Source :- BBC INDIA NEWS

जनरल नरवणे

Published

वाचन वेळ: 5 मिनिटे

2 फेब्रुवारी 2026 रोजी लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एका अप्रकाशित पुस्तकातील काही उतारे वाचण्याचा प्रयत्न केला. पण भाजप नेत्यांनी याला आक्षेप घेत, ‘जे पुस्तक अजून प्रसिद्धच झाले नाही, त्यातील मजकूर कसा वाचला जाऊ शकतो?’ असा सवाल उपस्थित केला होता.

हा वाद इतका वाढला की, संबंधित अधिकाऱ्यांची परवानगी न घेता पुस्तकाची अप्रकाशित प्रत प्रसारित केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी स्वतःहून दखल घेत गुन्हा दाखल केला होता.

या अप्रकाशित पुस्तकाचे नाव ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ आहे. हे पुस्तक भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद (एम.एम.) नरवणे यांनी लिहिलं आहे.

त्यांची महत्त्वाची ओळख अशी की, गलवान खोऱ्यात भारत आणि चीनचे सैनिक जेव्हा आमनेसामने आले होते, त्या काळात ते भारतीय लष्कराचे नेतृत्व करत होते.

बीबीसीचे प्रतिनिधी जुगल पुरोहित यांना दिलेल्या मुलाखतीत जनरल एम.एम. नरवणे यांनी त्यांच्या पुस्तकाशी निगडीत वाद, भारत-चीन यांच्यातील सीमा वाद आणि इतर अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले.

पुस्तकाशी संबंधित वादाबाबत जनरल नरवणे काय म्हणाले?

संसदेतील वादाबाबत विचारलेल्या प्रश्नावर जनरल नरवणे म्हणाले की, या प्रकरणाशी त्यांचा कोणताही संबंध नव्हता आणि असे काही घडणार आहे याची त्यांना आधी माहितीही नव्हती.

ते म्हणाले, “माझं नाव वापरून कोणी वाद निर्माण करण्याचा किंवा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला, तर याचा अर्थ त्याचा माझ्याशी संबंध असेलच असं नाही. याबद्दल मला सर्वप्रथम माझ्या मित्रांकडून याची माहिती मिळाली, त्यांनी फोन करून सांगितलं होतं.”

युवक काँग्रेसचे कार्यकर्ते

फोटो स्रोत, Ishant Chauhan/Hindustan Times via Getty Images)

राहुल गांधी लोकसभेत ज्या अप्रकाशित पुस्तकातील काही उतारे वाचून दाखवण्याचा प्रयत्न करत होते, ते पुस्तक जानेवारी 2024 मध्ये प्रकाशित होणार असल्याचे सांगितलं जात होतं.

पण, ते प्रत्यक्षात प्रकाशित झाले नाही. सध्या हे पुस्तक परीक्षणासाठी (पुनरावलोकनासाठी) संरक्षण मंत्रालयाकडे आहे, असे माध्यमांत आलेल्या वृत्तांमध्ये म्हटलं आहे.

इंडियन एक्सप्रेसच्या एका वृत्तानुसार, “या पुस्तकात 2020 मध्ये पूर्व लडाखमध्ये भारत-चीनदरम्यान झालेल्या लष्करी वादाची माहिती देण्यात आली आहे. तसेच गलवान खोऱ्यातील संघर्ष आणि अग्निपथ योजनेचाही उल्लेख आहे. या पुस्तकात 31 ऑगस्ट 2020 च्या रात्री संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत झालेल्या संभाषणाचाही यात संदर्भ आहे.”

लोकसभेत उपस्थित झालेल्या या मुद्द्याबाबत राहुल गांधी किंवा काँग्रेस पक्षाने त्यांच्याशी कधीही संपर्क साधला नाही, असं जनरल नरवणे यांनी सांगितलं.

ते म्हणाले, “या विषयावर जास्त चर्चा करण्याची गरज नाही. कारण ही खूपच खालच्या पातळीवरची चर्चा आहे. जगात खूप महत्त्वाच्या घटना घडत आहेत, त्यावर चर्चा करूया.”

‘जे योग्य वाटेल ते करा’, असं मोदींनी म्हटलं होतं का?

जनरल नरवणे

फोटो स्रोत, Raj K Raj/Hindustan Times via Getty Images

भारत-चीन संघर्षाच्या काळात केंद्र सरकारने लष्कराला स्पष्ट सूचना दिल्या नव्हत्या, असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी करत आले आहेत.

याच वर्षी फेब्रुवारीमध्ये भोपाळ येथे झालेल्या सभेत राहुल गांधी यांनी जनरल नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकाचा पुन्हा उल्लेख केला होता. त्यांनी दावा केला की, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनरल नरवणे यांना “तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा” असा संदेश दिला होता.

पंतप्रधान मोदी यांनी खरंच संरक्षणमंत्र्यांमार्फत असं म्हटलं होतं का? असा प्रश्न विचारल्यावर जनरल नरवणे म्हणाले की, पुस्तक सध्या पुनरावलोकनासाठी आहे. त्यामुळे त्याविषयी बोलणे योग्य ठरणार नाही.

परंतु, ते म्हणाले, “शेवटी हा लष्कराचा निर्णय (मिलिट्री डिसीजन) होता की, काय करायचं आणि काय नाही. जेव्हा अशा प्रकारचे आदेश मिळतात, याचा अर्थ सरकारला आपल्या सैन्यावर आणि लष्करप्रमुखांवर पूर्ण विश्वास असतो. ते जे निर्णय घेतील किंवा जी कारवाई करतील, ती योग्यच असेल असा सरकारचा विश्वास असतो.”

ते म्हणतात, “या गोष्टीकडे अशाच दृष्टीने पाहिलं पाहिजे. यावरून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या दृष्टीकोनातून याकडे पाहू नये.”

‘चीनला समजून घेणं सोपे नाही’

भारताच्या सामरिक (रणनीतिक) वर्तुळात चीनबद्दल सखोल समज आहे का, असा प्रश्न विचारल्यावर जनरल नरवणे म्हणाले, “चीनला समजून घेणं सोपे नाही. तो खूप मोठा देश आहे. त्यांची व्यवस्था, यंत्रणा आणि काम करण्याची पद्धतही खूप वेगळी आहे. त्यामुळे उच्च स्तरावर चीनचा अधिक अभ्यास होणे गरजेचं आहे.”

जनरल नरवणे म्हणतात की, चीनला नीट समजून घ्यायचं असेल तर भारतातील ‘चीनविषयक तज्ज्ञांना’ मँडरिन भाषा येणं आवश्यक आहे.

ते म्हणाले, “जेव्हा आपले संशोधक, विद्वान, पत्रकार आणि अभ्यासक चीनमध्ये राहतील, तिथे शिक्षण घेतील आणि काम करतील, तेव्हाच आपल्याला चीनबद्दल सखोल माहिती मिळेल. परंतु, धोरणात्मक आणि लष्करी पातळीवर कोणतीही कमतरता नाही.”

जनरल नरवणे यांच्या मते, चीनसोबतचे संबंध सुधारायचे असतील तर सर्वात आधी सीमावाद सोडवला पाहिजे. भारत आणि चीन दोन्ही देश आपापली सीमा वेगवेगळ्या ठिकाणी असल्याचा दावा करतात.

ते म्हणतात, “भारत आणि चीन यांच्यात जितका अधिक संवाद होईल, तितके मतभेद कमी होतील. पण, ही प्रक्रिया हळूहळूच पुढे जाऊ शकते.”

चीनने भारताची जमीन बळकावली आहे का?

भारताने आपला कोणताही भूभाग गमावलेला नाही, असं जनरल नरवणे यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

ते म्हणाले, “मला पुन्हा एकदा स्पष्ट करायचं आहे की, आपण काहीही गमावलेलं नाही. पंतप्रधान मोदी यांनी एका भाषणात बरोबर म्हटलं होतं की, भारताने एक इंचही जमीन गमावलेली नाही.”

जर घुसखोरी झालीच नाही, तर चीनबरोबर वाद कशावरून आहे? असा प्रश्न विचारल्यावर नरवणे म्हणाले की, हा दोन्ही देशांच्या सीमेबाबतच्या वेगवेगळ्या समजुतींचा फरक आहे.

सीमेवर गस्त घालताना भारत आणि चीनचे सैन्य आमनेसामने येणे ही सामान्य बाब आहे, असं जनरल नरवणे म्हणाले.

फोटो स्रोत, MONEY SHARMA/AFP via Getty Images

ते म्हणाले, “भारत जिथेपर्यंत आपली सीमा मानतो तिथेपर्यंत जातो, तर चीनही जिथेपर्यंत आपली सीमा मानतो तिथेपर्यंत येतो. त्यामुळे गस्तीदरम्यान दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोर येणं स्वाभाविकच आहे. अनेकदा हे शांततेत होतं, तर काहीवेळा संघर्षही होतो.”

ते म्हणाले की, भारत आणि चीनचे सैन्य आमनेसामने येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अशा घटना अनेकदा घडल्या आहेत.

पाकिस्तानबद्दल जनरल नरवणे काय म्हणाले?

जनरल नरवणे यांच्या मते, चीन आणि पाकिस्तान या दोघांमध्ये फरक आहे. त्यामुळे त्यांच्याशी व्यवहार करण्याची पद्धतही वेगवेगळी असते.

जनरल नरवणे

फोटो स्रोत, Sonu Mehta/Hindustan Times via Getty Images

ते म्हणाले, “पाकिस्तानसोबतचा आपला मुख्य प्रश्न दहशतवादाचा आहे, तर चीनसोबत तसं नाही. दहशतवादाचा धोका निर्माण झाल्यास, सीमेवर किंवा जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानविरोधात गोळीबार करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असतं.”

ते म्हणाले, “पण चीनच्या बाबतीत अशी परिस्थिती निर्माण होत नाही, कारण तिथे दहशतवादाचा प्रश्नच नाही. त्यामुळे दोन्ही देशाबाबतचा दृष्टिकोन वेगळा असणं स्वाभाविक आहे.”

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC