Source :- BBC INDIA NEWS

मयिलादुथुराई जिल्ह्यातील पुम्पुहार येथे मागील 2 आठवड्यांपासून समुद्राच्या तळाशी उत्खनन सुरू होतं. तामिळनाडू पुरातत्त्व विभागाकडून सुरू असलेलं हे उत्खनन 22 सप्टेंबर रोजी पूर्ण झालं.
तामिळनाडूचे शालेय शिक्षण आणि तमिळ विकास मंत्री राजमोहन यांनी 6 सप्टेंबरला या उत्खननाला सुरुवात केली होती.
या उत्खननात पुम्पुहारच्या समुद्र परिसरातून 250 हून अधिक पुरातत्त्वीय वस्तू सापडल्याची माहिती पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी दिली आहे.
जमिनीवर केल्या जाणाऱ्या उत्खननापेक्षा समुद्राच्या तळाशी उत्खनन करणं अधिक आव्हानात्मक असतं.
हे उत्खनन नेमकं कसं करण्यात आलं? आतापर्यंत सापडलेल्या पुरातत्त्वीय अवशेष किंवा वस्तूंमुळे पुम्पुहारबद्दलच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील का?
पुम्पुहार- जुनं बंदर शहर
तमिळ लोक आणि तामिळनाडूच्या इतिहासाबद्दल चर्चा होताना, प्राचीन बंदर शहर पुम्पुहारचाही प्रामुख्याने उल्लेख केला जातो.
तामिळनाडू पुरातत्त्व विभागाच्या माहितीनुसार, पुम्पुहार हे इसवी सन पूर्व चौथ्या शतकात एक समृद्ध बंदर शहर होतं. एकेकाळी हे शहर चोल राजांची राजधानी होती.
अकनानुरु, पुराणानुरु आणि पट्टिनप्पलाई यांसारख्या संगम साहित्यामध्ये, तसेच शिलप्पदिकारम आणि मणिमेकलई या महाकाव्यांमध्ये प्राचीन कावेरीपुम्पट्टिनम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुम्पुहारचा सविस्तर उल्लेख आहे.
संगम साहित्यामध्ये पुम्पुहारमध्ये उंच इमारती आणि वैष्णव, शैव, बौद्ध आणि जैन धर्मांची मंदिरं होती.

चारही दिशांना घुमणारा आवाज
शिलप्पदिकारममध्ये ‘भूतसथुक्कम’ नावाच्या एका ठिकाणाचा उल्लेख आहे, जिथे भूत लोकांना पकडून खात असत, असं सांगितलं आहे.
म्हणजेच, प्राचीन पुम्पुहार शहर सुमारे चार कादम अंतरापर्यंत पसरलेले होते. एक कादम म्हणजे साधारण 7.5 किलोमीटर.
पट्टिनप्पलाई या ग्रंथात कावेरीपुम्पट्टिनम हे कावेरी नदीच्या उत्तरेकडील काठावर वसले होते, असं सांगितलं आहे.
या ओळींमध्ये पुम्पुहारच्या मोठ्या व्यापाराचं वर्णन केलं आहे. येथे वेगवेगळ्या भागांतून अनेक मौल्यवान वस्तू येत होत्या. उत्तरेकडील डोंगरातून सोनं आणि रत्ने, पश्चिमेकडून चंदन आणि अगरू, दक्षिणेकडील समुद्रातून मोती, गंगेच्या प्रदेशातून वस्तू, कावेरीच्या परिसरातील उत्पादनं, श्रीलंकेतून खाद्यपदार्थ आणि काझगममधून विविध वस्तू पुम्पुहारमध्ये येत होत्या. या वस्तूंमुळे शहरातील बाजारपेठ खूप मोठी आणि गजबजलेली होती.
पट्टिनप्पलाईमध्ये पुम्पुहार येथे अनेक देशांमधून आलेल्या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या जात होत्या, असं वर्णन त्यात केलं आहे.
फोटो स्रोत, TNSAD
तामिळनाडू पुरातत्त्व विभागाच्या ‘पुम्पुहार समुद्रतळ उत्खनन संग्रहालय मार्गदर्शिका’मध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे.
थायलंडमधील तगुआ-पा या ठिकाणी इसवी सन 9व्या शतकातील एक तमिळ शिलालेख आहे. हा शिलालेख पल्लव राजा तिसरा नंदीवर्मन यांच्या काळातील आहे. त्यात नांगूरमधील ‘मणिक्किरामथर’ नावाच्या व्यापाऱ्यांच्या गटाने ‘अवणी नारायणम’ नावाचे तलाव खोदल्याचा उल्लेख आहे.
नांगूर आणि मणिक्किरामथर ही दोन्ही ठिकाणे पुम्पुहारच्या अगदी जवळ आहेत, असे या मार्गदर्शिकेत म्हटलं आहे.
पुम्पुहारमध्ये दिवस-रात्र बाजारपेठा सुरू असायच्या. तिथे व्यापार चालायचा. या बाजारांना ‘नालंगडी’ (दिवसभराची बाजारपेठ) आणि ‘अल्लंगडी’ (रात्रीची बाजारपेठ) अशी नावं होती. तिथला व्यापारी परिसर ‘पट्टिनप्पाक्कम’ आणि श्रीमंत लोक राहत असलेला भाग ‘मरुवूरप्पाक्कम’ म्हणून ओळखला जात असे.
पुम्पुहारच्या आसपासच्या गावांमध्येही वस्तूंचा मोठ्या प्रमाणावर व्यापार व्यापारी गटांच्या माध्यमातून होत असत. मणिक्किरामम, थलाचांगडू, वानागिरी, किळैयूर, थिरुवेंकडू आणि नांगूर ही त्यातील काही ठिकाणं होती.
पुम्पुहार म्हणजे कावेरी नदी जिथे समुद्राला मिळते ते ठिकाण. या शहराला कावेरीपूम्पट्टिनम, काकंती, सांबापथी, पल्पुगझ-मुथुर, मन्नागत्तु वानपाथी, चोलपट्टिनम, कावेरिस एम्पोरियम आणि कोलापट्टिनम अशा अनेक नावांनीही ओळखलं जात होतं.
उत्तर भारतातील भारहूत या ठिकाणी इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकातील एक बौद्ध स्तूप आहे. तामिळनाडू पुरातत्त्व विभागाच्या ‘पुम्पुहार समुद्रतळ उत्खनन संग्रहालय मार्गदर्शिके’मध्ये या स्तुपासाठी पुम्पुहारला ‘कागंथी’ असंही म्हटलं जात असे आणि तिथल्या ‘सोम’ नावाच्या व्यक्तीने या स्तूपाला देणगी दिली होती.
तामिळनाडू पुरातत्त्व विभागाचे सल्लागार प्राध्यापक के. राजन म्हणतात, “संगम साहित्य आणि शिलालेखांमधून पुम्पुहारबद्दलचे अनेक उल्लेख आढळून येतात. परंतु, ठोस आणि वैज्ञानिक निष्कर्ष मिळावेत यासाठी सविस्तर उत्खनन केलं जात आहे.”
पुम्पुहारमधील समुद्रतळ उत्खनन
पुम्पुहारमध्ये जमिनीवर आणि समुद्राच्या तळाशीही उत्खनन करण्यात आले आहे. या उत्खननादरम्यान जुन्या इमारतींचे अवशेष, प्राचीन नाणी, मातीच्या भांड्यांचे तुकडे, भाजलेल्या मातीच्या वस्तू आणि मणी यांसारख्या अनेक पुरातत्त्वीय वस्तू सापडल्या आहेत.
तामिळनाडू पुरातत्त्व विभागाच्या माहितीनुसार, पुम्पुहारमध्ये 1910 पासूनच संशोधन सुरू झाले. 1963-64 मध्ये पुम्पुहारमधील पल्लवनीश्वरम येथे एक बौद्ध विहार आढळून आले.
यानंतर, 1995-96 मध्ये मणिक्किरामम किळारवेली येथे झालेल्या उत्खननात प्राचीन बोटींचा धक्का (नौका घाट किंवा बोट जेट्टी) सापडला. तिथे मातीपासून बनवलेले बुद्धाच्या पावलांचे चिन्ह किंवा पाऊलखुणाही सापडल्या.
तसेच पानं, पक्षी, घोडा आणि बोटीची चित्रं असलेले रोमन मातीच्या भांड्यांचे तुकडे मिळाले. संशोधकांच्या मते, हा प्राचीन बोटींचा धक्का इसवी सन पूर्व चौथ्या शतकातील असावा.
याआधी झालेल्या समुद्रतळ उत्खननात जुन्या इमारतींचे अवशेष आणि काळ्या-लाल रंगाच्या मातीच्या भांड्यांचे तुकडे सापडले होते.
फोटो स्रोत, TNSAD
तामिळनाडू पुरातत्त्व विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुम्पुहारमध्ये रोमन काळातील रुलेटेड, अरेटाइन आणि अँफोरा प्रकारच्या मातीच्या भांड्यांचे तुकडे, तसेच मधाच्या किंवा दारूच्या भांड्यांचा तळाचा भाग आणि मध्ययुगीन काळातील भांड्यांचे अवशेष सापडले आहेत.
वनगिरी तोसक्कुलम येथील उत्खननात ब्राह्मी लिपी कोरलेला मातीच्या भांड्याचा तुकडाही सापडला. यावरून इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात पुम्पुहारचे उत्तर भारत आणि परदेशांशी व्यापारिक संबंध होते, असे पुरातत्त्व विभागाचं म्हणणं आहे.
पुम्पुहारच्या दक्षिणेकडे, कावेरी नदी समुद्राला मिळते त्या ठिकाणापासून सुमारे 4 किलोमीटर अंतरावर समुद्रात एक जहाज बुडाल्याचे आढळून आले. हे जहाज इसवी सन 18व्या शतकातील असल्याचे तामिळनाडू पुरातत्त्व विभागाच्या नोंदीतून दिसून येते.
तामिळनाडू पुरातत्त्व विभागाचे सहसंचालक यथीश कुमार म्हणतात, “हे डॅनिश जहाज होते. सध्या सुरू असलेल्या तिसऱ्या टप्प्यातील उत्खननात आम्ही या जहाजाच्या अवशेषांचाही अभ्यास केला.”
तिसऱ्या टप्प्यातील उत्खननात काय सापडलं?
आतापर्यंत झालेल्या पुरातत्त्वीय संशोधनातून पुम्पुहार शहर अस्तित्वात होते, याचे पुरावे आढळून आले आहेत, असं संशोधकांचं मत आहे. परंतु, या शहराचा किती भाग नष्ट झाला, तो कधी नष्ट झाला आणि याचा विनाश हळूहळू झाला की एखाद्या मोठ्या आपत्तीमुळे एकाच वेळी झाली, याबाबत अद्याप ठोस निष्कर्ष निघालेला नाही.
प्राध्यापक के राजन म्हणतात, “पुम्पुहारचा सुमारे 2 कादम (अंतराचे एक प्राचीन एकक) भाग समुद्रात बुडाला असावा. शहराचा इतका मोठा भाग समुद्रात कसा गेला, हे शोधणे महत्त्वाचं आहे. समुद्राची पातळी वाढली की जमीन खाली गेली, हे तपासावं लागेल. त्याचा शोध घेण्याची ही सुरुवात आहे.”
फोटो स्रोत, TNSAD
पुरातत्त्व संशोधक यथीश कुमार यांनी सांगितलं की, दोन आठवड्यांहून अधिक काळ चाललेल्या या तिसऱ्या टप्प्यातील समुद्रतळ उत्खननात 250 हून अधिक पुरातत्त्वीय वस्तू किंवा अवशेष सापडले आहेत.
ते म्हणतात, “यापूर्वी झालेल्या समुद्रतळ उत्खननात अशा प्रकारची मातीची भांडी कधी सापडली नव्हती.पण, यावेळी 250 हून अधिक मातीच्या भांड्यांचे तुकडे मिळाले आहेत. हा आमच्यासाठी महत्त्वाचा पुरावा आहे. मोठ्या आकाराच्या साठवणुकीच्या भांड्यांचे तुकडेही सापडले आहेत. अशा भांड्यांचा वापर व्यापारी जहाजांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जात असत. परंतु, ही भांडी नेमकी किती जुनी आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.”
“या वस्तूंचा सविस्तर अभ्यास केल्यास, पुम्पुहारमध्ये कोणत्या प्रकारचा व्यापार होत होता, हे स्पष्ट होईल.”
किलाडीशी साधर्म्य
किलाडी येथे सापडलेल्या पुरातत्त्वीय वस्तूंच्या कार्बन तपासणीतून किलाडीची संस्कृती इसवी सन पूर्व सहाव्या शतकातील असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गंगेच्या खोऱ्यात इसवी सन पूर्व सहाव्या शतकाच्या आसपास दुसरी नागरी संस्कृती विकसित झाली. सिंधू संस्कृतीला पहिली नागरी संस्कृती मानलं जातं. किलाडीच्या उत्खननामुळे तामिळनाडूमध्ये शहरांची सुरुवात कधी झाली, याबाबतच्या चर्चेला नवीन दिशा मिळाली.
किलाडीच्या उत्खननातून इसवी सन पूर्व सहाव्या शतकाच्या आसपास तामिळनाडूमध्येही शहरांची संस्कृती अस्तित्वात होती, असे संकेत दिसून आले. त्यामुळे किलाडी संपूर्ण भारतात चर्चेचा विषय बनला.
पुम्पुहारच्या समुद्रतळ उत्खननात किलाडी येथील उत्खननाशी मिळतेजुळते विहिरी-पाणवठे आणि काळ्या-लाल रंगाच्या मातीच्या भांड्यांचे तुकडे सापडले आहेत.

तामिळनाडू पुरातत्त्व विभागाच्या मते, सापेक्ष कालमापन म्हणजेच रिलेटिव्ह डेटिंग पद्धतीनुसार या वस्तू इसवी सन पूर्व सहाव्या किंवा पाचव्या शतकातील, म्हणजेच संगम काळातील असू शकतात. परंतु, कार्बन तपासणीसारख्या वैज्ञानिक पद्धतीने त्याची अद्याप खात्री झालेली नाही.
यथीश कुमार म्हणाले, “पुम्पुहारमध्ये बौद्ध विहार आणि जल व्यवस्थापनाशी संबंधित साधनं होती, हे उत्खननातून समोर आले आहे. ही सर्व बांधकामं संगम काळातील विटांनी केली होती. किलाडी आणि अरिकमेडू येथे जशा विटा सापडल्या आहेत, तशाच प्रकारच्या विटा पुम्पुहारमध्येही आढळून आल्या आहेत.”
यथीश कुमार सांगतात, “यावेळी पुम्पुहारमध्ये विहिरींचे अवशेषही सापडले असून त्यांचा अभ्यास करण्यात आला. या विहिरींचा व्यास 65 सेंटीमीटरपेक्षा जास्त आहे. किलाडी येथे सापडलेल्या विहिरींशी त्यांची तुलना करता त्या एक सारख्याच दिसतात. अशा विहिरी आढळून येतात, याचा अर्थ त्या परिसरातून नदी वाहत असावी. त्यामुळे नदी वाहत असल्याचे पुरावे कुठे मिळतात, याचाही आम्ही शोध घेतला.”
समुद्रतळ उत्खननातील आव्हानं
तामिळनाडूमध्ये पुरातत्त्व विभागाने यापूर्वी किलाडी, आदिचनल्लूर, शिवकलई, कोडुमणल, अळगनकुलम आणि अरिकमेडू अशा अनेक ठिकाणी उत्खनन केलं आहे.
मात्र, त्या तुलनेत समुद्रतळावर उत्खनन करणे आणि पुरातत्त्वीय वस्तू शोधणे अधिक कठीण आणि आव्हानात्मक आहे. सागरी जीवांचा धोका, तळाशी कमी सूर्यप्रकाश आणि खराब हवामान अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
पुम्पुहारच्या पाण्याखाली उत्खननाच्या पथकात विशेष प्रशिक्षण घेतलेले 4 पुरातत्त्व संशोधक आणि त्यांना मार्गदर्शन करणारे काही स्कुबा डायव्हिंग तज्ज्ञ आहेत.

यथीश कुमार सांगतात, “पाण्याखालील उत्खनन करण्यासाठी आम्ही योग्य साधनं आणि विशेष प्रशिक्षण घेतलेलं असतं. आम्ही समुद्रात 30 मीटर खोलीपर्यंत जाऊ शकतो. पाण्याखालील आमच्या सर्व हालचालींवर वरच्या बाजूला असलेल्या बोटीतून लक्ष ठेवलं जातं.”
“समुद्रात उतरताना आम्ही विशेष कॅमेरेही सोबत घेऊन जातो. पाण्याखाली प्रकाश कमी असतो. तिथे असलेल्या जुन्या बांधकामांच्या अवशेषांमध्ये मच्छीमारांची जाळी अडकलेली असतात. ही जाळी आमच्या पायात अडकणार नाही याची काळजी घेत आम्हाला उत्खनन करावं लागतं.”
ते म्हणतात, “सागरी जीवांपासूनही सावध राहावं लागतं. उदाहरणार्थ, जेलीफिशचा स्पर्श झाला तर भाजल्यासारखी वेदनादायी जळजळ होते. समुद्रात शार्कही असतात. या जीवांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी लागते. ते जवळ आले तरी घाबरून किंवा गोंधळून जाता कामा नये. अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.”
22 सप्टेंबर रोजी या टप्प्यातील समुद्रतळ उत्खननाचं काम पूर्ण झालं. परंतु, पावसाळ्यात समुद्राची परिस्थिती बदलत राहते आणि ती धोकादायकही ठरू शकते. त्यामुळे पुढचं उत्खनन जानेवारीमध्ये पुन्हा सुरू होणार आहे.
पुढील टप्प्यांमध्ये समुद्रात गडप झालेल्या या प्राचीन बंदर शहराविषयी आणखी अनेक महत्त्वाची आणि आश्चर्यकारक माहिती समोर येईल, अशी संशोधकांना अपेक्षा आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
SOURCE : BBC



