Source :- ZEE NEWS

Shehbaz Sharif on Operation Sindoor: भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं तेव्हा पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करत होते. स्वत: त्यांनीच हा खुलासा केला आहे. इतकंच नाही तर आपल्या लष्कराने दिलेलं प्रत्युत्तर पाहून भारताने शस्त्रसंधीसाठी विनंती केल्याचा हास्यास्पद दावाही त्यांनी केला आहे. त्यांच्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, पाकिस्तानातील काही पत्रकारही त्यांची खिल्ली उडवत तथ्य वेगळं असल्याचं सांगत आहेत. इस्लामाबादमधील पाकिस्तान स्मारकात आयोजित एका विशेष ‘यौम-ए-तशकूर’ (Youm-e-Tashakur) कार्यक्रमाला ते संबोधित करत होते. 

काय म्हणाले शहबाज शरीफ? 

“सकाळची वेळ होती. मला सवय असल्याने, फजरनंतर मी स्विमिंग करतो. मी माझा सेक्यूअर फोन सोबत नेला होता. मी स्टाफला जर घंटी वाजली तर लगेच सांगा असं सांगितलं होतं. घंटी वाजल्यानंतर जनरल मुनीर लाईनवर होते. आम्ही भारताला जोरदार प्रत्युत्तर दिलं असून, आता शस्त्रसंधीसाठी विनंती केली जात आहे, तुमचा काय विचार आहे? अशी विचारणा त्यांनी केली. मी म्हटलं यापेक्षा मोठी काय गोष्ट असू शकते. तुम्ही शत्रूला कानाखाली मारली असून, त्याचं डोकं गरगरलं आहे, त्यामुळे आता ते शस्त्रंसधघीसाठी मजबूर आहेत. तुम्ही शस्त्रसंधीची विनंती स्विकारा,” असं शहबाज शरीफ म्हणाले. 

भारताने नूर खान एअरबेसवर हल्ला केल्याची कबुली

पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी रावळपिंडीतील नूर खान एअरबेस आणि इतर ठिकाणी भारताने केलेल्या अचूक क्षेपणास्त्र हल्ल्याची कबुलीही दिली आहे. लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी 9 आणि 10 मेच्या मध्यरात्री 2.30 वाजता फोन करुन आपल्याला ऑपरेशन सिंदूर दरम्यान झालेल्या हल्ल्याची माहिती दिल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 

शहबाज शरीफ यांनी सांगितलं की, “9-10 मे च्या मध्यरात्री 2.30 च्या सुमारास, लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी मला सुरक्षित लाईनवरून फोन करून माहिती दिली की हिंदुस्तानी बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी नूर खान एअरबेस आणि इतर भागात हल्ला केला आहे. मी तुम्हाला देवाची शपथ घेऊन सांगू शकतो की जनरल यांच्या आवाजात आत्मविश्वास आणि देशभक्ती होती”.

“आपल्या हवाई दलाने देशाला वाचवण्यासाठी आपल्याच देशात विकसित करण्यात आलेल्या तंत्रज्ञानाचा वापर केला. यासह त्यांनी चिनी विमानांमध्ये आधुनिक उपकरणं आणि तंत्रज्ञानाचा वापर केला,” असंही ते म्हणाले. 

SOURCE : ZEE NEWS