Source :- BBC INDIA NEWS

इंग्लंड दौऱ्यातील पाच कसोटी सामन्यांची सूत्रे शुभमन गिलकडे असतील.

फोटो स्रोत, ANI

12 मिनिटांपूर्वी

बीसीसीआयने इंग्लंड दौऱ्यासाठी शुभमन गिलला कसोटी संघाचा नवा कर्णधार म्हणून घोषित केलं आहे. तर दुसऱ्या बाजूला उपकर्णधारपदाची जबाबदारी ऋषभ पंतवर सोपवण्यात आली आहे.

भारतीय क्रिकेट संघ पुढील महिन्यामध्ये इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.

या संघाच्या निवडीसाठी मुंबईमधील भारतीय क्रिकेट नियंत्रण बोर्डाच्या मुख्यालयात बैठक झाली.

या बैठकीमध्ये बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया आणि अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीचे सदस्य सामील झाले होते.

या बैठकीनंतर पत्रकार परिषदेमध्ये अजित आगरकर यांनी भारतीय संघाची घोषणा केली.

भारतीय संघामध्ये असलेले खेळाडू

भारतीय संघामध्ये असलेले खेळाडू

रोहित आणि विराटची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती

भारतीय संघाचे दोन दिग्गज खेळाडू म्हणजेच रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी फक्त 5 दिवसांच्या अंतराने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

या बातमीनंतर, अर्थातच क्रिकेटच्या चाहत्यांना धक्का बसला.

जवळपास एका महिन्यानंतर भारतीय संघ इंग्लंडच्या संघाविरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. मात्र, या मालिकेमध्ये हे दोन्हीही दिग्गज खेळाडू नसणार आहेत.

अगदी हेडिंग्लेमध्ये होणाऱ्या पहिल्याच सामन्यासाठी या दोन वरिष्ठ खेळाडूंची अनुपस्थिती ही भारतीय संघासाठी चिंतेची बाब असणार आहे.

कारण, ड्रेसिंग रुममध्ये रोहित आणि विराट यांची उपस्थिती असताना इतर खेळाडूंना त्या दोघांच्या अनुभवाचा तसेच शहाणीवेचा मोठा आधार असायचा.

इग्लंडमधील मैदानांवर कसं खेळायचं, याबाबत रोहित शर्माचा व्यावहारिक आणि अनुभवी सल्ला, तसेच मैदानावर खेळताना विराटचा जोश तसेच खेळण्याची पद्धत या सगळ्यांमुळे इतर खेळाडूंना बरंच काही शिकायला मिळायचं. त्यांचं संघामध्ये असणं, हा ‘टीम इंडिया’साठी आधार असायचा.

मात्र, क्रिकेट खेळाचं एक सत्य असंही आहे की, जेव्हा एखादा दिग्गज खेळाडू जातो, तेव्हा कुणी ना कुणी त्या खेळाडूची रिकामी झालेली जागा भरुन काढण्यासाठी तयार असतो.

भारतीय संघाचे दोन दिग्गज खेळाडू म्हणजेच रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी फक्त 5 दिवसांच्या अंतराने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

फोटो स्रोत, Getty Images

मात्र, एक फलंदाज म्हणून विराट कोहलीसाठी कसोटी क्रिकेट हा खेळ प्रकार गेल्या 5 वर्षांमध्ये फार काही खास ठरलेला नाही.

या दरम्यान, कोहलीने 65 इनिंग्समध्ये 32.09 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. भारतातील मैदानांवर हीच सरासरी 29.92 इतकी राहिली, तर परदेशातील दौऱ्यांमध्ये 34.12 राहिली.

दोन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल्समध्ये त्याच्या धावांची सरासरी फक्त 30 राहिली आहे.

दुसऱ्या बाजूला, रोहित शर्माने 63 इनिंग्समध्ये 36 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. भारतातील मैदानांवर त्याची सरासरी 37.6 तर परदेशी मैदानांवर त्याची सरासरी 35.5 राहिली.

2024 मध्ये, रोहितने 26 इनिंग्समध्ये फक्त 619 धावा केल्या असून त्याची सरासरी फक्त 24.76 इतकीच होती.

खरं तर, या आकडेवारीसह एखादा फलंदाज क्वचितच टीममधील आपलं स्थान कायम ठेवू शकतो.

आता रोहित आणि विराट या दोघांनीही केवळ 5 दिवसांच्या अंतराने निवृत्ती घेणं, हा एक मोठा संकेत आहे.

पुजारा आणि रहाणे या दोघांनंतर भारतीय क्रिकेटमधील परिवर्तनाचा जो काळ होता, तो आता पूर्णत्वास गेला असल्याचंच हे लक्षण आहे.

भारतीय कसोटी क्रिकेटचं नवं पर्व

हा इंग्लंड दौरा भारतीय कसोटी क्रिकेटच्या दृष्टीने एक नवं पर्व असणार आहे. मात्र, त्याकडे भीतीऐवजी एका नव्या आशेसह सामोरं जाण्याची गरज आहे.

भारताने अलीकडेच 2024-25 चं एक अत्यंत खराब सत्र समाप्त केलं आहे.

या सत्रात भारतीय संघाला सातत्याने पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारतीय संघाला आपल्याच मैदानात न्यूझीलंडच्या विरोधात 0-3 ने तर ऑस्ट्रेलियाकडून 1-3 ने पराभव पत्करावा लागला आहे.

बैठकीनंतर पत्रकार परिषदेमध्ये अजित आगरकर यांनी भारतीय संघाची घोषणा केली.

फोटो स्रोत, Getty Images

या पार्श्वभूमीवर, क्रिकेट चाहत्यांना इंग्लंड दौऱ्यामध्ये येणाऱ्या अडचणींसाठी तयार रहावं लागेल.

जोपर्यंत, कसोटी क्रिकेटमध्ये नेतृत्व करू शकणाऱ्या फलंदाजांची एक तगडी पिढी तयार होत नाही, तोवर हे आव्हान कायम राहणार आहे. भारताच्या गोलंदाजीला साथ देऊ शकेल, अशी फलंदाजी कसोटी क्रिकेटमध्ये भारताला उभी करावी लागणार आहे.

आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे, इंग्लंड दौऱ्यावर जाणारे भारतीय गोलंदाज हे फलंदाजांच्या तुलनेत अधिक वरिष्ठ आहेत.

रविंद्र जडेजा 36, मोहम्मद शमी 34, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या 31 वर्षांचा आहे.

दुसऱ्या बाजूला, फलंदाजांमध्ये फक्त केएल राहुल (33) आणि श्रेयस अय्यर (30) हे दोघेच या वयाच्या आसपासचे खेळाडू आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC