Source :- ZEE NEWS

भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानात खळबळ माजली आहे. पाकिस्तान वारंवार भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र दरवेळी पाकिस्तानवर तोंडावर आपटण्याची वेळ येत आहे. यादरम्यान पाकिस्तान सतत अमेरिकेकडे मदतीसाठी याचना करत आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव पाहता अमेरिकेने या संपूर्ण घटनाक्रमावर प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंस आम्ही दोन्ही देशांतील तणाव कमी करण्यासाठी आवाहन करु शकतो, पण आम्ही युद्धात सहभागी होऊ शकत नाही असं स्पष्ट केलं आहे. 

अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंस आम्ही दोन्ही देशांतील तणाव कमी करण्यासाठी आवाहन करु शकतो असं फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. पण आम्ही हस्तक्षेप करणार नाही, कारण ते आमचं काम नाही असं सांगितलं आहे. “आम्ही युद्धात सहभागी होऊ शकत नाही, कारण हे आमचं काम नाही आणि आम्ही ते नियंत्रित करु शकत नाही,” असं ते म्हणाले आहेत. 

ते म्हणाले आहेत की, “अमेरिका भारताला शस्त्रं सोडून देण्यास सांगू शकत नाही. आम्ही पाकिस्तानी नागरिकांनाही सांगू शकत नाही. आम्ही राजनैतिक माध्यमातून यावर तोडगा काढू शकतो. फक्त आम्हाला आशा आहे की, सध्याच्या युद्धाचं रुपांतर मोठ्या किंवा अण्वस्त्र युद्धात होऊ नये. पण सध्या तरी असं होईल असं आम्हाला वाटत नाही”.

याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्याच्या स्थितीत मी काहीच मदत करु शकत नाही असं स्पष्ट केलं होतं. ही फार भयानक स्थिती आहे. माझे भारत आणि पाकिस्तान दोघांशी चांगले संबंध आहेत आणि दोघांनी यावर तोडगा काढावा असंही ते म्हणाले आहेत. 

दुसरीकडे याआधी पाकिस्तानलाही संयुक्त राष्ट्राकडून झटका बसला होता. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणावादरम्यान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने बंद दरवाजाआड एक बैठक घेतली होती. पाकिस्तानच्या आवाहनानंतर करण्यात आलेल्या या बैठकीतून कोणताही तोडगा निघाला नव्हता. यामुळे पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडावर पडला होता. संयुक्त राष्ट्राने या बैठकीनंतर कोणतंही अधिकृत निवेदन जारी केलं नाही. 

दुसरीकडे पाकिस्तान मात्र ही बैठक सुरु असताना वारंवार खोटी विधानं करत होता. भारताने सिंधू करार निलंबित केल्याने संयुक्त राष्ट्राने बेकयादेशीर ठरवलं असल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. 

SOURCE : ZEE NEWS