Home LATEST NEWS ताजी बातमी ‘रशियाने युक्रेनविरोधात उत्तर कोरियाची क्षेपणास्त्रं वापरली,’ झेलेन्स्की यांचा दावा

‘रशियाने युक्रेनविरोधात उत्तर कोरियाची क्षेपणास्त्रं वापरली,’ झेलेन्स्की यांचा दावा

5
0

Source :- BBC INDIA NEWS

रशियाकडून युक्रेनवर उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्रांचा वापर; झेलेन्स्कींचा दावा

फोटो स्रोत, Reuters

रशिया आणि युक्रेनने रात्रीही एकमेकांवर हल्ले सुरूच ठेवले आहेत.

रशियाने उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्रांचा वापर केल्याचा आरोप युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी केला आहे.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले की, झापोरिझियावर झालेल्या हल्ल्यांमध्ये रशियाचा मित्रदेश असलेल्या उत्तर कोरियाची बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे वापरण्यात आली.

या हल्ल्यात किमान 6 जणांचा मृत्यू झाला, तर 19 जण जखमी झाले आहेत.

दक्षिण रशियातील व्होरोनेझ शहरात ऑनलाईन कंपनी वाइल्डबेरीजच्या गोदामांवर युक्रेनने हल्ला केला. ‘रशियाची ॲमेझॉन’ म्हणून ओळख असलेल्या या कंपनीला गेल्या काही आठवड्यांपासून सातत्याने लक्ष्य केले जात आहे.

या हल्ल्याच्या एक दिवस आधी युक्रेनने रशियातील तातारस्तानवर ड्रोन हल्ले केले होते. या ड्रोन हल्ल्यात एका मुलासह किमान 13 जणांचा मृत्यू झाला होता. तातारस्तान हे युक्रेनच्या सीमेपासून 1100 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर आहे.

‘…हा उर्वरित जगासाठी धोका- युक्रेनचा इशारा’

सोमवारी (10 ऑगस्ट) सायंकाळी व्हीडिओ संदेशातून झेलेन्स्की म्हणाले की, ‘पहिल्यांदाच’ रशियाला “युद्ध लढण्यासाठी उत्तर कोरियाच्या मदतीची गरज भासत आहे.”

झेलेन्स्की म्हणाले, “युक्रेन आणि युरोपमध्ये उत्तर कोरियाची क्षेपणास्त्रे आणि सैनिक जितके जास्त वापरले जातील, तितकेच उत्तर कोरियाला त्यांच्यातील उणिवा दूर करण्याचा आणि चुका सुधारण्याचा अनुभव मिळेल. यामुळे उर्वरित जगासाठीही धोका निर्माण होऊ शकतो.”

झेलेन्स्की यांनी सोमवारी पश्चिम सायबेरियामधील रशियाच्या पेट्रोकेमिकल प्रकल्पावर केलेल्या हवाई हल्ल्याचेही कौतुक केले. हा हल्ला युक्रेनच्या लष्कराची ‘अत्यंत महत्त्वपूर्ण कामगिरी’ असल्याचे त्यांनी म्हटले.

झेलेन्स्की

फोटो स्रोत, Getty Images

त्यांनी सांगितलं की, ‘युक्रेनकडून रशियाच्या आणखी आतल्या भागात हल्ले’ केले जातील. या हल्ल्यांमधून रशिया आणि रशियन जनतेला शांततेची गरज आहे, हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला जाईल.

रशियाला उत्तर कोरियाकडून लष्करी मदत मिळत असल्याचा आरोप झेलेन्स्की यांनी यापूर्वीही केला आहे.

रशियाच्या बाजूने युद्धात सहभागी होण्यासाठी तब्बल 50 हजार उत्तर कोरियाचे सैनिक पाठवले जात असल्याचे झेलेन्स्की यांनी रविवारी (9 ऑगस्ट) सांगितलं.

‘गाइडेड बॉम्बच्या मदतीने हल्ले, मोठं नुकसान’

झापोरिझिया प्रांताचे गव्हर्नर इव्हान फेदोरोव्ह यांनी आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या गाड्या आणि इमारतींचे फोटो शेअर केले. मॉस्कोने क्षेपणास्त्रे आणि ‘गाइडेड बॉम्ब’च्या मदतीने शहरावर हल्ला केल्याचे त्यांनी सांगितले. या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांव्यतिरिक्त किमान 19 जण जखमी झाले.

कीव्हवर झालेल्या हल्ल्यात एक जण जखमी झाला. रात्री दोन वेळा हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन वाजले. राजधानीच्या बाहेरील भागात स्फोटांचे आवाज ऐकू आले आणि त्यानंतर काही ठिकाणी आग लागली.

फेदोरोव्ह यांनी सांगितलं की, रशियाच्या हल्ल्यात झापोरिझियामधील औद्योगिक ठिकाणं, पायाभूत सुविधा आणि अनिवासी इमारतींचं मोठं नुकसान झालं.

युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, रशियाने रात्री 120 ड्रोन आणि वेगवेगळ्या प्रकारची क्षेपणास्त्रं डागली. परंतु, पहिल्यांदाच किती क्षेपणास्त्रं डागली किंवा किती क्षेपणास्त्रे पाडली, याची माहिती त्यांनी जाहीर केली नाही.

युक्रेनची राजधानी किव्हमध्ये पाडलेलं एक रशियन ड्रोन (संग्रहित छायाचित्र)

फोटो स्रोत, Getty Images

यापूर्वी सोमवारी हवाई दलाने माध्यमांना हवाई संरक्षणासाठी लागणाऱ्या क्षेपणास्त्रांची कमतरता याबाबत ‘अतिशयोक्तीपूर्ण मथळे किंवा बातम्या’ देऊ नका आणि ‘नकारात्मक वातावरण निर्माण करू नका’, असं आवाहन केलं होतं.

कीव्हमध्ये झालेल्या हल्ल्यात एका रुग्णालयाचे नुकसान झाले. परंतु अधिकारी म्हणाले की, त्यावेळी रुग्णालयातील कर्मचारी आणि रुग्ण सुरक्षित ठिकाणी हलवण्यात होते. दरम्यान, खेरसॉन आणि खार्किव्हमधील वीज केंद्रांवर हल्ले झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला.

रशियाच्या ड्रोन हल्ल्यात दोन महिला जखमी झाल्या असल्याची माहिती, सुमी शहराच्या लष्करी प्रशासनाचे प्रमुख सेरही क्रिव्होशिनेको यांनी सांगितलं.

टेलिग्रामवर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी महिलांचे वय 52 आणि 66 वर्षे आहे. त्यांच्यावर घटनास्थळीच उपचार करण्यात आले.

या हल्ल्यामध्ये सामान्य नागरिकांची वाहने, गोदामं आणि पायाभूत सुविधांचेही मोठ्याप्रमाणात नुकसान झाले, असंही त्यांनी सांगितलं.

युक्रेनकडून रशियाचे ‘वाइल्डबेरीज’ टार्गेट

दरम्यान, रशियातील सर्वात मोठी ऑनलाईन कंपनी वाइल्डबेरीजच्या व्होरोनेझमधील लॉजिस्टिक्स सेंटरमध्ये आग लागल्याचे आणि तेथे स्फोट झाल्याचे वृत्त आहे.

‘वाइल्डबेरीज’ने या हल्ल्याला अद्याप दुजोरा दिलेला नाही. परंतु, युक्रेनच्या सीमेला लागून असलेल्या या भागातील कंपनीची केंद्रं रिकामी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

जुलै महिन्यात, युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यांमुळे वाइल्डबेरीजच्या अनेक गोदामांचं काम बंद पडलं होतं. त्यामुळे रशियातील मोठ्या संख्येने छोट्या आणि मध्यम व्यवसायांवर परिणाम झाला होता.

त्यावेळी कीव्हने सांगितलं होतं की, रशियन सैन्याकडून लष्करी सामान खरेदी करण्यासाठी वापरत असलेल्या लॉजिस्टिक्स केंद्रांना लक्ष्य करण्यात आले. रशियन सैन्याला होणारा सामानाचा पुरवठा थांबवणे हा त्यामागचा उद्देश होता.

याआधी रशियाने युक्रेनच्या मुख्य सरकारी इमारतीवर हल्ला केला होता (संग्रहित छायाचित्र)

फोटो स्रोत, X/Andrii Sybiha

या आठवड्यात तातारस्तानवर झालेला हल्ला हा 2022 मध्ये युक्रेनमधील युद्ध सुरू झाल्यापासून रशियावर झालेल्या सर्वात मोठ्या प्राणघातक हल्ल्यांपैकी एक होता.

या हल्ल्यामध्ये किमान 75 जण जखमी झाले. युक्रेनच्या सशस्त्र दलांनी शहरातील तानेव्हो तेल शुद्धीकरण कारखान्यावर हल्ला केल्याचे त्यांनी सांगितले.

सोशल मीडियावर समोर आलेल्या आणि व्हेरिफाय केलेल्या फोटोमध्ये दिवसा मोठ्या प्रमाणात धूर आणि आगीच्या ज्वाळा आकाशात उठताना दिसत होत्या. पार्श्वभूमीवर हवाई हल्ल्याचे सायरन वाजत असल्याचेही ऐकू येत होते.

मृतांपैकी 7 जण उझबेकिस्तानचे नागरिक होते, असं तातारस्तानमधील उझबेकिस्तानच्या वाणिज्य दूतावासाने सांगितलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC