Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, Nitesh Raut
यवतमाळ शहराजवळ चौसाळा जंगलात 15 मे रोजी एक जळालेला मृतदेह आढळून आला. पोलिसांनी तपास करायला सुरूवात केल्यानंतर हा खून असल्याचं समोर आलं.
या हत्येमधील एकेक धक्कादायक तपशील उघडकीस येत गेले.
मुख्याध्यापिका असलेल्या पत्नीने आपल्या दोन विद्यार्थ्यांच्या मदतीनं पतीला विष देऊन संपवलं आणि मृतदेह जंगलात नेऊन जाळला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतदेह शंतून देशमुख (32) नावाच्या व्यक्तीचा होता. निधी देशमुख असं त्याच्या आरोपी पत्नीचं नाव आहे.
शंतनू हा 13 मे पासून बेपत्ता होता. पत्नी निधी देशमुखने फळांच्या शेकमध्ये विष मिसळून त्याची हत्या केली आणि दोन विद्यार्थ्यांच्या मदतीने मृतदेह जाळला.
या प्रकरणी निधी देशमुखवर खुनाचा गुन्हा दाखल करून तिला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याचं पोलिसांनी सांगितलं. तसंच मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिला मदत करणाऱ्या दोन अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
हे नेमकं काय प्रकरण आहे? काय घडलं? पोलिसांच्या तपासात आणखी काय पुढे आलंय, ते जाणून घेऊया.
नेमकं प्रकरण काय?
वर्षभरापूर्वी शंतनू आणि निधीचा प्रेमविवाह झाला होता. लग्नाला शंतनुच्या आई वडिलांचा विरोध होता. शंतनू आधीपासूनच व्यसनाच्या आहारी गेला होता. कुटुंबातलेही त्याच्या व्यसनामुळे त्रासले होते. त्यामुळे आई-वडिलांनी त्याला वेगळं राहण्यास सांगितलं.
त्यामुळे शंतनू पत्नीसह आई वडिलांपासून विभक्त राहायचा. सुयोग नगरला भाड्याच्या खोलीत ते दोघे राहात होते. दोघेही एकाच शाळेत शिक्षक म्हणून काम करायचे.
शंतनू यवतमाळच्या सनराईज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होता. त्यांची पत्नी निधी देशमुख त्याच शाळेत मुख्याध्यापिका म्हणून काम करायची.

फोटो स्रोत, Nitesh Raut
लग्नानंतर काही महिन्यातच शंतनूने पत्नीला त्रास देण्यास सुरुवात केली. दारुमुळे दोघांत खटके उडायला लागले होते.
शंतनू दारुसाठी वारंवार पत्नीकडे पैसे मागायचा आणि पैसे दिले नाही तर मारहाण करायचा. पत्नीचे काही अश्लील फोटो त्याने मोबाईल मध्ये काढून ठेवले होते. दारुसाठी पैसे न दिल्यास ते अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी द्यायचा. याच त्रासाला कंटाळून पत्नीने त्याच्या हत्येचं टोकाचं पाऊल उचललं.
असा रचला खुनाला कट
पतीला संपवण्यासाठी निधीने गुगलवर विष तयार करण्याची माहिती घेतली. त्यांनतर तिने महादेव मंदिर परिसरातून फळं आणि फुलं विकत घेतली. फळं आणि फुलांचा शेक तयार करून त्यात पॅरासीटामोलच्या जवळपास पंधरा गोळ्या टाकल्या.
निधीने इंटरनेटच्या माध्यमातून विषारी फुलांची माहिती मिळवली होती. त्यानुसार तिने जास्तीत जास्त धोतऱ्याची फुलं घालून शेक तयार केला.
तो शेक तिने दारूच्या नशेत असणाऱ्या पतीला दिला. त्यानंतर मंगळवारी म्हणजे 13 मे च्या संध्याकाळी 5च्या दरम्यान शंतनूचा मृत्यू झाला.
निधीने शिकवणीसाठी येत असलेल्या दोन विद्यार्थ्यांनाही स्वतःची कर्मकहाणी सांगत मदतीसाठी तयार केल्याचं पोलीस तपासात समोर आलं.

फोटो स्रोत, Getty Images
मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी निधीने त्या विद्यार्थ्यांना तयार केलं होतं. त्यानंतर विद्यार्थ्यांनी मृतदेह गाडीवरून नेऊन जंगलात टाकला. मात्र, पोलिसांच्या भीतीने दुसऱ्या दिवशी या तिघांनी मृतदेह पेट्रोल टाकून जाळला.
त्यानंतर तिने शंतनू बेपत्ता असल्याचा बनाव रचला. शंतनू बेपत्ता असल्याचं दाखवण्यासाठी ती स्वतःच शंतनुला कॉल करून त्याची विचारपूस करायची. मोबाईल चालू ठेऊन तो जिवंत असल्याचं ती भासवायची. शंतनुच्या मोबाईवरून ती स्वतःला कॉल करून रिप्लाय पण करायची.
पोलिसांना संशय येऊ नये म्हणून पतीच्या मोबाईलमधून ‘मी थोड्या वेळात येतो. इथेच आहे,’ असे मेसेज करून ठेवले होते. पुरावे नष्ट करण्यासाठी तिनं सगळे प्रयत्न केले होते.
मात्र, पोलिसांनी नेमके धागेदोरे शोधून काढले. बेवारस मृतदेह सापडल्याप्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र मृतदेहाची ओळख पटत नव्हती.
पोलिसांत कोणतीही बेपत्ता झाल्याची तक्रारही दाखल नव्हती. त्यामुळे खुनाचा तपास करण्यात पोलिसांपुढे मोठे आव्हान होते.

फोटो स्रोत, Getty Images
पोलिसांनी तपास सुरू केला. तपास करतांना पोलिसांना महत्वाचे धागेदोरे सापडले. त्यात शंतनूसोबत बारमध्ये असणाऱ्या मित्राची कुजबुज पोलिसांच्या चौकशीची दिशा बदलणारी होती.
पोलिसांनी संशयित म्हणून एका मित्राची चौकशी केली. त्यावेळी 13 मे रोजी काढलेला शंतनूचा फोटो एका मित्रांच्या मोबाईलमध्ये पोलिसांना सापडला.
गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष मनवर यांनी दिलेल्या माहितीनुसार “मृतदेहाची ओळख पटल्यानंतर आम्ही चौकशीची चक्रे फिरवली. मित्रांच्या मोबाईलमध्ये असलेला फोटोच्या शर्टचा कलर आणि घटनास्थळी जळलेल्या अवस्थेत मृतदेहावरच्या शर्टचा कलर सारखा होता. आम्ही सविस्तर माहिती काढून शंतनुच्या पत्नीची चौकशी केली. तेव्हा आम्हाला तिच्याकडून उडवाउडवीची उत्तर मिळाली. चौकशीअंती आम्ही आरोपी पत्नी निधी देशमुख हिला ताब्यात घेतले. तिने गुन्ह्याची कबुली दिली असून दारुड्या पतीपासून सुटका करण्यासाठी हा खून केल्याची कबुली दिली आहे.”
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
SOURCE : BBC