Source :- BBC INDIA NEWS

या दुर्मिळ छायाचित्रात उजवीकडे सावित्रीबाई तर डावीकडे त्यांच्या सहकारी शिक्षिका फातिमा शेख

फोटो स्रोत, GOVERNMENT OF MAHARASHTRA

‘केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयात’ सल्लागार म्हणून काम करणाऱ्या दिलीप मंडल यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासोबत ज्ञानदानाचं काम केलेल्या फातिमा शेख हे इतिहासातील कपोलकल्पित पात्र असल्याचा दावा केला.

दिलीप मंडल यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये दावा केला, “फातिमा शेख ही माझ्याच मेंदूतली उत्पत्ती असून, असं कोणतंही पात्र इतिहासात नव्हतं. मी शून्यातून फातिमा शेख हे पात्र उभं केलं.”

दिलीप मंडल यांनी त्यांच्या पोस्टमध्ये अनेक दावे केले आहेत. या पोस्टनंतर त्यांनी फातिमा शेख या विषयावर एकूण सात पोस्ट केल्या आहेत. त्याबाबत आपण पुढे जाणून घेणारच आहोत. याशिवाय अभ्यासकांचं यावर काय मत आहे आणि उपलब्ध पुरावे काय सांगतात हेही समजून घेणार आहोत.

मंडल यांच्या सात पोस्टमध्ये त्यांनी फातिमा शेख यांच्याबाबत लिहिताना ‘फातिमा शेख कांड,’ ‘लापता लेडी’, ‘मोलकरीण की शिक्षिका’ या शब्दप्रयोगांचा वापर केला आहे.

देशातील मुस्लीम धर्मियांकडून फातिमा शेख यांना विनाकारण महत्त्व दिलं जात असल्याची टीकाही मंडल यांनी केली आहे.

दिल्लीत राहणाऱ्या दिलीप मंडल यांनी आम आदमी पक्षाचं एक पोस्टरदेखील पोस्ट केलं. या पोस्टरमध्ये फातिमा शेख आणि सावित्रीबाई फुले यांचा फोटो वापरलेला दिसत आहे.

आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांनी मतांसाठी फातिमा शेख यांचा फोटो वापरल्याचा आरोप मंडल यांनी केला.

दिल्लीमध्ये येत्या 5 फेब्रुवारीला विधानसभा निवडणुकीचं मतदान होणार आहे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

दिलीप मंडल यांच्या दाव्यानंतर महाराष्ट्रातील काही प्रसारमाध्यमं आणि सोशल मीडियावर फातिमा शेख यांच्याबाबत चर्चेला उधाण आलं.

सोशल मीडियावरील चर्चेत प्रामुख्यानं दोन गट दिसून येतात. यामध्ये पहिला गट या फातिमा शेख यांचं अस्तित्व पूर्णपणे नाकारतो, तर दुसरा गट फातिमा शेख यांच्या योगदानाला अधोरेखित करण्याचा प्रयत्न करताना दिसतो.

फातिमा शेख यांच्याबाबत सुरू असलेल्या या वादावर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर संशोधन करणाऱ्या अभ्यासकांनी, इतिहास विषयाच्या प्राध्यापकांनी, पत्रकारांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आपापली मतं मांडली आहेत.

ती मतं देखील आपण जाणून घेणारच आहोत मात्र फातिमा शेख या नेमक्या कोण होत्या? त्यांच्याबाबतचे कोणकोणते पुरावे उपलब्ध आहेत? फातिमा या मुस्लिमच होत्या की ख्रिश्चन होत्या? या आणि अशाच काही शंका कुशंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न आपण या बातमीतून करणार आहोत.

2006 च्या आधी फातिमा शेख यांचा कुठेच उल्लेख नाही?

दिलीप मंडल यांनी त्यांच्या पोस्टमध्ये असा दावा केला आहे की, 2006च्या आधी फातिमा शेख यांच्या नावाचा उल्लेख कुणीही केलेला नव्हता आणि तो सगळ्यात आधी मंडल यांनी केला.

मंडल यांनी असाही दावा केलाय की, त्यांनीच या ‘पात्रा’ला जन्म दिला.

तर याबाबतचा एक पुरावा असा की, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळानं 1988 साली पहिल्यांदा प्रकाशित केलेल्या सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मय या पुस्तकात पान क्रमांक 54 वर एक फोटो प्रसिद्ध झाला आहे.

या फोटोच्या खाली लिहिलं आहे, ‘सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख त्यांच्या दोन विद्यार्थ्यांसह.’ हा फोटो 100 वर्षांपूर्वीच्या निगेटिव्हवरून तयार केला असल्याची माहिती देखील त्याखाली आहे.

या पुस्तकाचे संपादक डॉ. म. गो. माळी यांनी प्रस्तावनेत याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

फोटो

फोटो स्रोत, Maharashtra State Literary Culture Corporation

सावित्रीबाईंचा फोटो कित्येक वर्षांपूर्वी पुण्याहून प्रकाशित होणाऱ्या ‘मजूर’ या मासिकात छापला होता. हे मासिक 1924-30 या काळात प्रकाशित होत होतं. याचे संपादक रा. ना. लाड होते. तर माळींना हा फोटो द. स. झोडगे यांच्याकडून मिळाला. झोडगे स्वतः काही काळ ‘मजूर’ मासिकाचे संपादक होते.

लोखंडे नावाचे एक ख्रिस्ती मिशनरी होते. त्यांनी काढलेल्या पुस्तकातही सावित्रीबाईंचा एक फोटो प्रसिद्ध झाला आहे. ‘मजूर’ मासिकात प्रसिद्ध झालेला फोटो आणि या पुस्तकातला फोटो दोन्ही सारखेच आहेत.

या फोटोत सावित्रीबाईंच्या दोन विद्यार्थीनी खाली बसल्या आहेत आणि स्वतः सावित्रीबाई आणि फातिमा शेख या फोटोत दिसतात.

100 वर्षांपूर्वीच्या निगेटिव्हवरून तयार केलेला सावित्रीबाई फुले यांचा फोटो.

फोटो स्रोत, Maharashtra State Literary Culture Corporation

याच फोटोवरून सावित्रीबाईंचा सध्या सर्वत्र पाहायला मिळणारा फोटो तयार करण्यात आला आहे. हा फोटो पुण्यात राहणाऱ्या एकनाथ पालकर यांच्याकडं उपलब्ध असलेल्या निगेटिव्हवरून तयार केला असल्याची माहिती प्रस्तावनेत दिली आहे.

हा फोटो नसता, तर कदाचित आपल्याला फातिमा शेख यांच्याविषयी काहीच माहिती मिळाली नसती. इतकंच काय, आपल्याला सावित्रीबाई कशा दिसतात हेही कळालं नसतं.

तर या फोटोत दिसणाऱ्या फातिमा शेख या सावित्रीबाईंच्या सहशिक्षका होत्या, असं म्हटलं जातं.

सावित्रीबाईंचं पत्र

सावित्रीबाईंनी जोतिबांना लिहिलेल्या एका पत्रात फातिमा शेख यांचा उल्लेख सापडतो. सावित्रीबाईंची तब्येत खराब असताना त्यांनी 10 ऑक्टोबर 1856 रोजी जोतिबांना एक पत्र लिहिलं होतं. तोवर वंचितांसाठी, महिलांसाठी पुण्यात अनेक शाळा या दाम्पत्याने उभ्या केल्या होत्या.

त्यांची चिंता जोतिबांना असणं साहजिकच होतं. त्यांना आश्वस्त करण्यासाठी सावित्रीबाई या पत्रात लिहितात, “माझी काळजी करू नका, तब्येत ठीक होताच मी पुण्यात परत येईन. फातिमाला सध्या त्रास होत असेल, पण ती कुरकुर करणार नाही.”

सावित्रीबाईंनी जोतिबांना लिहिलेलं पत्र

फोटो स्रोत, Maharashtra State Literary Culture Corporation

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील प्रा. डॉ. श्रद्धा कुंभोजकर यांनी म्हटलं, “महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती महामंडळानं प्रकाशित केलेल्या सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मयात सावित्रीबाईंनी जोतीरावांना 1856 मध्ये लिहिलेलं पत्र उद्धृत केलेलं आहे.

त्यात ‘फातिमास त्रास पडत असेल. परंतु ती कुरकूर करणार नाही.’ असं वाक्य आहे. या वाक्यापलीकडे फातिमा यांच्या अस्तित्वाविषयी विश्वासार्ह ऐतिहासिक पुरावा मिळत नाही.

तरीही, वरच्या वाक्यामुळे आपल्याला हे समजतं की सावित्रीबाईंची फातिमा नावाची कुणी विश्वासू सहकारी असावी, की जिच्या खांद्यावर सावित्रीबाई आपल्या अनुपस्थितीत बरीच जबाबदारी देऊ शकत होत्या. अर्थातच फातिमा ही सावित्रीबाईंना लाभलेली एक सक्षम सहकारी होती हे स्पष्टच आहे.”

फातिमा शेख यांच्या अस्तित्वावर प्रश्न का उपस्थित केले जात आहेत?

फातिमा शेख यांच्याबाबत सध्या सुरू असलेल्या चर्चेमध्ये दिवंगत लेखक प्राध्यपक हरी नरके यांच्या एका सोशल मीडिया पोस्टचा उल्लेख आवर्जून केला जात आहेत.

यात हरी नरके यांनी फातिमा शेख यांच्या जन्मतारखेबाबत प्रश्न उपस्थित केला होता. तसेच फातिमा यांच्याबाबत फार त्रोटक माहिती उपलब्ध असल्याचंही म्हटलं होतं.

त्यावरून अनेकांनी नरके यांनी फातिमा शेख आणि त्यायोगे मुस्लीम समाजाचं योगदान नाकारल्याचा आरोप केला होता. यावर स्वतः प्राध्यापक हरी नरके यांनीच 10 जानेवारी 2022 रोजी पोस्ट करून स्पष्टीकरण दिलेलं आहे.

त्या पोस्टमध्ये नरके म्हणतात, “मी फातिमा शेख यांच्या जन्मतारखेचा दस्तऐवज विचारल्याबद्दल काही मंडळींनी आरडाओरडा सुरू केला. मला अल्पसंख्य समाजाच्या विरोधातला, विशिष्ट विचारधारेचा हस्तक वगैरे ठरवण्यात आलं. मात्र, गेली 30 वर्षे मी मुनशी गफार बेग, उस्मान व फातिमा शेख यांच्यावर लिहितो आहे.”

“‘मिळून साऱ्याजणी’ पासून असंख्य पुस्तकात, खूप ठिकाणी मी यावर लिहिलं आहे, बोललो आहे, मालिकेत दाखवलं आहे. खरं तर ही माहिती सर्वात पहिल्यांदा उजेडात आणणारा आणि सातत्याने लावून धरणारा मीच आहे,” असं नरके यांनी म्हटलं होतं.

नरके यांनी लिहिलं की, “या विषयावर पुस्तक लिहिणारे सय्यद नासीर अहमद माझे मित्र आहेत. मी या पुस्तकासाठी त्यांना माझ्याकडची सर्व माहिती देऊन भरीव मदत केली आहे. याबाबत मी देशविदेशातील डझनभर लेखकांना मदत केली आहे, करतो आहे. मात्र हे सगळं मी संशोधनाची शिस्त पाळून करतो.”

आंध्रप्रदेशातील कल्लुरू मंडल, जि. कर्नुल येथील महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांचा पुतळा.

फोटो स्रोत, Facebook/Prof.HariNarke

प्राध्यापक हरी नरके हे आता जिवंत नाहीत. मात्र त्यांनी फातिमा शेख यांच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित न करता त्यांच्या जन्मतारखेचा पुरावा उपलब्ध नसल्याचं म्हटलं होतं.

यावर बोलताना प्रा. डॉ. श्रद्धा कुंभोजकर म्हणतात, “फातिमाबी शेख या नावाची व्यक्तिरेखा आपल्याच मनाने निर्माण करण्यावरून उठलेल्या वादंगात दोन दावे आहेत. पहिला दावा असा की, फातिमाबी शेख या कपोलकल्पित व्यक्तिरेखेमुळं सावित्रीबाईंच्या स्त्रीशिक्षणविषयक कर्तृत्वाला झाकोळलं जात आहे. अर्थातच हा पोकळ दावा आहे. कारण असं कुणीही म्हटलेलं नाही किंवा सूचित केलेलं नाही.”

“याखेरीज असल्या दाव्यामुळं महानता हे जणू काही एका वेळी एकाच माणसाला मिळणारं सुवर्णपदक असल्याप्रमाणं एक तितकीच कपोलकल्पित शर्यत सावित्रीबाई आणि फातिमाबी यांच्यात लावली जाते. अशी शर्यत मुळात नसतेच. एकावेळी अनेक माणसं महान असतात, असू शकतात.”

“फातिमाबी शेख या व्यक्तिरेखेबाबत ओरड करणाऱ्यांचा दुसरा आक्षेप सहसा बोलून दाखवला जात नाही. पण त्याचा इत्यर्थ असा असतो, की मुस्लिमांचं सत्यशोधक चळवळीत काहीही योगदान नव्हतं. किंबहुना ती चळवळ एक जातीपुरती मर्यादित होती. हा दावाही खोटा आहे. सावित्रीबाई फुले आणि जोतिरावांच्या अंगीकृत कार्यात अनेक मुस्लीम व्यक्तींनी सक्रिय सहभाग घेतल्याचे सबळ पुरावे आहेत. जोतिरावांचं शिक्षण वडिलांनी थांबवलं, तेव्हा मुन्शी गफ्फार बेग यांनी वडिलांची समजूत काढून त्यांचं शिक्षण पुन्हा सुरू केलं,” असं मत श्रद्धा कुंभोजकर यांनी व्यक्त केलं.

फातिमा शेख आणि सावित्रीबाई फुले यांनी एकत्र शिक्षण घेतलं?

फातिमा शेख आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचा अभ्यास करणाऱ्या संशोधक आणि लेखकांनी आणखी एक महत्त्वाचा संदर्भ दिला आहे.

1848 मध्ये मुलींची पाहिली शाळा सुरू होण्याआधी सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांनी अहमदनगर येथून शिकवण्याचं प्रशिक्षण घेतलं होतं, असा दावा काही संशोधकांनी केला आहे.

सामाजिक कार्यकर्ते आणि महात्मा जोतिराव फुले समता प्रतिष्ठानचे पदाधिकारी नितीन पवार म्हणतात, “भारतामध्ये मुलींच्या शिक्षणाची सुरुवात 1815 पासून झाली. मिशनरींनी 1815 पासून महिलांना शिकवण्याचा प्रयत्न केला. याच प्रयत्नांचा भाग म्हणून शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या सिंथिया फरार यांनी अहमदनगरला शिक्षण प्रशिक्षण संस्था सुरू केली. याच संस्थेत फातिमाबी शेख आणि सावित्रीबाईंनी कसं शिकवावं याचं शिक्षण घेतलं. अमेरिकन मराठी मिशनच्या अहवालामध्ये याचा उल्लेख आहे.”

नितीन पवार यांनी सांगितलं की, फातिमा शेख यांनी सहशिक्षिका म्हणून काम केलं. सावित्रीबाईंनी लिहिलेल्या पत्रामध्ये अतिशय जवळची व्यक्ती असल्यासारखा फातिमा यांचा उल्लेख आहे. फातिमाबी शेख यांचा आंध्र प्रदेशातल्या कन्नूर जिल्ह्यामध्ये पहिला पुतळा उभारण्यात आला आहे. त्या राज्यातील आठवीच्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकात फातिमाबी शेख यांचा उल्लेख आहे.

सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख

मागच्या 10 वर्षांपासून फातिमा शेख सावित्रीबाई फुले कौन्सिलिंग अँड ट्रेनिंग सेंटर चालवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या आणि संशोधक झुलेखा जबीं म्हणतात, “मागच्या 13 वर्षांपासून मी पुण्यात जाऊन फातिमा शेख यांच्या अस्तित्वाचे पुरावे शोधण्याचं काम करत आहे. माझ्या मते आंतरराष्ट्रीय स्रोतांचा अभ्यास केला, तर फातिमा शेख यांच्या अस्तित्वाचे पुरावे मिळतात. मात्र फातिमा शेख यांचं कार्य लपवण्याचं कारस्थान केलं जात आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये मी यासंदर्भात चर्चा करण्यासाठी हरी नरके यांच्या घरी गेले होते. मात्र त्यावेळी ते मला भेटले नाहीत. मी एकटीच नव्हते, तर पुण्यातील दोन प्रतिष्ठित व्यक्ती त्यावेळी माझ्यासोबत होत्या.”

“अहमदनगरच्या क्लारा ब्रूस शाळेच्या रेकॉर्डमध्ये फातिमा शेख आणि सावित्रीबाई फुले यांनी त्या शाळेतून पदवी घेतल्याचा उल्लेख शोधण्यासाठी मी तिथे गेले होते. त्यावेळी मला रेकॉर्ड दाखवण्यास नकार दिला गेला. फातिमा शेख आणि सावित्रीबाई फुले यांनी याच शाळेतून पदवी किंवा शिकवण्यासाठी आवश्यक असणारं प्रमाणपत्र मिळवलं होतं,” असं जबीं यांनी नमूद केलं.

फुले दाम्पत्यांच्या आयुष्यातील मुस्लीम व्यक्तींचं योगदान पुसण्याचा हा प्रयत्न आहे का?

ज्या दिलीप मंडल यांच्या पोस्टवरून हा वाद सुरू झाला त्यांनी मुस्लीम माध्यमांवर टीका केली आहे. मुस्लीम माध्यमं सावित्रीबाई फुलेंना घेरण्याचा प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले.

यावर बोलताना झुलेखा जबीं म्हणाल्या, “फुलेंच्या आयुष्यातील मुस्लीम पात्रांचा प्रयत्न अनेकांनी केला आहे. त्यांच्या मनात फातिमा शेख यांचं कार्य प्रकाशात आणण्याबाबत एक असुरक्षितता होती. केवळ मराठी लेखकांनीच नाही, तर उच्चवर्गीय मुस्लिमांनी देखील फातिमा शेख आणि उस्मान शेख यांचं कार्य नाकारलं आहे.”

“फातिमा शेख यांना मिथक मानणाऱ्या लोकांना त्यांच्या अस्तित्वाचे सबळ पुरावे देणं हेच माझ्या आयुष्याचं ध्येय आहे. फुले दाम्पत्याच्या आयुष्यातील मुस्लीम व्यक्तींचं योगदान झाकोळण्याचा प्रयत्न आहे. त्यावेळच्या ख्रिश्चन मिशनरी शाळेत जोतिबा फुले यांचा प्रवेश व्हावा यासाठी प्राध्यापक गफ्फार मुन्शी यांनी शिफारस केली होती. ते जोतिबांच्या वडिलांचे मित्र होते. पुण्यातील दारूवाला पुलावर जी मजार आहे ती गफ्फार मुन्शी यांची आहे.”

काल्पनिक चित्र

याबाबत प्राध्यापक श्रद्धा कुंभोजकर यांनी लिहिलं, “1874 मध्ये जेव्हा फुले दाम्पत्यानं एका आंतरजातीय विवाहासाठी पुढाकार घेतला. तेव्हा त्यांना अनेकांनी विरोध केला. पण गंज पेठेतल्या मोमीन मंडळींनी इतर सत्यशोधकांच्या बरोबरीनं हा आंतरजातीय विवाह निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी खूप मदत केली हे सत्यशोधक समाजाच्या रिपोर्टात कृतज्ञतेनं नोंदवलेलं आहे.”

“मुस्लिमांना सत्यशोधक चळवळीतून नजरेआड करण्याच्या या प्रयत्नांमागे कोणत्याही चळवळीला जातीच्या साच्यात कोंबण्याच्या प्रयत्नांची दुर्गंधी येते. असल्या साच्यात सत्यशोधक चळवळ कोंबली जाणं शक्य नाही. कारण अनेक जातधर्मातल्या माणसांच्या सहभागामुळे ती नेहमीच एक बहुसांस्कृतिक चळवळ होती.”

फातिमा मुस्लिम होत्या की ख्रिश्चन?

फातिमा शेख यांच्या अस्तित्वावर शंका घेणाऱ्या वर्गाकडून फातिमा हे नाव ख्रिस्ती धर्मात देखील असल्याचा उल्लेख केला जातो. त्यावर कुंभोजकर यांनी अतिशय चपखल विश्लेषण केलं आहे.

त्यांनी लिहिलं, “फातिमा हे नाव ख्रिश्चन लोकांमध्येही मुलीला देतात. त्यामुळे सावित्रीबईंची फातिमा मुस्लीम कशावरून होती असाही प्रश्न विचारला गेला आहे. त्याचं उत्तर म्हणजे ख्रिस्ती ‘फातिमा’ हे नाव Fàtima या पोर्तुगालमधल्या गावी 1917साली झालेल्या ‘चमत्कारा’ मुळे प्रचारात आले. तिथे व्हर्जिन मेरी प्रकटली असा विश्वास असल्यामुळे तिला Our Lady of Fàtima म्हणतात.”

“या चमत्काराच्या आधी ख्रिस्ती लोकांत “फातिमा” हे नाव प्रचारात नव्हते. चमत्कारानंतरही स्पॅनिश / पोर्तुगीज भाषिक देशांशिवाय इतर जगात ते विशेष प्रचलित नाही. ख्रिस्ती फातिमा नावाचा उगम Fàtima या गावाच्या नावात आहे. त्याचा आणि मुस्लीम फातिमाचा संबंध नाही. ती दोन केवळ समध्वनी नावे आहेत. 1917 नंतर ख्रिस्त्यांत फातिमा नाव प्रचलित झाल्यानं सावित्रीबाईंची फातिमा ही निश्चित मुसलमान होती असं म्हणता येईल.”

फातिमा शेख यांचं पेंटिंग

फातिमा शेख यांच्याबाबत पुरेसे पुरावे उपलब्ध नाहीत हे स्पष्ट आहे. मात्र त्याबाबत पुरेसा अभ्यास किंवा शोधकार्य झालं आहे असंही म्हणता येणार नाही. सावित्रीबाईंनी ज्या आपुलकीने फातिमा असा उल्लेख केला आहे, त्यावरून या पात्राबाबत संशोधन होणं गरजेचं आहे. अर्थात त्यांच्या जन्मतारखेबाबत आणि इतर तपशिलाबाबत व्यक्त केले जाणारे संशयही अभ्यासले पाहिजेत.

श्रद्धा कुंभोजकर म्हणतात, ” फातिमा शेख यांच्या अस्तित्वाबाबत वादंग का उठतो? तर या बाबतीत ऐतिहासिक स्मृतीची मोडतोड केली गेली आहे हे कारण स्पष्टच आहे. आधी एकतर काही माणसांच्या त्या त्या वेळच्या व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेला सोयिस्कर ठरेल अशा पद्धतीनं एक मिथक घडवलं गेलं.”

“आताही व्यक्तींच्या सध्याच्या महत्त्वाकांक्षेला सोयीचं पडेल अशा पद्धतीनं ते मिथक मोडण्याची तारांबळ केली जात आहे. या वैयक्तिक लाभालाभांच्या पलीकडे जाऊन पाहिलं, तर काळजीपूर्वक इतिहास वाचणाऱ्या कुणाच्याही लक्षात येईल की हे सरळसरळ समृतींवरून केलं जाणारं राजकारण आहे,” असं मत श्रद्धा कुंभोजकर यांनी व्यक्त केलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC