Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, Youtube/Shemaroo
1 तासापूर्वी
2000 साली आलेल्या हेराफेरी चित्रपटानं प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं होतं. अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी यांच्या विनोदी अभिनयानं चाहत्यांची मनं जिंकली होती. यातील परेश रावल यांनी साकारलेलं बाबूराव गणपत आपटे हे पात्र तर अजरामर झालं आहे.
हेराफेरीला मिळालेल्या यशामुळं 2006 साली ‘फिर हेरा फेरी’ हा सिक्वेल काढण्यात आला. या चित्रपटालाही चांगलं यश मिळालं. अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टीच्या केमिस्ट्रीमुळं हा चित्रपटही चर्चेत राहिला.
आता ‘हेराफेरी 3’ च्या चर्चांदरम्यान, परेश रावल यांनी यात काम करण्यास नकार दिला आहे. यामुळे चाहत्यांमध्ये निराशा पसरली आहे. याशिवाय चित्रपटाचं पुढे काय होणार याविषयी उत्सुकता वाढली आहे.
परेश रावल यांनी ‘हेराफेरी 3’ चित्रपटातून माघार घेतल्याने चर्चांना उधाण आलं. या चित्रपटापासून वेगळं होत असल्याचं परेश रावल यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितलं होतं.
आता या चित्रपटाच्या मुख्य पात्रांपैकी एक असलेल्या सुनील शेट्टीनं परेश रावलशिवाय हा चित्रपट बनवणं शक्य नसल्याचं म्हटलं आहे.
चित्रपटाच्या पहिल्या भागाचे दिग्दर्शक प्रियदर्शन यांनीही परेश रावल यांच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं आहे.
‘हेराफेरी 3’ सोडल्यामुळे अक्षय कुमारनं परेश रावल यांना 25 कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस पाठवली असल्याचं वृत्त माध्यमांत आले. यानंतर या प्रकरणात अनेक घडामोडी होताना दिसत आहेत. मात्र, बीबीसीकडे याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही.
‘हेराफेरी’बद्दल परेश रावल काय म्हणाले होते?
गेल्या काही दिवसांपासून ‘हेराफेरी 3’ मध्ये परेश रावल नसतील अशा बातम्या येत होत्या.
तत्पूर्वी, परेश रावल यांनी लल्लनटॉपला दिलेल्या एका मुलाखतीत हेराफेरीमध्ये काम करण्यास इच्छुक नसल्याचं म्हटलं होतं.
मुलाखती दरम्यान त्यांनी या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेला आणि अभिनयाला ‘गले का फंदा’ असं म्हटलं होतं. त्यांनी असंही सांगितलं की, चित्रपटाचा दुसरा भाग आल्यानंतर त्यांना या भूमिकेमुळे तयार झालेल्या प्रतिमेपासून मुक्ती हवी होती.

फोटो स्रोत, Getty Images
त्यांनी सांगितलं की, या चित्रपटात अभिनय करताना आनंद तर मिळतो, पण ती एक बंधनात्मक गोष्टही असते. परेश रावल म्हणाले होते, “जेव्हा तुम्ही सिक्वेल पाठोपाठ सिक्वेल करता, तेव्हा तुम्ही तिथेच चुका करता.”
याच मुलाखतीत जेव्हा त्यांना अक्षयकुमार तुमचा मित्र आहे का, असा प्रश्न करण्यात आला, तेव्हा सुरुवातीला त्यांनी ‘होय’ असं उत्तर दिलं. परंतु, त्यांनी नंतर पुढं म्हटलं की, “या इंडस्ट्रीत सहकारी असतात, थिएटरमध्ये (नाटक) मित्र असतात आणि शाळेत जीवलग मित्र असतात, तर सिनेमात फक्त सहकारी.”
त्यानंतर परेश रावल यांनी रविवारी (18 मे) एक्सवर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी लिहिलं की, “हेराफेरी 3 मधून मी बाजूला होण्याचा निर्णय क्रिएटिव्ह डिफरन्समुळे (मतभेद) घेतलेला नाही, हे मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो.”
“माझे चित्रपट निर्मात्यांशी कोणतेही मतभेद नाहीत. चित्रपटाचे दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्याबद्दल माझ्या मनात खूप प्रेम, सन्मान आणि विश्वास आहे.”
सुनील शेट्टीनं काय म्हटलं?
सध्या आपल्या ‘केसरी वीर: द लिजेंड ऑफ सोमनाथ’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असलेल्या सुनील शेट्टीला जेव्हा याबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा त्यानं आश्चर्य व्यक्त केलं.
तो म्हणाला, “हा माझ्यासाठी खूप मोठा धक्का आहे. मला हे कालच समजलं आणि वाईट वाटलं. कारण जर एखादा चित्रपट असा असेल ज्याची मी आतुरतेने वाट पाहत होतो, तर तो हेराफेरी होता. 100 टक्के परेश रावल यांच्याशिवाय हा चित्रपट बनूच शकत नाही.”
“1 टक्का शक्यता आहे की तो माझ्या किंवा अक्षयशिवाय बनू शकेल. जर बाबूभैय्यानं राजू आणि शामची धुलाई केली नसती, तर हा सिनेमा चाललाच नसता.”

फोटो स्रोत, Getty Images
सुनील शेट्टी म्हणाला, “मला याबाबत काहीच माहिती नव्हती. मलाही तुमच्यासारखंच माध्यमांमधून आणि सतत येणाऱ्या बातम्यांमधूनच याबद्दल माहिती मिळाली.”
तो म्हणाला, “मला आशा आहे की, सर्व काही ठीक होईल. भले सिनेमा नाही बनला तरी चालेल पण परेश आणि अक्षयमध्ये कोणतेही वैर नको आहे.”
सुनील शेट्टीने टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, “मी परेश रावल यांना फोन केला, पण ते फारसे आनंदी वाटले नाहीत. त्यांनी सांगितलं की, आपण नंतर बोलू. त्यामुळे मीही तिथेच विषय थांबवला.”
सुनील शेट्टीने हेही सांगितलं की, त्याने अक्षय कुमारशीही बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यालाही या सगळ्याचा काही अंदाज नव्हता.
अक्षयकुमारची नोटीस आणि प्रियदर्शन यांची प्रतिक्रिया
अक्षय कुमारने त्याच्या ‘केप ऑफ गुड फिल्म्स’ या प्रॉडक्शन हाऊसमार्फत परेश रावल यांना 25 कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस पाठवली असल्याचा दावा इंग्रजी वृत्तपत्र हिंदुस्तान टाइम्सने एका एक्सक्लूझिव रिपोर्टमध्ये केला आहे.
माध्यमातील वृत्तानुसार, परेश रावल यांना ही नोटीस त्यांच्या अव्यवसायिक वागणुकीमुळे, कायदेशीर करारावर स्वाक्षरी करून आणि शूटिंग सुरू झाल्यानंतर चित्रपट सोडल्यामुळे पाठवण्यात आली आहे.
हिंदुस्तान टाइम्सने जेव्हा या बातमीबाबत ‘हेराफेरी’च्या पहिल्या भागाचे दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्याशी संपर्क साधला, तेव्हा त्यांनी सांगितलं, “अक्षयकडे कायदेशीर पाऊल उचलण्याचा पूर्ण अधिकार आहेत. कारण त्याचे पैसे या चित्रपटात गुंतले आहेत.”

फोटो स्रोत, Getty Images
त्यांनी हेही सांगितले की, अक्षयकुमारने या चित्रपटाचे हक्क निर्माता फिरोज नाडियादवाला यांच्याकडून खरेदी केले होते.
“मला माहीत नाही हे सगळं का घडलं, कारण परेशनं आम्हाला याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. चित्रपट सुरू करण्यापूर्वी अक्षयनं मला सांगितलं होतं की, मी परेश आणि सुनीललाही याबाबत विचारावं आणि मी तसं केलं. दोघंही तयार होते,” असंही त्यांनी नमूद केलं.
प्रियदर्शन पुढे म्हणाले, “माझ्याकडे गमावण्यासारखं काहीच नाही, पण अक्षयनं पैसे गुंतवले आहेत.0 त्यामुळेच कदाचित त्यानं असा निर्णय घेतला असू शकतो. परेश रावलनं अजूनपर्यंत याबाबत माझ्याशी काहीही चर्चा केलेली नाही.”
हिंदुस्तान टाइम्सच्या या रिपोर्टमध्ये असंही नमूद करण्यात आलं आहे की, त्यांनी याबाबत प्रतिक्रियेसाठी परेश रावल यांच्याशी संपर्क साधला होता. त्यावर त्यांनी “मला याबाबत काहीच माहिती नाही,” असं म्हटलं.
सोशल मीडियावर चाहत्यांनी काय म्हटलं?
परेश रावल यांनी हेराफेरी 3 मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यावर या चित्रपटाच्या प्रेक्षकांमधून निराशा व्यक्त होत आहे.
एका युजरनं एक्सवर लिहिलं, “हेराफेरी 3 बाबत ज्या गोष्टी समोर येत आहेत, त्या लवकर सोडवल्या जातील, अशी आशा करतो. या तिघांमध्येच (परेश रावल, सुनील शेट्टी, अक्षय कुमार) खरी जादू आहे, यातील एक जरी कमी झाला, तर हा आयकॉनिक सिनेमा कमजोर ठरेल.”

फोटो स्रोत, Base Industries Group
एका दुसऱ्या युजरनं लिहिलं, “हेराफेरीमध्येच हेराफेरी होली. बाबू भैय्याशिवाय हा चित्रपट कसा होईल?”
“बाबू भैय्याशिवाय चित्रपटात मजा येणार नाही,” असं आणखी एका युजरनं म्हटलं
“हेराफेरी परेश रावलशिवाय म्हणजे, जशी मंदीराशिवाय घंटी किंवा चहा शिवाय साखर. बाबू भैय्याच्या निरागसतेनं, चतुराईनं आणि हास्यभावानं चित्रपटाला अमर केलं आहे.”
“त्यांची संवादफेक आणि कॉमिक टायमिंग लोकांच्या हृदयात घर करून राहिली आहे. ती भूमिका (पात्र) नाही, तर भावना आहे, त्यांच्याशिवाय हास्यही अपूर्ण वाटेल,” असं एका युजरनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC