Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Getty Images
-
Published
-
वाचन वेळ: 2 मिनिटे
महाराष्ट्रात मान्सून पोहोचला, पण त्यानंतर पावसानं ब्रेक घेतलाय. मात्र, लवकरच तो पुन्हा सक्रीय होऊ शकतो.
सध्या किनारी भागांत ढग जमा होऊ लागले असून, गेल्या चोविस तासांत विदर्भातही तुरळक ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली.
पुढच्या दोन तीन दिवसांत हवामान कसं असेल आणि कुठल्या जिल्ह्यांमध्ये काय इशारे दिले आहेत, जाणून घेऊयात.
28 जूनच्या दुपारी इन्सॅट थ्रीडी आर सॅटेलाईटनं टिपलेल्या दृश्यांमध्ये भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर ढगांचा संचय होत असल्याचं दिसतं. पुढच्या एक दोन दिवसांत इथे तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो.
हवामान विभागाच्या मॉडेल गायडन्सनुसार, 29 ते 2 जुलैदरम्यान कोकणात किनारपट्टीवरील भागात तसंच घाटभागात हळूहळू पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. इथेकाही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाची प्रणाली तयार होत असून तिच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढू शकतो.
1 आणि 2 जुलैला तळकोकणात, तसंच मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी पावसाचा जोर जास्त राहू शकतो. 3 आणि 4 जुलैपर्यंत पावसात वेगानं वाढ होऊन मुंबई परिसरात जोरदार पावसाची शक्यता आहे.
फोटो स्रोत, Getty Images
पुढच्या चोवीस ते 48 तासांत विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
कोकणात विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे.
28 जूनच्या रात्रीसाठी वाशिम यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचा वारा, वीजा आणि गडगडाटासह तुरळक ठिकाणी जोरदार पावसासाठी ऑरेंज अलर्ट आहे. तर राज्यात इतर सर्व जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
फोटो स्रोत, Getty Images
29 जून रोजी अमरावतीमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसासाठी ऑरेंज अलर्ट आहे. तर विदर्भातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट आहे.
मुंबई, रायगड, रत्नागिरीमध्ये जोरदार पावसासाठी यलो अलर्ट आहे.
ठाणे, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला जिल्ह्यांमध्ये थंडरस्टॉर्मसाठी यलो अलर्ट आहे.
1 आणि 2 तारखेला कोकणातल्या काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC




