Home LATEST NEWS ताजी बातमी नेहा बोरा : भाजप समर्थक कुटुंबातील तरुणी ते डाव्या चळवळीचा चेहरा; असा...

नेहा बोरा : भाजप समर्थक कुटुंबातील तरुणी ते डाव्या चळवळीचा चेहरा; असा आहे तिचा प्रवास

4
0

Source :- BBC INDIA NEWS

नेहा बोरा

Published

वाचन वेळ: 5 मिनिटे

नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या अभिजीत दीपके आणि सोनम वांगचुक यांच्यासह आणखी एका चेहऱ्यानं संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतलं.

तो चेहरा म्हणजे नेहा बोरा.

कॉक्रोच जनता पार्टीच्या (सीजेपी) आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नेहा यांनी त्यांच्या काही सहकाऱ्यांसोबत उपोषण केलं होतं.

नेहा सीपीआय-एमएल (लिबरेशन) या पक्षाची विद्यार्थी संघटना ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनची (AISA) च्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.

त्यानंतर झारखंड लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनात सहभागी होण्यासाठी त्या रांचीला पोहोचल्यानं त्या पुन्हा चर्चेत आल्या होत्या.

या आंदोलनादरम्यान त्यांच्या चेहऱ्यावर शाई फेकण्यात आली होती. त्यावेळी नेहा बोरा म्हणाल्या होत्या, “माझ्यावर शाई फेकली जाण्याची मला भीती वाटत नाही. दिल्लीतील आंदोलनादरम्यान मी पेलेट गन आणि लाठीचार्जचाही सामना केला आहे.”

“देशभरातील विद्यार्थी आणि तरुणांचा संताप शाईने दाबला जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं का?”, असा सवालही त्यांनी केला होता.

त्यानंतर आंदोलनादरम्यान अटक केलेल्या विद्यार्थ्यांच्या सुटकेच्या मागणीसाठी त्या बिहारला गेल्या. एकूणच गेली काही वर्ष विद्यार्थी राजकारणात सक्रिय असलेल्या नेहा बोरा आता देशभरात सुरू असलेल्या युवक आणि विद्यार्थी चळवळींमध्ये एक प्रमुख व्यक्तिमत्व म्हणून समोर आल्या आहेत.

नेहा बोरा सध्या त्यांचा स्पष्टवक्तेपणा, रोखठोक भाषणं आणि आक्रमक भूमिकेमुळं चर्चेत आहेत. त्यांच्या भाषणांचे अनेक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

नेहा सध्या पुन्हा एकदा दिल्लीमध्ये त्यांच्या समर्थकांसह आंदोलन करत आहे. यावेळी त्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी समर्थकांसह मैदानात उतरल्या आहेत.

देशात सुरू असलेल्या एसआयआर प्रक्रियेतील कथित अनियमिततेसाठी ज्ञानेश कुमार जबाबदार असून त्यामुळं लाखो लोकांना मतदानाचा अधिकार गमवावा लागला असल्याचा आरोप अनेक विरोधी पक्षांनी केला आहे.

नुकतंच ‘इंडियन एक्सप्रेस’ या इंग्रजी वृत्तपत्रानं एसआयआर प्रक्रियेसंदर्भात मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन निवडणूक आयुक्तांमध्ये मतभेद असल्याचा दावा एका वृत्तात केला होता.

विद्यापीठ ते युवा चळवळीचा चेहरा

नेहा मूळच्या उत्तराखंडच्या रहिवासी आहेत. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून पदवी आणि त्यानंतर दिल्लीतील आंबेडकर विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी (एम.ए.) पूर्ण केली.

सध्या त्या दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (जेएनयू) पीएचडी करत आहेत.

नेहा बोरा

नेहा दिल्ली आणि जेएनयूमधील डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी चळवळीचा चेहरा आहेत. सीपीआय एमएल (लिबरेशन) च्या आयसा (AISA) या विद्यार्थी संघटनेचं त्या नेतृत्व करत आहेत. विद्यापीठात त्या अधिक सक्रिय असतात.

पण गेल्या काही दिवसांपासून देशभरात जी आंदोलनं होत आहेत, त्यासह डाव्या चळवळीच्या आंदोलनाच्या खंबीर प्रवक्त्या म्हणून त्या पुढं येत आहेत.

आंदोलनाने नेहा यांना काय शिकवलं?

फ्रंटलाइनला दिलेल्या एका मुलाखतीत नेहा म्हणाल्या की, “जंतर मंतरवर मोठ्या संख्येनं पोस्टर लावण्यात आले होते. त्या पोस्टरवर ‘तुम्ही गोडसेला मानता, आम्ही भगत सिंगांना मानतो. हाच तुमच्या आणि आमच्यातला मूळ फरक आहे. त्यामुळंच तुम्ही जायला (सत्तेतून) हवं.’ गोडसेला मानणारे या देशावर राज्य करू शकत नाही, असं लोक सतत म्हणत होते.”

“त्यात आरएसएसचा वारसा याबाबत बोललं जात होतं. तसंच जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप करण्यात आला. त्यात म्हटलं की, ते गोडसेच्या बाजूनं उभे होते आणि आम्ही भगतसिंगांच्या बाजूने. त्यांच्या फूट पाडण्याच्या राजकारणामुळं देश अशा स्थितीत पोहोचला आहे की, पेपरफुटी ही मोठी गोष्ट ठरत नाही, पण हिंदू-मुस्लिम वादाच्या मुद्द्याने अचानक सर्वांचे लक्ष वेधून घेतले जाते. लोक यावरच चर्चा करत होते,” असंही त्यांनी म्हटलं.

नेहा बोरा

नेहा यांनी या मुलाखतीत म्हटलं की, “देशातील तरुणांना सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून काय नको हे या आंदोलनांनी दाखवून दिलं. या आंदोलनानं आम्हा सर्वांना शिकवलेले धडे, फॅसिस्टांनाही जबाबदार धरता येतं याच्याही पुढं जाणारे होते. त्यामुळंच मी उपोषणावरून परत आले आणि माईकवर बोलत होते, तेव्हा तरुणांनी एकमेकांविरुद्ध नव्हे, तर एकमेकांसाठी लढण्याची भावना लक्षात ठेवावी असं म्हटले होते.”

विचारसरणीवरून कुटुंबाबरोबर मतभेद

नेहाचं कुटुंब हे भाजप समर्थक आहे.

याबाबत नेहानं मुलाखतीत सांगितलं की, “माझं कुटुंब कट्टर भाजप समर्थक आहे. आमच्या कुटुंबात खूप काळापासून मोठे मतभेद आहेत. मी दिल्लीत येऊन राजकीयदृष्ट्या सक्रिय झाल्यापासून कुटुंबात असे मतभेद होत आहेत.”

नेहा बोरा

“कधी कधी खूप तणाव वाढतो. मी आर्थिक आणि वैयक्तिक अशा दोन्ही बाबतीत स्वतःचे निर्णय घेण्याच्या बाबतीत खूप स्वतंत्र राहिली आहे. हे स्वातंत्र्य मला पदवीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षातच मिळालं, कारण तो माझ्या आयुष्यातील एक निर्णायक टप्पा होता,” असं नेहा सांगतात.

‘राजकारणात मोठा पल्ला गाठायचा आहे’

नेहा यांच्या मते, सीजेपीच्या चळवळीचं महत्त्व फक्त धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापुरतं नसून त्याही पुढं आहे.

तरुणांना एकमेकांविरुद्ध उभं करण्याऐवजी एकमेकांच्या पाठीशी उभं राहून बदल घडवून आणणं शक्य आहे, हे शिकल्याचं त्या सांगतात.

नेहा बोरा

जंतर-मंतर वरील आंदोलनातून निर्माण झालेली ऊर्जा एसआयआर, मतदारसंघ पुनर्रचना, कामगार हक्क आणि महिला आरक्षण यांसारख्या इतर मुद्द्यांशी संबंधित आंदोलनांपर्यंत पोहोचावी, अशी त्यांची इच्छा आहे.

नेहा यांच्यासाठी ही चळवळ देशाच्या लोकशाही, समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष रचनेच्या व्यापक लढ्याचा एक भाग आहे.

‘लोक एकमेकांचा हात धरू लागले आहेत’

बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत जंतर-मंतरच्या आंदोलनाबद्दल बोलताना नेहा म्हणाल्या की, “या आंदोलनाला कोणत्याही एका ठराविक वर्गात ठेवता येणार नाही, हे दिसून आलं आहे. हीच या आंदोलनाची शक्ती आहे आणि ती कायम राहिली पाहिजे.”

“जंतर-मंतरच्या आंदोलनादरम्यान अनेकांनी सांगितलं की, त्यांच्या आईनंच त्यांना तिथं जायला सांगितलं होतं. अनेकांनी आंदोलनात सामील होण्यासाठी शाळा बुडवली असं सांगितलं. म्हणजेच द्वेषाचे प्रशिक्षण दिलं जात असलं तरी देशात लोक एकमेकांचा हात धरायला शिकले आहेत, याचे हे संकेत आहेत,” असं नेहा म्हणाल्या.

नेहा बोरा

आंदोलनादरम्यान भाजपसमर्थक पालक आणि ज्येष्ठ लोकही त्यांच्याकडे आले आणि काहींनी अगदी रडून विद्यार्थ्यांच्या परिस्थितीबद्दल माफी मागितली, असंही नेहा सांगतात.

फ्रंटलाइनला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी स्वतःच्या कुटुंबाचं उदाहरण दिलं. त्यांची आई भाजप समर्थक असली तरी त्यांनी पोलिसांची कारवाई प्रत्यक्ष पाहिल्यानंतर आंदोलकांचं कौतुक केलं होतं. नेहा यांच्या मते, अशा प्रकारच्या बदलामुळं या चळवळीचा व्यापक सामाजिक प्रभाव पाहायला मिळाला.

अभिजीत दिपके यांच्याशी तुलना

सोशल मीडियावर नुकतीच एक रंजक चर्चा झाली. त्यात नेहा बोरा आणि सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांची तुलना करण्यात आली. त्या दोघांपैकी अधिक परिपक्व कोण? यावर वादविवादही झाला.

अमोक नावाच्या एका एक्स यूझरनं नेहा यांचा फोटो पोस्ट करत लिहिलं की, “परिपक्वपणा म्हणजे नेहा बोरा अभिजीत दीपकेपेक्षा जास्त प्रतिभावान आहे, हे तुम्हाला समजणं. ती GenZ ची खरी आयकॉन आहे आणि तिच्यात जबरदस्त स्वॅग आहे.”

अभिजीत दिपकेनंही ही पोस्ट रिशेयर करत,’मी याच्याशी सहमत आहे’, असं लिहिलं.

नेहा बोरा

या पोस्टनंतर नेहानं लगेचच X वर लिहिलं, “तुलना नाही, एकजूट. आपण यांच्या विरोधात मिळून लढूया.”

त्याला उत्तर देत अभिजीतनं, “इन्कलाब जिंदाबाद” असं लिहिलं.

दिपके नम्र आहेत. तो ऐकूण घ्यायला तयार असतो आणि तो आंदोलकांसारखाच एक विद्यार्थी आणि संघर्षातील त्यांचा सहकारी असल्याचं त्यानं सगळ्यांना दाखवून दिलं होतं, असं नेहानं जंतर-मंतरवरील सीजेपीच्या आंदोलनादरम्यान सांगितलं होतं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC