Source :- ZEE NEWS
India Air Strike Operation Sindoor News in Marathi: भारताने पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देताना पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त जम्मू आणि काश्मीरमध्ये हवाई हल्ले केले आहेत. यासंदर्भात संरक्षण मंत्रालयाने रात्री पावणे दोन वाजता अधिकृत माहिती जारी केली. “काही वेळापूर्वी भारतीय सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ या मोहिमेअंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तान-व्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांवर कारवाई केली आहे. ही ठिकाणं भारतावर हल्ल्यांची आखणी आणि मार्गदर्शनासाठी वापरली जात होती,” असं भारताने म्हटलं आहे.
नऊ ठिकाणांवर हल्ला, कारण…
एकूण नऊ ठिकाणांवर हल्ला करण्यात आला आहे, अशी माहितीही भारतीय संरक्षण दलाने दिली आहे. ही कारवाई अतिशय नेमकी, मोजकी आणि अशांतता न घडवणारी होती. कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आलेले नाही. भारताने लक्ष्यांची निवड व कारवाईची पद्धत ठरवताना अत्यंत संयम दाखवला आहे, असंही संरक्षण दलाने म्हटलं आहे.
पहलगाम हल्ल्याचा केला उल्लेख
संरक्षण मंत्रालयाने या हल्ल्याची माहिती देताना पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केला आहे. “ही पावले पहलगाम येथे झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर उचलण्यात आली आहेत. या हल्ल्यात 25 भारतीय आणि एक नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाला होता. आपण या घटनेमागे जबाबदार असणाऱ्यांना उत्तरदायी ठरवण्याच्या आपल्या वचनाशी प्रामाणिक आहोत, असं संरक्षण दलाने जाहीर केलं आहे.
नेमके कुठे करण्यात आले हल्ले?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत, पाकिस्तानमधील मुद्रिके, कोटली, मुझफ्फराबाद आणि बहावलपूरसह 9 ठिकाणी क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. या हल्ल्यामुळे तेथील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त झाले आहेत. पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्याने हल्ल्याची पुष्टी केली आहे आणि प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली आहे.
भारतीय लष्कराची पोस्ट
संरक्षण मंत्रालयाने ‘ऑपरेशन सिंदूर’ बद्दल सविस्तर माहिती आज दिवसभरात दिली जाईल, असंही स्पष्ट केलं आहे. भारतीय लष्कराच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन, “न्याय झाला. जय हिंद!” अशी एक पोस्ट करण्यात आली आहे. 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये एकूण 26 जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याचा बदला भारताने हवाई हल्ला करुन घेतला आहे.
SOURCE : ZEE NEWS