Home LATEST NEWS ताजी बातमी ‘शहजाद भट्टी नेटवर्क’ काय आहे? अमित शाह आणि एनआयएच्या आरोपांनंतर चर्चेत आलेलं...

‘शहजाद भट्टी नेटवर्क’ काय आहे? अमित शाह आणि एनआयएच्या आरोपांनंतर चर्चेत आलेलं नाव

4
0

Source :- BBC INDIA NEWS

शहजाद भट्टी

फोटो स्रोत, Facebook/OfficialShahzadBhatti

Published

वाचन वेळ: 6 मिनिटे

गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी एक्सवर एक निवेदन केलं. मोदी सरकारने स्वातंत्र्यदिनापूर्वी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या पाठिंब्याने चालवल्या जाणाऱ्या कथित अतिरेकी संघटना ”शहजाद भट्टी नेटवर्क”चा नायनाट केला आहे, असं त्यात ते म्हणाले आहेत.

या नेटवर्कच्या 200 हून अधिक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली असून, संघटनेच्या विध्वंसक हल्ल्यांच्या योजनाही हाणून पाडण्यात आल्या आहेत, असंही गृहमंत्री शाह यांनी सांगितलं.

त्याच दिवशी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमित शाह यांचा दावा फेटाळून लावला.

“अशा प्रकारचा प्रचार हा पाकिस्तानविरोधात भारत राबवत असलेल्या दुष्प्रचार मोहिमेचाच आणखी एक पुरावा आहे. भारत आपल्या अंतर्गत सुरक्षा समस्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी आणि राजकीय फायद्यासाठी पाकिस्तानवर दोष टाकत आहे”, अशा शब्दांत पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं आपली बाजू मांडली होती.

पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात पुढे म्हटलंय, “भारताची निराधार आणि दिशाभूल करणारी विधानं भारताकडून प्रायोजित दहशतवाद, लक्ष्यित हत्या आणि परदेशी भूभागांवरील विध्वंसक कारवायांकडून आंतरराष्ट्रीय समुदायाचं लक्ष हटवू शकत नाहीत.”

मात्र, देशातील अतिरेकी कारवायांच्या संदर्भात भारतीय अधिकाऱ्यांनी ‘शहजाद भट्टी नेटवर्क’ हे नाव वापरण्याची ही पहिलीच वेळ नाही.

मग शहजाद भट्टी कोण आहे? तो कथितपणे चालवत असलेल्या या नेटवर्कबाबत भारतीय अधिकाऱ्यांनी कोणते आरोप केले आहेत?

अमित शाह यांनी काय दावा केला?

भारतीय सुरक्षा दलांनी 14 राज्यांमध्ये समन्वित कारवाया करून पाकिस्तानच्या आयएसआयच्या पाठिंब्याने चालवल्या जाणाऱ्या कथित दहशतवादी संघटना ‘शहजाद भट्टी नेटवर्क’चा नायनाट केला आहे, असा दावा अमित शाह यांनी एक्सवर केला होता.

त्यांनी याला दहशतवादाविरोधातील भारताच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाचं उदाहरण म्हटलं.

अमित शाह यांनी याला दहशतवादाविरोधातील भारताच्या 'झिरो टॉलरन्स' धोरणाचं उदाहरण म्हटलं.

फोटो स्रोत, NurPhoto via Getty Images

गृहमंत्र्यांच्या मते, या नेटवर्ककडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रं आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. यामध्ये पाकिस्तान ऑर्डिनन्स फॅक्टरीची निशाणी असलेले हँड ग्रेनेड, पिस्तुलं, काडतुसे आणि हेरगिरीसाठी वापरले जाणारे सीसीटीव्ही कॅमेरे यांचा समावेश आहे.

भारताने आतापर्यंत या नेटवर्कबाबत काय म्हटलं आहे?

यावर्षी 9 जून रोजी, भारताच्या राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शहजाद भट्टी नेटवर्कविरोधातील कारवाईबाबत एक निवेदन प्रसिद्ध केलं.

कथित अतिरेकी शहजाद भट्टीशी संबंधित अतिरेकी-गँगस्टर नेटवर्कविरोधात तीन प्रकरणांच्या तपासाअंतर्गत पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यांतील नऊ जिल्ह्यांमधील 18 ठिकाणी समन्वित छापे टाकण्यात आले आणि अनेक लोकांची चौकशी करण्यात आली, असं या निवेदनात म्हटलं होतं.

या छाप्यांदरम्यान विविध संवाद नेटवर्क, आर्थिक व्यवहार आणि तपासाच्या कक्षेत असलेल्या व्यक्तींच्या हालचालींशी संबंधित चौकशी करण्यात आली. तसेच अनेक डिजिटल उपकरणं आणि कागदपत्रं जप्त करण्यात आली, अशी माहिती एनआयएनं दिली होती.

एजन्सीच्या मते, मार्च 2025 मध्ये पंजाबच्या जालंधर शहरात सोशल मीडिया इन्फ्लुएंसर रोजर संधू यांच्या घरावर झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात शहजाद भट्टीचा सहभाग असल्याचं समोर आलं. एप्रिल 2026 मध्ये या प्रकरणात त्याला फरार आरोपी घोषित करण्यात आलं होतं.

नोव्हेंबर 2025 मध्ये हरियाणातील सिरसा जिल्ह्यातील महिला पोलीस ठाण्यावर आणि जानेवारी 2026 मध्ये हरियाणातील अंबाला जिल्ह्यातील बलदेव नगर पोलीस ठाण्यावर झालेल्या स्फोटांचा सूत्रधारही शहजाद भट्टी होता, असा दावाही एनआयएनं केला होता.

31 जानेवारी 2025 रोजी फेसबुकवर पोस्ट केलेल्या छायाचित्रांमध्ये शहजाद भट्टी दुबई मॉलमध्येही दिसतो.

फोटो स्रोत, Facebook/OfficialShahzadBhatti

11 जुलै रोजी एनआयएने जारी केलेल्या आणखी एका निवेदनात सांगितलं की अंबाल्यातील बलदेव नगर पोलीस ठाण्याच्या पार्किंगमध्ये झालेल्या कार बॉम्बस्फोट प्रकरणात शहजाद भट्टीसह आठ जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.

एनआयएच्या मते, पंचकुला येथील विशेष न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रात करमजीत सिंह उर्फ टोनी, आकाश, सोरिब उर्फ सोबी उर्फ सौरभ, रमन कुमार, सत्यम, सुखदेव सिंह उर्फ सुखा आणि अमरजीत सिंह उर्फ अंबी यांची नावं होती.

एनआयएच्या दाव्यानुसार, शहजाद भट्टीने भारतात कार्यरत राहण्यासाठी स्थानिक नेटवर्क उभारलं होतं. पोलीस ठिकाणांवर हल्ले करण्यासाठी लागणारी रसद आणि स्फोटकांची व्यवस्था स्थानिक लोकांमार्फत केली जात होती.

एजन्सीच्या म्हणण्यानुसार, आकाश हा भारतातील शहजाद भट्टीचा मुख्य संपर्क होता आणि इतर आरोपींसह हल्ल्यांचं नियोजन व समन्वय साधण्याची जबाबदारी त्याच्यावर होती.

एनआयएने असंही म्हटलं की तपासात असं समोर आलं आहे की शहजाद भट्टीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि गुप्त संपर्क माध्यमांच्या साहाय्याने लोकांची भरती केली आणि त्यांना अतिरेकी विचारसरणीकडे वळवलं.

या आरोपांबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी बीबीसीने दिल्ली पोलीस आणि नवी दिल्लीतील एनआयएच्या प्रवक्त्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, बातमी लिहितानापर्यंत त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नव्हती. प्रतिक्रिया मिळाल्यास ती या वृत्तात समाविष्ट केली जाईल.

शहजाद भट्टीने आयएसआयशी संबंध असल्याचा आरोप फेटाळला

बीबीसी उर्दूने भारतीय अधिकाऱ्यांनी केलेल्या आरोपांबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी शहजाद भट्टीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही बातमी लिहून होईपर्यंत त्याने कोणतंही उत्तर दिलेलं नव्हतं.

तथापि, 19 जुलै रोजी टिकटॉक आणि फेसबुकवर प्रसिद्ध केलेल्या एका व्हीडिओमध्ये त्याने भारत सरकार आणि गृहमंत्री अमित शाह यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले.

याआधीही सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हीडिओंमध्ये त्याने दहशतवाद आणि आयएसआयशी संबंध असल्याच्या आरोपांचा इन्कार केला आहे.

त्याचे हे व्हीडिओ टिकटॉक आणि फेसबुकवरील ‘शहजाद भट्टी’ या नावाच्या खात्यांवर उपलब्ध आहेत.

एनआयएच्या 9 जूनच्या निवेदनानंतर सुमारे दोन आठवड्यांनी या खात्यावर आणखी एक व्हीडिओ पोस्ट करण्यात आला होता.

23 जून रोजी पोस्ट केलेल्या त्या व्हीडिओमध्ये स्वतःला शहजाद भट्टी म्हणवणाऱ्या व्यक्तीने म्हटलं की, भारतातून वारंवार अशा बातम्या येत आहेत की “कधी शहजाद भट्टीचे चार नोकर तर कधी पाच नोकर अटक झाले.”

त्याने म्हटलं, “या सगळ्या खोट्या बातम्या आहेत.”

“ते इतर कुणाचे तरी नोकर पकडतात आणि त्यांना माझ्याशी जोडतात. मग म्हणतात की शहजाद भट्टीचे इतके नोकर अटक झाले.”

शहजाद भट्टीने या व्हीडिओमध्ये हे मान्य केलं की भारतात काही लोक त्याच्यासाठी काम करतात. मात्र ते नेमकं कोणतं काम करतात, हे त्याने स्पष्ट केलं नाही.

फोटो स्रोत, .tiktok/shahzadbhatti_3

त्याने पुढे म्हटलं, “माझ्याविरोधात काही पुरावे असतील तर ते समोर आणा. काही चॅट दाखवा की हे खरोखर माझेच लोक आहेत.”

मात्र, या व्हीडिओमध्ये त्याने हे मान्य केलं की भारतात काही लोक त्याच्यासाठी काम करतात. मात्र ते नेमकं कोणतं काम करतात, हे त्याने स्पष्ट केलं नाही.

त्याचप्रमाणे, 16 मार्च रोजी फेसबुकवर पोस्ट केलेल्या एका व्हीडिओमध्येही शहजाद भट्टीने अंबालामधून आरडीएक्स जप्त झाल्याचा दावा नाकारला.

त्याने म्हटलं, “तुम्ही म्हणता की आरडीएक्स राजस्थानहून पंजाबमध्ये नेलं, तिथून अंबालामार्गे हनुमानगडला नेलं आणि पुन्हा परत आणलं. मग तुमच्या संस्था काय करत होत्या?”

त्याने दावा केला की या घटनेची जबाबदारी स्वीकारणाऱ्या संघटनेने भारतीय पोलिसांना इशारा दिला आहे की पंजाबमधील कथित बनावट पोलीस चकमकी थांबल्या नाहीत तर सरकारी संस्था त्यासाठी जबाबदार असतील.

भारतीय तपास संस्थांनी आयएसआयशी संबंध असल्याचा आरोप केल्याबाबत बोलताना तो म्हणाला, “ते मला आयएसआयशी जोडतात. जर मी आयएसआयचा कर्मचारी असतो, तर सहा वर्षं पाकिस्तानबाहेर राहिलो नसतो. मी परत पाकिस्तानमध्येच गेलो असतो.”

“मी कोणत्याही गुप्तचर संस्थेचा कर्मचारी नाही. माझ्या स्वतःच्या समस्या आहेत. तुमच्याच गँगस्टर्ससोबत आमचं वैर आहे.”

लॉरेन्स बिश्नोईशी संबंध असल्याचा दावा

आणखी एका व्हीडिओमध्ये शहजाद भट्टीने दावा केला की त्याचे भारतीय गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्याशी पूर्वीपासून संबंध होते.

त्याच्या मते, दोन कारणांमुळे त्याने लॉरेन्स बिश्नोईशी संबंध तोडले.

“एक म्हणजे सिद्धू मूसेवाला प्रकरण आणि दुसरं म्हणजे तो आपल्या माणसांचा वापर करून नंतर त्यांना सोडून देतो.”

“मी भारतात माझ्यासाठी काम करणाऱ्या लोकांना कधीही सोडलं नाही.”

जम्मू-काश्मीरमधील एका डीजीपीच्या इशाऱ्याचा उल्लेख करत तो म्हणाला की तो फक्त पाकिस्तानी संस्थांपुढेच उत्तरदायी आहे.

“मी पाकिस्तानात गेलो तर तिथेच उत्तर देईन.”

“मला तुमच्या देशात येण्याची किंवा तिथे नेटवर्क उभारण्याची कोणतीही इच्छा नाही.”

अनेक भारतीय सोशल मीडिया युजर्स आणि पत्रकार दावा करतात की शहजाद भट्टी संयुक्त अरब अमिरातीत (यूएई) राहतो. मात्र, बीबीसीने या दाव्याची स्वतंत्र पडताळणी केलेली नाही.

यावर्षी 4 जुलै रोजी त्याच्या टिकटॉक खात्यावर पोस्ट केलेल्या एका व्हीडिओमध्ये तो दुबईमधील एका रेस्टॉरंटमध्ये बसलेला दिसतो. 31 जानेवारी 2025 रोजी फेसबुकवर पोस्ट केलेल्या छायाचित्रांमध्ये तो दुबई मॉलमध्येही दिसतो.

शहजादच्या अनेक व्हीडिओ आणि छायाचित्रांमध्ये तो जमीयत उलेमा-ए-इस्लाम (एफ) चे नेते फारुख इम्तियाज खोखर यांच्यासोबतही दिसतो.

फोटो स्रोत, Facebook/OfficialShahzadBhatti

भारतीय पत्रकार प्रवीण स्वामी यांनी एक्सवर लिहिलं, “मला आश्चर्य वाटतं की मध्यपूर्वेतील भारताचा सर्वात जवळचा भागीदार असलेल्या यूएईने अद्याप या व्यक्तीला अटक का केलेली नाही. भारताविरोधातील दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. अमिराती सुरक्षा यंत्रणा अत्यंत प्रभावी आहेत आणि त्यांनी यापूर्वीही भारताच्या विनंत्यांवर अपेक्षेपेक्षा जास्त सहकार्य केलं आहे. त्यामुळे हे प्रकरण विशेष महत्त्वाचं आहे.”

9 सप्टेंबर 2025 रोजीच्या आणखी एका व्हीडिओमध्ये शहजाद दुबई क्रीकमधील एका क्रूझवर मित्रांसोबत दिसतो.

त्याच्या टिकटॉक खात्यावर पोस्ट केलेल्या अनेक व्हीडिओंमध्ये पार्श्वभूमीला भारतीय वृत्तवाहिन्यांवरील त्याच्याविषयीच्या बातम्यांचे ऑडिओ ऐकू येतात, ज्यामध्ये भारतातील हल्ल्यांसाठी त्याला जबाबदार ठरवलं जातं.

शहजादच्या अनेक व्हीडिओ आणि छायाचित्रांमध्ये तो जमीयत उलेमा-ए-इस्लाम (एफ) चे नेते फारुख इम्तियाज खोखर यांच्यासोबतही दिसतो.

फारुख इम्तियाज खोखर हे रावळपिंडी आणि इस्लामाबादमध्ये प्रभावशाली मानल्या जाणाऱ्या खोखर कुटुंबातील आहेत. ते इम्तियाज उर्फ ताजी खोखर यांचे पुत्र असून, नॅशनल असेंब्लीचे माजी उपसभापती हाजी नवाज खोखर यांचे पुतणे आणि माजी सिनेटर मुस्तफा नवाज खोखर यांचे चुलत भाऊ आहेत.

ते व्यवसाय, कल्याणकारी उपक्रम आणि सोशल मीडिया क्षेत्रातही सक्रिय राहिले आहेत. मात्र, त्यांचं नाव हत्या आणि दहशतवादविरोधी कायद्याशी संबंधित अनेक प्रकरणांमध्येही समोर आलं आहे.

14 जुलै 2026 रोजी रावळपिंडीमधील एका न्यायालयाने त्यांना आणि इतर दोन आरोपींना माजिद सत्ती हत्याकांड प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

SOURCE : BBC