Source :- BBC INDIA NEWS

वॉटर हायड्रंट सिस्टीम

फोटो स्रोत, Alpesh Karkare/BBC

अमेरिकेतील लॉस एंजेलिसमधील आगीनं संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं. महासत्ता अशी ओळख असलेल्या अमेरिकेतील यंत्रणाही या भयानक वणव्यासमोर अक्षरश: हतबल झालेल्या दिसल्या. यात नैसर्गिक संपत्तीसह जीवितहानीही झाली.

लॉस एंजेलिसमधील आग वेगानं पसरण्याची अनेक कारणं समोर आली. त्यापैकी एक कारण होतं ‘फायर हायड्रंट्स’ने व्यवस्थित काम न करणं. त्यामुळं या यंत्रणेबाबत शंका आणि चिंता व्यक्त केली जात आहे.

लॉस एंजेलिस जसं अमेरिकेतील महत्त्वाचं शहर आहे, तसंच मुंबई हे भारतातील महत्त्वाचं शहर आहे. किंबहुना, लॉस एंजेलिसपेक्षा हे शहर कित्येक पटीनं अधिक गजबजलेलं आहे.

लोकांची, गाड्यांची गर्दी असलेल्या मुंबईनगरीत अशी दुर्दैवी घटना घडली, तर अग्निशमन दलाच्या गाड्या वगळता आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी इतर कुठली यंत्रणा आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

तर अशा एका प्रणालीबद्दल आपण जाणून घेऊ ज्याचा वापर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केला जातो.

मुंबईत आगीवर नियंत्रणासाठी ब्रिटिशांनी उभ्या केलेल्या एका यंत्रणेबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

ती यंत्रणा म्हणजे, वॉटर हायड्रंट सिस्टिम.

मुंबईत आणि विशेषत: दक्षिण मुंबईत फिरताना जागोजागी छोटे छोटे लाल खांबासारखं काहीतरी दिसतं.

हे लाल खांब म्हणजेच, वॉटर हायड्रंट सिस्टीम. ही यंत्रणा ब्रिटिशांनी आगीवर नियंत्रणासाठी बनवली होती. ही यंत्रणा सध्या अडगळीत पडली आहे.

कशी आहे ‘वॉटर हायड्रंट सिस्टीम’?

आग लागल्यानंतर ही यंत्रणा फार महत्त्वाची असते. आग विझवण्यासाठी जागेवरच पाणी उपलब्ध करून देण्याचे काम वॉटर हायड्रंट यंत्रणेद्वारे केलं जातं.

आग शमवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागतं. त्यामुळं जमिनीखालून पाईप लाईनच्या माध्यमातून विविध ठिकाणी अशा प्रकारे वॉटर हायड्रंट पाण्याच्या टाक्यांना जोडलेले असतात.

जमिनीखालील पाण्याच्या टाक्या आणि जवळील तलावाच्या माध्यमातून आपत्कालीन परिस्थितीमध्ये या यंत्रणेच्या माध्यमातून आग विझवण्यासाठी या पाण्याचा वापर करता येतो.

जमीनीच्या वर असलेल्या या पाईप सदृश्य खांबाला नळखांब असंही म्हटलं जातं.

आग विझवण्यासाठी जागेवरच पाणी उपलब्ध करून देण्याचे काम वॉटर हायड्रंट करतात.

फोटो स्रोत, Alpesh Karkare

मुंबई शहर आणि उपनगरात एकेकाळी असे एकूण 10 हजार 843 ब्रिटिशकालीन नळखांब होते. ते सर्व चांगल्या स्थितीतही होते.

ब्रिटिशांनी मुंबई शहराचं सर्वच दृष्टीने अशा प्रकारे काटेकोर नियोजन केलं होतं.

मुंबईसारख्या या शहरात आग लागल्यानंतर अग्निशमन यंत्रणेला वाहतूककोंडी आणि इतर समस्यांना सामोरे जायला नको, त्यामुळं आग विझवण्यासाठी त्वरित पाणी पोहोचावं म्हणून वॉटर हायड्रंट ही यंत्रणा उभारण्यात आली होती.

सध्या नळखांबांची दूरवस्था

ब्रिटिशांनी उभारलेल्या या यंत्रणेतील हे नळखांब मुंबईत झपाट्याने झालेल्या ‘विकासामुळं’ अडगळीत पडले. तर अनेक नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

मुंबईत ब्रिटिश काळातील एकूण 10 हजार 843 असे नळखांब किंवा वॉटर हायड्रंट होते. त्यापैकी काही ठरावीक वॉटर हायड्रंट सोडता इतर सर्व दयनीय अवस्थेत आहेत.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

मुंबई आणि उपनगरामध्ये अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेले हे वॉटर हायड्रंट फेरीवाल्यांनी नष्ट केले, किंवा त्या परिसरात झालेल्या कामांमुळे संपूर्णपणे बुजले आहेत.

मुंबईची व्यवस्था पाहणाऱ्या प्रशासकीय यंत्रणांचं दुर्लक्ष झाल्यानं आज ही ब्रिटिशकालीन वॉटर हायड्रंट सिस्टीम अखेरच्या घटका मोजत आहे.

अधिकारी नॉट रिचेबल

मुंबई महापालिकेचे अग्निशमन दलप्रमुख रवींद्र आंबुलगेकर यांनी याबाबत जल अभियंता आपल्याला माहिती देऊ शकतात, असं सांगितलं.

ही यंत्रणा सध्या बंद आहे. पण याची पूर्ण माहिती हायड्रॉलिक अभियंता यांच्याकडं आहे. या वॉटर हायड्रंटमधून पाणीगळती, पाणीचोरी असे बरेच प्रकार घडले आहेत, असंही ते म्हणाले.

आग विझवण्यासाठी जागेवरच पाणी उपलब्ध करून देण्याचे काम वॉटर हायड्रंट करतात.

फोटो स्रोत, Alpesh Karkare

या वॉटर हायड्रंट सिस्टीमची सध्याची परिस्थिती आणि पूर्ववत करण्याविषयी मुंबई महापालिकेच्या जल अभियंत्यांशी संपर्क साधला असता, अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली नाही.

अनेक वर्षांपासून मुंबई महापालिका जल अभियंता विभाग हे वॉटर हायड्रंट पूर्ववत करणार, असं अनेकदा सांगत आले आहेत, मात्र प्रत्यक्षात काहीही झालेलं नाही.

मुंबईत काही ठराविक वॉटर हायड्रंट सोडता बाकी सर्व दयनीय अवस्थेत आहेत.

फोटो स्रोत, Alpesh Karkare

मुंबई महापालिकेच्या जल विभागाच्या यार्डमधून सध्या आग विझवण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले जाते. अग्निशमन दलाच्या पाण्याच्या गाड्या यार्डमध्ये जाऊन पाणी भरतात. पाणी भरलेला टँकर घटनास्थळी पुन्हा येऊन आग विझवण्यासाठी वापरला जातो. मुंबईत अग्निशमन दलाचे 26 टँकर फिलिंग पॉईंट आहेत.

मुंबईत आगीच्या घटनांची समस्या

मुंबईत वर्षभरात अनेकदा आगीच्या घटना घडत असतात. त्यात झोपटपट्टीत किंवा अरुंद रस्त्यांवरील इमारतीत आग लागली तर, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळापर्यंत पोहोचवताना प्रशासनाची तारांबळ उडते.

मुंबई महापालिकेचे अग्निशमन दलप्रमुख रवींद्र आंबुलगेकर यांनीही आग विझवण्यासाठी जाणाऱ्या गाड्या आणि टँकर यांच्यासमोर वाहतूक कोंडी ही सर्वात प्रमुख समस्या असते, असं सांगितलं.

अनेकदा मुंबई परिसरात वस्त्यांमध्ये गल्ल्या, इमारत परिसरामध्ये तोकडा रस्ता, वाहतूक आणि अग्निशमन दलाला लागणाऱ्या पाण्याचं केंद्र दूर असल्यामुळे आग विझविताना अनेक अडचणी येतात.

त्यामुळं अशाप्रकारे ठिकठिकाणी असलेल्या वॉटर हायड्रंट यंत्रणेला पूर्ववत करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. अमेरिकेतील लॉस एंजेलीसमधील आगीच्या घटनेनंतर याबाबत आणखी चर्चा सुरू झाली आहे.

मुंबईत नेहमीच वर्षाच्या बारा महिने कुठे ना कुठे आगीच्या घटना घडत असतात. (फाईल फोटो)

फोटो स्रोत, ANI

मुंबईत आगीच्या घटनेत हानी टाळण्यासाठी दुर्लक्षित असलेली वॉटर हायड्रंट यंत्रणा प्रशासनाने पूर्ववत करून खबरदारी घेणं गरजेचं असल्याचं मत सामाजिक कार्यकर्ते रुपेश ढेरंगे व्यक्त करतात.

तर मुंबईतील वकील मिलिंद नकाशे यांच्या मते, “सद्यस्थितीत मुंबई शहरातले वॉटर हायड्रंटची (नळखांब) परिस्थिती वाईट आहे. त्यामुळे दाटीवाटीच्या वस्तीत आग विझवण्यासाठी तयार करण्यात आलेली ही ब्रिटिशकालीन यंत्रणा काही काळानंतर पूर्णपणे कालबाह्य होण्याच्या मार्गावर आली आहे.

“काळानुसार मुंबईचा विकास झपाट्याने होत गेला आणि हे नळखांब जमिनीखाली गेले आहेत. हे चिंताजनक आहे. पण भविष्याच्या दृष्टीने ही यंत्रणा लवकरात लवकर पूर्ववत करणे गरजेचे आहे,” नकाशे सांगतात.

गैरवापरामुळे बंद झाली यंत्रणा?

या ब्रिटिशकालीन हायड्रंटची दुरुस्ती आणि नवे खांबही प्रशासानंन अनेकदा बसवले, पण त्याचा गैरवापर होत असल्याचं निदर्शनास आल्याचं काही अधिकाऱ्यांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितलं.

अनेकदा बांधकाम किंवा टँकर भरण्यासाठी यांचा वापर केला जात असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर महापालिकेनं ही यंत्रणा पुन्हा सुरू करायची की नाही या बाबतचा निर्णय राखून ठेवला, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.

मुंबईतील अग्निशमन दल आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज?

मुंबई अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, “मुंबई अग्निशमन दलाकडे आधुनिक तंत्रज्ञान आहे. अग्निशमन दलातील कर्मचारी आणि अधिकारी हे प्रशिक्षित आहेत. तसेच, आग विझवण्यासाठी टँकरची व्यवस्था देखील पुरेशी आहे. यामुळे मुंबईत अग्निशमन दल कोणत्याही दुर्घटनेचा सामना करण्यास नेहमीच तयार असते.”

आगीचा शास्त्रोक्त पद्धतीने अंदाज घेण्याची यंत्रणा तयार आहे. अग्निशमन विभागात जम्पिंग मशीन असून आपत्कालीन परिस्थितीत ती काहीच वेळात कार्यरत होऊ शकते, अशी माहिती विभागाकडून देण्यात आली.

मुंबई शहरात वर्षाच्या बारा महिने कुठल्या ना कुठल्या परिसरामध्ये आगीची घटना घडते. (फाईल फोटो)

फोटो स्रोत, ANI

याशिवाय अग्निशमन दलाकडं 6 लाख लिटर क्षमतेचे 25 पाण्याचे टँकर्स आहेत. मुंबईत एकूण मोठे 34 फायर स्टेशन्स आणि 19 लहान स्टेशन्स आहेत. त्यांचे नियंत्रण कक्ष भायखळा मुख्यालयात आहे.

मुंबई फायर ब्रिगेडमध्ये सध्या हजारो अग्निशामक, पाचशे चालक आणि साधारण 300 अधिक अधिकारी आहेत.

“भविष्यात आणखी अग्निशमन केंद्र आणि कर्मचारी अधिकाऱ्यांची भरती होणार आहेत. तसेच, मुंबईत प्रत्येक इमारतींना फायर सिस्टीम अनिवार्य करण्यात आलेली आहे”, अशी माहिती मुंबई अग्निशमन दलाकडून देण्यात आली.

मुंबईत वर्षभरात अनेक ठिकाणी आग आणि मृत्यू

मुंबई शहरातील 2025 पर्यंतची आगीची एकूण आकडेवारी, त्यातील मृत आणि जखमींची संख्या याबाबत मुंबई महापालिकेच्यावतीने माहिती देण्यात आलेली नाही.

पण, गेल्या वर्षी एका वृत्तपत्रात आलेल्या माहितीनुसार गेल्या सात वर्षांत आगीच्या लहान मोठ्या तब्बल 33 हजार 313 घटना घडल्या आहेत. त्यात 221 जणांचा मृत्यू, तर 01 हजार 439 जण जखमी झाले आहेत.

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, ANI

मागील वर्षीच ऑक्टोबर महिन्यात मुंबईतील चेंबूर परिसरात एका चाळीतील घराला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

साखर झोपेत असताना पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली आणि आणि एकाच कुटुंबातील सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या परिसरात देखील चिंचोली गल्ली असल्यामुळे त्वरित अग्निशमन गाड्या पोहोचल्या नव्हत्या.

‘वॉटर हायड्रंट यंत्रणा आणि पाणीसाठे सुधारण्याची गरज’

आगीपासून सुरक्षेसंदर्भात अभ्यास आणि काम करणारे झाईद शेख यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं की, “मुंबईसारख्या शहरात प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचणे आपत्कालीन परिस्थितीत शक्य होत नाही. कारण मुंबईत अरुंद गल्ल्या अरुंद रस्ते आणि ट्राफिक यामुळे घटनास्थळी पोहोचणे जिकरीचे होते.

“त्यामुळे ब्रिटिशांनी मुंबईत बसवलेल्या या वॉटर हायड्रंट सिस्टीमची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. कारण आग लागल्यानंतर त्यावेळेस त्वरित काही मिनिटात आग विझवणे हे गरजेचे असते,” शेख सांगतात.

सध्या मुंबईत अनेक झोपडपट्टी आणि इमारत परिसरांमध्ये फूटपाथ आणि रस्ते हे अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचतील अशा स्थितीत नाहीत. त्यामुळे ही जुनी हायड्रंट सिस्टीम जर सुरू असेल तर आग लागलेल्या परिसरात पाणी पोहोचवणं त्वरित शक्य होतं आणि आगीवर नियंत्रण मिळवलं जाऊ शकतं, असंही ते म्हणाले.

ठिकठिकाणी असलेल्या वॉटर हायड्रंट पूर्ववत करावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे.

फोटो स्रोत, Alpesh Karkare

शेख यांच्या मते, ही यंत्रणा पूर्णपणे पूर्ववत करता येत नसेल तर किमान झोपडपट्टी आणि ज्या परिसरात अग्निशमन दल पोहोचणं कठीण आहे, तिथं तरी प्रशासनाने ती सुरू करावी.

प्रशासनाकडे आग विझवण्यासाठी कितीही आधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्रणा असली तरी ती घटनास्थळी पोहचण्यास वेळ लागतोच. त्यामुळे जुने वॉटर हायड्रंट यंत्रणा पुन्हा पूर्वत करायला हवी, असं ते म्हणाले.

वॉटर हायड्रंट यंत्रणा आणि पाणीसाठे व्यवस्थित असतील, तर मोठमोठ्या टँकरची गरज भासणार नाही. लॉस एंजलिस येथे लागलेल्या आगीनंतर मुंबईतील प्रशासनाने याकडे लक्ष दिलं नाही, तर गजबजलेल्या आणि दाटीवाटीची वस्ती असलेल्या मुंबईसारख्या शहरात तर मोठी समस्या निर्माण होऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC