Home LATEST NEWS ताजी बातमी फूड पॉयझनिंग म्हणजे फक्त पोट बिघडणं नाही, भेसळयुक्त अन्नामुळे तुमचे कोणते अवयव...

फूड पॉयझनिंग म्हणजे फक्त पोट बिघडणं नाही, भेसळयुक्त अन्नामुळे तुमचे कोणते अवयव सर्वाधिक धोक्यात? वाचा

5
0

Source :- BBC INDIA NEWS

फूड पॉयझनिंग म्हणजे फक्त पोट बिघडणं नाही, भेसळयुक्त अन्नामुळे तुमचे कोणते अवयव सर्वाधिक धोक्यात? वाचा

फोटो स्रोत, Getty Images

  • Published

  • वाचन वेळ: 9 मिनिटे

गेल्या काही दिवसांपासून अन्न आणि औषधी प्रशासन विभागाच्या वतीने अनेक खाद्यपदार्थ निर्मिती करणाऱ्या अनेक ठिकाणांवर कारवाई झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे.

या विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यात खाद्यपदार्थाशी निगडित 1400 ठिकाणी तपासणी झाल्याचे सांगितले. ज्या ठिकाणी गांभीर्यपूर्णरीत्या नियमांचे उल्लंघन झाले आहे त्यांचे परवाने रद्द केल्याचे तुकाराम मुंढेंनी सांगितले तसेच अनेक 400 ठिकाणी सुधारणा करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

तुकाराम मुंढेंनी सांगितले आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला नियमांचे उल्लंघन होताना दिसेल त्याची तक्रार आपण महाराष्ट्र शासनाच्या पोर्टलवर करू शकता.

अन्न आणि औषधी प्रशासन विभागाच्या धडक कारवाई मोहिमेमुळे विविध बातम्या आपल्या वाचनात आणि पाहण्यात येत आहेत. आइसक्रीम पार्लर, दूध डेअरी, हॉटेल्स, सरकारी आस्थापनांमधील कँटीन या ठिकाणी या धाडी पडल्या आहेत.

या कारवाईच्या निमित्ताने खाद्यपदार्थांमधील भेसळ, निकृष्ठता आणि अस्वच्छता यांची चर्चा सुरू आहे. या निमित्ताने फुड पॉइझनिंग अर्थात विषबाधा आणि त्याचे परिणाम याची देखील चर्चा सुरू आहे.

या लेखातून आपण हे समजून घेणार आहोत.

अन्नातून होणारी विषबाधा, भेसळ सगळ्या स्थितीचा परिणाम एखाद दिवस पोट बिघडणं, उलटी होणं आणि डॉक्टरांनी एकदोन दिवसांच्या गोळ्या दिल्या की आपण पुन्हा आहे तसं वागायला मोकळे होतं एवढाच मर्यादित नाही. याचे दीर्घकालीन परिणाम होत असतात. त्यातही फूड पॉयझनिंग म्हणजे फक्त पोट बिघडणं हा प्रचंड मोठा गैरसमज आहे. त्याबद्दलच येथे माहिती घेऊ.

फूड पॉयझनिंग म्हणजे फक्त पोट बिघडणं नाही, भेसळयुक्त अन्नामुळे तुमचे कोणते अवयव सर्वाधिक धोक्यात? वाचा

फोटो स्रोत, Getty Images

अन्नात म्हणजे आपण रोज जे पदार्थ, फळं खातो त्यात भेसळ होण्याच्या घटना आता नवीन नाहीत. खरंतर जगभरात विशेषतः पाश्चिमात्य देशांत अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत आणि त्यांच्या साठवणीबद्दल, विक्रीबद्दल अनेक कठोर मापदंड आहेत.

मात्र भारतात दुर्दैवाने अशाप्रकारचे मापदंड काही ठिकाणी पाळले जात नसल्याचं गेले काही दिवस येत असलेल्या बातम्यांमधून सहज लक्षात येतं.

भेसळीतल्या तसेच नियम डावलल्यामुळे अनेक रसायनं, जड धातू, कृत्रिम रंग आणि कीटकनाशकांचे अवशेष शरीरात कमी प्रमाणात पण सातत्याने जात राहिले, तर त्यांचे परिणाम वर्षानुवर्षांनी दिसून येऊ शकतात. अशा विषारी घटकांचा साठा शरीरातील विविध अवयवांमध्ये होत राहतो.

परिणामी यकृत, मूत्रपिंड, पचनसंस्था, हृदय आणि हार्मोन प्रणालीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. काही संशोधनांमध्ये अशा दूषित अन्नपदार्थांचा संबंध किडनी विकार, यकृताचे आजार, मधुमेह आणि काही अभ्यासांमध्ये कॅन्सरशी संबंध आढळला आहे, मात्र त्यातील कारण-परिणाम संबंध निश्चित झालेला नाही

एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर तत्काळ त्रास झाला नाही, याचा अर्थ तो पूर्णपणे सुरक्षित आहेच असे नाही. त्यामुळे भेसळीचा प्रश्न हा केवळ अन्न विषबाधेपुरता मर्यादित नसून सार्वजनिक आरोग्याशी संबंधित दीर्घकालीन चिंतेचा विषय ठरतो.

भारतात नियम नाहीत का?

तज्ज्ञांच्या मते, हे अपयशी ठरलेले नमुने विविध कारणांमुळे असू शकतात. यामध्ये अस्वच्छता, लेबलिंग नियमांचे उल्लंघन, तसेच दूषितीकरण किंवा भेसळीची प्रकरणे यांचा समावेश होतो.

राष्ट्रीय मानवी हक्क आयोगानं (NHRC) एप्रिल 2026 मध्ये आयोजित केलेल्या बैठकीत अन्नभेसळीविरोधात अनेक महत्त्वाच्या उपायांची शिफारस करण्यात आली होती. अन्नपदार्थांच्या संपूर्ण पुरवठा साखळीचं मॅपिंग करून प्रत्येक टप्प्यावर दूषितीकरणाची शक्यता तपासणं, अन्नसुरक्षा यंत्रणांमध्ये नागरिकांचा सहभाग वाढवणं, जनजागृती मोहिमा राबवणं, शालेय स्तरावर अन्नसुरक्षा शिक्षण सुरू करणं, प्रयोगशाळा आणि तपासणी सुविधा मजबूत करणं तसेच अन्नभेसळ तक्रारींसाठी डिजिटल यंत्रणा विकसित करणं अशा सूचना करण्यात आल्या.

याशिवाय, अन्नाची गुणवत्ता प्रत्यक्ष वेळेत तपासता यावी यासाठी कमी खर्चिक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) साधनांचा वापर, खाद्यपदार्थांच्या चाचण्यांमध्ये अधिक पारदर्शकता, विक्रेत्यांची अनुपालन माहिती सार्वजनिक करणे आणि केंद्र व राज्यस्तरावरील संस्थांमध्ये अधिक समन्वय निर्माण करण्याचाही आग्रह बैठकीत धरण्यात आला होता.

भारतात नियम नाहीत का?

फोटो स्रोत, Getty Images

अन्नात होणारी भेसळ रोखण्यासाठी भारतात नियम अस्तित्वात आहेत. 2006 च्या कायद्याअंतर्गत स्थापन झालेली भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (FSSAI) ही संस्था अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक आणि विक्री यांचे नियमन करते. याआधी अस्तित्वात असलेल्या विविध जुन्या कायद्यांच्या जागी ही व्यवस्था आणण्यात आली.

नियमांनुसार, मोठ्या अन्न कंपन्यांपासून ते छोट्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांपर्यंत सर्वांना परवाना घेणे बंधनकारक आहे. तसेच अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांवर तपासण्या करणे, नमुने गोळा करणे आणि तक्रारींची चौकशी करणे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

फूड पॉयझनिंग म्हणजे फक्त पोट बिघडणं नाही, भेसळयुक्त अन्नामुळे तुमचे कोणते अवयव सर्वाधिक धोक्यात? वाचा

फोटो स्रोत, Getty Images

त्याबद्दल FSSAI चे माजी प्रमुख पवन अग्रवाल निकिता यादव यांना म्हणाले होते, “हा जगातील सर्वांत आधुनिक अन्नसुरक्षा कायद्यांपैकी एक आहे, “तो अन्नपदार्थ कशा प्रकारे विकले जावेत आणि कशा प्रकारे विकले जाऊ नयेत यासाठी स्पष्ट मानके निर्धारित करतो.”

मात्र प्रत्यक्षात पाहता, अनेकदा या व्यवस्थेची अंमलबजावणी एखादी समस्या उघडकीस आल्यानंतरच सुरू होते.

“मोठ्या कंपन्यांकडून उत्पादन बाजारात येण्यापूर्वी त्याची चाचणी घेण्याची अपेक्षा असते. पण अन्नव्यवस्थेचा मोठा भाग अशा पद्धतीने कार्यरत नाही,” असं अग्रवाल म्हणाले.

“अनेकदा अन्नपदार्थांची तपासणी तक्रारी आल्यानंतर किंवा संशय निर्माण झाल्यानंतरच केली जाते.”

पाकिटबंद पदार्थ घेताना त्यावरचं लेबल वाचणं आवश्यक आहे.

फोटो स्रोत, Getty Images

निकिता यादव यांनी अन्नपदार्थांची चाचणी करणाऱ्या ऑरिगा रिसर्च या प्रयोगशाळेचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ अरोरा यांच्याशीही चर्चा केली होती.

त्यात अन्नपदार्थांच्या चाचणी व्यवस्थेत एक मूलभूत त्रुटी असल्याचं अरोरा म्हणाले होते.

सौरभ अरोरा सांगतात, “व्यवसायांना केवळ सहा किंवा 12 महिन्यांतून एकदाच नमुने तपासणीसाठी पाठवणे बंधनकारक असतं. पण या मर्यादित तपासणी व्यवस्थेचाही अनेकदा गैरफायदा घेतला जातो”

“तपासणीसाठी पाठवलेला नमुना सर्व मानकांची पूर्तता करेल याची ते खात्री करतात. मात्र, त्याच उत्पादनाच्या इतर तुकड्यांची गुणवत्ता तशीच असेलच, याची हमी नसते.”

भेसळीचे परिणाम शरीरात हळूहळू कसे दिसतात?

भेसळयुक्त अन्नाचे सर्व परिणाम लगेच दिसून येतातच असे नाही. अनेकदा शरीरात गेलेले विषारी घटक वर्षानुवर्षे शांतपणे नुकसान करत राहतात.

रासायनिक रंग, जड धातू, कीटकनाशकांचे अंश किंवा काही औद्योगिक रसायनं अल्प प्रमाणात शरीरात गेल्यास त्यांना बाहेर टाकण्याची जबाबदारी प्रामुख्याने यकृत आणि मूत्रपिंडांवर येते. दीर्घकाळ असे घटक शरीरात जात राहिल्यास या अवयवांवर अतिरिक्त ताण निर्माण होऊ शकतो.

फूड पॉयझनिंग म्हणजे फक्त पोट बिघडणं नाही, भेसळयुक्त अन्नामुळे तुमचे कोणते अवयव सर्वाधिक धोक्यात? वाचा

फोटो स्रोत, Getty Images

याशिवाय काही विषारी पदार्थ पेशींच्या कार्यात हस्तक्षेप करू शकतात. त्यामुळे शरीरात सूक्ष्म स्वरूपाचा दाह निर्माण होऊ शकतो, हार्मोन्सचे संतुलन बिघडू शकते किंवा पचनसंस्थेतील उपयुक्त जिवाणूंवर परिणाम होऊ शकतो.

सुरुवातीला कोणतीही लक्षणं जाणवत नसल्यामुळे अनेकांना त्याचा अंदाजही येत नाही. परंतु कालांतराने अशा बदलांचा परिणाम आरोग्यावर दिसू लागतो.

विशेषतः लहान मुलं, गरोदर महिला, वृद्ध व्यक्ती आणि आधीपासून यकृत, मूत्रपिंड किंवा इतर दीर्घकालीन आजार असलेल्या लोकांना याचा अधिक धोका असू शकतो. त्यामुळे अन्नाची सुरक्षितता ही केवळ तत्काळ आजार टाळण्यापुरती नसून भविष्यातील आरोग्य जपण्यासाठीही तितकीच महत्त्वाची आहे.

भेसळीचे परिणाम शरीरात हळूहळू कसे दिसतात?

फोटो स्रोत, Getty Images

या भेसळीचा आपल्या शरीरातील कोणत्या अवयवांवर आणि अंतर्गत क्रियांवर परिणाम होतो याची माहिती आम्ही डॉ. दीपक भांगळे यांना विचारली. ते नवी मुंबईतल्या कोकिळाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, हेपॅटोलॉजी, इंटरव्हेन्शनल एन्डोस्कोपी आणि यकृत प्रत्यारोपण सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.

ते सांगतात, “भेसळयुक्त अन्नाचे तात्काळ परिणाम हे कोणता भेसळ करणारा पदार्थ आणि त्याचे प्रमाण किती आहे यावर अवलंबून असतात. मळमळ, उलट्या, जुलाब, पोटदुखी, पोटफुगी, डोकेदुखी आणि चक्कर येणे ही सामान्य लक्षणे आहेत. काही लोकांना अ‍ॅलर्जी, त्वचेवर पुरळ किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. गंभीर प्रकरणांमध्ये विषारी पदार्थांचा परिणाम यकृत, मूत्रपिंड किंवा मज्जासंस्थेवर होऊन निर्जलीकरण, फिट्स किंवा इतर वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकतात. लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेले लोक अधिक धोक्यात असतात.”

भेसळीचे परिणाम शरीरात हळूहळू कसे दिसतात?

फोटो स्रोत, Getty Images

डॉ. भांगळे यांना आम्ही या भेसळीचा आणि एकूणच गुणवत्ताहीन पदार्थांचा आपल्या कोणत्या अवयवांवर परिणाम होतो याबद्दल प्रश्न विचारले. त्यांनी याची सविस्तर उत्तरं दिली आहेत.

प्रश्न- भेसळयुक्त अन्नाच्या सतत संपर्कामुळे कोणते अवयव सर्वाधिक धोक्यात असतात?

डॉ. भांगळे- यामुळे यकृत आणि मूत्रपिंडं हे सर्वाधिक प्रभावित होतात कारण ते शरीरातील विषारी पदार्थ गाळून बाहेर टाकण्याचं काम करतात. सततच्या विषारी संपर्कामुळे या अवयवांवर ताण येतो, त्यामुळे ऊतींमध्ये व्रण निर्माण होतात आणि अखेरीस अवयव निकामी होऊ शकतात.

पोट आणि आतड्यांचीही हानी होते, ज्यामुळे सूज आणि पचनाशी संबंधित समस्या निर्माण होतात. शिसं आणि कॅडमियमसारखे जड धातू शरीरात साचून हृदय, रक्तवाहिन्या आणि मज्जासंस्थेचेही नुकसान करतात.

प्रश्न- भेसळयुक्त अन्नाचा यकृतावर कसा परिणाम होतो?

डॉ. भांगळे- यकृत हे शरीरातील मुख्य रासायनिक फिल्टर आहे. जेव्हा अन्नामध्ये रासायनिक रंग, फॉर्मालीनसारखे संरक्षक किंवा बुरशीजन्य विषद्रव्ये असतात, तेव्हा यकृताला त्यांचे विघटन करण्यासाठी सतत काम करावे लागते. या प्रक्रियेत ‘फ्री रॅडिकल्स’ नावाचे हानिकारक घटक तयार होतात, ते यकृताच्या पेशींचे नुकसान करतात.

परिणामी सूज, चरबी साचणे आणि फायब्रोसिस निर्माण होतो. दीर्घकाळ असे विषारी पदार्थ घेत राहिल्यास फॅटी लिव्हर, सिरोसिस आणि यकृताच्या कर्करोगाचा धोका वाढतो.

प्रश्न- भेसळीमुळे पचनसंस्था आणि आतड्यांतील सूक्ष्मजीवांचे संतुलन (गट मायक्रोबायोम) बिघडू शकते का?

डॉ. भांगळे- होय. रासायनिक भेसळ करणारे पदार्थ, औद्योगिक रंग आणि डिटर्जंटचे अवशेष पोट व आतड्यांच्या संरक्षणात्मक श्लेष्मल त्वचेचा (म्युकस लेयर) नाश करतात. या थेट त्रासामुळे पोटातील अल्सर, अॅसिडिटी आणि दीर्घकालीन गॅस्ट्रायटिस होऊ शकतो. याशिवाय, हे विषारी पदार्थ पचनास मदत करणारे आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे लाखो ‘चांगले’ जिवाणू नष्ट करतात.

जेव्हा हे लाभदायक जिवाणू कमी होतात, तेव्हा हानिकारक जिवाणू वाढू लागतात आणि ‘लीकी गट’ नावाची अवस्था निर्माण होऊ शकते. त्यामुळे विषारी घटक थेट रक्तप्रवाहात प्रवेश करू शकतात, ज्यामुळे संपूर्ण शरीरात सूज, पोटफुगी, पोषक घटकांचे अपुरे शोषण आणि दीर्घकालीन पचनविकार उद्भवू शकतात.

प्रश्न- हृदय किंवा रक्तवाहिन्यांवर याचे काही ज्ञात परिणाम आहेत का?

डॉ. भांगळे- होय, अन्नातील भेसळ हृदयाच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण करू शकते. याचे एक प्रसिद्ध उदाहरण म्हणजे मोहरीच्या तेलामध्ये विषारी आर्गेमोन तेलाची भेसळ.

या विषामुळे रक्तवाहिन्या कमकुवत होतात, शरीरात मोठ्या प्रमाणात द्रव गळती होते, सूज येते आणि हृदय निकामी होण्याचा धोका वाढतो. अन्नातील अनधिकृत रंगांमध्ये आढळणारं शिसं (लेड) आणि कॅडमियम यांसारखे जड धातू रक्तवाहिन्यांमध्ये साचून त्या कठीण व अरुंद करतात. त्यामुळे रक्तदाब वाढतो आणि हृदयविकाराचा धोका अधिक होतो.

तसेच, निकृष्ट दर्जाच्या भेसळयुक्त चरबीमुळे ‘वाईट’ कोलेस्टेरॉल वाढतं, हृदयाच्या धमन्या बंद होऊ लागतात आणि अचानक हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता लक्षणीयरीत्या वाढते.

संप्रेरकांवर काय परिणाम होतो?

भेसळयुक्त अन्नामध्ये आढळणारी काही रसायनं, जसं की बिस्फेनॉल (बीपीए, बीपीएस), थॅलेट्स (डीईएचपी, डीबीपी, डीईपी), पीएफएएस (पीएफओए, पीएफओएस), ऑर्गेनोक्लोरीन कीटकनाशकं (डीडीटी/डीडीई), पीसीबी, पीबीडीई आणि शिसे, कॅडमियम व आर्सेनिकसारखे जड धातू शरीराच्या संप्रेरक प्रणालीमध्ये अडथळा निर्माण करू शकतात.

अधूनमधून होणाऱ्या या संपर्कामुळे तात्काळ समस्या उद्भवण्याची शक्यता कमी असते. मात्र, दीर्घकाळ संपर्कात राहिल्यास संप्रेरकांची निर्मिती, त्यांचे वहन आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर परिणाम होऊ शकतो.

संप्रेरकांवर काय परिणाम होतो?

फोटो स्रोत, Getty Images

मुंबई सेंट्रल इथल्या वोकहार्ट हॉस्पिटल्समध्ये अंतस्रावतज्ज्ञ आणि मधुमेहतज्ज्ञ म्हणून कार्यरत असणारे डॉ. प्रणव घोडी या रसायनांचा थायरॉईड ग्रंथीवर होणाऱ्या परिणामाकडेही लक्ष वेधतात.

डॉ. प्रणव घोडी सांगतात, “काही संशोधनांमध्ये बिस्फेनॉल (बीपीए, बीपीएस), थॅलेट्स (डीईएचपी), ज्वालारोधक रसायने (पीबीडीई), पीएफएएस (पीएफओए, पीएफओएस), पीसीबी तसेच पर्क्लोरेट आणि नायट्रेट यांसारख्या रसायनांचा थायरॉइड संप्रेरकांच्या कार्यावर परिणाम होत असल्याचे आढळून आलंय. थायरॉइड ग्रंथी शरीराच्या चयापचय प्रक्रियेत आणि विशेषतः गर्भधारणेदरम्यान तसेच बालपणात मेंदूच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे अशा रसायनांचा दीर्घकालीन संपर्क चिंतेचा विषय ठरतो.”

गरोदर स्त्रियांनी जास्त काळजी घेतली पाहिजे असं ते सांगतात. त्याबद्दल डॉ. प्रणव म्हणाले, “गर्भधारणेचा काळ अत्यंत संवेदनशील असतो. या काळात संप्रेरकं गर्भाच्या वाढीसाठी आणि अवयवांच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. बीपीए, थॅलेट्स, पीएफएएस, पीसीबी तसेच शिसं आणि कॅडमियमसारखी रसायनं गर्भनाळेद्वारे गर्भापर्यंत पोहोचू शकतात आणि त्याच्या थायरॉइड कार्यावर, प्रजनन अवयवांच्या विकासावर आणि जन्मानंतरच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात.”

किडनीच्या आरोग्यावर काय परिणाम होतो?

मूत्रपिंडं रक्तातील अपायकारक रसायने आणि टाकाऊ पदार्थ गाळून शरीरातून बाहेर टाकण्याचं महत्त्वाचं कार्य करतात. भेसळयुक्त अन्नातील दूषित घटकांचा वारंवार संपर्क आल्यास मूत्रपिंडांवर अतिरिक्त ताण येऊ शकतो. त्यामुळे सूज येणं, गाळण्याच्या प्रक्रियेमध्ये बिघाड होणं किंवा काही व्यक्तींमध्ये दीर्घकालीन नुकसान होण्याचा धोका वाढतो.

कॅडमियम आणि शिसं यांसारखे जड धातू दीर्घकाळ संपर्कात आल्यास मूत्रपिंडांच्या ऊतींमध्ये साचू शकतात. त्यामुळे रक्त गाळण्याची मूत्रपिंडांची क्षमता कमी होऊ शकते.

डॉ. निखिल भसीन सांगतात, “शिसे, कॅडमियम, आर्सेनिक आणि पारा यांसारखे जड धातू सर्वाधिक धोकादायक मानले जातात. कारण कालांतरानं ते मूत्रपिंडांच्या ऊतींना हानी पोहोचवू शकतात. काही औद्योगिक रसायने, कीटकनाशके आणि मेलेमाइनसारख्या रसायनांच्या अतिप्रमाणातील वापरामुळेही मूत्रपिंडांना इजा होऊ शकते.” डॉ. भसीन मुंबई सेंट्रल येथील वोकहार्ट हॉस्पिटल्समध्ये मूत्रपिंडरोगतज्ज्ञ आणि मूत्रपिंड प्रत्यारोपण तज्ज्ञ सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.

किडनीच्या आरोग्यावर काय परिणाम होतो?

फोटो स्रोत, Getty Images

हानिकारक पदार्थ रक्तप्रवाहात मिसळल्यानंतर मूत्रपिंडं त्यांना गाळून लघवीद्वारे शरीराबाहेर टाकतात. मात्र, वारंवार किंवा दीर्घकाळ संपर्क आल्यास काही विषारी पदार्थ मूत्रपिंडांच्या ऊतींमध्ये साचू शकतात, असं ते सांगतात.

मूत्रपिडांवर झालेल्या परिणामांची लक्षणं ओळखणं अतिशय आवश्यक आहेत. कारण सुरुवातीच्या टप्प्यात याची लक्षणं ओळखू येत नाहीत.

डॉ. भसीन सांगतात, सुरुवातीला लक्षणं दिसली नाही तरी कालांतरानं पाय किंवा चेहऱ्यावर सूज येणं, लघवीचे प्रमाण कमी होणं, सतत थकवा वाटणं, मळमळ, भूक मंदावणं, रक्तदाब वाढणं किंवा लघवीत रक्त दिसणं अशी लक्षणं दिसू शकतात. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणी करणे अत्यंत महत्वाचं आहे.

आपण काय करू शकतो?

  • विश्वासार्ह ठिकाणांहून अन्नपदार्थ खरेदी करावेत.
  • फळे आणि भाज्या व्यवस्थित धुवाव्यात.
  • संशयास्पद रंग किंवा स्वरूप असलेले पदार्थ टाळावेत.
  • बीपीए किंवा थॅलेट्स असलेल्या प्लास्टिकच्या भांड्यांमध्ये अन्न गरम करणं टाळावं.
  • प्रक्रिया केलेल्या आणि डबाबंद अन्नाचे सेवन कमी करावं.
  • अन्नातील भेसळीची शंका आल्यास संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी.
  • संतुलित आणि वैविध्यपूर्ण आहार घेतल्यास शरीरावर होणारा संभाव्य धोका कमी करता येतो.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC