Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Reuters
मँचेस्टरमध्ये एका व्यक्तीने पत्नीच्या नकळत तिला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी 60 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. वयाचा विचार करता ही व्यक्ती साठीत असल्याची माहिती मिळाली आहे.
महिलेवर अनेक वेळा बलात्कार, लैंगिक अत्याचार आणि इच्छेविरुद्ध महिलेला औषध देणं यासह अनेक गंभीर आरोप या आरोपीवर आहेत.
जवळपास 20 वर्षे त्यानं पत्नीवर हे अत्याचार केल्याचं न्यायालयीन प्रक्रियेत समोर आलं.
सर्व्हायव्हर महिलेची ओळख गोपनीय राहावी यासाठी तिचा आरोपी असलेल्या पतीचं नावही जाहीर करण्यात आलेलं नाही.
सध्या या अत्याचार प्रकरणाची सुनावणी मँचेस्टरमधील मिन्शुल स्ट्रीट क्राउन कोर्टामध्ये सुरू आहे.
दरम्यान, आरोपीनं आधीच बलात्कारासह विविध गुन्ह्यांमध्ये त्याच्यावर असलेले आरोप मान्य करत दोषी असल्याची कबुली दिली होती.
या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना सर्व्हायव्हर महिला तिच्या कुटुंबासह न्यायालयाच्या प्रेक्षक गॅलरीमध्ये उपस्थित होत्या, अशी माहितीही मिळाली आहे.
आरोपी त्यांच्यावर असलेले प्रत्येक आरोप मान्य करताना भावूक झाल्याचंही पाहायला मिळालं. त्यामुळं त्याची अवस्था पाहून न्यायाधीशांनी त्याला काही वेळ बसायलाही सांगितलं.
60 गुन्ह्यांची कबुली
आरोपीने पत्नीवर केलेलेल्या अत्याचाराशी संबंधित अनेक गंभीर लैंगिक गुन्ह्यांची कबुली दिली.
त्यात बलात्कार, लैंगिक अत्याचार आणि इच्छेविरुद्ध गुंगीचं औषध देणं अशा अनेक गुन्ह्यांचा समावेश आहे.
जवळपास 2004 पासून म्हणजे 20 वर्षांहून अधिक काळासाठी हे अत्याचार सुरू असल्याचं न्यायालयासमोर सांगण्यात आलं.
आरोपी आणि सर्व्हायव्हर महिलेचा अनेक वर्षांपूर्वी विवाह झाला होता. तेव्हापासून गेली अनेक वर्ष हा प्रकार घडल्याचं न्यायालयाच्या कारवाईदरम्यान समोर आलं.
आणखी 13 पुरुषांवर आरोप
धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकरणात फक्त महिलेचा पती हाच एकमेव आरोपी नाही, तर आणखी 13 पुरुषांवर महिलेवरील गंभीर लैंगिक अत्याचारांशी संबंधित गुन्ह्याचे आरोप करण्यात आले आहेत.
आरोप करण्यात आलेल्या या इतर 13 जणांपैकी 12 पुरुषांनी त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप नाकारले आहेत. पण एका व्यक्तीनं मात्र या महिलेवर करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचारांच्या आरोपाची कबुली दिली आहे.
पतीशिवाय इतर आरोपींवर दाखल करण्यात आलेले गुन्हे हे सप्टेंबर 2018 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीतले असल्याचं समोर आलं आहे.
पतीविरुद्धच्या प्रकरणात त्यानं मान्य केलेल्या गुन्ह्यांच्या संदर्भातली कारवाई पूर्ण झाल्यानंतर त्याला शिक्षा सुनावली जाऊ शकते.
तर इतरांवर करण्यात आलेल्या आरोपांच्या प्रकरणात अद्याप न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे.
या प्रकरणामुळं दीर्घकाळ वैवाहिक नात्यात राहणाऱ्या महिलेच्या संमतीशिवाय केलेलं लैंगिक कृत्य, तसेच तिच्या नकळत औषध देऊन तिच्यावर अत्याचार करण्यासारख्या गंभीर बाबी पुन्हा चर्चेत आल्या आहेत.
या प्रकरणातील खटला पुढील काही आठवडे सुरू राहणार आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC




