Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Twitter,
-
13 मे 2025
अपडेटेड 11 मिनिटांपूर्वी
प्रचंड उष्णता आणि उकाड्यात थंडावा देणारी बातमी आहे. मान्सूनचं यंदा आठ दिवसांपूर्वीच म्हणजे 24 मे रोजी केरळमध्ये आगमन झालं झालं आहे. हवामान विभागानं मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची माहिती दिली.
दरवर्षी सरासरी 1 जूनला मान्सून देशात दाखल होत असतो. पण यावर्षी आठ दिवसांपूर्वीच मान्सूननं प्रवेश केला आहे.
उत्तर कर्नाटकापर्यंत (कारवारचा परिसर) मान्सून पोहोचला असून दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्रातही दाखल होण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
2009 नंतरचा विचार करता मान्सून वेळेपूर्वी दाखल होण्याची ही सर्वात अलिकडची तारीख आहे. 2009 मध्ये 23 मे रोजी मान्सूनचं आगमन झालं होतं.
दरम्यान, अरबी समुद्रावर तयार झालेला कमी दाबाचा पट्टा दक्षिण कोकणकडे सरकला आहे. त्यामुळं रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला अतिवृष्टीचा इशारा (रेड अलर्ट) देण्यात आला आहे.
तर सातारा, कोल्हापूरला घाट परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तसंच रायगडला ऑरेंज अलर्ट तर मुंबई, ठाणे आणि पालघरला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
दरम्या यापूर्वी 19 मे रोजी मान्सूननं श्रीलंकेतला काही भाग व्यापत कन्याकुमारीच्या दक्षिणेकडील समुद्राच्या भागात प्रवेश केला होता..
पुढच्या 2-3 दिवसांत मान्सून मालदीवला पूर्णतः व्यापून टाकेल आणि दक्षिण अरबी समुद्रात तसंच बंगालच्या उपसागरात आणखी आगेकूच करेल असं हवामान विभागानं म्हटलं होतं.

फोटो स्रोत, IMD
दरवर्षी अंदमान-निकोबारमध्ये साधारणपणे 20 मे पर्यंत मॉन्सून ऑनसेट होतो, म्हणजे मान्सून दाखल होतो. पण यंदा आठवडाभर आधीच म्हणजे 13 मे रोजीच मान्सून निकोबारमध्ये दाखल झाला.
सामान्यतः केरळमध्ये 1 जूनच्या आसपास मान्सून दाखल होतो, तिथून 7 ते 10 जूनपर्यंत मुंबईत आणि 15 जुलैपर्यंत संपूर्ण भारतात पसरतो.
कर्नाटकच्या किनाऱ्याजवळ समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची आणि त्याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं होतं.
या वेदर सिस्टिमच्या प्रभावामुळे पुढच्या काही दिवसांत भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर कर्नाटकसोबतच कोकण, गोवा आणि केरळमध्येही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

फोटो स्रोत, IMD
दरम्यान, महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यात काही ठिकाणी मान्सूनपूर्व वादळी सरी बरसल्या आहेत.
19 मे रोजी नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, बीड आणि धाराशीव जिल्ह्यांना वादळी वारे, विजा आणि पावसासाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे तर राज्यात बाकी बहुतांश भागात यलो अलर्ट आहे.
20 मे रोजी राज्यात विशेषतः दक्षिणेकडील भागांत वादळी वारे आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशीव आणि लातुरमध्ये ऑरेंज अलर्ट आहे आणि बाकी सर्व जिल्ह्यांत यलो अलर्ट आहे.
21 मे साठी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, अहिल्यानगर आणि संभाजीनगर हे जिल्हे तसंच पुणे आणि साताऱ्यातील घाट प्रदेशात वादळी वारे आणि पावसासाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे तर राज्यात इतर जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट आहे.
2025 मध्ये मान्सून कसा असेल? महाराष्ट्रात किती पाऊस पडेल?
2025 या वर्षी आगामी मान्सूनसाठीचा पहिला दीर्घकालीन अंदाज भारतीय हवामान विभागानं जारी केला होता.
त्यानुसार देशात दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत 105 टक्के पावसाची शक्यता आहे. लडाख, तामिळनाडू आणि ईशान्य भारत वगळता इतर राज्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल.

फोटो स्रोत, IMD
महाराष्ट्रात कोकणातला किनारी भाग, मराठवाड्याचा काही भाग तसंच विदर्भातील काही ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता बरीच जास्त आहे.
तर राज्यात इतर बहुतांश ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे, असंही हवामान विभागानं दिलेल्या नकशातून दिसून येतं.
मान्सून हा शब्द कुठून आला? मान्सूनचे दोन प्रकार कोणते?
काही भाषातज्ज्ञांच्या मते, मान्सून या शब्दाचं मूळ अरबी भाषेतल्या मौसीम या शब्दात आहे. मौसीम म्हणजे मोसमी वारे किंवा ऋतूनुसार वाहणारे वारे.
दक्षिण आशियात ठराविक काळात मोसमी वाऱ्यांमुळे पाऊस पडतो. इतका की त्या काळाला पावसाळ्याचा ऋतू म्हणून इथे स्वतंत्र ओळख मिळाली आहे.
याच मोसमी वाऱ्यांसाठी मान्सून हा शब्द ब्रिटिशकालीन भारतात वापरला जाऊ लागला.

फोटो स्रोत, Getty Images
भारतात जून ते सप्टेंबर या काळात वारे नैऋत्य दिशेकडून म्हणजे साधारण अरबी समुद्राकडून हिमालयाकडे वाहतात. या वाऱ्यांना नैऋत्य मोसमी वारे किंवा नैऋत्य मान्सून (साऊथ-वेस्ट मान्सून) म्हणून ओळखतात.
तर ऑक्टोबर महिन्यात वारे याच्या उलट दिशेने म्हणजे ईशान्येकडून वाहतात. त्यांना ईशान्य मोसमी वारे किंवा ईशान्य मान्सून (नॉर्थ वेस्ट मान्सून) म्हणतात. या वाऱ्यांमुळे ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात प्रामुख्यानं दक्षिण भारतात पाऊस पडतो.
मान्सून ऑनसेट म्हणजे काय?
फक्त पाऊस आला, म्हणजे मान्सूनची सुरुवात झाली, असं नसतं. तर एखाद्या ठिकाणी विशिष्ठ कालावधीतील पावसाचं प्रमाण, वाऱ्याचा वेग आणि तापमानाची स्थिती पाहून हवामान विभागाचे तज्ज्ञ त्या ठिकाणी मान्सून ऑनसेट झाल्याचं म्हणजे मान्सूनची सुरूवात झाल्याचं जाहीर करतात.
केरळ आणि लक्षद्वीपमधल्या 14 ठराविक हवामान केंद्रांपैकी किमान 60 टक्के म्हणजे 9 केंद्रांवर ठिकाणी 10 मे नंतर कधीही सलग दोन दिवस 2.5 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली, तर तिथे मान्सून दाखल झाल्याचं हवामान विभाग जाहीर करतो.
नैऋत्य मान्सूनच्याही दोन शाखा आहेत – एक अरबी समुद्रातली आणि दुसरी बंगालच्या उपसागरातली.
भारताच्या मुख्य भूमीवर नैऋत्य मान्सूनचा काळ साधारण 1 जून ते 30 सप्टेंबरदरम्यानचा आहे. तर ईशान्य मान्सून साधारण 20 ऑक्टोबरच्या आसपास सक्रीय होतो.
मान्सून कुठे तयार होतो?
मान्सूनची निर्मिती कशामुळे होते, याविषयी काही सिद्धांत आहेत.
पृथ्वी 21 अंशांमध्ये कलली आहे. त्यामुळे तिचा उत्तर गोलार्ध सूर्याच्या दिशेला असतो. परिणामी उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो, तेव्हा दक्षिण गोलार्धात थंडी असते.
जास्त तापमान असतं तिथे हवेचा दाब कमी तर कमी तापमानाच्या ठिकाणी हवेचा दाब जास्त असतो. वारे नेहमी जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहतात.
जमिनीपेक्षा समुद्राचं तापमान थोडं थंड असतं, त्यावेळी समुद्राकडून वारे वाहू लागतात. येताना हे वारे समुद्रावरचं बाष्प आणतात, त्यातून पाऊस पडतो.
पण हे असं चित्र पृथ्वीच्या इतर अनेक ठिकाणी होतं. मात्र भारतीय उपखंडातली स्थिती थोडी खास बनवते.

फोटो स्रोत, BBC Weather
भारतीय द्वीपकल्पाचा आकार मोठा असून उन्हाळ्याच्या दिवसांत इथलं तापमान वेगानं खूप वाढतं आणि जमीनही तापते. विशेषतः मे महिन्या पर्यंत राजस्थानच्या वाळवंटात उष्णता वाढते. त्याच वेळी अरबी समुद्राच्या आसपासच्या प्रदेशात म्हणजे आफ्रिका, सौदी अरेबियन द्वीपकल्प यांचं तापमानही वाढतं.
परिणामी हिंदी महासागरातून उत्तर गोलार्धात आलेले वारे भारतीय द्वीपकल्पाकडे वाहू लागतात. या वाऱ्यांसोबत मोठ्या प्रमाणात बाष्पही येतं. त्यातून ढगांची निर्मिती होते आणि पाऊस पडतो.
ऑक्टोबर उजाडेपर्यंत तापमान आणि वाऱ्यांच्या दिशेचं गणित बदलतं, वारे ईशान्येकडून वाहू लागतात.
मान्सूनमुळे किती पाऊस पडतो?
भारतात साधारण 80 टक्के पाऊस हा नैऋत्य मान्सूनमुळे पडतो तर साधारण 11% पाऊस ईशान्य मान्सूनमुळे पडतो असं हवामान खात्याच्या नोंदी सांगतात.
भारतात जून ते सप्टेंबर या काळात सरासरी 87 सेंटीमीटर एवढा पाऊस पडतो.
मान्सून का महत्त्वाचा?
जून- सप्टेंबर या मान्सूनच्या काळात साधारणपणे वर्षभरातील 70 टक्के पाऊस पडतो. यामुळे शेतीसोबतच, नद्या, धरणं, तलाव, विहिरी भरण्यासाठी मान्सून महत्त्वाचा ठरतो.

फोटो स्रोत, Getty Images
मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसामुळे तीव्र उष्णतेपासून सुटका होते. पण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनंही मान्सून महत्त्वाचा आहे. दक्षिण आशियातल्या अर्थव्यवस्था त्यावर अवलंबून आहेत.
भारतासारख्या शेतीप्रधान देशात आजही अनेक गणितं पावसावर अवलंबून असतात. एका रिपोर्टनुसार भारतातील जवळपास अर्धी शेती ही मान्सूनवरच्या पावसावर अवलंबून आहे.
एल निनो, ला निना आणि मान्सून
एल-निनो आणि ला-निना ही पॅसिफिक महासागरातल्या सागरी प्रवाहांच्या विशिष्ट स्थितींची नावं आहेत.
पॅसिफिक महासागरात दक्षिण अमेरिकेच्या आसपास पाण्याचे तापमान जेव्हा नेहमीपेक्षा वाढते आणि ते गरम पाणी पश्चिमेला आशियाकडे सरकते, तेव्हा त्या स्थितीला ‘एल-निनो’ असं संबोधलं जातं. ला निना ही त्याउलट स्थिती आहे.

पण फक्त एकट्या एल निनोमुळे मान्सूनवर परिणाम होत नाही. तर एल निनोसारखाच हिंदी महासागरात इंडियन ओशन डायपोल अर्थात IOD हा प्रवाहही महत्त्वाचा ठरतो.
IOD सकारात्मक असतो, म्हणजे पश्चिम हिंदी महासागराचं तापमान पूर्वेपेक्षा जास्त असतं, तेव्हा ती स्थिती भारतात मान्सूनला पोषक ठरताना दिसते.
त्याशिवाय जेट स्ट्रीम या वातावरणाच्या वरच्या थरातील हवेच्या प्रवाहाचाही मान्सूनवर परिणाम होतो.
मान्सूनचा दीर्घकालीन अंदाज असा वर्तवला जातो
मान्सूनचा अंदाज वर्तवण्यासाठी काही प्रमुख गोष्टींचा आधार घेतला जातो. त्यातल्या तीन गोष्टी आहेत :
1. इंडियन ओशन डायपोल (IOD) म्हणजेच हिंदी महासागरातील द्विध्रुव. अर्थात या महासागराच्या पूर्व आण पश्चिम भागांतील पाण्याचं असमान तापमान.
IOD सकारात्मक असतो, म्हणजे पश्चिम हिंदी महासागराचं तापमान पूर्वेपेक्षा जास्त असतं, तेव्हा ती स्थिती भारतात मान्सूनला पोषक ठरताना दिसते.
पॅसिफिक महासागरात दक्षिण अमेरिकेच्या आसपास पाण्याचे तापमान जेव्हा नेहमीपेक्षा वाढते आणि ते गरम पाणी पश्चिमेला आशियाकडे सरकते, तेव्हा त्या स्थितीला ‘एल-निनो’ असं संबोधलं जातं. ला निना ही त्याउलट स्थिती आहे.
या एल निनो आणि ला निना प्रवाहांचा जगभरातल्या हवामानावर आणि भारतातल्या मान्सूनवरही परिणाम होताना दिसतो. साधारणपणे भारतात एल निनोच्या काळात कमी तर ला निनाच्या काळात जास्त पाऊस पडताना दिसतो.
3. उत्तर गोलार्धात हिवाळा आणि वसंत ऋतूत झालेला हिमवर्षाव कमी असतो, तेव्हा त्या वर्षी मान्सूनच्या काळात भारतात पाऊस सहसा जास्त पडतो.
4. जेट स्ट्रीम या वातावरणाच्या वरच्या थरातील हवेच्या प्रवाहाचाही मान्सूनवर, विशेषतः मान्सूनच्या आगमनावर परिणाम होतो.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC