Source :- BBC INDIA NEWS

तरुणाला मारहाण करतानाच व्हीडिओ व्हायरल झाला

नांदेड शहरात 18 वर्षीय तरुणाला चोरीच्या संशयावरुन मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबलसहित त्याच्या दोन मित्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती नांदेड पोलिसांनी दिली आहे.

पोलीस कॉन्स्टेबलविरोधात चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पीडित तरुण नांदेड शहरात नीट परीक्षेची तयारी करत आहे.

गाडी चोरीचा आरोप करत पोलीस कर्मचारी आणि त्याच्या मित्रांनी तरुणाच्या तोंडात रुमाल कोंबून त्याला बेदम मारहाण केली. 5 आणि 6 जानेवारी रोजी हा प्रकार घडला आहे.

या मारहाणीचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हीडिओमध्ये तरुणाच्या तोंडात रुमाल कोंबून पोलिसाच्या काठीने त्याला अमानूष मरहाण केली जात असल्याचं दिसत आहे.

लाल रेष
लाल रेष

या घटनेची दखल घेत आरोपी पोलीस कॉन्स्टेबल आकाश सावंत याला निलंबित करण्यात आलं असून, त्याच्यावर डिपार्टमेंटल चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिली आहे.

या प्रकरणातील तिन्ही आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

‘वेगवेगळे कारणं सांगत मारहाण’

हा तरुण नांदेड शहरात नीट परीक्षेची तयारी करायला आला होता. शहरातील श्रीनगर भागातील एका हॉस्टेलमध्ये तो राहत होता.

या प्रकरणासंदर्भात तरुणाने माध्यमांना माहिती दिली.

तो म्हणाला, “5 जानेवारीच्या रोजी पोलीस कॉन्स्टेबल आकाश सावंत व त्याचे मित्र क्षीतिज कांबळे आणि श्रावण हे तिघे माझ्या रूमवर पोहोचले. आम्ही महाराष्ट्र पोलीसचे कर्मचारी आहोत, असं म्हणत त्यांनी मला दुचाकी आणि सोन्याची चैन चोरली का? असा सवाल केला. त्यानंतर तिघांनी मला बाहेर नेलं.

“गाडी चोरली, सोन्याची चैन चोरली, गर्लफ्रेंडला छेडलं असे वेगवेगळे कारणं सांगत मला अशोक नगर, गोकूळ नगर, आसना नदी अशा वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बेदम मारहाण केली. इतकंच नाही तर दुसऱ्या दिवशी परत वसतिगृहाच्या खोलीत येऊन मला मारहाण केली.”

पोलीस कॉन्स्टेबल आकाश सावंत

फोटो स्रोत, mustan mirza

या घटनेशी संबधित दोन व्हीडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहेत. एका व्हीडिओत क्षितीज कांबळे हा पोलीस कॉन्स्टेबल आकाश सावंतच्या काठीने तरुणाला मारहाण करताना दिसत आहे.

इतकंच नाही तर त्याच्या ओरडण्याचा आवाज इतरांना येऊ नये म्हणून मारहाण करताना त्याच्या तोंडात रुमाल कोंबण्यात आल्याचंही दिसत आहे.

तर दुसऱ्या व्हीडिओमध्ये, एकजण मोबाईलने व्हीडिओ काढत तरुणाला मारहाणीत झालेल्या जखमा दाखवत आहे. तसेच ‘होय, मीच याला मारलं’ असं बाजूलाच उभा असलेला पोलीस कॉन्स्टेबल आकाश सावंत म्हणत असताना दिसत आहे.

तरुणाच्या अंगावर जखमा

या मारहाणीत पीडित तरुणाच्या अंगावर जखमा झाल्या आहेत. मारहाण करुन आरोपींनी त्याला तीन दिवस सोबतच ठेवलं होतं. कुणाला सांगितलं तर तुला सोडणार नाही, अशी धमकी त्याला दिली होती.

झालेल्या प्रकारामुळे हा तरुण इतका भयभयीत झाला होता की त्याने काही दिवस आपल्या घरी काही सांगितलं नाही.

भाग्यनगर पोलीस स्टेशन

फोटो स्रोत, mustan mirza

अखेर त्याची अवस्था बघून त्याच्या मित्राने झालेला प्रकार त्याच्या वडिलांना सांगितला. पीडित तरुणाचे वडील तत्काळ शहरातील भाग्य नगर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, या घटनेमुळे संबंधित हॉस्टेलमधील मुलं भयभीत झाली आहेत. अनेक जण भीतीपोटी गावाकडे निघून गेले आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC