Home LATEST NEWS ताजी बातमी ब्लड प्रेशर आणि डिप्रेशनची औषधं घेताय? मग ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी नक्की लक्षात...

ब्लड प्रेशर आणि डिप्रेशनची औषधं घेताय? मग ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा

4
0

Source :- BBC INDIA NEWS

नैराश्यावर (डिप्रेशन) नियंत्रण मिळण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या काही औषधांमुळे शरीराला उष्णता (हीट) जाणवण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.

फोटो स्रोत, Getty Images

यावर्षी जूनमध्ये युरोपमध्ये प्रचंड उष्णतेची लाट आली होती. तेव्हा इतरांपेक्षा आपल्यालाच इतका जास्त त्रास का होतोय, हे इलियाना ओकुमुसला समजत नव्हतं.

ती म्हणते, “मी अपार्टमेंटमधून बाहेर पडताच माझ्या चेहऱ्यावर प्रचंड घाम यायचा.”

ब्रसेल्समधील एका अपार्टमेंटच्या वरच्या मजल्यावरील एसी नसलेल्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या 28 वर्षीय इलियानाने उष्णतेपासून दिलासा मिळवण्यासाठी अनेक उपाय करून पाहिले. ती ऑफिसमध्ये किंवा जवळच्या कॅफेमध्येही जात असे, परंतु त्याचा तिला फारसा उपयोग झाला नाही.

ती सांगते, “माझ्या शरीराचं तापमान पुन्हा सामान्य होण्यासाठी मला अर्धा ते एक तास लागायचा. एकदा तर माझ्या अपार्टमेंटमधलं तापमान 34 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं होतं. त्या दिवशी तर मी चक्क 18 तास झोपले होते.”

जागं होणंही मला कठीण होत होतं आणि आपला रक्तदाब तर कमी झाला नसेल ना, अशी तिला चिंता वाटत होती.

ओकुमुससाठी प्रचंड उष्णतेचा सामना करणं नवीन गोष्ट नव्हतं. तिने यापूर्वी जगातील इतर ठिकाणी 40 अंश सेल्सिअस तापमानाच्या उष्णतेचाही सामना केला होता.

तरीही, यावेळी उष्णतेचा तिच्यावर इतका वाईट परिणाम होण्याची ही पहिलीच वेळ होती. सोशल मीडियावर तिच्यासारखाच त्रास होत असलेल्या लोकांच्या पोस्ट तिने पाहिल्या. त्यानंतर उष्णता आणि दोन वर्षांपासून घेत असलेल्या नैराश्य (डिप्रेशन) व चिंतेच्या (एंग्झायटी) औषधांचा संबंध असू शकतो, हे तिच्या लक्षात आलं.

हवामान बदलामुळे उष्णतेच्या लाटा (हीटवेव्ह) अधिक तीव्र आणि गंभीर होत चालल्या आहेत.

अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर आणि आरोग्य संघटना इशारा देत आहेत की, मानसिक आरोग्य, ब्लड प्रेशर आणि हृदयविकारांवर घेतली जाणारी काही सामान्य औषधं शरीराचं तापमान नियंत्रित करण्याच्या क्षमतेवर परिणाम करू शकतात. त्यामुळे उष्णतेमुळे होणारे आजार होण्याचा धोका वाढू शकतो.

उष्णता आणि मानसिक आरोग्यासाठीची औषधं

डिप्रेशन, एंग्झायटी आणि बायपोलर डिसऑर्डरसारख्या मानसिक आरोग्याच्या समस्यांवर उपचारासाठी घेतली जाणारी काही औषधं उष्णतेमुळे होणाऱ्या त्रासाचा धोका वाढवू शकतात.

या औषधांचा हायपोथॅलॅमसवर परिणाम होतो, यामुळे असं होतं. मेंदूमध्ये असलेला हायपोथॅलॅमस हा भाग शरीराचं तापमान नियंत्रित करतो.

रॉबर्ट फेडर हे न्यू हॅम्पशायर येथील निवृत्त मानसोपचारतज्ज्ञ आहेत. तसेच ते ‘मेडिकल सोसायटी कन्सोर्टियम ऑन क्लायमेट अँड हेल्थ’च्या सुकाणू कमिटीचे सदस्यही आहेत.

ते म्हणतात, “मेंदूचा हा भाग आपल्याला आपली हालचाल कमी करण्यास, जास्त घाम येण्यास आणि शरीरातील चयापचयाची क्रिया कमी करण्यास मदत करतो. उष्णतेचा सामना करण्यासाठी हे बदल फायदेशीर ठरतात.”

या औषधांमध्ये सर्वाधिक वापरली जाणारी अँटीडिप्रेसंट औषधंही आहेत. त्यात सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिअपटेक इनहिबिटर (एसएसआरआय) आणि सेरोटोनिन-नॉरएपिनेफ्रिन रिअपटेक इनहिबिटर (एसएनआरआय) यांचा समावेश होतो.

एंग्झायटीवर उपचारासाठी घेतली जाणारी अनेक औषधं उष्णतेमुळे होणाऱ्या त्रासाचा धोका वाढवू शकतात.

फोटो स्रोत, Getty Images

या प्रकारच्या औषधांमध्ये सर्ट्रालिन, फ्लुओक्सेटीन, एस्सिटालोप्राम आणि व्हेनलाफॅक्सिन यांसारख्या औषधांचा समावेश होतो.

ही औषधं मेंदूतील सेरोटोनिनचा पुन्हा वापर होण्याची प्रक्रिया (री-अपटेक) रोखून काम करतात. सेरोटोनिन हे शरीरात नैसर्गिकरित्या तयार होणारं एक रसायन आहे, ते मूड आणि शरीरातील इतर अनेक कार्यं नियंत्रित करण्यास मदत करतं.

हायपोथॅलॅमसमध्ये सेरोटोनिनचं प्रमाण जास्त झाल्यास शरीराचं तापमान नियंत्रित करण्यास अडथळा येऊ शकतो आणि जास्त घाम येऊ शकतो. अँटीडिप्रेसंट औषधं घेणाऱ्या सुमारे 5 पैकी एका व्यक्तीला ही समस्या जाणवू शकते. त्यामुळे शरीरात इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता निर्माण होऊ शकते.

फेडर म्हणतात, “आधीच जास्त तापमानामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सची पातळी कमी झाली असेल, तर ही समस्या आणखी गंभीर होऊ शकते.”

ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट्स ही जुन्या प्रकारची डिप्रेशनवरील औषधं आहेत. या औषधांमुळे जास्त घाम येऊ शकतो किंवा घाम येणं पूर्णपणे कमी होऊ शकतं. ही एक समस्या आहे. यामुळे शरीराला उष्णता बाहेर काढणं कठीण होतं आणि शरीराचं तापमान वाढू शकतं.

या अँटीडिप्रेसंट औषधांचा ‘अँटीकोलिनर्जिक’ प्रभाव असतो. म्हणजेच, ही औषधं ॲसिटिलकोलिन नावाच्या रसायनाची (न्यूरोट्रान्समीटर) क्रिया कमी करतात. हे रसायन घाम येण्यासह शरीराच्या विविध कार्यांमध्ये सहभागी असतो, ते महत्त्वाची भूमिका बजावतं.

यापूर्वीच्या उष्णतेच्या लाटांवर झालेल्या अभ्यासांमध्ये अँटिसायकोटिक औषधं घेणाऱ्या लोकांमध्ये मृत्यूचा धोका अधिक असल्याचं दिसून आलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

लॉस एंजेलिसमध्ये राहणाऱ्या 36 वर्षांच्या करिअर कोच कॅरोलिन फ्रॅसेनेट यांच्यावर या उन्हाळ्यात 3 वेगवेगळ्या प्रकारची मानसिक आरोग्याची औषधं एकत्र घेतल्याचा परिणाम दिसून आला.

या औषधांमध्ये अँटीडिप्रेसंट, मनःस्थिती स्थिर ठेवणारी औषधे (मूड स्टॅबिलायझर) आणि एडीएचडीवरील औषधांचा समावेश होता. जुलैमध्ये खूप दिवस चाललेल्या उकाड्याच्या आणि दमट हवामानाच्या काळात त्यांना लक्ष केंद्रित करण्यास त्रास झाला. त्या जास्त चिडचिड करू लागल्या आणि त्यांना नेहमीपेक्षा जास्त घाम येऊ लागला.

सुरुवातीला त्यांना वाटलं की, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि कमी पाणी पिण्यामुळे हा त्रास होत असेल. नंतर त्यांच्या मेंटल हेल्थ सपोर्ट ग्रुपमधील एका मित्राने त्यांना उष्णता आणि औषधांमधील संबंध सांगणारे काही लेख पाठवले. त्या ग्रुपमधील इतरांनाही अशाच प्रकारचा त्रास झाल्याचं सांगितलं.

त्या म्हणतात, “माझ्या मानसिक आरोग्याच्या समस्या आणि औषधांच्या दुष्परिणामांबद्दल मला चांगली माहिती होती. तरीही उष्णतेचा औषधांशी असा संबंध असू शकतो, याची मला मात्र अजिबात कल्पना नव्हती.”

इतर प्रकारच्या मानसिक आजारांवरील औषधांचाही परिणाम होऊ शकतो. स्किझोफ्रेनिया आणि बायपोलर डिसऑर्डरच्या उपचारासाठी वापरली जाणारी अँटिसायकोटिक औषधं हायपोथॅलॅमसमधील डोपामाइनची क्रिया रोखतात. त्यामुळे शरीराचं तापमान कमी ठेवण्यासाठीची शरीराची नेहमीची प्रक्रिया व्यवस्थित काम करू शकत नाही.

या पूर्वीच्या उष्णतेच्या लाटांवर झालेल्या अभ्यासांमध्ये अँटिसायकोटिक औषधं घेणाऱ्या लोकांमध्ये मृत्यूचा धोका अधिक असल्याचं आढळून आलं आहे. त्याचबरोबर, एडीएचडीच्या उपचारासाठी वापरली जाणारी रिटालिनसारखी स्टिम्युलंट औषधं शरीरातील उष्णता वाढवू शकतात आणि रक्तवाहिन्या आकुंचित करतात.

यामुळे शरीराला नैसर्गिकरित्या थंड होण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो. फेडर यांच्या मते, या औषधांमुळे थकवा किंवा अतिश्रम होत असल्याचं जाणवतही नाही. त्यामुळे शरीर खूप गरम झालं आहे, याची जाणीवही व्यक्तीला होत नाही.

बीटा-ब्लॉकर्सपासून ते लघवी वाढवणाऱ्या औषधांपर्यंत

उष्णतेच्या लाटेचा शरीरावर होणारा परिणाम केवळ मानसिक आरोग्याच्या औषधांमुळेच वाढतात, असं नाही. ब्लड प्रेशर आणि हृदयविकारांसाठी घेतली जाणारी काही औषधंही शरीराची उष्णतेशी जुळवून घेण्याची क्षमता कमी करू शकतात.

डाययुरेटिक्स, एसीई इनहिबिटर्स आणि एआरबीएस ही उच्च रक्तदाबासाठी वापरली जाणारी औषधं आहेत. या औषधांमुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचं संतुलन बिघडू शकतं.

यातील शेवटच्या दोन प्रकारच्या औषधांचा तहान लागण्याचा संकेत देणाऱ्या हार्मोनवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शरीराला पाणी कमी झालं, तरी तहान लागल्याचं लगेच जाणवू शकत नाही.

लोगन हार्पर हे युनिव्हर्सिटी ऑफ कोलोरॅडो एंशुट्झच्या क्लायमेट अँड हेल्थ प्रोग्राममध्ये फॅमिली फिजिशियन आणि असिस्टंट फेलोशिप डायरेक्टर आहेत.

हृदयविकारावरील काही औषधांमुळे शरीरात पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन) निर्माण होऊ शकते.

फोटो स्रोत, Getty Images

ते म्हणतात, “या सगळ्या औषधांचा एकत्रित परिणाम झाल्यास शरीरातील पाणी कमी होऊ शकते. त्यामुळे किडनी निकामी होणे, हृदयविकाराचा झटका येणे किंवा शरीरातील इतर महत्त्वाच्या अवयवांवर गंभीर परिणाम होण्याचा धोका वाढतो.”

हृदयाशी संबंधित आजारांवर वापरली जाणारी ‘बीटा-ब्लॉकर्स’ ही औषधं त्वचेकडे होणारा रक्तप्रवाह कमी करू शकतात. त्यामुळे शरीरातील उष्णता बाहेर टाकण्याची प्रक्रिया कमी प्रभावी होऊ शकते.

ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट्स व्यतिरिक्त अँटीकोलिनर्जिक प्रकारची इतर औषधंही शरीराच्या तापमानावर परिणाम करू शकतात. पार्किन्सन्स, अतिसक्रिय मूत्राशय (ओव्हरऍक्टिव्ह ब्लॅडर), श्वसनाचे आजार आणि ॲलर्जी यांसारख्या समस्यांसाठी ही औषधं वापरली जातात. या औषधांमुळे घाम येण्याची प्रक्रिया आणि शरीर थंड ठेवण्याची नैसर्गिक यंत्रणेवर परिणाम करू शकतात.

हार्पर म्हणतात, “लोक अनेकदा एकाच वेळी वेगवेगळी औषधं घेतात. या औषधांमुळे शरीराला स्वतःला थंड ठेवणं कठीण होऊ शकतं आणि यामुळे शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना नुकसान होण्याचा धोकाही वाढू शकतो.”

ते पुढे सांगतात, हे प्रामुख्याने वृद्ध व्यक्तींच्या बाबतीत अधिक लागू होतं. कारण उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांचा धोका तुलनेने त्यांना जास्त असतो.

उन्हाळ्यात ब्लड प्रेशरची औषधं वेगवेगळ्या वयोगटातील लोकांवर वेगवेगळा परिणाम करू शकतात.

फोटो स्रोत, Getty Images

काही औषधांमुळे सौम्य उष्णताही गंभीर त्रासाचं कारण ठरू शकते. ‘डाययुरेटिक्स, अँटिसायकोटिक्स, बीटा-ब्लॉकर्स, स्टिम्युलंट्स आणि ब्लड प्रेशरची औषधं घेणाऱ्या वृद्धांना उष्णतेची लाट नसतानाही उष्णतेशी संबंधित आजारांमुळे रुग्णालयात दाखल होण्याचा धोका जास्त असू शकतो’ असं अमेरिकेत झालेल्या एका संशोधनात आढळलं आहे.

हार्पर म्हणतात, “ही औषधं एकत्र घेतल्यास, एकावेळी केवळ एक औषध घेण्याच्या तुलनेत आरोग्याचा धोका जास्त वाढू शकतो.”

पण कोणत्या औषधांचा एकत्रित वापर सर्वाधिक धोकादायक ठरू शकतो, हे अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाही, असं ते सांगतात.

सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचाही उष्णतेमुळे होणाऱ्या त्रासाच्या धोक्यावर परिणाम होऊ शकतो. हार्पर म्हणतात, “एखाद्या व्यक्तीचं काम शारीरिक कष्टाचं असू शकतं, ज्यामुळे तिला जास्त उष्णतेत काम करावं लागतं. काही जणांना घराबाहेरच जास्त वेळ राहावं लागतं. तर काही लोक अशा शहराच्या भागामध्ये राहतात, जिथे उष्णता जास्त असते आणि एअर कंडिशनरचा खर्च त्यांना परवडत नाही.”

दक्षिण नेवाडा येथील टौरो युनिव्हर्सिटीमध्ये आपत्कालीन वैद्यकीय विभागातील फिजिशियन असिस्टंट आणि असिस्टंट प्रोफेसर सेसिलिया अहोनोनु यांनी अलीकडेच याचा अनुभव घेतला.

डॉक्टर औषधांबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याचा सल्ला देतात

फोटो स्रोत, Getty Images

लास वेगासमध्ये एका कम्युनिटी हेल्थ कार्यक्रमादरम्यान तापमान जवळपास 43 अंश सेल्सिअस होतं. त्यावेळी त्यांची भेट पार्कमध्ये झोपलेल्या एका 60 वर्षीय व्यक्तीशी झाली.

त्या सांगतात, “त्याचा चेहरा खूप फिकट पडला होता, त्याला खूप घाम येत होता आणि त्याच्या हृदयाचे ठोके वेगाने सुरू होते.”

तो व्यक्ती डाययुरेटिक आणि एसएसआरआय औषधं घेत होता. त्याच्या शरीराचं तापमान किती वाढलं आहे, याची त्याला जाणीवही झाली नव्हती.

अहोनोनु म्हणतात, “आपल्यापैकी बहुतेक जण जे करतात, तेच त्यांनीही केलं. तीव्र उन्हामुळेच आपल्याला हा त्रास होत असेल, असं त्यांना वाटलं.”

पण जेव्हा त्यांनी त्यांना आणखी काही प्रश्न विचारले, तेव्हा या त्रासामागचं आणखी एक संभाव्य कारण समोर आलं, ते म्हणजे त्याची औषधं.

अहोनोनु यांनी त्यांना उष्णतेपासून बचाव करण्यासाठी काही सोपे उपाय सांगितले. भरपूर पाणी पिणे, कडक उन्हाच्यावेळी बाहेर न पडणे अशा सूचना त्यांनी दिल्या. तसेच, जवळच्या कूलिंग सेंटरची यादीही त्यांना दिली.

त्यांनी त्यांना उष्माघाताची (हीट स्ट्रोक) शक्यता दर्शवणाऱ्या गंभीर लक्षणांबाबतही सावध केलं. कारण हीट स्ट्रोक ही गंभीर आणि तातडीने वैद्यकीय उपचारांची गरज असलेली अवस्था आहे.

त्या म्हणतात, “जर एखाद्या व्यक्तीच्या वागण्यात बदल जाणवला, ती गोंधळलेली दिसली किंवा नेहमीसारखी वागत नसेल, तर तिला त्वरीत जवळच्या रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात नेलं पाहिजे.”

अधिक माहिती आणि योग्य काळजी

वैद्यकीय सल्ल्याशिवाय कोणतीही औषधं बंद करू नयेत, असा डॉक्टरांचा सल्ला आहे.

हार्पर म्हणतात की, डॉक्टरांना स्वतःला उष्णता आणि औषधांचा संबंध याबाबत अधिक प्रशिक्षण आणि माहिती मिळणं गरजेचं आहे.

ते म्हणतात, “मला वाटतं, डॉक्टरांनी जेव्हा एखादं नवीन औषध लिहून दिलं, तेव्हा त्यांनी थोडा वेळ काढून त्या औषधाच्या गंभीर दुष्परिणामांबद्दल रुग्णाला माहिती द्यायला हवी.”

“काही औषधं अशी असतात, विशेषतः ज्यांना उष्णतेमुळे त्रास होण्याचा धोका जास्त आहे अशा लोकांना, उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांच्या धोक्याबद्दलही माहिती द्यायला हवी.”

ओकुमुसला या उन्हाळ्यात आलेल्या त्रासामुळे आपण ही औषधं पुढेही घ्यायची का, असा विचार करण्यास भाग पाडलं आहे.

ती म्हणते, “मी माझ्या डॉक्टरांकडे जाऊन ही औषधं पूर्णपणे बंद करता येतील का, याचा गांभीर्याने विचार सुरू केला आहे. कारण उन्हाळ्यात मी नीट काम करू शकत नाही किंवा माझं आयुष्य नेहमीसारखं जगू शकत नाही.”

मात्र, फ्रॅसेनेट यांनी औषधं बंद करण्याचा विचार केलेला नाही. त्या म्हणतात, “ही औषधं माझ्यासाठी खूप चांगल्याप्रकारे काम करतात.”

त्यांचं म्हणणं आहे की, त्यांना हा त्रास औषधांमुळे होतोय, शरीरात दुसरी काही समस्या नाही, हे समजल्यामुळे दिलासा मिळाला.

त्या म्हणतात, “यामुळे मला समजलं की, ही खरंच एक समस्या आहे, अचानक घडलेली घटना नाही.”

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC