Home LATEST NEWS ताजी बातमी पकडले जाण्यापेक्षा मृत्यू पत्करला; रशियासाठी लढणाऱ्या उत्तर कोरियाच्या ‘घोस्ट सोल्जर्स’ची कहाणी

पकडले जाण्यापेक्षा मृत्यू पत्करला; रशियासाठी लढणाऱ्या उत्तर कोरियाच्या ‘घोस्ट सोल्जर्स’ची कहाणी

4
0

Source :- BBC INDIA NEWS

युक्रेनच्या सैन्याने केवळ दोन उत्तर कोरियन सैनिकांना जिवंत पकडले.

फोटो स्रोत, @ZELENSKYYUA/X

एक असा शत्रू, जो प्रचंड गोळीबार सुरू असतानाही मोठ्या संख्येने रणांगणात घुसला, जणू ड्रोन आणि स्वयंचलित शस्त्रांच्या माऱ्याच्या धोक्याची त्याला पर्वाच नव्हती.

‘एलिट घोस्ट सोल्जर्स’ म्हणून वर्णन केले गेलेले हे सैनिक शरणागती पत्करण्याऐवजी आत्महत्या करत होते. हजारोंच्या संख्येने त्यांनी लढा दिला आणि मृत्युमुखी पडले आणि त्यानंतर जणू काही रणांगणातून अदृश्यच झाले.

2024 च्या अखेरीस मॉस्कोच्या प्रदेशावर युक्रेनकडून झालेला हल्ला परतवून लावण्याच्या प्रयत्नात उत्तर कोरियाने रशियन सैन्यासोबत लढण्यासाठी आपले सैनिक पाठवले. त्याची मोठी किंमत उत्तर कोरियाला मोजावी लागली. तैनात करण्यात आलेल्या सुमारे 13 हजार सैनिकांपैकी जवळपास 3 हजार सैनिक लढाईत मारले गेले.

अखेर त्यांनी आपली रणनीती बदलली आणि रशियन सैन्यासोबत मिळून युक्रेनच्या सैन्याला कुर्स्क भागातून मागे हटवले. मात्र लष्करी दृष्टिकोनातून त्यानंतर त्यांच्याबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही. पण युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेंस्की यांच्या म्हणण्यानुसार, उत्तर कोरियाचे सैनिक आणि त्यांची शस्त्रसामग्री लवकरच युक्रेनमधील युद्धात मोठ्या प्रमाणावर पुन्हा सक्रिय होऊ शकते.

झेलेन्स्की यांनी असा इशारा दिला आहे की रशियामध्ये 50 हजारांपर्यंत उत्तर कोरियन सैन्य तैनात केले जाऊ शकते.

फोटो स्रोत, AFP via Getty Images

गेल्या महिन्यात झेलेंस्की यांनी इशारा दिला होता की, रशियामध्ये 50 हजारांपर्यंत उत्तर कोरियाचे सैनिक तैनात केले जाऊ शकतात. यापूर्वी त्यांनी हा आकडा 30 हजार असल्याचे सांगितले होते. त्यांनी दक्षिण कोरियाला आपल्या देशाच्या हवाई संरक्षणासाठी मदत करण्याचे आवाहनही केले.

पण एवढे मोठे नुकसान झाल्यानंतरही उत्तर कोरिया रशियासाठी लढण्यासाठी आणखी सैनिक का पाठवेल? आणि सुरुवातीला पाठवलेल्या सैनिकांचे पुढे काय झाले?

दक्षिण कोरियाची राजधानी सोल येथील आसन इन्स्टिट्यूट फॉर पॉलिसी स्टडीजच्या सेंटर फॉर फॉरेन पॉलिसी अँड नॅशनल सिक्युरिटीचे संशोधक डॉ. यांग उक म्हणाले, “ते अजूनही तिथेच आहेत. युक्रेनकडून होणारा कोणताही प्रतिहल्ला रोखण्यासाठी ते रशियन भूभागाचे संरक्षण करत आहेत. आमच्या मते इंजिनिअरिंग कॉर्प्स किंवा काही कर्मचारी रशियाच्या ताब्यात असलेल्या डोनबास भागात असू शकतात; मात्र ते लढाऊ सैनिक नाहीत.”

युक्रेनियन सैन्य आणि उत्तर कोरियन सैन्य यांच्यात पहिला संघर्ष नोव्हेंबर 2024 मध्ये झाला.

युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाच्या मुख्य गुप्तचर संचालनालयाने (HUR) दिलेल्या अंदाजानुसार, उत्तर कोरियाचे अजूनही सुमारे 8,500 सैनिक रशियन भूभागात आहेत.

हे सैनिक चार ब्रिगेडमध्ये संघटित असून ‘नॉर्थ’ या लष्करी गटाचा भाग म्हणून काम करतात. कुर्स्क भागातील रशियन सीमेला युक्रेनकडून होणाऱ्या घुसखोरीपासून संरक्षण देणे हे त्यांचे काम आहे.

HUR ने बीबीसीला दिलेल्या निवेदनात म्हटले, “ते सक्रिय लष्करी कारवायांमध्ये सहभागी होत नाहीत. युक्रेनच्या तात्पुरत्या ताब्यात असलेल्या प्रदेशांमध्ये कोरियन पीपल्स आर्मीच्या तुकड्या आढळलेल्या नाहीत.”

उत्तर कोरियासाठी हे पहिल्यांदाच

उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्यासाठी कुर्स्कमधील ही लष्करी तैनाती अत्यंत जोखमीची होती. परदेशात पाठवण्यात आलेली ही उत्तर कोरियाची आतापर्यंतची सर्वात मोठी लढाऊ फौज होती.

1973 मध्ये इस्रायलसोबतच्या योम किप्पूर युद्धादरम्यान उत्तर कोरियाने इजिप्तमध्ये सुमारे 1,500 सैनिक आणि प्रशिक्षक पाठवले होते. तसेच 1960 च्या दशकाच्या अखेरीस अंदाजे 87 उत्तर कोरियाचे वैमानिक अमेरिकन सैन्याविरोधात उत्तर व्हिएतनामी सैन्याच्या बाजूने लढले होते.

मोठ्या प्रमाणावर रक्तपात होऊनही कुर्स्कमधील तैनाती हा असा जोखमीचा निर्णय ठरला, ज्यातून उत्तर कोरियाला अनेक फायदे मिळाले. या गरीब आणि जगापासून मोठ्या प्रमाणावर अलिप्त असलेल्या देशाच्या आर्थिक आणि लष्करी स्थितीत अभूतपूर्व बदल घडवून आणणारा हा अनुभव ठरला. भविष्यात अधिक सखोल लष्करी सहकार्यासाठी तो एक आदर्शही ठरू शकतो.

यांग म्हणाले, “उत्तर कोरियाच्या सैनिकांना आता आधुनिक युद्ध म्हणजे काय, हे माहीत झाले आहे.”

रशियामध्ये लढण्यासाठी पाठवलेले सैनिक ‘स्टॉर्म कॉर्प्स’मधील होते. हा उत्तर कोरियाच्या सशस्त्र दलातील विशेष दलाचा भाग आहे. उत्तर कोरिया हा जगापासून मोठ्या प्रमाणावर अलिप्त, हुकूमशाही, लष्करीकरण झालेला आणि कट्टर विचारसरणी असलेला देश आहे.

सुरुवातीला रशिया आणि उत्तर कोरिया या दोन्ही देशांनी आपल्या सैनिकांच्या उपस्थितीला दुजोरा दिला नव्हता. युक्रेनियन सैन्याचा त्यांच्याशी पहिला संघर्ष नोव्हेंबर 2024 मध्ये झाला. जिवंत पकडले गेलेले पहिले उत्तर कोरियाचे युद्धकैदी पुढील वर्षी जानेवारीपर्यंत समोर आले नव्हते.

एप्रिल 2025 पर्यंत रशियाने त्यांची भूमिका अधिकृतपणे मान्य केली नव्हती. मात्र रशियन सशस्त्र दलांचे जनरल स्टाफ प्रमुख व्हॅलेरी गेरासिमोव्ह यांनी रणांगणातील त्यांच्या “शौर्याचे” कौतुक केले होते.

कुर्स्क येथे उत्तर कोरियन सैन्य पाठवणे हे किम जोंग उनसाठी एक जोखमीचे पाऊल होते. उत्तर कोरियाने परदेशात पाठवलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी सैन्य तैनाती होती.

फोटो स्रोत, Reuters

यांग पुढे म्हणाले, “उत्तर कोरियाचे सैनिक खूप धाडसी असतात, विशेषतः ‘स्टॉर्म कॉर्प्स’चे सैनिक. ते आपल्या देशासाठी प्राण देण्यास तयार असतात. पण उत्साह म्हणजे कुशल युद्धकौशल्य असे नाही… कुर्स्क मोहिमेच्या सुरुवातीला त्यांना मोठे नुकसान सोसावे लागले. मात्र त्यांनी आधुनिक ड्रोन युद्धातून धडेही घेतले.”

युक्रेनच्या 95व्या एअर असॉल्ट ब्रिगेडमधील ‘सुल्तान’ नावाच्या सैनिकाने उत्तर कोरियाच्या सैनिकांचे वर्णन “तोफेचे खाद्य” असे केले. 2024 च्या अखेरीस कुर्स्कमधील लढाईत त्याचा या सैनिकांशी सामना झाला होता.

कीवमध्ये नुकतीच आठवण सांगताना तो म्हणाला, “ते एका मोठ्या हल्लेखोर गटाने सुरुवात करायचे. त्यानंतर त्याच ठिकाणी आणखी 15-20 सैनिक पाठवले जायचे आणि मग त्याहून अधिक सैनिक येत. उत्तर कोरियाचे सैनिक वेगळ्या पद्धतीने लढत होते. ते सतत हालचालीत असायचे. त्याचा त्यांना काही फायदा होत होता, पण निर्णायक फायदा मिळत नव्हता.”

त्याच्या म्हणण्यानुसार, उत्तर कोरियाच्या सैनिकांमध्ये आणि त्यांच्या रशियन सहकाऱ्यांमध्ये समन्वय चांगला नव्हता. तसेच सैनिकांकडे आवश्यक साधनसामग्रीचीही कमतरता होती.

लढाईनंतर सुल्तान आणि त्याचे सहकारी शत्रूंच्या मृतदेहांची तपासणी करून कागदपत्रे आणि गुप्त माहिती शोधत असत. रशियन सैनिकांच्या मृतदेहांवर त्यांना वैयक्तिक वस्तू, ओळखपत्रे आणि उपकरणे सापडत. मात्र तो म्हणाला, “जेव्हा आम्ही विशेषतः उत्तर कोरियाच्या सैनिकांची झडती घेतली, तेव्हा त्यांच्याकडे फक्त दारूगोळा सापडला. आम्ही त्यांच्या सर्व छोट्या खिशांचीही तपासणी केली, कुठलेही कागदपत्र नव्हते, काहीही नव्हते.”

इतर युक्रेनियन सैनिकांनी सांगितले की उत्तर कोरियाच्या सैनिकांकडे बॉडी आर्मर, हिवाळी कपडे आणि हेल्मेटचीही कमतरता होती.

रशियन संरक्षण मंत्री आंद्रे बेलौसोव्ह यांच्या उपस्थितीत सैनिकांच्या कुटुंबीयांशी बोलताना, किम यांनी त्यांना युद्धात स्वतःचे बलिदान देण्याचे निवडलेले 'वीर' संबोधले.

फोटो स्रोत, Reuters

युक्रेनच्या हल्ल्याचा एक हादरवून टाकणारा व्हीडिओही समोर आला आहे. त्यात जंगलाच्या परिसरातील बर्फाच्छादित जमिनीवर एक जखमी उत्तर कोरियाचा सैनिक पोटावर पडलेला दिसतो. युक्रेनियन सैनिक जवळ येताच तो आपल्या हनुवटीखाली ग्रेनेडचा स्फोट घडवून आणतो. त्याआधी तो आपल्या अखेरच्या शब्दांत उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांचे नाव घेतो.

एप्रिल 2025 मध्ये प्योंगयांगमधील ‘फॉरेन मिलिटरी ऑपरेशन्स म्युझियम’मध्ये आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात किम यांनी पकडले जाण्याऐवजी आत्महत्या करणाऱ्या सैनिकांचे कौतुक केले.

रशियाचे संरक्षणमंत्री आंद्रे बेलोसोव्ह यांच्या उपस्थितीत सैनिकांच्या कुटुंबीयांना संबोधित करताना त्यांनी म्हटले की, हे “महान सन्मानाचे रक्षण करण्यासाठी कोणताही संकोच न करता स्वतःला उडवून देण्याचा मार्ग निवडणारे नायक” होते.

उत्तर कोरियाने कुर्स्क मोहिमेत मारल्या गेलेल्या सैनिकांची संख्या कधीही अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. मात्र बीबीसी कोरियाने स्मारकस्थळाच्या केलेल्या विश्लेषणानुसार, रशियासाठी लढताना सुमारे 2,300 सैनिक मारले गेले.

युक्रेनची गुप्तचर संस्था HUR च्या मते, मृतांची संख्या 3,000 असून सुमारे 1,500 सैनिक जखमी झाले आहेत.

पण युद्धाचा अनुभव मिळण्याव्यतिरिक्त, उत्तर कोरियाने आपल्या सर्वोत्तम सैनिकांपैकी एवढ्या मोठ्या संख्येने सैनिकांना परदेशातील युद्धात का झोकून दिले?

अनपेक्षित आर्थिक फायदा

सोलस्थित नॅशनल सिक्युरिटी स्ट्रॅटेजी इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ संशोधक लिम सू-हो यांच्या मते, ही तैनाती उत्तर कोरियासाठी अपेक्षित असलेला मोठा आर्थिक फायदा आणि भू-राजकीय विजय ठरली आहे.

त्यांच्या अंदाजानुसार, रशियाला शस्त्रविक्री आणि सैनिकांच्या तैनातीमधून उत्तर कोरियाला सुमारे 10 अब्ज डॉलरचा फायदा झाला आहे.

ते म्हणाले, “उत्तर कोरियाचा वार्षिक GDP सुमारे 30 अब्ज डॉलर असल्याचा अंदाज आहे. म्हणजे शस्त्रांची निर्यात आणि सैनिकांच्या तैनातीच्या माध्यमातून अडीच वर्षांत त्यांनी एका वर्षाच्या GDPच्या सुमारे एक तृतीयांश रक्कम मिळवली आहे. उत्तर कोरियासारख्या छोट्या अर्थव्यवस्थेसाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे.”

आपल्या मनुष्यबळाच्या बदल्यात उत्तर कोरियाला अन्न, तेल आणि परकीय चलन मिळते. चीनचा दावा आहे की, तो उत्तर कोरियाविरोधातील निर्बंधांचे पालन करतो; मात्र रशिया तसे करत नाही.

पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे रशियासोबतच्या सहकार्यामुळे उत्तर कोरियाचे चीनवरील दीर्घकालीन अवलंबित्व बदलले आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये बीजिंगमध्ये किम जोंग उन हे चीनचे नेते शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभे राहिले. तिघांची ही पहिली सार्वजनिक भेट होती. समान दर्जा नसला, तरी आता उत्तर कोरिया केवळ चीनवर अवलंबून राहिलेला नाही.

लिम म्हणाले, “हे महत्त्वाचे आहे. भू-राजकारणात हा मोठा बदल आहे.”

“जेव्हा जेव्हा उत्तर कोरिया आपल्या अलिप्ततेमुळे अडचणीत सापडायचा, तेव्हा तो सर्वप्रथम दक्षिण कोरिया, जपान किंवा विशेषतः अमेरिकेसोबतचे संबंध सामान्य करण्याचा प्रयत्न करायचा. कोरियन द्वीपकल्पातील मुत्सद्देगिरीचा हा नेहमीचा पॅटर्न होता. पण आता रशियासोबतचे संबंध अधिक खोल झाले आहेत. किम जोंग उन यांना असे वाटते की जग नव्या शीतयुद्धाच्या आणि बहुध्रुवीय व्यवस्थेच्या दिशेने जात आहे.”

रशियासोबतची भागीदारी सुरुवातीला आर्थिक आणि लष्करी गरजांमधून सुरू झाली होती. आता ती अधिक खोल आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या संबंधांमध्ये बदलताना दिसत आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये, किम जोंग उनने चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत आपल्या पहिल्या सार्वजनिक बैठकीला हजेरी लावली.

फोटो स्रोत, Reuters

यावर्षी कोरियन वर्कर्स पार्टीच्या नवव्या काँग्रेसमध्ये किम जोंग उन यांचा आत्मविश्वास वाढलेला दिसला. त्यांनी अशा काही उपलब्धींचा उल्लेख केला, ज्या त्यांच्या आजोबा किम इल सुंग आणि वडील किम जोंग इल यांनाही साध्य करता आल्या नव्हत्या.

पण पुढे धोकेही आहेत.

आतापर्यंत कोणत्याही उत्तर कोरियाच्या सैनिकाने युक्रेनमध्ये किंवा रशियाच्या ताब्यातील युक्रेनियन भूभागात लढाई केलेली नाही. जर त्यांनी तसे केले, तर त्याचे राजनैतिक परिणाम होऊ शकतात—विशेषतः दक्षिण कोरियासाठी. दक्षिण कोरिया हा युक्रेनचा समर्थक देश आहे, मात्र आतापर्यंत त्याने केवळ “घातक नसलेली” मदत दिली आहे.

राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांनी याच मुद्द्यावर भर दिला आहे. त्यांनी सोलकडे प्रगत लष्करी उपकरणे, त्यात हवाई संरक्षण यंत्रणांचाही समावेश आहे, देण्याची मागणी केली आहे.

त्यांनी म्हटले आहे की जूनपासूनच रशियाच्या वोरोनेझ भागात उत्तर कोरियाच्या सैनिकांच्या नव्या तुकड्यांच्या स्वागताची तयारी सुरू आहे. तसेच उत्तर कोरिया रशियाला आणखी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे पाठवण्याची तयारी करत असल्याचा दावाही त्यांनी केला.

जुलैमध्ये राष्ट्राध्यक्ष म्हणून केलेल्या भाषणात ते म्हणाले, “रशिया उत्तर कोरियाला आधुनिक युद्धकला शिकण्यास, आपली शस्त्रे अधिक सक्षम करण्यास आणि युद्धाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यास मदत करत आहे. यामुळे आशियातील त्या सर्व देशांसाठी धोका निर्माण झाला आहे, जे उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात येतात.”

युद्धकैदी होणे हा पर्यायच नाही

युक्रेनियन सैन्यासोबतच्या लढाईत उत्तर कोरियाचे केवळ दोन सैनिक जिवंत पकडले गेले. कुर्स्क मोहिमेत 11 हजार ते 14 हजार सैनिक सहभागी झाले होते, हे लक्षात घेतल्यास ही संख्या अत्यंत कमी आहे.

दक्षिण कोरियाच्या नॅशनल इंटेलिजन्स सर्व्हिसनुसार, आणखी एक सैनिक जिवंत पकडला गेला होता; मात्र लढाईत झालेल्या जखमांमुळे त्याचा मृत्यू झाला.

ज्यांनी पकडले जाण्यापेक्षा आत्महत्या करण्याचा मार्ग निवडला, त्या आपल्या सहकाऱ्यांप्रमाणेच या दोन्ही सैनिकांचीही जिवंत पकडले जाण्याची इच्छा नव्हती.

युक्रेनच्या तुरुंगात या सैनिकांची मुलाखत घेणाऱ्या दक्षिण कोरियाच्या MBC या माहितीपटाच्या पथकाला एका युद्धकैद्याने सांगितले, “जोसॉन (उत्तर कोरियाच्या) सैनिकांसाठी युद्धकैदी होणे हाच एक गुन्हा आहे. हा पर्यायच नाही. आम्ही युद्धकैदी होऊ शकत नाही.”

बेक प्योंग-गँग (नाव बदललं आहे) ड्रोन हल्ल्यात जखमी झाल्यानंतर चार दिवस तिथेच पडून होते. त्यानंतर त्यांना पकडण्यात आले. युक्रेनियन सैनिकांना त्यांनी आपले रशियन सहकारी समजल्यामुळे त्यांना फसवून शरण येण्यास भाग पाडले गेले.

दुसरा कैदी ली कांग-यून (नाव बदललं आहे) याने पत्रकार किम यंग-मी यांना सांगितले की, आपण जिवंत राहिल्याचा त्याला अपराधीपणा वाटतो. जवळपास बेशुद्ध अवस्थेत युक्रेनियन सैनिकांना तो रणांगणात सापडला होता. त्याच्या हाताला आणि जबड्याला गंभीर दुखापत झाली होती.

तो म्हणाला, “माझ्याकडे स्वतःला ठार करण्यासाठी ग्रेनेड किंवा चाकू नव्हता.”

युद्धाच्या सुरुवातीच्या काळात ड्रोन हल्ल्यांमध्ये मारल्या गेलेल्या आपल्या अनेक सहकाऱ्यांचे वर्णन त्याने केले. रणांगणावर रक्ताचा दुर्गंध पसरला होता, असेही त्याने सांगितले.

या दोन्ही सैनिकांना उत्तर कोरियात परतण्याची इच्छा नाही. लीने सांगितले की, आपल्याला पकडण्यात आल्याच्या शिक्षेच्या स्वरूपात आपल्या कुटुंबातील सदस्यांना “संपवले” जाईल, अशी त्याला भीती आहे.

दोघांनीही दक्षिण कोरियात पाठवण्याची इच्छा व्यक्त केली असून, सोल त्यांना स्वीकारण्यास तयार आहे.

त्यांच्या परतीची मागणी केवळ रशियाने केली आहे; उत्तर कोरियाने नाही.

मात्र युक्रेन अजूनही दक्षिण कोरियाकडून लष्करी मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे या दोन्ही कैद्यांना दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्याची हमी युक्रेनने दिलेली नाही.

जिवंत पकडलेल्या उत्तर कोरियाई सैनिकांपैकी एकाने सांगितले की, त्याला घरी परतायचे नव्हते कारण त्याला भीती होती की त्याच्या अटकेची शिक्षा म्हणून त्याच्या कुटुंबाला

फोटो स्रोत, @ZELENSKYYUA/X

युक्रेनने म्हटले आहे की युद्धकैद्यांना जबरदस्तीने परत पाठवण्यास प्रतिबंध करणाऱ्या आंतरराष्ट्रीय मानवाधिकारांच्या जबाबदाऱ्यांचे पालन केले जाईल.

त्यांचे भवितव्य अद्याप अनिश्चित आहे. मात्र आणखी उत्तर कोरियाचे नागरिक रशियाच्या युद्धात सहभागी होण्याची शक्यता दिसत आहे.

उत्तर कोरियासाठी त्यांच्या सैनिकांची सेवा आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे. पण रशियालाही या सैनिकांची मोठी गरज आहे.

युक्रेनवरील रशियाच्या पूर्ण क्षमतेच्या आक्रमणाला साडेचार वर्षे उलटल्यानंतर रशियाला सैनिकांची मोठी कमतरता भासत आहे. पाश्चिमात्य आणि युक्रेनियन गुप्तचर संस्थांच्या अंदाजानुसार, रशिया दर महिन्याला भरती होणाऱ्या सैनिकांच्या तुलनेत सुमारे 6 हजार अधिक सैनिक गमावत आहे.

त्यामुळे आपल्या सैन्याची संख्या टिकवून ठेवण्यासाठी रशियाला कोलंबिया, केनिया, कॅमेरून आणि उत्तर कोरियासारख्या देशांमधील परदेशी लढाऊ सैनिकांची मदत घ्यावी लागत आहे.

रशिया आणि उत्तर कोरियासाठी हे परस्पर फायद्याचे संबंध आहेत. मात्र त्याची एक किंमतही आहे.

अखेरीस, उत्तर कोरिया रशियाच्या युद्धात लढण्यासाठी आपले सैनिक पाठवत राहील; पण जोपर्यंत असे करणे त्याच्यासाठी फायदेशीर ठरेल, तोपर्यंतच.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC