Source :- BBC INDIA NEWS

व्हिटॅमिन्स

फोटो स्रोत, Getty Images

1 तासापूर्वी

व्हिटॅमिन्सचा (जीवनसत्व) उद्योग दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे आणि बरेच लोक याला आपल्या आरोग्याचा एक महत्त्वाचा भाग मानू लागले आहेत.

लंडन येथील मार्केट रिसर्च फर्म मिंटेलच्या मते, ब्रिटनमधील दोन तृतीयांश ग्राहक व्हिटॅमिन्स, खनिजे किंवा कोणत्या ना कोणत्या प्रकारचे सप्लिमेंट (पूरक आहार) घेतात.

बरेच लोक हे केवळ एखाद्या व्हिटॅमिनच्या कमतरतेची भरपाई करण्यासाठी करत नाहीत, तर व्हिटॅमिनच्या गोळ्या घेतल्याने आपलं आरोग्य आणखी सुधारेल, असं त्यांना वाटतं.

बाजारात अनेक प्रकारचे सप्लिमेंट्स उपलब्ध आहेत आणि त्यापैकी बरेचसे सप्लिमेंट्स वेगवेगळ्या व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सच्या मिश्रणातून बनवलेले मल्टिव्हिटॅमिन्स असतात. मात्र, त्यापैकी कोणते आपल्यासाठी उपयुक्त ठरतील हे ओळखणं कठीण असतं.

खरं तर, निरोगी राहण्यासाठी मूलभूत स्वरूपात 13 व्हिटॅमिन्सची आवश्यकता असते. पण प्रश्न असा आहे की, ही व्हिटॅमिन्स सप्लिमेंटच्या स्वरूपात घ्यावीत का?

व्हिटॅमिनच्या गोळ्या दररोज घ्याव्यात का?

व्हिटॅमिनचे दोन प्रकार असतात, चरबीत विरघळणारे आणि पाण्यात विरघळणारे.

चरबीमध्ये (फॅट) विरघळणारी जीवनसत्त्वे (व्हिटॅमिन ए, डी, ई आणि के) तुमच्या शरीरात साठवून ठेवले जातात, त्यामुळं तुम्ही रोज यांची गोळी न घेतासुद्धा त्यांची पातळी राखू शकता.

ही जीवनसत्त्वे जास्त प्रमाणात घेतल्यास ओव्हरडोजचा धोका असतो, म्हणून ती जास्त प्रमाणात घेणं टाळावं.

पाण्यात विरघळणारी जीवनसत्त्वे (के आणि बी जीवनसत्त्वं, जसं की फॉलिक ॲसिड) शरीरात साठवता येत नाहीत. त्यामुळं ते संतुलित प्रमाणात घेणं आवश्यक आहे.

पण गरजेपेक्षा हे व्हिटॅमिन्स जर जास्त प्रमाणात घेतले तर जास्तीची मात्रा लघवीद्वारे बाहेर पडते. तरीही, लिव्हर (यकृत) व्हिटॅमिन बी साठवू शकते.

मल्टिव्हिटॅमिन

फोटो स्रोत, Getty Images

काही मल्टिव्हिटॅमिन गोळ्यांमध्ये विशेषतः कॅल्शियम, झिंक आणि आयर्न अशा खनिजांचा समावेश असतो.

जोपर्यंत तुम्हाला यांचा अधिक प्रमाणात वापर करणं आवश्यक आहे, अशी परिस्थिती उद्भवत नाही. तोपर्यंत हे तीनही खनिजे तुम्हाला तुमच्या आहारातूनच पुरेशा प्रमाणात मिळू शकतात.

मजबूत हाडांसाठी कॅल्शियम महत्वाचे आहे. आपल्याला दररोज 700 मिलीग्रॅम कॅल्शियमची आवश्यकता असते.

झिंक आपल्या रोगप्रतिकारक आणि पाचन प्रणालीसाठी आवश्यक आहे. महिलांना दररोज 7 मिलीग्राम आणि पुरुषांना दररोज 9.5 मिलीग्राम झिंकची आवश्यकता असते.

अन्नातून ऊर्जा मुक्त करण्यासाठी आणि रक्तात ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी आयर्न (लोह) आवश्यक असते. 19 ते 50 वर्षे वयाच्या महिलांसाठी दररोज 14.8 मिलीग्राम आणि पुरुषांसाठी 8.7 मिलीग्राम लोहाची आवश्यकता असते.

सप्लिमेंट्स (पूरक आहार) घेतल्याने कोणाला फायदा?

ब्रिटनची सरकारी आरोग्य संस्था एनएचएसचा दावा आहे की, ब्रिटनमध्ये राहणाऱ्यांनी शरद ऋतू आणि हिवाळ्यात व्हिटॅमिन डीचे सप्लिमेंट घेणे आवश्यक आहे.

व्हिटॅमिन डी कॅल्शियमचे शोषण करण्यास मदत करते, जे मजबूत आणि निरोगी दात, हाडे आणि स्नायूंसाठी अत्यंत आवश्यक आहे.

हे फॉस्फेट आणि मॅग्नेशियम शोषण्यासही आपली मदत करते.

ज्यांना भूक कमी लागते किंवा जे वयस्कर आहेत, त्यांना काही विशेष मल्टिव्हिटॅमिन्स घेण्याचा फायदा होऊ शकतो. यासाठी त्यांनी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

वृद्ध लोकांनी किंवा घरात राहणाऱ्या लोकांनी वर्षभर व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमचे सप्लिमेंट घ्यावे.

जर तुम्ही डाएटवर असाल आणि काही विशेष आहारावर तुम्ही स्वतःच निर्बंध घातले असतील. तेव्हा तुम्हाला सप्लिमेंट्सचा फायदा होऊ शकतो आणि हे त्या विशेष आहारातून मिळणाऱ्या पोषणतत्त्वांची भरपाई करतात.

जर तुम्ही खूप कमी कॅलरी असलेल्या डाएटवर असाल, तर मल्टिव्हिटॅमिन घेणे फायदेशीर ठरू शकते. इथे काही डाएट प्रकार दिले आहेत ज्यामध्ये सप्लिमेंट्सची आवश्यकता भासू शकते.

व्हिटॅमिन

फोटो स्रोत, Getty Images

जर तुम्हाला दुग्ध उत्पादनं नको असतील तर तुमच्यासाठी कॅल्शियम सप्लिमेंट्स किंवा कॅल्शियमयुक्त गोळ्या फायदेशीर ठरू शकतात.

व्हेगन, म्हणजेच दुग्ध उत्पादनांचेही सेवन न करणाऱ्या पूर्ण शाकाहारी व्यक्तींमध्ये व्हिटॅमिन बी 12 आणि कॅल्शियमची कमतरता होण्याचा धोका असतो, म्हणून या पोषक घटकांचे सप्लिमेंट घेण्याचा सल्ला दिला जातो.

ज्यांना मासिक पाळीच्या काळात जास्त अशक्तपणा जाणवतो, अशा मुली आणि महिलांना लोहाची कमतरता भासू शकते

ब्रिटनच्या नॅशनल डाएट आणि न्यूट्रिशन सर्व्हेनुसार, 35 ते 49 वर्षे वयाच्या 4.8% महिलांना लोहाच्या कमतरतेमुळे अॅनिमियाचा सामना करावा लागतो. तर 12.5% महिलांमध्ये लोह कमी आढळले आहे. परंतु लोहाच्या गोळ्या घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

गर्भधारण करण्याच्या 12 आठवड्यांपूर्वी फॉलिक अॅसिडच्या सप्लिमेंट्स घेण्याची सूचना दिली जाते. यामुळं त्यांच्या मुलांमध्ये न्यूरल ट्यूब विकाराचा धोका कमी होतो.

व्हिटॅमिन सी टॅब्लेट – ‘लाइफ सेव्हर’ की वेळेचा अपव्यय?

सर्दी-खोकल्यापासून बचावासाठी लोक अनेक वर्षांपासून व्हिटॅमिन सी घेत आहेत. याला सुपरफूडचा दर्जा मिळाला आहे. कारण हे एक प्रकारचे अँटिऑक्सिडंट देखील आहे.

परंतु, यामुळं संसर्ग, आजार किंवा सर्दीची सुरुवातीची लक्षणं टाळता येऊ शकतात, याचे खूप कमी पुरावे आहेत.

विटामिन

फोटो स्रोत, Getty Images

कारण शरीर अतिरिक्त व्हिटॅमिन सी साठवून ठेवू शकत नाही. त्यामुळं जास्त प्रमाणात त्याचं सेवन केल्यास ते लघवीच्या मार्गाने बाहेर पडेल.

सामान्यतः व्हिटॅमिन सी फळे आणि भाज्यांमध्ये उपलब्ध असते.

एक संत्र्यात जवळपास 70 मिलीग्राम व्हिटॅमिन सी असतं. त्यामुळं त्याची कमतरता सहसा उद्भवत नाही.

किती व्हिटॅमिन्सची (जीवनसत्त्व) आवश्यकता असते?

जीवनसत्त्वे आणि खनिजांची प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी गरज असते. हे तुमचे वय, तुमच्या शारीरिक हालचाली, लिंग आणि इतर गोष्टींवर अवलंबून असते.

विटामिन

फोटो स्रोत, Getty Images

बहुतेक तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, आपल्याला आवश्यक असलेली सर्व व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स (खनिजे) निरोगी आणि संतुलित आहारातूनच मिळतात. याला व्हिटॅमिन डी हा एकमेव अपवाद आहे.

परंतु, नॅशनल डाइट अँड न्यूट्रिशन सर्व्हेचं म्हणणं आहे की, काही लोक मानक आहार घेऊ शकत नाहीत आणि याची भरपाई ते सप्लिमेंट्सने करतात.

त्याऐवजी, त्यांना आपल्या आहारामध्ये सुधारणा करावी लागेल आणि आपल्या आहारात पाच प्रकारांची फळे आणि भाज्या समाविष्ट केल्यास ते अधिक आरोग्यपूर्ण राहू शकतात.

हा लेख ऑक्टोबर 2018 मध्ये प्रकाशित झाला होता.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC