Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Getty Images
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे
राज्यासह देशभरातील काही भागांत पूर्व मोसमी पाऊस सक्रिय होत असून महाराष्ट्रातील विविध भागांत हवामान बदलले आहे. मुंबईसह उपनगरात आज (3 जून) पावसाने हजेरी लावली.
मुंबईच्या काही भागात आज पहाटे पाऊस पडला. वांद्रे, लोअर परेल, दहिसर, मालाड तसेच पूर्व उपनगरातील मुलुंड, सायन या भागात पावसाच्या सरी कोसळल्या. पावसाच्या आगमनाने वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
राज्यात काही जिल्ह्यांमध्येही पावसाने मान्सूनपूर्वीच हजेरी लावली आहे. अनेक भागांत पावसाच्या आगमनाने उष्णता कमी झाली आहे.
हवामान खात्याने कोकण-गोवा विभागातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस आणि 40-50 किमी प्रति तास वेगाने वाहणारे सोसाट्याचे वारे वाहण्याची दाट शक्यता वर्तवली आहे.
कोकण-गोवा विभागातील जिल्ह्यांमध्ये काही तुरळक भागांत उष्ण आणि दमट हवामान राहण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान, नैऋत्य मान्सून 4 जूनच्या सुमारास केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. केरळासह दक्षिण भारतात पुढचे 6 ते 7 दिवस पावसाचे असतील असंच स्पष्ट होत आहे.
कुठे काय स्थिती?
हवामान खात्याने विदर्भ, मराठवाडासह मध्य महाराष्ट्रात 2 जून ते 4 जूनदरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली असून कमाल तापमानात 1 ते 2 अंशांनी घट होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे.
कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड या जिल्ह्यांसाठी उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागांमध्ये उष्ण आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडताना काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
फोटो स्रोत, @RMC_Mumbai
दरम्यान, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला असून काही ठिकाणी मेघगर्जनेसह सरी कोसळू शकतात.
महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीसाठी मच्छिमारांसाठी इशारा
लक्षद्वीप आणि लगतच्या मालदीवमध्ये, तसेच केरळच्या किनारपट्टीवर आणि समुद्रात ताशी 35-45 किमी वेगाने वारे वाहण्याची आणि वाऱ्याचे झोत ताशी 55 किमी पर्यंत पोहोचण्याची शक्यता असून, वादळी हवामानाची शक्यता आहे.
मच्छिमारांना उपरोक्त कालावधीत या भागांमध्ये न जाण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
फोटो स्रोत, Getty Images
हवामान विभागाने म्हटलं की, मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आकाश अंशतः ढगाळ राहील, तसेच रात्रीच्या वेळी किंवा पहाटेच्या सुमारास मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 34 अंश सेल्सिअस आणि 26 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
जूनमध्ये असं असेल हवामान
जून महिन्यात देशात बहुतांश ठिकाणी कमाल आणि किमान तापमानही सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
फोटो स्रोत, Getty Images
महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी यंदा जूनमध्येही नेहमीपेक्षा जास्त दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेश, हरयाणा, पंजाब, बिहार, ओडिसा, छत्तीसगड, गुजरात, आंध्र प्रदेशमध्ये जास्त दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता जास्त आहे.
जुलै महिन्यासाठीचा अंदाज हवामान विभाग जून महिन्याच्या अखेरीस वर्तवेल.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
SOURCE : BBC







