Source :- BBC INDIA NEWS

“युनिफॉर्म घातल्यानंतर फौजींचं फीलिंग कसं असतं ना की , खरोखर आपण देशासाठी काहीतरी करतोय. तसं आपण आपल्या जिल्ह्यासाठी काहीतरी करतोय, असं खूप चांगलं फीलिंग मनामध्ये येतं,” असं मयुरी आळवेकर यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.
आपत्ती व्यवस्थापनाच्या स्वयंसेविका म्हणून त्यांनी नुकतंच आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं. या प्रशिक्षणामुळे समाजाचा तृतीयपंथीयांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल तसेच या समुदायातील लोकांचा आत्मविश्वास देखील वाढेल असं त्यांनी सांगितलं.
समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असल्याचे अनुभव तृतीयपंथीय समुदायातील अनेक जण बोलून दाखवतात. समाजासाठी खूप काही करण्याची इच्छा असून देखील केवळ संधी मिळत नसल्यामुळे अनेकांना समाजोपयोगी उपक्रमात सहभाग घेता आला नव्हता. पण जेव्हा या समुदायातील लोकांना ही संधी मिळाली तेव्हा त्याचं त्यांनी अक्षरशः सोनं केलं. या संधीमुळे आपला आत्मविश्वास अनेक पटींनी कसा वाढला हे त्यांनी बीबीसी मराठीसोबत शेअर केलं.
कोल्हापुरात पुराची आणि त्यानंतर निर्माण झालेल्या आपत्तींची समस्या खूप गंभीर आहे. दरवर्षी या आपत्तीला तोंड देण्यासाठी शेकडो स्वयंसेवकांची गरज भासते. या वर्षी देखील आपत्ती व्यवस्थापनाचे स्वयंसेवक म्हणून कोल्हापुरातील अनेक तरुण-तरुणींनी प्रशिक्षण घेण्यासाठी उत्सुकता दाखवली. पण यावेळचे प्रशिक्षण खास ठरले. कारण, पहिल्यांदाच तृतीयपंथीय समुदायातील व्यक्तींनी आपत्ती व्यवस्थापनाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले आणि आता ते आपली सेवा समाजाला प्रदान करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत.
कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं जिल्ह्यातील दोन हजारांहून अधिक ‘आपदा मित्र’ आणि ‘आपदा सखी’ यांची प्रशिक्षित टीम तयार केली आहे. याच उपक्रमात 15 तृतीयपंथी सहभागी झाले असून ते आपत्तीच्या काळात प्रशासनाला मदत करण्यासाठी सज्ज होत आहेत.
पूर, भूकंप, शोध आणि बचावकार्य, प्रथमोपचार, बेसिक लाइफ सेव्हिंग सपोर्ट, गर्दी व्यवस्थापन आणि वाहतूक व्यवस्था अशा विविध बाबींचं प्रशिक्षण या टीमला जून-जुलै महिन्यात दिलं गेलं. आता या टीमचा सराव सुरू आहे.
‘आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला’
या टीममधील मयुरी आळवेकर सांगतात की, तृतीयपंथीयांकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन अनेकदा ठराविक चौकटीत अडकलेला असतो.
“आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन एकतर देवाचे, नाहीतर गावाचे…सेक्स वर्कर नाहीतर मग भीक मागणारे लोक आहेत एवढाच होता. पण ज्या वेळेला आम्ही आपत्ती व्यवस्थापनाशी जोडलो गेलो, आमचं ट्रेनिंग झालं आणि ते सोशल मीडियावर व्हायरल झालं, तेव्हा खूप लोकांनी आमचं कौतुक केलं,” असं त्या सांगतात.

या उपक्रमानंतर समाजमाध्यमांवरही सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्याचं त्या सांगतात. “काहीतरी वेगळं करायचं, ते कोल्हापूरनं करायचं आणि या कोल्हापूरच्या तृतीयपंथीयांनी करून दाखवलं,” अशा प्रतिक्रिया मिळाल्याचं मयुरी सांगतात.
‘आम्ही कुणापेक्षाही कमी नाही’
शिवानी राजभर यांच्या मते, तृतीयपंथीयांबद्दल समाजात आजही अनेक गैरसमज आहेत.
“समाजाकडून आमच्याबाबत सुरुवातीपासूनच एक स्टिरिओटाइप आणि स्टिग्मा आहे, की हे लोक काहीच करू शकत नाहीत. सिग्नलवर भीक मागून पोट भरणं एवढंच त्यांचं काम अशी एक धारणा आहे,” त्या म्हणतात.
मात्र, काम करताना लिंग किंवा ओळख आड येत नाही, हे या प्रशिक्षणातून दाखवून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

“आम्हीसुद्धा या समाजाचे घटक आहोत आणि इतर स्त्री-पुरुषांप्रमाणेच काम करू शकतो. आमच्यातही ती क्षमता आहे. गरज आहे ती फक्त संधी देण्याची. आज आम्हाला ही संधी मिळाली आहे आणि नक्कीच आम्ही या संधीचं सोनं करून दाखवू,” असं शिवानी सांगतात.
पूरपरिस्थितीपासून बचावकार्यापर्यंत प्रशिक्षण
या तृतीयपंथी स्वयंसेवकांना रोज वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्तींचं प्रशिक्षण दिलं गेलं. भूकंप किंवा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी घ्यायची काळजी, मानवनिर्मित आपत्ती, पूरपरिस्थितीत बचावकार्य अशा विविध बाबी त्यांना शिकवल्या जात आहेत.
पूरपरिस्थितीत बोट तयार करण्यापासून ते अडचणीत सापडलेल्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यापर्यंतच्या प्रक्रियेचं प्रशिक्षणही त्यांना दिलं गेलं.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्या मते, आपत्तीच्या ठिकाणी काम करण्यासाठी धैर्य, ताकद, कौशल्य आणि संकटात सापडलेल्या व्यक्तीची काळजी घेण्याची वृत्ती आवश्यक असते.
“यांच्यामध्ये धाडस आहे, धैर्य आहे आणि ताकद आहे. त्याचबरोबर केअरिंग नेचरही आहे. त्यामुळे यांना तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिलं तर ते खूप चांगल्या पद्धतीनं आपत्ती व्यवस्थापनात काम करू शकतील,” असं संकपाळ सांगतात.
स्वयंसेवकांच्या टीमला कसे प्रशिक्षण देण्यात आले असे विचारले असता संकपाळ सांगतात की “स्वयंसेवकासाठी शासनाचा एक निर्धारित अभ्यासक्रम आहे. त्यात थेअरी आणि प्रॅक्टिकल अशी दोन्ही तयारी करुन घेतली जाते. थेअरीमध्ये अगदी बेसिकपासून म्हणजेच आपत्ती म्हणजे काय या पासून सारंकाही शिकवलं जातं. तर प्रॅक्टिकल मध्ये प्रत्यक्ष फिल्डवर नेऊन हे प्रशिक्षण देण्यात येतं.
“आम्ही या टीमला कोल्हापुरातील राजाराम तलावात प्रशिक्षण दिले. इन्फ्लेटेड रबर मोटर बोट सुरू कशी करायची, ती फुगवायची कशी, चालवायची कशी या साऱ्या गोष्टींचे आम्ही त्यांना प्रशिक्षण दिले. भविष्यात या बोटीची देखभाल कशी घ्यायची, ती दुरुस्त कशी करायची याचे प्रशिक्षण देखील आम्ही या टीमच्या सदस्यांना देणार आहोत,” असं संकपाळ यांनी सांगितलं.
‘निम्म्या वेळेत प्रशिक्षण आत्मसात केलं’
या टीमनं प्रशिक्षणातील गोष्टी अतिशय वेगानं आत्मसात केल्याचं प्रसाद संकपाळ सांगतात.
त्यांच्या मते, इतर स्वयंसेवकांना एखादी गोष्ट आत्मसात करण्यासाठी जितका वेळ लागतो, त्याच्या तुलनेत या तृतीयपंथी स्वयंसेवकांनी अनेक गोष्टी निम्म्या वेळेत शिकून घेतल्या.
प्रशिक्षणादरम्यान प्रशासन आपल्याला वेगळं न मानता आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमचा आणि कुटुंबाचा भाग मानत आहे, ही भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. त्यामुळे त्यांच्यातील न्यूनगंडही कमी झाल्याचं संकपाळ सांगतात.
‘युनिफॉर्म घातल्यानंतर फौजी असल्यासारखं वाटतं’
आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमचा गणवेश मिळाल्यानंतर आपल्याला एक वेगळीच ओळख मिळाल्याची भावना मयूरी आळवेकर व्यक्त करतात.
“युनिफॉर्म घातल्यानंतर फौजींचं फीलिंग कसं असतं ना की , खरोखर आपण देशासाठी काहीतरी करतोय. तसं आपण आपल्या जिल्ह्यासाठी काहीतरी करतोय, असं खूप चांगलं फीलिंग मनामध्ये येतं,” त्या सांगतात.
हा गणवेश केवळ कपडा नसून समाजासाठी काहीतरी करण्याची जबाबदारी असल्याची जाणीव करून देतो, असंही त्या म्हणतात.
‘जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटतं’
तृतीयपंथी म्हणून जन्माला आल्यानंतर मनात निर्माण झालेली अस्वीकृतीची भावना या कामामुळे बदलल्याचं मयूरी सांगतात.
“स्वतःला काहीतरी जन्माला येऊन काहीतरी सार्थक झालं. मी तृतीयपंथी आहे, मला असा जन्म नको होता, हे जे आधी वाटायचं ते वाटणार नाही. स्वतःला अभिमान वाटेल की आपण खरोखर माणूस म्हणून जन्माला येऊन काहीतरी करून दाखवलं,” असं त्या सांगतात.

शिवानी राजभर यांच्यासाठी या कामाचा आणखी एक वैयक्तिक अर्थ आहे. त्यांनी सातवीत असताना घर सोडलं आणि गेली सुमारे 14 वर्षं त्या एकट्या राहत असल्याचं त्या सांगतात.
मात्र आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण घेऊन काम करण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केला.
“चौदा-पंधरा वर्षांनंतर माझे घरचे पुन्हा माझ्याशी जोडले गेले,” असं शिवानी सांगतात.
‘केवळ प्रशिक्षण नाही, तर ओळख बदलण्याचा प्रयत्न’
आपत्तीच्या काळात जीव वाचवण्यासाठी काम करणं ही या टीमची प्राथमिक जबाबदारी असली, तरी या उपक्रमाचा अर्थ त्यापेक्षा मोठा आहे.
तृतीयपंथीयांकडे केवळ एका ठराविक सामाजिक चौकटीतून न पाहता, त्यांच्या क्षमता आणि कौशल्यांना संधी दिली तर तेही समाजासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, हा संदेश या टीममधून दिला जात आहे.
कोल्हापुरात सुरू झालेला हा प्रयोग भविष्यात इतर जिल्ह्यांसाठीही उदाहरण ठरू शकतो, असा विश्वास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग व्यक्त करत आहे.
‘आम्हीही जीव वाचवू शकतो’- हा केवळ या तृतीयपंथी स्वयंसेवकांचा दावा नाही, तर प्रशिक्षणातून प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याचा त्यांचा संकल्प आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC




