Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, X/White House
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एआयच्या मदतीने बनवलेला एक फोटो पोस्ट केल्यामुळे काही कॅथलिक धर्मियांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. या फोटोमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी पोप यांच्या वेशभूषेत दिसत आहेत.
पोप फ्रान्सिस यांचं 21 एप्रिल रोजी निधन झालं. कॅथलिक धर्मीय लोक पोप यांच्या मृत्यूचा शोक व्यक्त करत आहेत आणि पुढचे पोप निवडण्याची तयारी सुरू असतानाच व्हाईट हाऊसच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यांवरून हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे.
न्यूयॉर्क स्टेट कॅथलिक कॉन्फरन्सने ट्रम्प यांनी धर्माचा अपमान केल्याची टीका केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना विनोदाने असं म्हटलं होतं की, “मला पोप व्हायला आवडेल.” आणि या विधानानंतर काही दिवसांनी हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे.
कॅथलिक धर्माचा उपहास केल्याने टीका झालेले ट्रम्प हे पहिले राष्ट्राध्यक्ष नाहीयेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी एक वर्षापूर्वी फ्लोरिडातील टाम्पा येथे गर्भपाताच्या समर्थनार्थ आयोजित केलेल्या एका सभेत क्रॉसचं चिन्ह बनवल्यामुळे त्यांच्यावर देखील सडकून टीका झाली होती.
व्हॅटिकनचे प्रवक्ते मॅटिओ ब्रुनी यांनी शनिवारी (3 मे) रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टविषयी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास नकार दिला.
पोप फ्रान्सिस यांच्यानंतर पुढील पोप निवडण्यासाठी व्हॅटिकनमध्ये एक परिषद आयोजित करण्यात येणार आहे. या परिषदेची सुरुवात बुधवारपासून (7 मे) होईल.

फोटो स्रोत, Instagram
शुक्रवारी (2 मे) रात्री ट्रम्प यांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये त्यांनी बिशप घालतात तसा पारंपरिक पोशाख घातलेला दिसून येतो. या फोटोत ट्रम्प यांनी गळ्यात मोठा क्रॉस घातला आहे, त्यांनी एक बोट उचललं आहे आणि चेहऱ्यावर गंभीर भाव आहेत.
न्यूयॉर्क मधील बिशप्सचं प्रतिनिधित्व करणाऱ्या न्यूयॉर्क स्टेट कॅथलिक कॉन्फरन्सने एक्सवर पोस्ट करून ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे.
त्यांनी लिहिलंय, “माननीय राष्ट्राध्यक्ष हा फोटो अजिबात विनोदी नाहीये किंवा असा फोटो पोस्ट करणे हे काही हुशारीचं लक्षण नाहीये.”
“आम्ही नुकतेच आमच्या लाडक्या पोप फ्रान्सिस यांच्यावर अंत्यसंस्कार केले आहेत. आणि कार्डिनल्स सेंट पीटरचे नवीन उत्तराधिकारी निवडण्यासाठी परिषदेची सुरुवात करत आहेत. आमची थट्टा करू नका.”
डाव्या विचारसरणीचे इटलीचे माजी पंतप्रधान मॅटेओ रेन्झी यांनीही ट्रम्प यांच्या पोस्टवर टीका केली.
रेन्झी यांनी एक्सवर लिहिलं, “हा फोटो श्रद्धाळूंच आणि संस्थांचा अपमान करणारा आहे. आणि उजव्या विचारांच्या या नेत्याला दुसऱ्यांचा उपहास करणं आवडतं हेच यावरून दिसतंय.”
व्हाईट हाऊसने मात्र डोनाल्ड ट्रम्प पोप या पदाचा अपमान करत असल्याचे आरोप फेटाळून लावले आहेत.
प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट म्हणाल्या, “पोप फ्रान्सिस यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प इटलीला गेले आणि ते कॅथलिक आणि धार्मिक स्वातंत्र्याचे कट्टर समर्थक राहिले आहेत.”
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
SOURCE : BBC