Source :- BBC INDIA NEWS

52 मिनिटांपूर्वी
एक, दोन नाही तर तब्बल 63 वर्षांपासून बेपत्ता असलेली एक महिला जिवंत आणि सुरक्षित सापडली असल्याचं अमेरिकेतील विस्कॉन्सिन राज्याच्या पोलिसांनी सांगितलं आहे. या प्रकरणाचा पुन्हा तपास करताना ही बाब उघडकीस आली आहे.
विशेष म्हणजे हे असं ‘गायब’ होण्याचा निर्णय या महिलेचा स्वतःचाच होता.
ऑड्री बॅकबर्ग असं या महिलेचं नाव आहे. 7 जुलै 1962 ला वयाच्या 20 व्या वर्षी ऑड्री रीड्सबर्ग या छोट्या शहरातील त्यांच्या घरातून बेपत्ता झाल्या होत्या.
सॉक काउंटीचे शेरिफ चिप माईस्टर यांनी या प्रकरणात जाहीर केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, “बॅकबर्ग या स्वेच्छेने घरातून निघून गेल्या होत्या आणि त्यामागे कोणतेही गुन्हेगारी कृत्य किंवा अपघात नव्हता.”
शेरिफ यांनी पुढे सांगितलं की, त्या आता विस्कॉन्सिनबाहेर राहत आहेत. मात्र, यापेक्षा अधिक माहिती दिली नाही.
बेपत्ता व्यक्ती शोधण्याचे काम करणाऱ्या विस्कॉन्सिन मिसिंग पर्सन्स अॅडव्होकसी या एनजीओने दिलेल्या माहितीनुसार ज्यावेळी बॅकबर्ग बेपत्ता झाल्या तेव्हा त्या विवाहित होत्या आणि त्यांना दोन मुलं होती.
वयाच्या विसाव्या वर्षी बेपत्ता झालेल्या बॅकबर्ग या आता 82 वर्षांच्या आहेत. विस्कॉन्सिन मिसिंग पर्सन्स अॅडव्होकसीने दिलेल्या माहितीनुसार बेपत्ता होण्याच्या काही दिवस आधी त्यांनी आपल्या पतीविरुद्ध गुन्हेगारी तक्रार दाखल केली होती. वयाच्या 15 व्या वर्षी त्यांचा विवाह झाला होता आणि त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या पतीने त्यांना मारहाण केली होती व ठार मारण्याची धमकी दिली होती.
त्या लोकरीच्या कारखान्यात काम करायच्या. ज्या दिवशी त्या गायब झाल्या, त्या दिवशी त्यांनी आपला पगार घेण्याचं कारण देत घर सोडलं होतं.
त्यावेळी चौकशी केली असता, या दाम्पत्याच्या 14 वर्षांच्या बेबी सिटर (दाईने) पोलिसांना सांगितलं होतं की, ती आणि बॅकबर्ग या विस्कॉन्सिनची राजधानी मॅडिसनला एका वाहनातून गेल्या. त्यांनी तिथून 300 मैल (480 किमी) अंतरावर असणाऱ्या इंडियानापोलिस, इंडियाना इथं जाण्यासाठी बस पकडली.
ही बेबी सिटर नंतर घाबरली आणि घरी परत जाण्याचा आग्रह करू लागली, मात्र बॅकबर्ग यांनी नकार दिला. या बेबी सिटरने त्यांना शेवटचं पाहिलं तेव्हा त्या बस स्टॉपवरून चालत निघाल्या होत्या.
सॉक काउंटी शेरिफ कार्यालयाने सांगितले की, या प्रकरणात अनेक गोष्टींचा पाठपुरावा केला गेला, पण हाती काहीच लागलं नाही. शेवटी हे प्रकरण थंड बस्त्यात गेलं. यावर्षी काही जुन्या फाईल्सचा सखोल आढावा घेतल्यानंतर पुन्हा तपास सुरू केला गेला.
डिटेक्टिव्ह हॅन्सन यांनी म्हटलं की, त्यांनी बॅकेबर्ग जिथे राहतात तिथल्या स्थानिक शेरिफांशी संपर्क साधला आणि त्यांच्याशी फोनवर 45 मिनिटं बोलले.
त्या सहा दशके कुटुंबापासून दूर कशा राहिल्या आणि या काळात त्यांनी काय केले याबाबत स्थानिक माध्यमांनी विचारल्यावर अधिकाऱ्यांनी सांगितलं.
‘त्यांनी त्यांचं आयुष्य जगायचं होतं, त्या स्वतः परिस्थितीतून मार्ग काढत त्या जगत गेल्या’, असं हॅन्सन यांनी सांगितले.
“त्या आनंदी वाटत होत्या. त्यांच्या निर्णयाबाबत ठाम होत्या. त्यांना आपल्या कृत्याचा पश्चात्ताप नव्हता.”
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC