Source :- BBC INDIA NEWS

गेल्या काही वर्षांत चीनमध्ये सौंदर्य शस्त्रक्रियांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सोशल मीडियाच्या प्रभावामुळे, सौंदर्याची नवे मानकं तयार झाले आहेत आणि त्यांचं अनुकरण करण्यासाठी लाखो तरुण-तरुणी महागड्या शस्त्रक्रियांचा मार्ग पत्करत आहेत.
पण यामागंही एक मोठं सत्य दडलं आहे. ब्युटी क्लिनिक्सच्या या बाजारात आता महिला, मुलींना फसवणुकीचे स्कॅम समोर येताना दिसत आहे. यामुळे महिलांचे मानसिक आणि आर्थिक शोषण होताना दिसत आहे.
अॅबी वू फक्त 14 वर्षांची होती जेव्हा तिने पहिल्यांदाच कॉस्मेटिक सर्जरी (सौंदर्य शस्त्रक्रिया) करून घेतली होती.
एका आजारासाठी हार्मोन (संप्रेरक) उपचार घेतल्यानंतर, अॅबीचं वजन दोन महिन्यांत 42 किलोृवरून 62 किलो एवढं वाढलं.
हा बदल तिच्या नाटकाच्या शिक्षकाच्या लक्षात आला.
नाटकाच्या रोलसाठी स्क्रिनिंग टेस्ट सुरू होती आणि त्यावेळी सरांनी तिला वजन कमी करण्याचा सल्ला दिला.
“माझ्या शिक्षकांनी मला म्हटलं, ‘तू आमची स्टार होतीस, पण आता तू खूप लठ्ठ झाली आहेस. एक तर तू हे सोडून दे किंवा झपाट्याने वजन कमी कर असं त्या वेळी सरांनी सांगितलं,” अॅबी सांगते.
अॅबीच्या आईने यासाठी पुढाकार घेतला आणि तिला पोट आणि मांडीवरील चरबी काढून टाकण्यासाठी लिपोसक्शनसाठी नेलं.
अॅबी हॉस्पिटलचा गाउन परिधान करुन क्लिनिकमध्ये ऑपरेशनसाठी जाण्यासाठी वाट पाहत बसली होती, त्यावेळचे तिच्या आईचे शब्द तिला आठवतात.
“तू फक्त हिम्मत ठेव आणि आत जा. एकदा आतून बाहेर आलीस की, तू सुंदर दिसायला लागशील.”
शस्त्रक्रिया अत्यंत त्रासदायक ठरली. अॅबीला अर्धवट भूल देण्यात आली होती आणि संपूर्ण प्रक्रियेदरम्यान ती शुद्धीतच होती.
“माझ्या शरीरातून किती चरबी काढली जात होती आणि किती रक्त जात होतं, हे मी पाहू शकत होते,” असं ती म्हणाली.

फोटो स्रोत, Family handout
आता 35 वर्षांची असलेल्या अॅबीवर 100 हून अधिक जास्त शस्त्रक्रिया झाल्या आहेत. यासाठी तिने सुमारे 5 लाख डॉलर्स (अंदाजे 4.5 कोटी रुपये) खर्च केले आहेत.
ती बीजिंगमधील एक ब्युटी क्लिनिक देखील चालवते आहे. चीनमधील प्लॅस्टिक सर्जरीच्या वाढत्या ट्रेंडमधील सर्वात ओळखीच्या किंवा चर्चेतील चेहऱ्यांपैकी एक बनली आहे.
पण या शस्त्रक्रियांची तिला शारीरिकदृष्ट्या मोठी किंमत चुकवावी लागली आहे.
बीजिंगमधील तिच्या लक्झरी ड्यूप्लेक्स अपार्टमेंटमध्ये आरशासमोर ती बसली होती. अलीकडील फेस स्लिमिंग इंजेक्शनमुळे झालेल्या जखमांवर ती सौम्यपणे कन्सिलर लावते. या प्रक्रियेतून तिला महिन्यातून एकदा तरी जावं लागतं.
आपला चेहरा “कमी गुबगुबीत” (चबी) दिसावा यासाठी तिला आपल्या चेहऱ्यावर ही प्रक्रिया करावी लागते. कारण जबड्यावरील तीन शस्त्रक्रियांमुळे तिची खूप हाडं काढली गेली आहेत.
पण ती जोर देऊन सांगते की, तिला शस्त्रक्रियांबद्दल कोणताही पश्चाताप नाही आणि आपल्या आईने योग्य निर्णय घेतला होता, यावर तिचा विश्वास आहे.
“शस्त्रक्रिया यशस्वी ठरली. दिवसेंदिवस मला अधिक आत्मविश्वास जाणवू लागला आणि मी आनंदी होत गेले. मला वाटतं की माझ्या आईने योग्य निर्णय घेतला होता.”

फोटो स्रोत, Abby Wu
एकेकाळी टॅबू मानली जाणारी प्लॅस्टिक सर्जरी, चीनमध्ये मागील 20 वर्षांत प्लॅस्टिक सर्जरीच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली आहे. यात वाढते उत्पन्न आणि सामाजिक दृष्टिकोनातील बदलांचा मोठा हात आहे, ज्यामध्ये सोशल मीडिया मोठा कारणीभूत ठरला आहे.
दरवर्षी, 2 कोटी चिनी लोक कॉस्मेटिक प्रक्रियेसाठी पैसा खर्च करताना दिसतात.
मोठ्या प्रमाणावर, या शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या महिला तरुण असतात. 80 टक्के रुग्ण महिला असतात आणि शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या व्यक्तींचे सरासरी वय 25 वर्षे आहे.
चिनी संस्कृतीत, विशेषतः महिलांसाठी, सौंदर्याला नेहमीच महत्त्व दिलं गेलं आहे. आता देशातील सौंदर्याचे मानकं बदलत आहेत.
अनेक वर्षांपासून सौंदर्याचे सर्वाधिक मागणी असलेले निकष म्हणजे पाश्चिमात्य सौंदर्याचे आदर्श, अॅनिमे फँटसी आणि के-पॉपमधून मिळालेली प्रेरणा यांचा मिलाफ होता. जसं की डोळ्यांवर दुहेरी पापणी, कोरीव जबडा, ठळक नाक आणि सुबक चेहरा.
पण अलीकडे, अस्वस्थ करणाऱ्या शस्त्रक्रिया वाढताना दिसत आहेत. जिथे लोक एक अवास्तव, हायपर फेमिनाईन आणि जवळजवळ बालसुलभ सौंदर्याचा आदर्श गाठण्याच्या मागे लागले आहेत.
आता कानांच्या मागे बोटॉक्सचं इंजेक्शन दिलं जातं, ज्यामुळं चेहरा अधिक लहान व नाजूक दिसतो असा आभास निर्माण होतो.
लोअर आयलिड सर्जरी, जशी अॅनिमेमधील नायिकेचे डोळे काचेसारखे चकचकतात तसे डोळे दिसण्यासाठी ही सर्जरी केली जाते. डोळ्यांना अधिक मोठं आणि निरागस, बालसुलभ रूप देण्यासाठी ही शस्त्रक्रिया केली जाते.
अपर लिप शॉर्टनिंग ही प्रक्रिया ओठ आणि नाक यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी केली जाते, जे तरुणपणाचे संकेत देते.
पण या सौंदर्याचा बराचसा भाग केवळ स्क्रीनसाठीच तयार केला जातो. फिल्टर्स आणि रिंग लाइट्सच्या खाली हे परिणाम अगदी निर्दोष आणि चांगले दिसू शकतात. मात्र प्रत्यक्ष आयुष्यात, हे सौंदर्य अनेकदा अस्वस्थ करणारे वाटते, एक चेहरा जो पूर्णपणे मानवीही नाही आणि लहान मुलासारखाही नाही.

फोटो स्रोत, TikTok
कॉस्मेटिक सर्जरी अॅप्स जसं की सोयंग(न्यू ऑक्सिजन) आणि गेंगमेई (मोअर ब्युटिफूल) जे “चेहऱ्याच्या अपूर्णते”चे अल्गोरिदम-आधारित विश्लेषण देण्याचा दावा करतात, त्यांच्या लोकप्रियतेत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.
युजर्सचा चेहरा स्कॅन आणि त्याचे मूल्यांकन करून, हे अॅप्स जवळच्या क्लिनिक्सकडून शस्त्रक्रियेच्या शिफारसी करतात आणि त्या प्रत्येक शस्त्रक्रियेवर कमिशन घेतात.
हे आणि इतर सौंदर्य ट्रेंड्स सोशल मीडियावर सेलिब्रिटी आणि इन्फ्लूएन्सर्सद्वारे शेअर आणि प्रमोट केले जातात.
चीनमधील सौंदर्य शस्त्रक्रियेच्या पहिल्या इन्फ्लूएंसरपैकी एक असलेल्या अॅबीने आपल्या शस्त्रक्रियांचे प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर डॉक्यूमेंट केले आहे आणि सोयंग लॉन्च झाल्यानंतर ती लगेचच त्यात सामील झाली.
100 हून अधिक शस्त्रक्रिया झाल्यानंतरही, जेव्हा अॅबी सोयंगच्या “मॅजिक मिरर” फिचरचा वापर करून तिचा चेहरा स्कॅन करते, तेव्हा ते अॅप अजूनही तिच्या चेहऱ्यात “दोष” दाखवतं आणि शस्त्रक्रियांच्या लांब यादीची शिफारस करतं.
“ते अॅप मला म्हणतं की, माझ्या डोळ्यांखाली गडद वर्तुळं आहेत. जरा हनुवटी वाढवण्याची गरज आहे, आणि विशेष म्हणजे मी हे सर्व आधीच केलं आहे.”
अॅबीला हे सर्व विनोदी वाटतं.
“नोज (नाक) स्लिमिंग? मी आणखी एक नाकाची शस्त्रक्रिया करावी का?”

फोटो स्रोत, SoYoung
सामान्य ई-कॉमर्स साइट्सच्या विरुद्ध, ब्यूटी अॅप्स जसं की सोयंग एक सामाजिक मीडिया फंक्शन देतात. युजर्स त्यांच्या “बीफोर आणि आफ्टर” डायरीज शेअर करतात आणि बहुतेक वेळा अॅबीसारख्या सुपर यूझर्सकडून सल्ल्याची विचारणा करतात.
‘माझ्या त्वचेखाली सिमेंट आहे असं वाटतं’
वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी संपूर्ण चीनमध्ये अनेक क्लिनिक्स जलद गतीने सुरू होत आहेत.
परंतु, तिकडे तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता भासत आहे आणि अनेक क्लिनिक परवान्याशिवाय कार्यरत आहेत
आय रिसर्च या मार्केटिंग रिसर्च फर्मच्या अहवालानुसार, 2019 पर्यंत, चीनमध्ये 80,000 ठिकाणी परवान्याशिवाय कॉस्मेटिक उपचार केले जात होते आणि 100,000 कॉस्मेटिक प्रॅक्टिशनर योग्य पात्रतेशिवाय काम करत होते.
त्यामुळे, चीनमधील कॉस्मेटिक सर्जरी क्लिनिकमध्ये दररोज शेकडो चुकीच्या घटना घडत असल्याचा अंदाज आहे.
डॉ. यांग लू, या एक प्लॅस्टिक सर्जन आहेत आणि शांघायमध्य एक परवाना प्राप्त कॉस्मेटिक सर्जरी क्लिनिक चालवतात. त्या सांगतात की, अलीकडच्या वर्षांमध्ये चुकीच्या शस्त्रक्रिया झालेले आणि त्या दुरुस्तीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे.
डॉ. यांग म्हणतात, “मी असे अनेक रुग्ण पाहिले आहे, ज्यांची पहिली शस्त्रक्रिया अयशस्वी ठरली. कारण त्यांनी परवाना नसलेल्या ठिकाणी जाऊन ती केली होती.”
‘काहींनी तर लोकांच्या घरातच शस्त्रक्रिया केल्या होत्या’
28 वर्षांच्या यू यू या अशा लोकांपैकी एक आहेत ज्यांची शस्त्रक्रिया अयशस्वी झाली होती.
2020 मध्ये यू यू यांनी त्यांच्या एका जवळच्या मैत्रिणीने उघडलेल्या विना परवाना क्लिनिकमधून ‘बेबी फेस’ कोलाजेन इंजेक्शन्स घेतले. जे तरुण दिसण्यासाठी वापरले जाते. पण हे फिलर्स कडक झाले.
“माझ्या त्वचेखाली जणू सिमेंट भरलं आहे, असं मला वाटत होतं,” असं त्या म्हणतात.
झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी यू यू यांनी सोशल मीडियावरून सापडलेल्या काही प्रसिद्ध क्लिनिक्सचा आधार घेतला. पण तिथंही त्यांना निराशा हाती आली. चेहरा ठीक होणं दूरच पण परिस्थिती आणखी बिघडली.
एका क्लिनिकने सिरिंज वापरून फिलर काढण्याचा प्रयत्न केला. पण कठीण झालेले फिलर तर निघाले नाहीच, त्याऐवजी त्यांचे नैसर्गिक टिश्यूज (ऊतक) काढले गेले, त्यामुळे त्यांची त्वचा आणखी सैलसर झाली.
दुसऱ्या क्लिनिकने त्यांच्या कानाच्या जवळील त्वचेला ओढून खालील फिलरपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. पण यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर दोन मोठे डाग (स्कार्स) तयार झाले आणि चेहरा अनैसर्गिकपणे ताणलेला दिसू लागला.
“माझी संपूर्ण प्रतिमा कोलमडली. मी माझी चमक गमावली आणि याचा माझ्या कामावरही (शांघायमधील एका परदेशी कंपनीतील एचआर विभागात) परिणाम झाला.”
त्यांनी गेल्या वर्षी सोयंगच्या माध्यमातून डॉ. यांग यांना शोधलं आणि त्यानंतर त्यांनी तीन रिपेअर सर्जरी केल्या, ज्यात त्यांच्या पापण्यांचा देखील समावेश होता, ज्या आधीच्या क्लिनिकमध्ये केलेल्या ऑपरेशनमध्ये खराब झाल्या होत्या.
परंतु, डॉ. यांग यांच्या सर्जरीमुळे दिसू शकणाऱ्या सुधारणा झाल्या असल्या तरी, पूर्वीच्या चुकीच्या ऑपरेशन्समुळे झालेल्या नुकसानीचे परिणाम कायमचे असू शकतात.
“मला यापुढं आणखी सुंदर व्हायचं नाही,” असं त्या म्हणतात.
“शस्त्रक्रियेपूर्वी मी जशी दिसत होते तशी परत होऊ शकले, तरी मला खूप आनंद होईल.”
‘यामुळं माझं करिअर उद्ध्वस्त झालं’
दरवर्षी, यू यू सारखे हजारो लोक चीनमधील विनापरवाना (अवैध) कॉस्मेटिक क्लिनिकला बळी पडतात.
परंतु काही परवानाधारक क्लिनिक्स आणि पात्र सर्जन्स देखील नियमांचं काटेकोरपणे पालन करताना दिसत नाहीत.
2020 मध्ये अभिनेत्री गाओ लिऊच्या नाकाचे ऑपरेशन झाले. या ऑपरेशनमध्ये गडबड झाली. यामध्ये तिच्या नाकाचे टोक काळे झाले होते. हे सोशल मीडियावर खूप व्हायरल झालं होतं.
“माझा चेहरा विद्रूप झाला आणि मी खूप निराश झाले होते. त्यामुळं माझी अभिनय कारकीर्द उद्ध्वस्त झाली.”
तिने ग्वांगझूमधील शीज टाइम्स नावाच्या प्रमाणित (परवानाधारक) क्लिनिकमध्ये डॉ. हे मिंग यांच्याकडून नाकाची शस्त्रक्रिया केली होती. डॉ. मिंग हे ‘मुख्य शल्यचिकित्सक’ आणि नाकाच्या शस्त्रक्रियेचे तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात.
पण प्रत्यक्षात डॉ. मिंग हे पर्यवेक्षणाशिवाय शस्त्रक्रिया करण्यासाठी पात्र नव्हते. त्याचबरोबर त्यांनी ग्वांगडोंग प्रांतिक आरोग्य आयोगाचा परवाना असलेला प्लॅस्टिक सर्जनचा दर्जाही मिळवला नव्हता.
या घोटाळ्यानंतर हे क्लिनिक लगेचच बंद करण्यात आले. अधिकार्यांनी त्या क्लिनिकला दंड ठोठावला आणि डॉ. हे मिंग यांना सहा महिन्यांसाठी वैद्यकीय प्रॅक्टिस करण्यास बंदी घातली.
मात्र, शीज टाइम्स हे क्लिनिक अधिकृतपणे बंद होण्याच्या काही आठवड्यांपूर्वीच, त्याच पत्त्यावर क्विंगया (Qingya) नावाच्या एक नवीन क्लिनिकने नोंदणीसाठी विनंती केली.
‘बीबीसी आय’ला शीज टाइम्स आणि क्विंग्या या दोन्ही क्लिनिकमध्ये समान धागे आढळून आले आहे, जसं की दोघांचे एकच वेईबो अकाउंट आणि काही कर्मचाऱ्यांना (डॉ. हे मिंग यांच्यासह) नव्या क्लिनिकमध्ये कायम ठेवणं.

बीबीसीला हे देखील कळलं आहे की, डॉ. हे यांनी एप्रिल 2024 मध्ये अधिकृत प्लॅस्टिक सर्जनची पात्रता प्राप्त केली होती. विशेष म्हणजे त्यांच्यावर 2021 मध्ये कारवाई केल्यानंतर, ही पात्रता मिळवण्यासाठी त्यांच्यावर पाच वर्षे बंदी घालण्यात आली होती.
क्विंग्याने आता 30 शाखा उघडल्याचा दावा केला आहे.
डॉ. हे, क्किंग्या आणि गुआंगडोंग प्रांतीय आरोग्य आयोग यांना बीबीसीने प्रतिक्रियेसाठी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यांना यावर बोलण्याची विनंती केली. परंतु, त्यांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही.
ब्रिटनमधील चिनी दूतावासाने म्हटले आहे, “चिनी सरकार नेहमीच उद्योजकांकडून राष्ट्रीय कायदे, नियम व संबंधित धोरणात्मक तरतुदींचे काटेकोरपणे पालन करत व्यवसाय करण्याची अपेक्षा करते.”
चार वर्षे आणि दोन शस्त्रक्रियांनंतरही, गाओ लिऊच्या नाकाची रचना अजूनही असमान आहे. तिचे नाक व्यवस्थित करता आलेलं नाही.
‘मला खरंच पश्चाताप होतोय, मी असं का केलं?’
चीनच्या केंद्रीय आरोग्य आयोगाने गेल्या काही वर्षांपासून या समस्येवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
स्थानिक आरोग्य संस्थांना नियम अधिक कठोर करण्याचे आदेश दिले, अधिक कडक मार्गदर्शक तत्त्वे जारी केले. इतक्या उपाययोजना करून पण समस्या तशाच कायम आहेत.
नोकरीच्या ऑफरपासून कर्ज आणि शस्त्रक्रियेपर्यंत – सर्व 24 तासांच्या आत
आजच्या चीनमध्ये, चांगलं दिसणं हे व्यावसायिक यशासाठी खूप महत्त्वाचं मानलं जातं.
लोकप्रिय नोकरी भरती प्लॅटफॉर्मवर त्वरीत शोध घेतल्यास, अनेक कंपन्या (Employer) शारीरिक अटींच्या नोंदी करतात, वास्तविक कामाशी याचा फारसा संबंध नसतानाही त्या अशा प्रकारच्या अटी घालताना दिसतात.
एक रिसेप्शनिस्टच्या कामासाठी उमेदवार हा “किमान 160 सेमी उंच आणि आकर्षक असावा” अशी अपेक्षा केली जाते. तर प्रशासकीय नोकरीसाठीही “आकर्षक आणि देखणेपणा”ची मागणी केली जाते.
आणि आता या दबावाचा काही चिनी क्लिनिक्समध्ये वाढत्या घोटाळ्यांद्वारे फायदा घेतला जात आहे, ज्यामध्ये असुरक्षित युवा महिलांना नोकऱ्यांची ऑफर दिली जाते.
दा लॅन, हे तिचे खरे नाव नसून, मार्च 2024 मध्ये एका लोकप्रिय भरती वेबसाइटवर दक्षिण-पश्चिम चीनमधील चेंगडू येथील क्लिनिकमध्ये “ब्युटी कन्सल्टंट” (सौंदर्य सल्लागार) या पदासाठी तिने अर्ज केला.
मुलाखतीनंतर, त्याच संध्याकाळी तिला पदाची ऑफर देण्यात आली.
पण ती म्हणते की, जेव्हा तिने दुसऱ्या दिवशी तिचं काम सुरू केलं, तेव्हा तिच्या व्यवस्थापकाने तिला एका छोट्या खोलीत नेलं, तिला वरूनपासून खालपर्यंत पाहिलं आणि तिला एक अल्टिमेटम दिला, कॉस्मेटिक सर्जरी करुन घे नाहीतर नोकरी सोडून दे.
दा लॅन म्हणते की, निर्णय घेण्यासाठी तिला एका तासापेक्षा कमी वेळ दिला गेला होता.

फोटो स्रोत, Gao Liu
दबावाखाली, तिने डबल आयलिड सर्जरी करण्यास सहमती दिली, ज्याची किंमत 13,000 युआन (1,330 पाउंड) होती. जी तिच्या महिन्याच्या पगाराच्या तीन पट होती आणि त्यावर 30 टक्के वार्षिक व्याज लागणार होते.
ती म्हणते की, तिथल्या कर्मचाऱ्यांनी माझा फोन घेतला आणि ‘ब्युटी लोन’ साठी अर्जही केला, ज्यामध्ये माझ्या उत्पन्नाचे खोटे तपशील भरले. एका मिनिटात माझं कर्जही मंजूर झालं.
दुपारी तिच्या वैद्यकीय चाचण्या घेण्यात आल्या. एक तासातच, ती ऑपरेशन टेबलवर होती.
नोकरीच्या ऑफरपासून कर्ज आणि शस्त्रक्रियेपर्यंत, सर्वकाही 24 तासांच्या आत झालं.
ऑपरेशनचा तिच्या नोकरीसाठी काहीच उपयोग झाला नाही. दा लॅन सांगते की, तिच्या मॅनेजरने तिला सर्वांसमोर अपमानित केलं, तिच्यावर तो ओरडला, अपशब्द वापरले.
अवघ्या काही दिवसांतच तिने ही नोकरी सोडली. मागे वळून पाहताना, तिला आता वाटतंय की ती नोकरी खरी नव्हतीच.
“सुरुवातीपासून मी नोकरी सोडावी अशीच त्यांची इच्छा होती,” ती म्हणते.
दहा दिवसांहून जास्त दिवस काम करूनही, तिला फक्त 303 युआन (सुमारे 42 डॉलर्स) वेतन मिळालं. मित्रांच्या मदतीने, दा लॅननं सहा महिन्यांत सर्जरीचं कर्ज फेडलं.
‘बीबीसी आय’ने डझनभर पीडितांशी संवाद साधला. त्यातल्या दा लॅनसह तिघांना, चीनच्या “कॉस्मेटिक सर्जरीची राजधानी” बनण्याचा प्रयत्न करणाऱ्या चेंगडू शहरात भेटले. काही लोक तर गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या कर्जाच्या सापळ्यात अडकले आहेत.
दा लॅन ज्या क्लिनिकवर फसवणुकीचा आरोप करते, त्याच्याविरुद्ध याआधीही काहींनी तक्रार केली होती आणि स्थानिक मीडियानेही याचा पर्दाफाश केला होता. तरीही हे क्लिनिक अजूनही सुरू आहे आणि त्याच पदासाठी भरतीही करत आहे.
ही फसवणूक फक्त ब्युटी क्लिनिकच्या नोकऱ्यांपुरतीच मर्यादित नाही, ती आता इतर उद्योगांमध्येही हळूहळू पसरत चालली आहे.

काही लाईव्ह स्ट्रीमिंग कंपन्या तरुण मुलींवर शस्त्रक्रियेसाठी कर्ज घेण्याचा दबाव टाकतात, यामुळे त्यांना इन्फ्लुएंसर म्हणून प्रसिद्धी मिळण्याची संधी मिळेल, असं आश्वासन देतात.
पण पडद्यामागे या कंपन्यांचे अनेकदा क्लिनिक्ससोबत गुप्त करार असतात, ज्या प्रत्येक अर्जदार मुलीला त्या ऑपरेशन टेबलवर पाठवतात, तिच्या शस्त्रक्रियेसाठीही त्या कंपन्या कमिशन घेतात.
बीजिंगमधल्या एका बोहेमियन शैलीतील कॅफेमध्ये सेल्फीसाठी अगदी परफेक्ट ठिकाणी अॅबी आपल्या मित्रमैत्रिणींना कॉफीसाठी भेटते.
त्या तिघंही आपल्या पोझेस सेट करतात आणि आपला चेहरा, पापण्या नीट करतात, सेल्फीसाठी गालांकडे विशेष लक्ष देतात.
जेव्हा त्यांना त्यांच्या चेहऱ्यावरील सर्वांत जास्त आवडणाऱ्या वैशिष्ट्याबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा त्या थोडं थबकल्या, संकोचल्या. चेहऱ्यावरील कोणता भाग बदलायची किंवा दुरुस्त करायची इच्छा आहे, असा प्रतिप्रश्न त्यांना केला असता, त्यांना एक नाव सांगणंही कठीण गेलं.
आमची चर्चा हळूहळू चिन इम्प्लांट, वरचे ओठ छोटे करण्याची सर्जरी आणि नाकाच्या सर्जरीकडे वळते.
अॅबी म्हणते की ती आणखी एक नाकाची सर्जरी करण्याचा विचार करत आहे. तिचं सध्याचं नाक सहा वर्ष जुनं आहे, परंतु, सर्जन्सना ते ऑपरेट करणे कठीण जात आहे.
“इतक्या सर्व शस्त्रक्रियांनंतर माझी त्वचा आता जास्त ताणली जात नाही. डॉक्टरांकडे काम करण्यासाठी खूप काही नाही. तुम्ही त्यांना एक जॅकेट तयार करण्यासाठी पुरेसा कापड देऊ शकता, पण त्याच कपड्यातून ते एक लग्नाचा ड्रेस कसा तयार करणार?”
या उदाहरणातून मुलींना सर्व शस्त्रक्रियांमुळे होणारा शारीरिक आणि मानसिक ताण अधोरेखित होतो.
परंतु इतकं सर्व काही होऊनही, अॅबीची थांबण्याची कोणतीही योजना नाही.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC