Home LATEST NEWS ताजी बातमी मोसादचं ‘ऑपरेशन एंटेबे’, ज्यात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंचे भाऊ मारले गेले होते

मोसादचं ‘ऑपरेशन एंटेबे’, ज्यात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंचे भाऊ मारले गेले होते

4
0

Source :- BBC INDIA NEWS

बेंजामिन नेतन्याहूंनी ज्या भावाचा उल्लेख इस्रायलचा हिरो म्हणून केला, त्याचा 50 वर्षांपूर्वी कोणत्या मोहिमेत झाला होता मृत्यू

फोटो स्रोत, AMIR COHEN/POOL/AFP via Getty Images

Published

वाचन वेळ: 7 मिनिटे

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू रविवारी (21 जून) म्हणाले की, ते अमेरिकेच्या प्रत्येक इच्छेनुसार काम करत नाहीत.

त्यांनी लेबनॉनमधील इस्रायलच्या कारवाईचं समर्थन करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया दिली.

बेंजामिन नेतन्याहू यांनी त्यांच्या भावाची आठवण करत इस्रायलच्या सुरक्षेची शपथदेखील घेतली. ते म्हणाले, “50 वर्षांपूर्वी मी माझा मोठा भाऊ, इस्रायलचा हिरो लेफ्टनंट कर्नल योनी नेतन्याहूला गमावलं होतं. तो कायम माझ्या आठवणीत आहे.”

या लेखात आपण बेंजामिन नेतन्याहूंचे भाऊ लेफ्टनंट कर्नल योनाथन नेतन्याहू कोण होते आणि त्यांचा ज्या इस्रायली मोहिमेत मृत्यू झाला, ती मोहीम काय होती, तसंच त्या मोहिमेला आजदेखील इस्रायलच्या इतिहासातील सर्वात धाडसी मोहीम का मानलं जातं, हे जाणून घेऊया.

ही कहाणी मुळात रेहान फजल यांच्या विश्लेषणावर (विवेचना) आधारित आहे. ते 4 जुलै 2015 ला बीबीसीवर प्रकाशित झालं होतं.

एअर फ्रान्सच्या विमानाचं अपहरण

या कहाणीची सुरुवात होते 27 जून 1976 ला. तेल अवीवहून पॅरिसला जात असलेल्या एअर फ्रान्सच्या ‘फ्लाईट 139’नं अथेन्समध्ये थांबा घेतल्यानंतर पुन्हा उड्डाण केलं. दरम्यान विमानात बसलेले 4 प्रवासी हातात पिस्तूल आणि ग्रेनेड घेऊन एकदम उठले आणि त्यांनी विमान त्यांच्या नियंत्रणाखाली आणलं.

त्यांनी प्रवाशांना इशारा दिला की जर कोणी विरोध करण्याचा प्रयत्न केला तर ते विमानात स्फोट घडवतील.

त्यांनी पायलटला लिबियातील बेनगाजी शहराकडे जाण्याचा आदेश दिला. विमानाचं अपहरण करणाऱ्या या 4 जणांमध्ये 2 जण पॅलेस्टिनी आणि 2 जण जर्मन होते.

बेनगाजीमध्ये 7 तास थांबल्यानंतर आणि इंधन भरल्यानंतर अपहरण करणाऱ्यांनी पायलटला विमान युगांडातील एंटेबे विमानतळाकडे नेण्याचा आदेश दिला.

युगांडाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष इदी अमीन

फोटो स्रोत, Getty Images

त्यावेळेस युगांडामध्ये इदी अमीन या हुकुमशहाची राजवट होती. त्याची अपहरणकर्त्यांना पूर्ण सहानूभूती होती. एंटेबे विमानतळावर त्यांचे चार साथीदार त्यांना येऊन मिळाले.

मग त्यांनी विमानात असलेल्या ज्यू ओलिसांना वेगळं केलं. त्यांनी जगभरातील वेगवेगळ्या देशांमधील तुरुंगात असणाऱ्या 54 पॅलेस्टिनी कैंद्यांची सुटका करण्याची मागणी केली.

अपहरण करणाऱ्यांनी धमकी दिली की जर त्यांची मागणी पूर्ण केली नाही तर ते एक-एक करत प्रवाशांना मारण्यास सुरुवात करतील.

एंटेबे इस्रायलपासून साधारण 4000 किलोमीटर अंतरावर होतं. त्यामुळे कोणत्याही बचाव मोहिमेबद्दल विचारदेखील केला जाऊ शकत नव्हता.

यादरम्यान प्रवाशांच्या नातेवाईकांनी तेल अवीवमध्ये आंदोलन करण्यास सुरुवात केली होती. कोणत्याही परिस्थितीत ओलिसांची सुटका करण्यासाठी इस्रायलचे तत्कालीन पंतप्रधान रबीन यांच्यावरील दबाव वाढत चालला होता.

एअर फ्रान्सच्या विमान प्रवाशांची अपहरणकर्त्यांपासून यशस्वीरित्या सुटका करण्याचं श्रेय कर्नल योनाथन नेतन्याहू यांना दिलं जातं

फोटो स्रोत, GPO via Getty Images

मोसादच्या गुप्तहेरांनी केली मोर्चेबांधणी

ओलिसांपैकी एक असलेल्या सारा डेव्हिडसन यांनी रेहान फजल यांना सांगितलं होतं की, अपहरण करणाऱ्यांनी ओलिसांची विभागणी दोन गटात केली होती.

“त्यांनी लोकांची नावं पुकारली आणि त्यांना दुसऱ्या खोलीत जाण्यास सांगितलं. थोड्या वेळात लक्षात आलं की ते फक्त ज्यू लोकांची नावं पुकारत होती.”

यादरम्यान अपहरण करणाऱ्यांनी 47 बिगर ज्यू प्रवाशांची सुटका केली. त्यांना एक विशेष विमानानं पॅरिसला नेण्यात आलं.

विमानाचं अपहरण करून त्याला एंटेबे विमानतळावर नेण्यात आलं

मोसादच्या गुप्तहेरांनी पॅरिसमध्ये त्या प्रवाशांशी बोलून एंटेबेसंदर्भात बारीक सारीक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला.

मोसादच्या एका हेरानं केनियामध्ये एक विमान भाड्यानं घेऊन एंटेबेवरून उड्डाण करून त्याचे अनेक फोटो घेतले.

रंजक बाब म्हणजे एंटेबे विमानतळाच्या ज्या टर्मिनलवर ओलिसांना ठेवण्यात आलं होतं, त्याचं बांधकाम एका इस्रायली कंपनीनंच केलं होतं.

कंपनीनं त्या टर्मिनलचा नकाशा पुरवला आणि रात्रीतून इस्रायलमध्ये तसंच एक डमी किंवा नकली टर्मिनल उभं करण्यात आलं. इस्रायलच्या कमांडोंना त्यावर हल्ल्याचा सराव करता यावा म्हणून ते उभारण्यात आलं होतं.

योनाथन नेतन्याहू यांची एंट्री

जी मोहीम काही तास आधीपर्यंत जवळपास अशक्य मानली जात होती, इस्रायलनं त्याच मोहिमेची तयारी केली. त्यासाठी इस्रायलच्या सैन्यातील 200 सर्वोत्तम सैनिकांची निवड करण्यात आली.

ब्रिगेडियर जनरल डॅम शॉमरॉन यांना या मोहिमेची जबाबदारी देण्यात आली. तर लेफ्टनंट कर्नल योनाथन नेतन्याहू यांना फील्ड ऑपरेशन इंचार्ज करण्यात आलं.

एंटेबे विमानतळाच्या धावपट्टीवरील लाईट्स रात्रीच्या वेळेस बंद तर करण्यात येणार नाहीत ना आणि इदी अमीनचे सैनिक विमान धावपट्टीवर उतरू नये यासाठी धावपट्टीवर ट्रक तर उभा करणार नाहीत ना, ही या कमांडो ऑपरेशनमधील सर्वात मोठी समस्या होती.

पंतप्रधान होण्याआधी इस्रायलचे लष्कर प्रमुख जनरल राबीन (उजवीकडे), मध्ये माजी संरक्षण मंत्री मोशे द्यान

फोटो स्रोत, Reuters

यादरम्यान इस्रायलच्या सरकारनं संकेत दिला की ते अपहरण करणाऱ्यांशी बोलणी करण्यास तयार आहेत. कमांडोंना तयारी करण्यासाठी थोडा वेळ मिळावा यासाठी तसं करण्यात आलं. इदी अमीनचा मित्र मानला जाणाऱ्या माजी लष्करी अधिकारी बार लेव यांना त्यांच्याशी बोलण्याची जबाबदारी देण्यात आली.

त्यानं इदी अमीनशी फोनवर अनेकवेळा चर्चा केली. मात्र ओलिसांची सुटका करण्यात त्यांना अपयश आलं.

यादरम्यान इदी अमीन, आफ्रिकन एकजूट संघटनेच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी मॉरिशसची राजधानी असलेल्या पोर्ट लुईला गेले. त्यामुळे इस्रायलला आणखी वेळ मिळाला.

या सर्व मोहिमेतील सर्वात मोठी अडचण होती की 4000 किलोमीटर अंतरावर जाऊन परतदेखील यायचं होतं. त्यामुळे विमानात हवेतल्या हवेत दुसऱ्या विमानाद्वारे इंधन भरण्यात आलं.

फक्त 6 मिनिटांचा वेळ

इस्रायलसमोर 3 पर्याय होते. पहिला पर्याय होता, विमानांची मदत घेण्याचा. दुसरा होता बोटींनी तिथे पोहोचण्याचा. तर तिसरा पर्याय होता केनियातून रस्ते मार्गानं युगांडात शिरण्याचा.

मात्र अखेरीस ठरलं की एंटेबेपर्यंत पोहोचण्यासाठी विमानांचा वापर करण्यात यावा. हे काम अशाप्रकारे केलं जाईल की युगांडातील सैनिकांना वाटेल की या विमानांमधून राष्ट्राध्यक्ष इदी अमीन परदेश दौऱ्यावरून परतत आहेत.

इस्रायलमध्ये जमावाबरोबर आनंद साजरा करताना विरोधी पक्षनेते बेगिन मेनाचिम

इस्रायलच्या सायनाय बेसवरून 4 जुलैला 4 हर्क्युलिस विमानांनी उड्डाण केलं. फक्त 30 मीटर उंचावरून उड्डाण करत त्यांनी तांबडा समुद्र ओलांडला. जेणेकरून इजिप्त, सुदान आणि सौदी अरेबियाच्या रडावर ते दिसू नयेत.

इस्रायलच्या कमांडोंनी रस्त्यात युगांडाच्या सैनिकांचा गणवेष घातला.

विमानांनी उड्डाण केल्यानंतरच पंतप्रधान राबीन यांनी मंत्रिमंडळाला या मोहिमेची माहिती दिली.

सात तास एकसलग उड्डाण केल्यानंतर रात्री एक वाजता पहिलं हर्क्युलिस विमान एंटेबेच्या आकाशात पोहोचलं. त्याच्याकडे लँड करण्यासाठी आणि अपहरण करणाऱ्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी फक्त 6 मिनिटांचा वेळ होता.

त्यावेळेस धावपट्टीवरील लाईट्स सुरू होते. विमान धावपट्टीवर उतरण्याच्या 8 मिनिटं आधीच हर्क्युलिसचे रँप उघडण्यात आले, जेणेकेरून मोहिमेला कमीत कमी वेळ लागावा.

विमान उतरताच पायलटनं विमान धावपट्टीच्या मधोमध थांबवलं, जेणेकेरून पॅराट्रूपर्सची एक तुकडी खाली उतरवता यावी आणि त्यांना मागून येणाऱ्या विमानांसाठी धावपट्टीवर इमर्जन्सी लाईट्स लावता यावेत.

इदी अमीन यांनी बदलली होती त्यांची कार

इस्रायलच्या विमानातून एक काळ्या रंगाची मर्सिडिज कार उतरवण्यात आली. राष्ट्राध्यक्ष इदी अमीन ज्या कारचा वापर करायचे त्याच्याशी ही कार बरीचशी मिळतीजुळती होती.

त्याच्या मागे कमांडोंनी भरलेल्या 2 लँड रोवर गाड्यादेखील उतरवण्यात आल्या. या वाहनांनी वेगानं टर्मिनलकडे जाण्यास सुरुवात केली.

कमांडोंना आदेश होते की जोपर्यंत ते टर्मिनलपर्यंत पोहोचत नाहीत तोपर्यंत गोळ्या झाडू नयेत.

इस्रायलच्या बेन गुरियन विमानतळावर सुरक्षित उतरल्यावर रडणारे लोक

इस्रायलच्या सैनिकांना आशा होती की काळ्या रंगाची मर्सिडीज कार पाहून युगांडाच्या सैनिकांना वाटेल की इदी अमीन ओलिसांना भेटण्यासाठी आले आहेत. मात्र त्यांना हे माहित नव्हतं की काही दिवसांपूर्वीच अमीन यांनी त्यांची कार बदलली होती. आता ते पांढऱ्या रंगाची मर्सिडीज कार वापरू लागले होते.

याच कारणामुळे टर्मिनलबाहेर उभ्या असलेल्या युगांडाच्या सैनिकांनी त्यांच्या रायफल सज्ज केल्या. इस्रायलच्या कमांडोनी त्यांना सायलेन्सर लावलेल्या बंदूकांनी तिथेच मारण्यास सुरुवात केली. आतापर्यंत इस्रायलच्या ही मोहीम उघड झाली होती.

एंटेबेहून सुरक्षितपणे इस्रायलला पोहोचल्यावर ओलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या डोळ्यात अश्रू आले

गोळ्या चालताच कमांडरनं आदेश दिला की वाहनांमधून उतरून पायीच त्या टर्मिनलच्या इमारतीवर हल्ला चढवण्यात यावा. तिथेच ओलिसांना ठेवण्यात आलेलं होतं. कमांडोंनी बुल हॉर्नद्वारे ओलिसांना इंग्रजी आणि हिब्रू भाषेत सांगितलं की ते इस्रायलचे सैनिक आहेत आणि त्यांना वाचवण्यासाठी आले आहेत.

त्यांनी प्रवाशांना लगेचच जमिनीवर झोपण्यास सांगितलं. त्यांनी प्रवाशांना हिब्रूमध्ये विचारलं की अपहरण करणारे कुठे आहेत.

प्रवाशांनी मुख्य हॉलमध्ये उघडणाऱ्या दरवाजाकडे खूण केली. कमांडो हँड ग्रेनेड फेकत हॉलमध्ये शिरले. इस्रायलच्या कमांडोंना पाहताच अपहरण करणाऱ्यांनी गोळीबार सुरू केला.

दोन्ही बाजूनं गोळीबार सुरू झाला. त्यात सर्व अपहरणकर्ते मारले गेले. या दरम्यान ओलिस मातापिता त्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी त्यांच्यावर झोपले.

यादरम्यान तीन ओलिसांना देखील गोळ्या लागल्या. दरम्यान आणखी दोन इस्रायली विमानं तिथे उतरली होती. त्यामध्ये देखील इस्रायलचे सैनिक होते.

इस्रायलमधील लोक आनंद साजरा करताना

चौथं विमान पूर्णपणे रिकामं होतं. ते ओलिसांना नेण्यासाठी होतं.

एंटेबेवर उतरल्यानंतर 20 मिनिटांच्या आतच ओलिसांना लँडरोवर्समध्ये भरून रिकाम्या विमानात पोहोचवलं जाऊ लागलं होतं. यादरम्यान युगाडांच्या सैनिकांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली होती. तसंच संपूर्ण विमानतळाचे लाईट्स बंद करण्यात आले होते.

इतिहासातील सर्वात धाडसी मोहिमेत योनाथन नेतन्याहूंचा मृत्यू

या संपूर्ण मोहिमेत इस्रायलचा फक्त एकच सैनिक मारला गेला. कंट्रोल टॉवरवरून चालवण्यात आलेली एक गोळी लेफ्टनंट कर्नल नेतन्याहूंच्या छातीत लागली आणि ते तिथेच पडले.

एंटेबेतून निघण्यापूर्वी प्रत्येक इस्रायली सैनिकाची मोजदाद करण्यात आली.

सैनिकांनी जखमी नेतन्याहू यांना विमानात टाकलं. एंटेबेमध्ये विमान उतरल्यापासून 58 मिनिटांनी वाचवण्यात आलेल्या प्रवाशांना घेऊन विमानानं तिथून उड्डाण केलं. त्याआधी त्यांनी एंटेबेत उभ्या असलेल्या 11 मिग विमानांना नष्ट केलं. जेणेकरून या विमानांनी त्यांचा पाठलाग करू नये.

इस्रायलमध्ये विमानातून उतरत असलेले ओलीस

मग 4 जुलैच्या सकाळी वाचवण्यात आलेले 102 प्रवासी आणि इस्रायलचे कमांडो नैरोबीमार्गे तेल अवीवला पोहोचले. या संपूर्ण मोहिमेला इस्रायलच्या इतिहासातील सर्वात धाडसी मोहीम मानलं जातं.

परतीच्या प्रवासातच योनाथन नेतन्याहू यांचा मृत्यू झाला. या मोहिमेत सर्व 7 अपहरणकर्ते आणि युगांडाचे 20 सैनिक मारले गेले.

इस्रायलच्या या कारवाईत डोरा ब्लॉक या एका ओलिसाला परत आणता आलं नाही. कारण हल्ल्याच्या वेळेस त्या कंपालातील मुलागो हॉस्पिटलमध्ये होत्या.

नंतर युगांडाच्या ॲटर्नी जनरलनं तिथल्या मानवाधिकार आयोगाला सांगितलं की या मोहिमेनंतर इदी अमीनच्या आदेशावरून 2 लष्करी अधिकाऱ्यांनी डोरा ब्लॉक यांची हॉस्पिटलमध्ये हत्या केली होती.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC