत.

कोणत्याही माहितीसाठी या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधता येईल, असं दूतावासानं कळवलं आहे.

संपर्क क्रमांक खालीलप्रमाणे आहेत:

  • +977 985 131 6807
  • +977 970 910 7500

अनेक जणांची सुटका

26 ऑगस्टला मदत आणि बचाव कार्यात 12 जणांची सुटका करण्यात आली होती.

सशस्त्र पोलीस दलाच्या 13 जवानांचा संपर्क तुटून ते बेपत्ता झाल्यानंतर शोध आणि बचाव मोहीम सुरू करण्यात आल्याचं सशस्त्र पोलीस दलानं सांगितलं आहे.

सशस्त्र पोलीस दलाचे उप-प्रवक्ते शैलेंद्र थापा यांनी सांगितलं की, रसुवामधील मैलुंग येथून चार आणि तिमुरे इथून नऊ जण बेपत्ता आहेत.

त्यांनी सांगितलंय की, “आम्ही बालंबूमधील 100 खाटांचं रुग्णालय सज्ज ठेवलं आहे.”

रसुवा आणि नुवाकोटमधून वाहणाऱ्या भोटे कोशी आणि त्रिशूल नद्यांमधील पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या वृत्तावर राष्ट्रपती राम चंद्र पौडेल यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे.

नेपाळ पूर

फोटो स्रोत, RSS

काठमांडूमध्ये वास्तव्यास असलेल्या यी लियांग या चिनी व्यावसायिकाने बीबीसीला सांगितलं की, “आमच्या लॉजिस्टिक्स कंपनीचे सात कंटेनर ट्रक तिथे आहेत आणि त्यावर पूर्णपणे नेपाळी कर्मचारी कार्यरत आहेत. आमचा त्या सर्वांशी संपर्क तुटला आहे. तिथं नेटवर्क सिग्नल नसल्यामुळे आम्ही कोणाशीही बोलू शकत नाही.”

“जितकं मला माहितीय, त्यानुसार कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. दरडी कोसळणं किंवा भूस्खलन होणं, विशेषतः पावसाळ्यात, या घटना अधूनमधून घडत असतात. परंतु, ही घटना मात्र अत्यंत गंभीर असल्याचं दिसून येत आहे.”

नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं धोकादायक क्षेत्रांमधील नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचं आणि खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC