Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Chris Hyde-ICC/ICC via Getty Images
माणसाने स्वप्न बघावं असं म्हटलं जातं कारण स्वप्नं बघितलीच नाहीत तर ती पूर्ण कशी होणार? टोलेजंग षटकार आणि आक्रमक फलंदाजीमुळे ओळखल्या गेलेल्या शाहीद आफ्रिदीला मात्र असं वाटलं नसेल की त्याने बघितलेलं स्वप्न एवढ्या लवकर पूर्ण होईल.
शाहीद आफ्रिदीचं संपूर्ण आयुष्यच वादळी राहिलं आहे. त्याचा एकेकाळचा सहकारी शोएब अख्तर प्रमाणे शाहीदही नेहमी या ना त्या कारणामुळे चर्चेत असतो.
शाहीद निवृत्त होण्याआधी त्याची आक्रमक फलंदाजी आणि लेग-स्पिन गोलंदाजीसाठी ओळखला जायचा.
निवृत्तीनंतर मात्र आफ्रिदीने माध्यमांना दिलेल्या मुलाखती आणि त्याने वेळोवेळी केलेली विधानं यामुळे तो नेहमी बातम्यांमध्ये असतो.
शाहीद आफ्रिदीने ‘गेम चेंजर’ नावाची एक आत्मकथा लिहिली आहे. त्याची ही आत्मकथा त्याच्या व्यक्तिमत्वाला साजेशी अशीच आहे.
वेस्ट इंडिजमध्ये नाही तर नैरोबीमध्ये नशीब उजळलं
चार ऑक्टोबर 1996 चा तो दिवस….
केनियाच्या नैरोबीमध्ये एक वादळ आलं होतं. श्रीलंकेविरुद्ध फलंदाजीला उतरलेल्या शाहीद आफ्रिदी नावाच्या या वादळाने त्या सामन्यात अवघ्या 37 बॉल्समध्ये शतक झळकावलं होतं.
एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यावेळेसचं हे सर्वाधिक वेगवान शतक होतं. पण शाहीद आफ्रिदीचं पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघात पोहोचणं स्वप्नवतच होतं.
त्याच्या पदार्पणाच्या किस्सा भारीय. झालं असं की शाहीदला सुरुवातीला पाकिस्तानच्या संघात स्थान मिळालेलं नव्हतं. तो पाकिस्तानच्या अंडर-19 संघासोबत वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर होता.
त्यावेळी पाकिस्तानच्या संघात मुश्ताक अहमद लेग-स्पिन गोलंदाजी करायचा, तो जखमी झाला आणि वेस्ट इंडिज दौऱ्यावर असणाऱ्या आफ्रिदीची पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघात निवड झाली. त्याला तिथूनच नैरोबीला पाठवण्यात आलं.
त्यावेळी पाकिस्तानच्या अंडर-19 संघाचे प्रशिक्षक हारून रशीद होते. त्यांनी बीबीसीला सांगितलं, “मला आजही तो दिवस नीट आठवतोय. मी शाहीदला सांगितलं होतं की तुला वेस्ट इंडिजमधून परत जावं लागेल कारण तिथून तुला नैरोबीला जायचं आहे. तिथे तुला पाकिस्तानतर्फे पदार्पण करायचं आहे. शाहीदला सुरुवातीला यावर विश्वासच बसला नाही. त्याला हे शक्य आहे असं वाटलंच नव्हतं.”
अंडर-19 संघाच्या या दौऱ्यात झिशान परवेज या खेळाडूशी संबंधित एक वादही झाला होता. याच काळात शाहीदला नैरोबीला पाठवण्याचा निर्णय झाला.
त्यामुळे लोकांना शाहीद आफ्रिदीला वेस्ट इंडीजवरून परत का बोलावलं जातंय हेच कळत नव्हतं. काहींनी शाहीद आफ्रिदीचं नाव झिशानच्या वादाशी जोडून बघण्याचाही प्रयत्न त्यावेळी केला होता.
हारून म्हणाले, “शाहीद आफ्रिदीच्या मोठ्या भावाचा म्हणजेच तारिक आफ्रिदीचा मला फोन आला होता. शाहीदला परत का पाठवलं जातंय हे ते विचारत होते.
मी त्यांना म्हणालो तुम्हाला या निर्णयाचा आनंद झाला पाहिजे कारण शाहीद आता पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघात खेळण्यासाठी जातो आहे. हे ऐकून त्यांना खरं कारण समजलं.”
स्वप्नात जयसूर्या आणि मुरलीधरनला षटकार खेचले
केनियाच्या नैरोबीमध्ये झालेल्या त्या स्पर्धेत पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू शादाब कबीरही होते. एवढंच नाही ते शाहीदचे रूममेट देखील होते. त्या दौऱ्यातील एक मजेशीर आठवण ते सांगतात.
शादाब यांनी बीबीसीला सांगितलं, “आम्ही त्यादिवशी दिवसभर सराव करून थकलो होतो. त्यामुळे हॉटेलवर परत आलो आणि दोघेही झोपी गेलो. संध्याकाळी मी शाहीदला उठवून सांगितलं की संध्याकाळच्या नमाजची वेळ झालीय.”
“शाहीद झोपेतून उठून म्हणाला की मी एक स्वप्न बघितलं. मी श्रीलंकेच्या जयसूर्या आणि मुरलीधरनला षटकार ठोकत होतो. मी त्यावर हसत हसत म्हणालो, चल बाकीच्या धावा मैदानात काढ.”
फोटो स्रोत, Simon Cross/Getty Images
शादाब पुढे म्हणतात, “आमची चर्चा झाली आणि परत हॉटेलवर येऊन मी झोपी गेलो. मला अजूनही आठवतंय मी गाढ झोपेत असताना अचानक शाहीद उठला आणि उद्याच्या सामन्याची तयारी करू लागला. त्याने मलाही उठवलं आणि म्हणाला चल आपल्याला जायचं आहे.”
“मी त्याला म्हणालो भावा परत झोप रात्रीचे अडीच वाजलेत,” असं कबीर सांगतात.
शादाब कबीर म्हणाले, “शाहीद त्या सामन्याआधी खूप उत्साहीत होता. ही सगळी अल्लाहची मर्जी असते. एखाद्याचं हृदयात काय आहे आणि तो काय बोलतोय हे सगळंच. अल्लाहने त्याला मोठं करायचं ठरवलं होतं आणि तसंच घडलं.”
आफ्रिदीमुळे वसीम-वकारला बदलावी लागली शैली
पाकिस्तानच्या संघात सहभागी झाल्यानंतर शाहीद आफ्रिदीने सरावात वसीम आक्रम आणि वकार युनूसच्या गोलंदाजीवर आक्रमक फलंदाजी केली.
खरंतर एका लेग-स्पिनरच्या जागी संघात आलेला एक गोलंदाज एवढी आक्रमक फलंदाजी करतोय हे बघून सगळ्यांचे डोळे चमकले.
सुरुवातीला वसीम आणि वकार आफ्रिदीला गोलंदाज समजून गोलंदाजी करत होते. पण त्याची आक्रमकता बघून त्यांनीही त्यांचा वेग वाढवला आणि शाहीदची चांगलीच परीक्षा घेतली. पण वाढत्या वेगासोबतच शाहीदच्या फलंदाजीचा वेगही वाढत गेला.
फोटो स्रोत, LAKRUWAN WANNIARACHCHI/AFP via Getty Images
त्याकाळात जगभर दरारा असणाऱ्या वसीम-वकारच्या गोलंदाजीवर त्याने अतिशय आक्रमक फटके लगावले.
त्याचवेळी वसीम आक्रमला पाकिस्तानात परत यावं लागलं. त्याच्या जागी कर्णधार म्हणून सईद अन्वरने पाकिस्तानच्या नेतृत्वाची धुरा स्वीकारली.
वसीमने जाताना अन्वरला सांगितलं की या तरुण आफ्रिदीमध्ये ‘दम’ आहे. त्यामुळे त्याला फक्त गोलंदाज म्हणून खेळवू नको तर त्याच्या आक्रमक फलंदाजीचा पण फायदा घे.
नंतर इतिहास घडला
केनियाच्या नैरोबीमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळायला उतरलेला श्रीलंकेचा संघ जगज्जेता होता. त्यांनी नुकताच एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक जिंकलेला होता.
चामिंडा वासचा वेग, जयसूर्याची आणि धर्मसेनाची ऑफ-स्पिन आणि मुरलीधरनच्या फिरकी चक्रव्युहापुढे तरुण शाहीदने अत्यंत आक्रमक फलंदाजी केली. जगज्जेत्या संघातील गोलंदाजांची त्याने अक्षरशः पिसं काढली.
त्या सामन्यात जयसूर्याने 10 ओव्हर्समध्ये 94 धावा दिल्या. तर मुरलीधरनने 10 ओव्हर्समध्ये 73 धावा खर्च केल्या. शाहीद आफ्रिदीने त्या सामन्यात 40 बॉल्समध्ये 102 धावा केल्या होत्या. त्याने तब्बल 11 षटकार आणि सहा चौकारांचा पाऊस पाडला होता.
फोटो स्रोत, Ajay Aggarwal/Hindustan Times via Getty Images
श्रीलंकेचे क्रिकेटपटू रोशन महानामा त्या सामन्यात खेळत होते. त्यांनी लिहिलेल्या ‘रिटायर्ड हर्ट’ पुस्तकात ते या खेळीबाबत म्हणतात, “आफ्रिदीचे काही षटकार थेट मैदानाच्या बाहेर असलेल्या पार्किंगमध्ये पोहोचले होते.”
महानामा यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं, “आम्ही त्यावेळी भारत आणि पाकिस्तानचा पराभव केला होता. आम्हाला खूप आत्मविश्वास होता. पण आम्ही शाहीद आफ्रिदी या माणसाबद्दल त्यापूर्वी ऐकलं किंवा त्याला पाहिलेलं नव्हतं. तो आमच्यासाठी खूप नवीन होता. त्यामुळे त्याच्या फलंदाजीने आम्हाला धक्का बसला होता.”
महानामा पुढे म्हणाले, “हे काहीतरी नवीन होतं. अर्थात आमच्याही संघात जयसूर्या अरविंद डिसिल्वा सारखे आक्रमक फलंदाज होते पण तो दिवस पूर्णपणे शाहीद आफ्रिदीचा होता.”
‘तू माझ्यासाठी काय शिल्लक ठेवलं?’
पाकिस्तानचे माजी कर्णधार रमीझ राजा यांनाही तो सामना नीट आठवतो.
त्या आठवणी सांगताना ते म्हणतात, “सुरुवातीला मीही पाकिस्तानच्या संघात नव्हतो. शाहीदप्रमाणेच मलाही इंग्लंडवरून बोलावण्यात आलं होतं. आम्ही नेटमध्ये सराव करत होतो तेव्हा अनेकांनी मला शाहीदच्या वेगवान लेग-स्पिनपासून वाचण्याचा सल्ला दिला होता. तो बॉल खतरनाक असतो असं मला सांगण्यात आलं होतं.”
राजा म्हणतात, ” अगदी तसंच झालं त्याने टाकलेला वेगवान बॉल माझ्या पंजावर येऊन आदळला.”
“त्याच्या फलंदाजीबाबत बोलायचं झालं तर शाहीद कशालाही घाबरत नव्हता. सर्वाधिक वेगवान शतक झळकावून तो बाद झाला आणि त्याच्यानंतर मला फलंदाजीला उतरायचं होतं. तो तंबूत जात होता आणि मी मैदानात. त्यावेळी त्याला म्हणालो की आता तू माझ्यासाठी काय शिल्लक ठेवलं आहेस?”
रमीज म्हणतात, “त्या काळाचा विचार केला तर ती अद्भुत खेळी होती. खरंतर श्रीलंकेच्या आक्रमक फलंदाजांनी अशा खेळाची मुहूर्तमेढ रोवली होती पण दुसऱ्या देशाचा खेळाडू त्या पद्धतीने खेळताना बघून तेही बुचकळ्यात पडले होते.”
आणखीन एक मजेशीर गोष्ट म्हणजे रमीझ राजा यांनीच शाहीदला त्याने वेगवान शतकाचा विश्वविक्रम केला असल्याची माहिती दिली होती.
अजूनही आफ्रिदी तिसऱ्या क्रमांकावर
शाहीद आफ्रिदीचं हे शतक आता सर्वात वेगवान शतकांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
सगळ्यात आधी न्यूझीलंडच्या कोरी अँडरसनने केवळ एका चेंडूच्या फरकाने त्याचा विक्रम मोडला होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सने 31 चेंडूंमध्ये शतक झळकावत नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला.
मात्र 30 वर्षांनंतरही आफ्रिदीच्या त्या खेळीची चर्चा आजही तितक्याच उत्साहाने केली जाते.
फोटो स्रोत, Hamish Blair/Getty Images
यष्टीरक्षक मोईन खानही त्या सामन्यात पाकिस्तान संघाचा भाग होते.
त्यांनी बीबीसी हिंदीशी बोलताना सांगितलं, “आफ्रिदी असा क्रिकेटपटू होता की, त्याने पहिल्या डावापासून ते कारकीर्द संपेपर्यंत असा प्रभाव टाकला की प्रतिस्पर्धी संघ कायम त्याच्यामुळे त्रस्त असायचा.”
“फलंदाजी असो किंवा गोलंदाजी, तो काहीही करू शकत होता. फक्त नैरोबीतील ती खेळीच नाही, तर त्याने आपल्या कारकिर्दीत अशा अनेक अविस्मरणीय खेळी केल्या.”
ती बॅट सचिनची नाही गांगुलीची होती
शाहीद आफ्रिदीने ज्या बॅटने 37 चेंडूंमध्ये शतक झळकावलं, त्या बॅटबद्दल अनेक वर्षं असं म्हटलं जात होतं की ती सचिन तेंडुलकरची होती.
असं सांगितलं जात होतं की सचिनने ती बॅट वकार युनूसला दिली होती.
शाहीद आफ्रिदीनेही आपल्या पुस्तकात लिहिलं आहे की ती बॅट सचिन तेंडुलकरची होती आणि ती वकार युनूसकडे होती. वकारने फलंदाजीसाठी ती बॅट आफ्रिदीला दिली होती.
मात्र आता वकार युनूसने या बॅटबद्दल वेगळाच दावा केला आहे. त्यांच्यामते ती बॅट सचिन तेंडुलकरची नव्हती, तर सौरव गांगुलीची होती.
वकार युनूसने बीबीसी हिंदीशी बोलताना सांगितलं, “माझी सौरव गांगुलीशी मैत्री होती. एकदा त्यांनी मला त्यांची एक बॅट दाखवली.”
“मी ती बॅट तपासून पाहत होतो, तेव्हा ते म्हणाले की तिचं बॅलेन्स खूप चांगलं आहे. तुम्हाला आवडत असेल तर ती तुम्ही ठेवा.”
“मी त्यांना सांगितलं की जर या बॅटने खेळणं तुम्हाला सोपं जात असेल, तर मी सियालकोटमधून याच प्रकारच्या काही बॅट बनवून तुम्हाला पाठवण्याचा प्रयत्न करेन.”
फोटो स्रोत, Sunil Saxena/Hindustan Times via Getty Images
वकार युनूस पुढे म्हणाले, “ती बॅट माझ्याकडे होती. नैरोबीमध्ये शाहीद आफ्रिदीने नेटमध्ये खूप आक्रमक फलंदाजी केली होती.”
“तो श्रीलंकेविरुद्ध फलंदाजीला जाणार होता, तेव्हा मी ती बॅट त्याला दिली आणि म्हणालो, याच बॅटने खेळ.”
“त्याने त्या बॅटने ऐतिहासिक खेळी केली. त्यानंतर मी ती बॅट त्याला भेट म्हणून दिली. एका युवा खेळाडूने विक्रमी खेळी केली होती, त्यामुळे त्या बॅटवर त्याचाच जास्त हक्क होता. ती बॅट आता नक्कीच आफ्रिदीकडेच असेल.”
‘बूम-बूम’ नाव कसं पडलं?
शाहीद आफ्रिदीसाठी ‘बूम-बूम’ हा शब्द सर्वप्रथम कोणी आणि कधी वापरला, असा प्रश्न अनेकदा विचारला जातो.
याचं उत्तर 15 एप्रिल 2005 रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात कानपूरमध्ये खेळल्या गेलेल्या वनडे सामन्यात लपलेलं आहे.
त्या सामन्यात शाहीद आफ्रिदीने 10 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने अवघ्या 45 चेंडूंमध्ये शतक झळकावलं होतं. त्यावेळी समालोचन करताना ‘बूम-बूम’ हा शब्द प्रथम ऐकू आला. शाहीद आफ्रिदीला सर्वप्रथम ‘बूम-बूम’ म्हणणारे रवी शास्त्री होते.
त्यानंतर ‘बूम-बूम’ हा आफ्रिदीच्या नावाचाच एक भाग बनला आणि आजही अनेकजण त्यांना याच नावाने ओळखतात.
‘तू मॅच फिक्स केली आहेस’
शाहीद आफ्रिदीने आपल्या पुस्तकात कॅनडातील टोरोंटो येथे सहारा कपदरम्यान भारताविरुद्ध केलेल्या एका शतकाचाही उल्लेख केला आहे.
त्या खेळीच्या वेळी आपल्या कर्णधाराने आपल्यावर मॅच फिक्सिंगचा आरोप केल्याचा दावा त्याने केला आहे.
आफ्रिदीने लिहिलंय, “मी सईद अन्वरसोबत डावाची सुरुवात केली होती. सईद अन्वर बाद झाल्यानंतर कर्णधार आमीर सोहेल फलंदाजीला आले.”
“त्या वेळी मी आक्रमक शैलीत फलंदाजी करत होतो. आमीर सोहेल खेळपट्टीच्या मधोमध आले. मला वाटलं ते मला काहीतरी सांगणार आहेत, म्हणून मी त्यांच्या जवळ गेलो.”
“पण मला मोठाच धक्का बसला, जेव्हा त्यांनी शिवीगाळ करत माझ्यावर ओरडून म्हटलं, ‘मला माहीत आहे की तू वसीम अक्रमसोबत मिळून हा सामना फिक्स केला आहेस.'”
आफ्रिदीने पुढे लिहिलंय, “हे ऐकून मी हादरलो. ते काय बोलत आहेत, हेच मला समजत नव्हतं. त्या वेळी मी एक तरुण क्रिकेटपटू होतो. माझ्या डोळ्यांत अश्रू आले. पण मी स्वतःला सावरलं आणि शतक झळकावण्यात यशस्वी झालो.”
त्यानं पुढे लिहिलंय, “मी ड्रेसिंग रूममध्ये परतल्यानंतर आमीर सोहेल मला म्हणाले, माझी साथ दे आणि माझ्या बाजूने राहा. मी तुला योग्य लोकांशी भेटवून देईन. मला तुझी मदत करायची आहे, जेणेकरून तू पाकिस्तान क्रिकेट चालवू शकशील.”
आफ्रिदीच्या मते, त्याने ही संपूर्ण घटना वसीम अक्रम आणि इन्झमाम-उल-हक यांना सांगितली. त्यानंतर दोघांनी त्याला हा विषय स्वतःपुरताच ठेवण्याचा आणि शांतपणे हाताळण्याचा सल्ला दिला.
कर्णधाराविरोधातील बंडाचा सूत्रधार कोण होता?
2009 च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान पाकिस्तानच्या जवळपास संपूर्ण संघाने कर्णधार युनूस खान यांच्याविरोधात बंड केलं होतं.
खेळाडूंची युनूस खान यांच्या कठोर वागणुकीबद्दल नाराजी होती आणि त्यांच्या नेतृत्वाखाली खेळण्यास ते तयार नव्हते. यासाठी एका खोलीत खेळाडूंची बैठक झाली होती. या बैठकीत सहभागी खेळाडूंनी कुराणावर हात ठेवून शपथही घेतल्याचं सांगितलं जातं.
या खेळाडूंमध्ये संघाचा उपकर्णधार शाहीद आफ्रिदीही सहभागी होता. आफ्रिदीने आपल्या पुस्तकात या संपूर्ण घटनेसाठी आपल्या एका सहकारी क्रिकेटपटूला जबाबदार ठरवलं आहे. मात्र, त्या खेळाडूचं नाव त्याने उघड केलेलं नाही.
पुस्तकात स्वतःला निर्दोष असल्याचं सांगत आफ्रिदीने लिहिलं आहे की, ‘त्याने सहकाऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला होता. तो म्हणत होता की, या विषयावर थेट युनूस खान यांच्याशी किंवा संघ व्यवस्थापकासोबत चर्चा करावी. मात्र, सर्व खेळाडूंना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे तत्कालीन अध्यक्ष एजाज बट यांची भेट घ्यायची होती.’
विशेष म्हणजे, या बंडात सहभागी असलेले शाहीद आफ्रिदी, मोहम्मद युसुफ आणि सईद अजमल नंतर एका टीव्ही कार्यक्रमात एकत्र आले होते. त्या कार्यक्रमात तिघांनीही या बंडाची जबाबदारी स्वतःवर न घेता एकमेकांवर ढकलली होती. याच कार्यक्रमात युनूस खान पाहुणे म्हणून आले असता त्यांनी म्हटलं होतं की, आता प्रत्येक खेळाडू जबाबदारी दुसऱ्यावर ढकलत आहे.
“प्रत्येकजण म्हणतो की दुसऱ्या खेळाडूची माझ्याबद्दल तक्रार होती, माझी नव्हती.” युनूस खान यांनी प्रश्न उपस्थित केला होता की, जर कोणत्याही खेळाडूची त्यांच्याबद्दल तक्रार नव्हती, तर तो त्या बैठकीत सहभागीच का झाला?
युनूस खान यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं की, या संपूर्ण प्रकरणामागे कर्णधार बनण्याची इच्छा होती. त्यांनी या बंडाचा सूत्रधार म्हणून शाहीद आफ्रिदीकडे बोट दाखवलं होतं.
त्यांच्या म्हणण्यानुसार, आफ्रिदी कराचीहून विमानाने लाहोरला गेला आणि त्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे तत्कालीन अध्यक्ष एजाज बट यांची भेट घेतली होती.
राजकारणात येण्याच्या ऑफर कोणत्या नेत्यांनी दिल्या होत्या?
शाहीद आफ्रिदीने 2019 मध्ये प्रकाशित झालेल्या आत्मचरित्रात पाकिस्तानमधील काही प्रमुख नेत्यांनी दिलेल्या ऑफरचाही उल्लेख केला आहे.
आफ्रिदीच्या मते, या ऑफर त्याचा पाठिंबा मिळवण्यासाठी देण्यात आल्या होत्या.
आफ्रिदी लिहितो, “तो काळ असा होता की, क्रिकेट बोर्डाचे तत्कालीन अध्यक्ष एजाज बट यांच्याशी माझे गंभीर मतभेद झाले होते आणि मला पुन्हा संघाबाहेर केलं जाण्याची वेळ आली होती.”
“आता अंदाज लावा, सर्वात आधी मला मदतीची ऑफर कोणी दिली होती? बिलावल भुट्टो झरदारी यांनी.”
आफ्रिदी पुढे लिहितो, “ही ऑफर खूपच रंजक होती. पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या लोकांनी सांगितलं की, एजाज बट यांच्यासोबतचा माझा वाद मिटवण्यासाठी ते मदत करतील.”
“त्याच्या बदल्यात मला या तरुण नेत्यासोबत म्हणजे बिलावलसोबत राजकीय सभांमध्ये सहभागी व्हावं लागेल.”
आफ्रिदी लिहितो, “साहजिकच मी बिलावलची मदत आणि त्यांची ऑफर स्वीकारली नाही.”
फोटो स्रोत, AAMIR QURESHI/AFP via Getty Images
आफ्रिदी पुढे लिहितो, “दुर्दैवाने पाकिस्तान पीपल्स पार्टी बेनझीर भुट्टो यांच्यासोबतच संपली.”
“मी लंडनमध्ये बिलावलला भेटलो, तेव्हा तो राजकारणात स्वतःचं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. तो मला म्हणत होता की, माझ्यासोबत काम कर आणि माझ्या निवडणूक प्रचारातही सहभागी हो.”
आफ्रिदीच्या मते, “मी त्याला फक्त बेनझीर भुट्टो यांच्या मुलाला भेटायचं होतं म्हणून भेटलो होतो. मला वाटलं होतं की, तो आपल्या दिवंगत आईच्या पावलावर पाऊल ठेवेल.”
“पण लवकरच मला समजलं की, पीपल्स पार्टीमध्ये खरे निर्णय कोण घेतं. बिलावल भुट्टो झरदारी फक्त समोर दिसतो. त्याचे हात जणू बाहुलीसारखे बांधलेले आहेत.”
आफ्रिदीने आपल्या पुस्तकात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचाही उल्लेख केला आहे.
तो लिहितो, “मियाँ साहेबांनी मला त्यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज पक्षात एक पद देण्याची ऑफर दिली होती.”
“त्यांनी त्यांच्या खास शैलीत ही गोष्ट थेट न सांगता इशाऱ्यात सांगितली. ते म्हणाले की, माझ्या बॅटवर सिंहाचं स्टिकर लाव. सिंह हे त्यांच्या पक्षाचं निवडणूक चिन्ह आहे.”
आफ्रिदीच्या म्हणण्यानुसार, त्याने हसून ती गोष्ट टाळली.
तो पुढे लिहितो, “याचप्रमाणे इम्रान खान यांनीही पंतप्रधान होण्यापूर्वी मला त्यांच्या सोबत येण्याची ऑफर दिली होती. ही गोष्ट त्यांनी इस्लामाबादमध्ये धरना आंदोलन केलं होतं, त्या काळातील आहे.”
हेही लक्षात घेण्यासारखं आहे की, 2011 मध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि शाहीद आफ्रिदीमध्ये मोठा वाद झाला होता. त्या वेळी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या अधिकृत वेबसाइटवर एक निवेदन जारी केलं होतं.
या निवेदनात बोर्डाने आरोप केला होता की, आफ्रिदीने लंडनमध्ये बिलावल भुट्टो झरदारी यांची भेट घेतली आणि क्रिकेट बोर्डावर राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला.
बोर्डाचं म्हणणं होतं की, संघात पुनरागमन करण्यासाठी आफ्रिदी वेगवेगळ्या राजकीय नेत्यांकडून आणि गटांकडून बोर्डावर दबाव आणत होता.
बोर्डाने असाही दावा केला होता की, या प्रकरणात त्यांना विविध लोकांकडून गंभीर परिणाम भोगण्याच्या धमक्याही मिळत होत्या. याच काळात आफ्रिदीने त्या वेळच्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली खेळण्यास नकार दिला होता.
त्यानंतर त्याला वनडे संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आलं. त्याचं सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यात आलं आणि परदेशात खेळण्यासाठी आवश्यक असलेलं एनओसीही मागे घेण्यात आलं. यानंतर आफ्रिदीने न्यायालयात धाव घेतली. नंतर आफ्रिदी आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डामध्ये समझोता झाला.
त्यानंतर त्याला परदेशात खेळण्यासाठी पुन्हा एनओसी देण्यात आलं. मात्र, त्याचबरोबर त्याच्यावर 45 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला.
‘मियाँदाद म्हणाले, माझी स्तुती कर’
शाहीद आफ्रिदीने आपल्या पुस्तकात पाकिस्तानच्या 1999 च्या भारत दौऱ्याचाही उल्लेख केला आहे.
आफ्रिदीने लिहिलं आहे की, त्या दौऱ्यात संघाचे प्रशिक्षक जावेद मियाँदाद यांचं त्याच्याशी वागणं चांगलं नव्हतं.
आफ्रिदीच्या मते, दौऱ्यापूर्वीच मियाँदाद यांना त्याच्या जागी आसिफ मुजतबाचा संघात समावेश व्हावा, अशी इच्छा होती.
मियाँदाद यांना आफ्रिदीची फलंदाजीची शैली आणि तंत्र आवडत नव्हतं. मात्र कर्णधार वसीम अक्रम आणि मुख्य निवडकर्ता सलाहुद्दीन हे आफ्रिदीच्या बाजूने होते.
आफ्रिदी लिहितो की, त्या दौऱ्यादरम्यान मियाँदादचं त्याच्याशी वागणं चांगलं नव्हतं.
फोटो स्रोत, Tom Shaw/Getty Images
मात्र चेन्नई कसोटीत आफ्रिदीने शतक झळकावल्यानंतर मियाँदाद त्याला म्हणाले, “ऐक, प्रेझेंटेशन आणि मुलाखतीत माझे आभार मानायचे आहेत.”
“मी तुला किती तयार केलं आणि चांगला फलंदाज बनवलं, हे तुला सांगायचं आहे. समजलास?”
शाहीद आफ्रिदी आणि जावेद मियाँदाद यांच्यात नंतरही गंभीर मतभेद झाले.
2016 मध्ये जावेद मियाँदाद यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यानंतर आफ्रिदीने त्यांच्याविरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला होता.
मियाँदाद यांनी आफ्रिदीवर मॅच फिक्सिंगमध्ये सहभागी असल्याचा आरोप केला होता. नंतर दोघांमध्ये समझोता झाला.
वाद आणि शाब्दिक चकमकी
शाहीद आफ्रिदी आणि भारतीय क्रिकेटपटूंमध्ये अनेकदा शाब्दिक चकमकी झाल्या आहेत.
या भारतीय क्रिकेटपटूंमध्ये गौतम गंभीर, शिखर धवन आणि इरफान पठाण यांचा समावेश आहे.
इंग्लंडमध्ये झालेल्या एका लीजेंड्स स्पर्धेत भारतीय क्रिकेटपटूंनी शाहीद आफ्रिदीसोबत खेळण्यास नकार दिला होता. त्यानंतर तो सामना रद्द करण्यात आला.
शाहीद आफ्रिदीला अनेक वेळा दंड आणि बंदीचाही सामना करावा लागला.
यामध्ये खेळपट्टीची नासधूस करणे, चेंडूला दात लावणे आणि एका प्रेक्षकाच्या चेहऱ्याजवळ धमकीच्या स्वरूपात बॅट नेणे अशा घटनांचा समावेश आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
SOURCE : BBC



