Source :- ZEE NEWS

Indian Corporate Work Culture: तुम्हाला नाताळाची किती दिवस सुट्टी आहे? सामान्यपणे या प्रश्नाला भारतीय कर्मचाऱ्याचं उत्तर 25 डिसेंबर आणि नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणजेच 1 जानेवारी असं असेल. मात्र भारतातील काही कर्मचाऱ्यांना चक्क आतापासून थेट 6 जानेवारी 2025 पर्यंत नाताळाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यावरुन एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. नेमकी कोणत्या कर्मचाऱ्यांना ही जवळपास दोन आठवड्यांची सुट्टी देण्यात आली आहे आणि त्यावरुन काय वाद झालाय पाहूयात…

कोणी आणि काय म्हटल्याने सुरु झाली चर्चा?

पाश्चिमात्य देशांबरोबरच युनायटेड किंग्डमसारख्या ख्रिश्चनबहुल देशांमध्ये नाताळाची मोठी सुट्टी दिली जाते. मात्र या कंपन्यांसाठी भारतामधून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही या मोठ्या सुट्ट्यांचा फायदा मिळतो. युनायटेड किंग्डममधील एका कंपनीसाठी काम करणाऱ्या भारतातील कर्मचाऱ्याने आपल्याला 6 जानेवारीपर्यंत सुट्टी असल्याची माहिती दिली. त्यानंतर भारतातील कंपन्यांसाठी काम करणाऱ्या अनेकांनी आपल्याला मात्र राबवून घेतलं जात असल्याचं सांगत खंत व्यक्त केली. विवेक पांचाल नावाच्या व्यक्तीने आपल्या एक्स (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन त्याच्या सहकाऱ्याने पाठवलेल्या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर केला होता. हा सहकारी म्हणजे विवेकचा मॅनेजर असल्याचं सांगितलं जात असून या मेसेजमध्ये आपण आपल्या कर्मचाऱ्यांना 15 दिवसांची सुट्टी देत असल्याचं सांगितलं आहे. नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आणि नाताळानिमित्त ही सुट्टी दिली जात असल्याचं त्याने नमूद केलं.

नक्की या पोस्टमधील फोटोत आहे का?

“हॅलो विवेक, सोमवारपासून 6 जानेवारीपर्यंत नाताळ आणि नवीन वर्षानिमित्त सुट्टी असणार आहे,” असं या मेसेजमध्ये लिहिलेलं होतं. विवेकने या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर करताना, “युकेमध्ये असलेल्या कंपनीसाठी काम करण्याचे फायदे,” अशी कॅप्शन देत हा फोटो एक्स अकाऊंटवरुन शेअर केला. 

स्क्रीनशॉट व्हायरल अन् कमेंट्सचा पडला पाऊस

हा स्क्रीनशॉट व्हायरल झाला असून अनेकांनी यावरुन कमेंट्स केल्या आहेत. खास करुन भारतामधील कामाची पद्धत आणि कर्मचाऱ्यांना राबवून घेण्याची पद्धत कशी आहे यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. भारतात अशाप्रकारे कोणत्या कंपनीने सुट्टी दिलेलं ऐकीवात नाही असंही अनेकांनी म्हटलं आहे. या पोस्टखालील कमेंटमध्ये अनेकांचा संताप दिसून येत आहे. 

“केवळ युनायटेड किंग्डमच नाही तर पाश्चिमात्य देशांमध्ये असेच केले जाते. केवळ भारतात आणि काही आशियाई देशांमध्येच क्लायंट फर्स्ट धोरण राबवलं जातं आणि 24X7 अगदी 365 दिवस कर्मचाऱ्यांना राबवून घेतात,” असं राजेश अय्यर नावाच्या व्यक्तीने म्हटलं आहे. “भारतीय कंपन्यांना चेहरा दाखवणारी ही पोस्ट असून इथे दिवाळीमध्येही केवळ एकच सुट्टी दिली जाते,” असं अन्य एकाने म्हटलं आहे. 

मात्र याचवेळी अनेकांनी जे भारतीय अमेरिका किंवा युरोपीयन क्लायंट्ससाठी काम करतात त्यांना कोणत्याच सुट्ट्यांचा नीट आनंद घेता येत नाही असंही या पोस्टखाली म्हटलं आहे.

SOURCE : ZEE NEWS