Source :- BBC INDIA NEWS

वाचन वेळ: 6 मिनिटे
18 सप्टेंबर रोजी आयआयटीतील विद्यार्थी साहिल वाकोडेच्या मृत्यूप्रकरणानंतर मुंबई विद्यापीठात अनेक घडामोडी घडत आहेत.
साहिलच्या मृत्यूनंतर आयआयटी मुंबईने प्रा. सुर्यनारायण डुल्ला यांना प्रशासकीय कामकाज अधिष्ठाता (अॅडमिनिस्ट्रेटिव्ह अफेअर्स डीन) यांना या पदावरुन हटवण्यात आल्याची माहिती आयआयटी मीडिया कोऑर्डिनेटरने 21 सप्टेंबर दिली होती.
प्रा. डुल्ला यांच्यावर कारवाई करण्यात येऊ नये अशी मागणी तेव्हापासून सुरू झाली. या मागणीसाठी प्रा. डुल्ला यांच्या समर्थनार्थ आयआयटी मुंबईतील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी 22 सप्टेंबर रोजी मोर्चा काढला.
18 सप्टेंबर रोजी मुंबईतील आयआयटीमध्ये द्वितीय वर्षात शिकणारा विद्यार्थी साहिल वाकोडेचा मृतदेह खोलीत आढळल्यानंतर विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात आले होते.
साहिलच्या मृत्यूनंतर त्याच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. साहिलला जातिवाचक शिवीगाळ आणि जाच करण्यात येत होता, त्यातून साहिलने आपले जीवन संपवले असा आरोप या तक्रारीत करण्यात आला होता.
साहिलसोबत जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आयआयटी मुंबईने फेटाळला. साहिल हा परीक्षेत गैरप्रकार करताना आढळला त्यानंतर त्याने हे पाऊल उचलल्याचे आयआयटी मुंबईने आपल्या निवेदनात म्हटले होते आणि नंतर त्यांनी या विधानावर क्षमा मागितली.
फोटो स्रोत, ANI Video Grab
या प्रकरणात प्राध्यापक आणि आयआयटीतील अधिकाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. आयुष्य संपवण्यास प्रवृत्त करणे तसेच जातिवाचक शिवीगाळ करणे याविरोधात विद्यार्थ्याच्या पालकांनी तक्रार दाखल केली.
जातिवाचक भेदभाव आणि शिवीगाळ करण्यात आल्याचे आरोप आयआयटी मुंबईकडून फेटाळण्यात आले.
मुंबई आयआयआटी फॅकल्टी फोरमने विद्यार्थ्याच्या मृत्यूवर दुःख व्यक्त केले आहे त्याच वेळी त्यांनी संबंधित शिक्षकाला पाठिंबा देखील दर्शवला होता. प्रा. डुल्ला यांना डीन पदावरुन हटविण्यात आले.
आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. शिरीष केदारे यांनी राजीनामा दिला नसल्याचे आयआयटीने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, वाकोडे यांचे वकील निखील कांबळे वृत्तसंस्था एएनआयला प्रतिक्रिया देताना म्हणाले, “या प्रकरणात ज्यांची आरोपी म्हणून नावे आहेत, त्यांना अटक करण्यात यावी, हीच आमच्या पक्षकाराची अपेक्षा आहे. तपास पुढे नेण्यासाठी संबंधित आरोपींची अटक आवश्यक आहे.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “विविध व्यासपीठांवरून (फोरम्स) केले जाणारे विविध दावे, त्यावर आम्हाला कोणतीही टिप्पणी करायची नाही. असे दावे येत-जात राहतील आणि प्रत्येक वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्याचा काहीही उपयोग नाही. या प्रकरणाचा तपास निष्पक्षपणे व्हावा आणि जबाबदार असणाऱ्यांना अटक व्हावी, हीच आमची मागणी आहे.
आम्ही त्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि आम्हाला न्याय हवा आहे, असेही त्यांनी नमूद केले.
या प्रकरणी मुंबई आयआयटीचे फॅकल्टी फॉर्मचे अध्यक्ष राजकुमार पंत यांच्याशी बीबीसी मराठीने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. त्यांची प्रतिक्रिया आल्यानंतर ती बातमीत अपडेट केली जाईल.
(आत्महत्या ही एक गंभीर मानसिक आणि सामाजिक समस्या आहे. जर तुम्हीदेखील तणावात असाल तर भारत सरकारच्या जीवनआस्था हेल्पलाइन 18002333330 ची मदत घेऊ शकता. तुम्ही तुमच्या मित्रांशी आणि नातेवाईकांशी देखील बोललं पाहिजे.)
विद्यार्थ्याच्या मृत्यूचे तपशील जाहीर करण्याबद्दल आयआयटीने मागितली माफी
आयआयटीतील विद्यार्थी साहिल वाकोडेच्या मृत्यूनंतर आयआयटीने जे निवेदन प्रसिद्ध केले होते त्यासाठी आयआयटीने क्षमा मागितली. साहिलच्या दुर्दैवी मृत्यूच्या परिस्थितीबाबत करण्यात आलेल्या वक्तव्याबद्दल आम्ही क्षमा मागतो असे ट्विट आयआटी मुंबईने आपल्या अधिकृत X अकाउंटहून 21 सप्टेंबर रोजी केले होते.
साहिलच्या मृत्यूच्या आधी काय घडले याबाबतचा तपशील आयआयटीने सांगितला होता.
त्याबद्दल आयआयटीने माफी मागताना म्हटले होते, साहिलचा मृत्यू होण्याआधीच्या घटना आणि त्यावेळच्या परिस्थितीचे विवरण हे तपासाधीन आहे, संबंधित अधिकाऱ्यांकडून त्याची चौकशी होत आहे.
सध्या सुरू असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर आम्ही हे सांगत आहोत की त्याचा मृत्यू होण्याआधी नेमकी काय परिस्थिती होती आणि ती परिस्थिती कशामुळे उद्भवली या घटनांचे तपशील पूर्ण चौकशीअंती जाहीर करणे हे अयोग्यच होते, असे आयआयटीने म्हटले होते.
तक्रारीत काय म्हटले आहे?
आयआयटी मुंबईत एनर्जी सायन्स अँड इंजिनिअरिंग या शाखेत शिकणारा 20 वर्षीय साहिल वाकोडेचा मृतदेह 18 सप्टेंबरला सायंकाळी त्याच्या खोलीत आढळला होता. त्यानंतर विद्यार्थांनी शिक्षणप्रणालीतील पारदर्शकता आणि सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमध्ये आंदोलन केले.
या घटनेची माहिती मिळताच साहिलचे कुटुंबीय 19 सप्टेंबरला मुंबईत पोहचले. साहिलचे वडील रविंद्र वाकोडे यांनी आयआयटीतील प्राध्यापक आणि अधिकाऱ्यांविरोधात पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
साहिलच्या पालकांनी या तक्रारीत म्हटले, संस्थेचे डायरेक्टर आणि फॅकल्टी टीचर यांच्याकडून जातीवाचक शिवीगाळ आणि मानसिक त्रास देऊन आमच्या मुलाला आपले जीवन संपवण्यास प्रवृत्त केले.
गेल्या काही दिवसांपासून आपल्याला त्रास दिला जात आहे असे साहिलने आपल्याला सांगितले होते असे देखील साहिलच्या वडिलांनी तक्रारीत सांगितले.
तक्रारीनुसार, मागील 3 महिन्यांपासून संचालकांच्या सांगण्यावरून फॅकल्टी/टिचर मुलाला जातीवरून शिवीगाळ करत होते. जातीमुळे तुला कोणत्याही खोट्या प्रकरणात गुंतवू शकतो असे शिक्षक मला म्हणत होते. अशी माहिती साहिलने आपल्याला फोनवरुन दिली होती, असे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
आयआयटी प्रशासनाने काय म्हटले?
आयआयटीने 19 तारखेला सायंकाळी प्रसिद्धिपत्रक काढले त्यात त्यांनी सांगितले की सायंकाळी द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याने आपले जीवन संपवले.
या मुलाने परीक्षेदरम्यान आपल्या मोबाईल फोनचा वापर उत्तरे लिहिण्यासाठी केला. परीक्षेतील प्रश्न सोडवण्यासाठी या मुलाने चॅटजीपीटीवर प्रश्नपत्रिका अपलोड केली, असे आयआयटीने आपल्या निवेदनात म्हटले.
फोटो स्रोत, IIT/Bombay
आयआयटीने आपल्या निवेदनात म्हटले, मुलाविरोधात शिस्तभंगासंबंधी कारवाई करण्यात आली नव्हती. संबंधित घटना झाल्यावर इंस्ट्रक्टर आणि विभागप्रमुखासोबत विद्यार्थ्याची चर्चा झाली. विभागप्रमुखांनी त्याचे समुपदेशन केले आणि त्याला असे देखील सांगितले की या घटनेचा त्याच्या करिअरवर विपरित परिणाम होणार नाही.
त्यानंतर विद्यार्थी रूमवर गेला आणि नंतर तो मृतावस्थेत आढळला. विद्यार्थ्याच्या मृत्यूचे अतोनात दुःख झाल्याचे आयआयटीने म्हटले आहे. तपासात IIT मुंबई प्रशासनाकडून संबंधित अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य केले जाईल. तसेच, सर्वांनी मृताच्या कुटुंबीयांच्या गोपनीयतेचा आदर करावा, अशी विनंती करण्यात आली आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.
तपास सुरू असताना कोणत्याही प्रकारचे अंदाज बांधू नयेत, असेही आवाहन आयआयटी मुंबई प्रशासनाने केले आहे.

आयआयटीतील शिक्षकांनी देखील याबाबत निवेदन प्रसिद्ध करण्यात आले होते.
परीक्षेदरम्यान प्रा. सुर्यनारायण डुल्ला यांनी विद्यार्थ्याला गैरप्रकार करण्यास रोखले होते असे म्हणत आयआयटी फॅकल्टी फोरमने डुल्ला यांना पाठिंबा दर्शवला होता.
आयआयटी मुंबईच्या फॅकल्टी फोरमने म्हटले होते, आयआयटीत झालेल्या निधनाचे आम्हाला दुःख आहे आणि आम्ही कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत. आम्ही आमचे सहकारी प्रा. सुर्यनारायण डुल्ला यांच्यासोबत आहोत. सिनेटने मंजूर केलेल्या शैक्षणिक धोरणांनुसार ते आपले कर्तव्य बजावत होते.
मिड सेमिस्टर परीक्षेवेळी संबंधित कोर्सचे इंस्ट्रक्टर प्रा. डुल्ला हे परीक्षा घेत होते. त्यावेळी एक विद्यार्थी स्मार्टफोन वापरत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. परीक्षेवेळी त्यांनी नियमानुसार कारवाई करत या घटनेची माहिती संस्थेच्या अधिकाऱ्यांना दिली.
आपले कर्तव्य बजावताना झालेल्या घटनेनंतर त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न होत आहे, या प्रकाराने आयआयटी मुंबई फॅकल्टी फोरमला दुःख होत आहे, असे या फोरमने म्हटले होते.
पोलिसांनी काय माहिती दिली?
या घटनेसंदर्भात माध्यमांशी बोलताना डीसीपी दत्तात्रय नलावडे 19 सप्टेंबरला म्हणाले होते की आयआयटी पवईमध्ये एका विद्यार्थ्याने आपले जीवन संपवले.
“या घटनेनंतर, काही आयआयटी विद्यार्थी एकत्र जमले आणि त्यांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले.”
“आयआयटी प्रशासनाकडून विद्यार्थ्यांशी चर्चा करून सामंजस्यपूर्ण तोडगा काढण्याचे प्रयत्न केले. पोलिसांनीही येथे सर्व आवश्यक व्यवस्था केली होती. हा विद्यार्थी बीटेकच्या दुसऱ्या वर्षाचा होता. प्रकरणी ADR दाखल असून प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे,” असंही त्यांनी यावेळी नमूद केलं होतं.
विद्यार्थ्यांचं कॅम्पसमध्ये आंदोलन
या घटनेनंतर विद्यार्थ्यांमध्ये संताप पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांसदर्भात आंदोलन केले. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थ्याने वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि शिक्षणप्रणालीतील पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित केले.
तो म्हणाला, “मी आयआयटी मुंबईमध्ये इलेक्ट्रिकल शाखेच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे. आज आम्ही आंदोलन करत आहोत, कारण आमच्या महाविद्यालयात एका विद्यार्थ्याने आयुष्य संपवले. या प्रकरणी प्रशासनाकडून जबाबदारी आणि पारदर्शकतेची मागणी करण्यासाठी आम्ही आंदोलनाला बसलो आहोत.”

पुढे बोलताना तो म्हणाला, “ही अशी पहिलीच घटना नाही. यावर्षी अशा 4 घटना घडल्या आहेत, त्यापैकी 2 घटना गेल्या 2 महिन्यांतच घडल्या आहेत. हे नेमकं का घडत आहे किंवा यामागची कारणं काय आहेत, याबाबत आम्हाला पूर्णपणे अंधारात ठेवण्यात आलं आहे.”
“आम्हाला फक्त एवढंच हवं आहे की, डीन, संचालक आणि प्रशासनाने एक अहवाल द्यावा. त्यात त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची, जबाबदारी आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्याची आणि त्यांच्या कार्यकाळात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, याची हमी द्यावी,” अशी मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी केली होती.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता डॉ. सुर्यनारायण डुल्ला यांना डीन पदावरुन हटवण्यात आले आहे.
महत्त्वाची सूचना
औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.
हितगुज हेल्पलाईन, मुंबई – 022- 24131212
सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)
इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस – 9868396824, 9868396841, 011-22574820
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स – 080 – 26995000
विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC




