Source :- BBC INDIA NEWS

26 नोव्हेंबरपासून आमरण उपोषण करत असलेले जगजीत सिंग डल्लेवाल

फोटो स्रोत, SKM NP

पंजाब-हरियाणाच्या सीमेवर खनौरी येथे शेतकरी आपल्या मागण्यांसाठी मोठ्या काळापासून ठिय्या देऊन आहेत. 19 डिसेंबरला येथील मंचावरील हालचाली अचानक थांबल्या.

यानंतर वैद्यकीय पथकाच्या धावपळीवरून समजलं की, आमरण उपोषणाला बसलेल्या जगजीत सिंग डल्लेवाल यांची प्रकृती जास्त खराब झाली आहे. त्यामुळे काही लोक अस्वस्थ दिसले, तर काही भावनिक झालेले दिसले.

थोड्याच वेळात मंचावरून गुरबाणीचा जप सुरू झाला. तेथे उपस्थित लोक डल्लेवाल यांच्यासाठी प्रार्थना करू लागले.

दुपारी भारतीय किसान यूनियनचे (सिद्धपूर) प्रदेश महासचिव काका सिंग कोटडा यांनी जगजीत सिंग डल्लेवाल यांच्या रक्तदाबाची पातळी खूप खालावली होती, अशी माहिती दिली.

ते पुढे म्हणाले की, काही काळ डल्लेवाल बेशुद्ध होते. मात्र आता त्यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा होत आहे.

पोलिसांनी डल्लेवाल यांना बळजबरीने रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही विरोध करू, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.

डल्लेवाल यांचा शेतकरी चळवळीतील सहभाग

बोहड सिंग हे भारतीय किसान युनियन सिद्धपूरचे फरीदकोट जिल्हा अध्यक्ष आणि जगजीत सिंग डल्लेवाल यांचे निकटवर्तीय आहेत.

बीबीसी पंजाबीशी बोलताना ते म्हणाले की, जगजीत सिंग डल्लेवाल यांचं कुटुंब राजस्थानच्या जैसलमेरचं आहे. नंतर हे कुटुंब फरीदकोटमध्ये स्थायिक झालं.

जगजीत सिंग डल्लेवाल यांचा जन्म फरीदकोट जिल्ह्यातील डल्लेवाल गावात झाला.

त्यांचं प्राथमिक शिक्षण फरीदकोट येथे झालं आणि त्यानंतर त्यांनी पंजाबी विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवीचं शिक्षण घेतलं. बोहड सिंग सांगतात की, विद्यार्थी दशेत डल्लेवाल शिख स्टुडंट फेडरेशनच्या कामात सहभागी व्हायचे.

बोहड सिंग सांगतात, “2000 मध्ये जगजीत सिंग डल्लेवाल यांचे मोठे बंधू भारतीय किसान युनियन लखोवाल गटाचे कोषाध्यक्ष झाले. ते फार शिकलेले नव्हते. त्यामुळे ते जगजीत सिंग यांच्या मदतीने सर्व हिशेब ठेवायचे. पुढे भावाची मदत करता करता स्वतः जगजीत सिंग देखील शेतकऱ्यांच्या लढ्यात सामील व्हायला लागले.”

शंभू आणि खनौरी सीमेवर आंदोलन करणारे शेतकरी

फोटो स्रोत, Getty Images

2001 मध्ये भारतीय किसान युनियन लखोवालचे नेते अजमेर सिंग लखोवाल आणि पिशौरा सिंग सिद्धपूर यांच्यात मतभेद झाले आणि मग संघटना फुटली.

दरम्यान, जगजीत सिंग डल्लेवाल सिद्धपूर गटासोबत गेले. त्यांना फरीदकोटच्या सादिक ब्लॉकचे अध्यक्ष करण्यात आलं. त्यानंतर ते फरीदकोटचे जिल्हाध्यक्ष झाले. त्यांनी जवळपास 15 वर्षे या पदावर काम केलं.

सध्या जगजीत सिंग डल्लेवाल भारतीय किसान युनियन सिद्धपूरचे प्रदेशाध्यक्ष आहेत.

70 वर्षीय जगजीत सिंग यांना कर्करोग (कॅन्सर) आहे. 27 जानेवारी 2024 रोजी त्यांच्या पत्नीचे निधन झाले. अशा स्थितीतही शेतकरी प्रश्नावर केलेल्या आंदोलनाने ते शेतकरी आंदोलनाचे प्रमुख नेते म्हणून उदयाला आले.

जगजीत सिंग डल्लेवाल यांचा मुलगा गुरपिंदर सिंग डल्लेवाल यांनी बीबीसीचे प्रतिनिधी अवतार सिंग यांना सांगितलं की, त्यांचे वडील गेल्या 40 वर्षांपासून शेतकरी चळवळीत काम करतात. त्यांनी शेतकरी आंदोलनासाठी जे काही केले ते संपूर्ण जगासमोर आहे आणि त्यांचा संघर्ष सुरुच आहे.

जगजीत सिंग डल्लेवाल यांनी राष्ट्रीय पातळीवरीलही अनेक आंदोलनांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जवळपास 17 एकर जमिनीचे मालक असलेले डल्लेवाल शेतकरी आंदोलनांमुळे अनेकदा तुरुंगातही गेले आहेत.

लाल रेष
लाल रेष

कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनात डल्लेवाल यांची भूमिका

केंद्र सरकारने आणलेल्या तिन्ही कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर झालेल्या शेतकरी आंदोलनात जगजीत सिंग डल्लेवाल यांनी राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची भूमिका पार पाडली. तेथूनच ते महत्त्वाचे शेतकरी नेते म्हणून पुढे आले.

शेतकरी आंदोलनाच्या काळात अनेक शेतकरी नेते काही ना काही कारणाने वादात सापडले. मात्र, डल्लेवाल अशा शेतकरी नेत्यांपैकी होते ज्यांनी कायम नम्रपणाला प्राधान्य दिलं.

डल्लेवाल यांनी मागील पंजाब विधानसभा निवडणूक लढणाऱ्या शेतकरी नेत्यांचा जाहीर विरोधही केला होता.

डल्लेवाल यांच्या उपोषणाने लढ्याला नवं जीवदान?

किसान मजदूर मोर्चा आणि संयुक्त किसान मोर्चा (अराजकीय) यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 13 फेब्रुवारी 2024 रोजी दिल्लीत जाण्याची घोषणा केली होती.

मात्र पोलिसांनी शेतकऱ्यांना पंजाब आणि हरियाणाच्या सीमेवर रोखलं. तेव्हापासून शेतकरी शंभू आणि खनौरी सीमेवरच आंदोलन करत आहेत.

जगजीत सिंग डल्लेवाल पत्रकार परिषदेत बोलताना

फोटो स्रोत, Getty Images

21 फेब्रुवारीला शंभू आणि खनौरी सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी दिल्लीच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. मात्र खनौरी सीमेवर शेतकरी आणि पोलिसांमध्ये झालेल्या झडपेत तरुण शेतकरी शुभकरन सिंगचा मृत्यू झाला. तसेच अनेक शेतकरी जखमीही झाले.

गेल्या 9 महिन्यांपासून शेतकरी हे आंदोलन करत आहेत. आता शेतकरी नेते जगजीत सिंग डल्लेवाल यांनी 26 नोव्हेंबरपासून सुरू केलेल्या या उपोषणामुळे हे शेतकरी आंदोलन पुन्हा एकदा चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहे.

जगजीत सिंग डल्लेवाल यांच्या आमरण उपोषणाने शेतकरी आंदोलनाला नवं जीवदान दिलं आहे, असं मत सामाजिक कार्यकर्ते बलदेव सिंग सिरसा यांनी व्यक्त केलं.

ते म्हणाले की, डल्लेवाल यांच्या उपोषणामुळे राज्यातील मोठ्या पक्षांच्या नेत्यांसह धार्मिक नेतेही या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येत आहेत.

डल्लेवाल यांच्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात शेतकरी आंदोलनात सहभागी होत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी लोकांनी रेल्वे रोखण्याच्या आवाहनावरही अंमलबजावणी केली आहे, असं शेतकरी नेते सतनाम सिंग बहरू यांनी नमूद केलं.

खनौरी सीमा शेतकरी आंदोलनाचं केंद्र

शेतकरी आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीच्या काळात शंभू सीमा शेतकरी आंदोलनाचा केंद्रबिंदू होता. मात्र, जगजीत सिंग डल्लेवाल यांच्या उपोषणानंतर खनौरी सीमा चर्चेत आली.

26 नोव्हेंबरपासून आमरण उपोषण करणारे जगजीत सिंग डल्लेवाल

खनौरी सीमेपासून अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर राहणारे शेतकरी हरजीत सिंग सांगतात की, ज्या दिवसापासून डल्लेवाल आमरण उपोषणाला बसले आहेत, त्या दिवसापासून येथे येणाऱ्या तरुण आंदोलकांची संख्या प्रचंड वाढली आहे. 4-5 किलोमीटरपर्यंत शेतकऱ्यांच्या ट्रॉल्या उभ्या आहेत.

डल्लेवाल यांच्या आमरण उपोषणामुळे प्रभावित होऊन खनौरी सीमेवर आल्याचं या ट्रॉलींवरील तरुणांनी सांगितले.

पटियाला येथून आलेले सुखचैन सिंग म्हणाले, “एवढ्या वयाच्या वृद्ध व्यक्तीनं आमरण उपोषण केलं असेल, तर आपण तरुण असूनही काही का करू शकत नाही, अशी आमची भावना आहे.”

खनौरी सीमेवरील शेतकऱ्यांना कशाची भीती?

या टप्प्यावर आता सरकार जगजीत सिंग डल्लेवाल यांना आंदोलनास्थळावरून उचलून रुग्णालयात दाखल करून सलाईन लावू शकते, अशी भीती खनौरी सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना वाटते.

बहुतांश उपोषणाच्यावेळी पोलीसच आमरण उपोषण करणाऱ्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करतात.

26 नोव्हेंबरपासून आमरण उपोषण करणारे जगजीत सिंग डल्लेवाल

याआधी 26 नोव्हेंबरला पोलिसांनी डल्लेवाल यांना याच आंदोलनातून जबरदस्तीने लुधियाना येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र नंतर शेतकऱ्यांच्या दबावामुळे पोलिसांनी डल्लेवाल यांना सोडलं होतं.

मात्र, शेतकरी नेते बलदेव सिंग सिरसा यांनी कोणत्याही परिस्थितीत जगजीत सिंग डल्लेवाल यांना जबरदस्तीने आंदोलन स्थळावरून हलवू देणार नाही, असं म्हटलं.

दरम्यान, 2015 मध्ये शीख कैद्यांच्या सुटकेसाठी आमरण उपोषण करणाऱ्या सुरत सिंग खालसा यांना जवळपास 8 वर्षे लुधियाना येथील खासगी रुग्णालयात ठेवण्यात आलं होतं.

त्यावेळी सूरत सिंग खालसा यांचं म्हणणं होतं की, अनेक शीख कैद्यांची शिक्षा भोगून पूर्ण झालेली असतानाही त्यांना तुरुंगातच ठेवण्यात आलं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC