Home LATEST NEWS ताजी बातमी बॉयफ्रेंडपासून जीवाला धोका म्हणून केली हत्या? सोशल मीडिया इन्फ्लूएन्सरवर आरोप

बॉयफ्रेंडपासून जीवाला धोका म्हणून केली हत्या? सोशल मीडिया इन्फ्लूएन्सरवर आरोप

4
0

Source :- BBC INDIA NEWS

टिकटॉक इन्फ्लूएन्सर ब्रूक जॉर्ज

फोटो स्रोत, Detained in Dubai

दुबईत एका 23 वर्षांच्या टिकटॉक इन्फ्लूएन्सरवर तिनं बॉयफ्रेंडची (प्रियकर) हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ब्रिटनमधील केंट येथील ग्रेव्हसेंडमध्ये राहणाऱ्या ब्रूक जॉर्जवर तिच्या बॉयफ्रेंडला ठार मारल्याचा आरोप आहे. दोघांची ऑनलाइन ओळख झाली होती आणि त्यानंतर ते रिलेशनशिपमध्ये आले. ‘डिटेन्ड इन दुबई’ या संस्थेने ही माहिती दिली आहे.

या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, जोडीदाराने केलेल्या हिंसक हल्ल्यानंतर तिनं स्वसंरक्षणार्थ चाकू उचलला होता, असं ब्रूकने सांगितलं आहे.

ब्रूकची जामिनावर सुटका करण्यात यावी आणि याकडे घरगुती हिंसाचाराचे प्रकरण म्हणून पाहावे, अशी मागणी या संस्थेने केली आहे.

संस्थेनं म्हटलं आहे की, जर ती दोषी आढळून आली, तर तिला फायरिंग स्क्वॉडद्वारे (गोळ्या झाडून) मृत्युदंडाची शिक्षा होऊ शकते.

‘पुरुष पोलिसांसमोर कपडे काढण्यास भाग पाडलं’

यूएईमध्ये ताब्यात असलेल्या एका ब्रिटिश महिलेला आणि तिच्या कुटुंबाला आपण मदत करत आहोत, अशी माहिती ब्रिटनच्या फॉरेन, कॉमनवेल्थ अँड डेव्हलपमेंट ऑफिसने दिली आहे.

जॉन लुईस या ब्रिटिश ब्रँडमध्ये काम केलेल्या ब्रूकला 22 जूनच्या सकाळी अटक करण्यात आली. तिच्यावर सुरुवातीला ‘पूर्वनियोजित हत्या’ केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.

जर ती दोषी आढळून आली तर तिला यूएई कायद्यानुसार मृत्युदंडाची शिक्षा होऊ शकते.

टिकटॉक इन्फ्लूएन्सर ब्रूक जॉर्ज

फोटो स्रोत, Detained in Dubai

‘डिटेन्ड इन दुबई’ या संस्थेने सांगितलं की, ब्रूकने आरोप केला आहे की महिला पोलिसांच्या अनुपस्थितीत पुरुष पोलिसांसमोर तिला कपडे काढण्यास भाग पाडलं गेलं. हे तिच्यासाठी खूप लाजिरवाणं, अपमानजनक आणि त्रासदायक होतं.

‘पार्टनरने ठोसा मारला, पासपोर्ट स्वतःकडे ठेवला’

जेव्हा ब्रूक पहिल्यांदा दुबईवरून परतली होती, तेव्हा तिने तो तिच्या आयुष्यातील सर्वोत्तम काळ असल्याचे म्हटले होते.

‘डिटेन्ड इन दुबई’च्या सीईओ राधा स्टर्लिंग यांच्या मते, दुबईच्या दुसऱ्या दौऱ्यादरम्यान तिचा प्रियकर हिंसक झाला होता.

स्टर्लिंग म्हणाल्या की, “ब्रूकचा दावा आहे की तिचा पार्टनर हळूहळू तिला नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करू लागला आणि हिंसक झाला. पार्टनरने तिला ठोसा मारला, तिचा पासपोर्ट स्वतःकडे ठेवला आणि फ्लॅटमध्ये तिच्यावर हल्लाही केला. त्यानंतर ती दुबई सोडून जाण्याचा प्रयत्न करत होती.”

ब्रूक जॉर्ज

फोटो स्रोत, @RadhaStirling

ब्रूकचं म्हणणं आहे की, तिच्या जीवाला धोका निर्माण झाला होता, त्यामुळे तिने जवळचा चाकू उचलून स्वतःचं रक्षण करण्यासाठी तो वापरला.

“ब्रूक दुसऱ्यांदा दुबईला गेल्यानंतर त्यांच्या नात्यात स्पष्ट बदल झाला होता,” असं ब्रूकची आई थेरेसा जॉर्ज यांनी एका निवेदनात म्हटलं.

त्या पुढे म्हणाल्या की, “घटनेच्या एक दिवसापूर्वी ब्रूक नेहमीसारखी वाटत नव्हती. ती शांत होती आणि आनंदी दिसत नव्हती. पण तिने त्यामागचं कारण सांगितलं नाही. त्या संध्याकाळी दोघे दुबईतील एका बारमध्ये गेले होते.”

“घटनेनंतर लगेच ब्रूकशी बोलल्यावर ती खूप घाबरलेली होती. तिला इतकं घाबरलेलं मी कधीच पाहिलं नव्हतं. ती सतत रडत होती, तिचा एक डोळा खूप सुजला होता आणि तो बंद होऊ लागला होता.”

मुलीच्या सुरक्षिततेबद्दल ‘खूप काळजी’ वाटत आहे, असं थेरेसा जॉर्ज म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या, ” तिला कसंही करून घरी परत यायचं होतं. तिच्यासोबत जे काही घडलं होतं त्यापासून तिला दूर जायचं होतं.”

‘डिटेन्ड इन दुबई’च्या सीईओ राधा स्टर्लिंग यांनी सांगितलं की, ” तिचा गैरफायदा घेता यावा म्हणून तिला खोटं सांगून दुबईला बोलावण्यात आलं होतं, असा संशय ब्रूकच्या जवळच्या लोकांना हळूहळू येऊ लागला होता.”

त्या म्हणाल्या की, “ब्रूकच्या पार्टनरचं वर्तन अचानक बदललं होतं. ब्रूकसाठी केवळ एका बाजूचेच (वन-वे) तिकीट काढण्यात आलं होतं, हे त्यांच्या काळजीचं कारण होतं.”

“पहिल्या दौऱ्यावेळी तिचे बिकिनीमधील प्रोफेशनल फोटोशूट करण्यात आले होते. दुसऱ्या दौऱ्यावेळी त्याने तिचा पासपोर्ट स्वतःकडे ठेवल्याचा आरोप करण्यात आला होता. ब्रूकने आपल्या मित्रांना काहीही ठीक नाहीये आणि तिला कसंतरी करून तिथून बाहेर पडायचं आहे, असं सांगितलं होतं.”

‘दूतावासाची भेट घेण्याची परवानगी नाकारली’

‘डिटेन्ड इन दुबई’ने सांगितलं की, ब्रूकला ब्रिटिश दूतावासाच्या अधिकाऱ्यांना भेटण्याची परवानगी नाकारली. त्याचबरोबर तिला वकिलाशिवाय जबाब द्यावा लागला.

या प्रकरणामुळे महिलांवरील हिंसाचार, आत्मरक्षणाचा म्हणजे स्वसंरक्षणाचा अधिकार, कायदेशीर प्रक्रिया आणि परदेशात ताब्यात असलेल्या ब्रिटिश नागरिकांना कशी वागणूक दिली जाते, याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत, असं राधा स्टर्लिंग यांनी म्हटलं.

त्या म्हणाल्या, “तपास पूर्ण होईपर्यंत ब्रूकची जामिनावर सुटका केली जावी, अशी आमची मागणी आहे. यूएईमध्ये अनेकदा हिंसाचाराची तक्रार करणाऱ्या महिलांवरच उलट कारवाई केलेली आहे आणि त्यांना नंतर त्रासालाही सामोरे जावं लागलं आहे.”

तपास सुरू असताना ब्रूकला सुरक्षा, योग्य वैद्यकीय उपचार, कायदेशीर मदत आणि तातडीने ब्रिटिश दूतावासाकडून सहाय्य मिळावं, अशी मागणी ‘डिटेन्ड इन दुबई’ने केली आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC