Source :- BBC INDIA NEWS
चेन्नईतल्या तिरुपोरुर मुरुगन मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या दिनेश यांचा आयफोन चुकून तिथल्या दानपेटीत पडला. आता तो फोन परत मिळावा, यासाठी ते प्रयत्न करत आहेत.
तामिळनाडूच्या हिंदू धार्मिक देणगी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिनेश यांना सांगितलं आहे की, दानपेटीमध्ये पडलेला आयफोन हा आता मुरुगन(देव)चा झाला आहे.
आयफोन परत देण्यास नकार दिलेल्या अधिकाऱ्यांनी दिनेश यांना मोबाईलमधील फोटो, व्हीडिओ आणि इतर डेटा काढून घेण्यास मात्र परवानगी दिली आहे.
याबाबत बोलताना तामिळनाडूच्या हिंदू धार्मिक देणगी विभागाचे मंत्री शेखर बाबू म्हणाले आहेत की, ‘ते या आयफोनचा खरा मालक शोधून त्यांच्यापर्यंत आयफोन पोहोचवण्यासाठीच्या शक्यता तपासत आहेत.’
आयफोन दानपेटीत कसा पडला?
चेन्नईतील अंबत्तूर विनायगपुरम येथील रहिवासी असणारे दिनेश, चेन्नई महानगर विकास प्राधिकरण (सीएमडीए) मध्ये काम करतात.
चेन्नईतील तिरुपोरुर कंदस्वामी मंदिरात त्यांचा आयफोन हरवल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे तो आयफोन परत मिळवण्यासाठी ते आता प्रयत्न करत आहेत.
बीबीसी तमिळशी बोलताना ते म्हणाले की, “मी तिरुपोरुरच्या मुरुगन मंदिरात दर्शनासाठी गेलो असताना, चुकून माझा आयफोन (13 प्रो मॅक्स) तिथल्या दानपेटीत पडला. मी मंदिराच्या अधिकाऱ्यांना याबाबत पत्र लिहिलं. त्यानंतर तिथल्या अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की, 19 डिसेंबर रोजी आम्ही दानपेटी उघडल्यानंतर संबंधित फोनची माहिती तुम्हाला कळवू. त्यानुसार त्यांनी ती पेटी उघडली आणि त्यात माझा फोन देखील सापडला पण, मला माझा फोन परत देण्यास त्यांनी नकार दिला. याउलट, त्या अधिकाऱ्यांनी मला असं सांगितलं की, धर्मादाय नियमानुसार मंदिराच्या दानपेटीत पडणारी प्रत्येक वस्तू ही ‘स्वामी’च्या मालकीची असते.”
दिनेश म्हणतात, “त्यादिवशी दुपारी मी कंदस्वामी मंदिरात पूजेसाठी गेलो होतो. तिथे चुकून माझा फोन तिथल्या दानपेटीत पडला. त्यानंतर मला अधिकाऱ्यांनी सांगितलं की, दानपेटीत पडणारी प्रत्येक गोष्ट ‘स्वामीं’च्या मालकीची होते. मग मी तिथून परत निघून आलो.”
बीबीसी तमिळला त्यांनी सांगितलं की, “त्यानंतर तिथल्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संवाद साधला आणि माझ्याशी संपर्क केला. त्यांनी मला विचारलं की, तुम्ही मोबाईलमधला डेटा काढून घेण्यास इच्छुक आहात का? पण, मी परत मंदिरात जाऊ शकलो नाही आणि डेटाही परत काढू शकलो नाही.”
मंदिर प्रशासनाचं काय म्हणणं आहे?
तिरुपोरुर कंदस्वामी मंदिराचे कार्यकारी अधिकारी कुमारवेल म्हणाले की, “मंदिरातील राजगोपुराजवळ (गर्भगृहाजवळ) एक सहा फूट उंचीची दानपेटी आहे. त्या दानपेटीत मोबाईल पडणं शक्यच नाही.”
बीबीसी तमिळला त्यांनी सांगितलं की, “ऑगस्ट महिन्यात दिनेश मंदिरात दर्शनासाठी आले होते. त्यानंतर त्यांनी सप्टेंबर महिन्यात त्यांचा आयफोन हरवला असल्याची लेखी तक्रार मंदिर प्रशासनाकडे केली होती.”
कुमारवेल म्हणतात की, “आम्हाला दिलेल्या पत्रात त्यांनी असा उल्लेख केला होता की, त्यांचा फोन दानपेटीत पडला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंदिर प्रशासनाकडून दानपेटी उघडल्यानंतर त्यांना कळवण्यात यावे. आम्ही दानपेटी उघडतो तेव्हा त्याची माहिती सार्वजनिकरित्या देतो. आणि त्यानुसारच आम्ही दिनेश यांनाही कळवलं होतं.”
देवांची मालकी
गेल्या गुरुवारी, हिंदू धार्मिक देणगी विभागाच्या सहआयुक्त राजलक्ष्मी आणि मंदिर कार्यकारी अधिकारी कुमारवेल यांच्या उपस्थितीत तिरुपोरूर मुरुगन मंदिराचा खजिना उघडण्यात आला.
त्यावेळी धर्मादाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या खजिन्यात एकूण 52 लाख रुपये रोख, 289 ग्रॅम सोने, 6 हजार 920 ग्रॅम चांदी आणि एक आयफोन सापडला आहे.
“19 तारखेला मंदिरात येताना दिनेश यांनी त्यांच्यासोबत एक फोटोग्राफर आणि व्हीडिओग्राफर देखील आणला होता. राजगोपुराजवळच्या दानपेटीत एक आयफोन मिळाला होता. दिनेश यांनी तो आयफोन त्यांना देण्याची मागणी केली. आम्ही म्हणालो की, आम्ही लगेच तो आयफोन त्यांना देऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या मोबाईलचे तपशील लेखी स्वरूपात आम्हाला द्या. आम्ही आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून तुम्हाला कळवू,” कार्यकारी अधिकारी कुमारवेल यांनी सांगितलं.
नियम काय सांगतात?
कुमारवेल म्हणतात की, “तमिळनाडू हिंदू धार्मिक देणगी विभागाच्या नियमानुसार, दान करण्यात आलेल्या प्रत्येक गोष्टीवर मंदिराचं नियंत्रण असतं. कोणत्याही व्यक्तीला त्याच्या इच्छेनुसार हवं ते दान दानपेटीत टाकता येतं. त्यानंतर, त्या पेटीत टाकलेली प्रत्येक वस्तू आपोआपच मंदिराच्या मालकीची होते. दानपेटीत टाकण्यात आलेल्या प्रत्येक वस्तूची नोंद ठेवावी लागते. त्यामुळे, आम्ही त्यांच्याकडे लेखी पुरावा मागितला आहे. जेणेकरून तो फोन त्यांचाच असल्याचं ते सिद्ध करू शकतील.”
कुमारवेल म्हणाले की, “यापूर्वी असं काही घडल्याचं माझ्या ऐकिवात नाही. त्यामुळे या नियमात विशेष अपवाद म्हणून, दानपेटीतील इलेक्ट्रॉनिक वस्तू तिच्या मूळ मालकाला द्यायची की नाही, हे आता आमचे वरिष्ठ अधिकारी ठरवतील.”
मंदिराच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी, सहा फूट उंचीच्या दानपेटीत मोबाईल पडणे शक्य नाही असं म्हटल्यानंतर, आम्ही दिनेश यांच्याशी संपर्क साधला. यावर ते म्हणाले की, “मोबाईल चुकून तिथे पडला.” त्यानंतरच्या एकाही प्रश्नाचं उत्तर देण्यास मात्र त्यांनी नकार दिला.
तमिळनाडूचे मंत्री काय म्हणाले?
आयफोन प्रकरणाबाबत तिरुवल्लूर येथे पत्रकारांशी बोलताना, तामिळनाडूचे हिंदू धार्मिक देणगी विभागाचे मंत्री शेखर बाबू म्हणाले, “या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर आम्ही निष्कर्षापर्यंत पोहोचू.”
शेखर बाबू यांनी सांगितलं की, “दानपेटीत पडणारी प्रत्येक गोष्ट स्वामींच्या खात्यात जमा करणे अनिवार्य आहे. याबाबत काही कायदेशीर मदत मिळू शकते का? याचा आम्ही तपास करत आहोत.”
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC