Home LATEST NEWS ताजी बातमी शॉपिंगच्या बिलांना हात लावल्याने प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो का? याबाबतच्या संशोधनातून काय...

शॉपिंगच्या बिलांना हात लावल्याने प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो का? याबाबतच्या संशोधनातून काय समोर आलं?

4
0

Source :- BBC INDIA NEWS

महिला

फोटो स्रोत, Getty Images

आपल्यापैकी बहुतेक जण खरेदी केल्यानंतर मिळालेली पावती सहज खिशात टाकून देतो. पण काही लोकांसाठी हीच पावती आता आरोग्यासाठी एक मोठा धोका ठरते आहे.

कारण गेल्या काही महिन्यांत सोशल मीडियावर अशा दाव्यांचे अनेक व्हीडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत.

यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की, “बिलांना हात लावल्याने भविष्यात मूल जन्माला घालण्याच्या तुमच्या क्षमतेवर वाईट परिणाम होऊ शकतो. यामुळे तुमच्या शरीराला नुकसान पोहोचू शकतं.”

जवळजवळ 2,500 टिक टॉक पोस्ट्समध्ये एका ट्रेंडिंग ऑडिओ क्लिपचा वापर केला गेला आहे. यात एक व्यक्ती, “मी कधीच बिलांना स्पर्श करत नाही”, असं म्हणताना ऐकू येतं.

जगभरात दरमहा लाखो लोक ऐकत असलेल्या ‘डायरी ऑफ द सीईओ’ या पॉडकास्टमधील एका पाहुण्यानेही हीच भीती व्यक्त केली होती.

या पॉडकास्टनुसार, सोशल मीडियावरील पोस्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, बिलांना हात लावल्याने वंध्यत्व येऊ शकतं, हार्मोन्सचं संतुलन बिघडू शकतं आणि टेस्टोस्टेरॉनची पातळीही घटू शकते.

पण मग या कागदी पावत्यांकडे लोक इतक्या संशयाने का पाहत आहेत, हा खरा प्रश्न आहे.

याचे कारण म्हणजे ही बिलं साधारणपणे ‘थर्मल पेपर’वर प्रिंट केली जातात. या कागदावर एका रसायनाचा थर असतो, जो बहुतेक वेळा बिस्फेनॉल ए म्हणजेच बीपीए (BPA) असतो.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, बीपीए हे शरीरातील एंडोक्राइन सिस्टीमवर म्हणजेच हार्मोन्सच्या यंत्रणेवर परिणाम करणारे रसायन आहे. यामुळे हार्मोन्समध्ये बिघाड आणि प्रजनन क्षमतेवर वाईट परिणाम होऊ शकतो.

पण सध्या उपलब्ध असलेल्या शास्त्रीय पुराव्यांच्या आधारे खरेदी करणाऱ्या सामान्य लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही, असा निर्वाळा वैज्ञानिकांनी बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसशी बोलताना दिला आहे.

बीपीए नेमकं काय आहे?

1960 च्या दशकापासून बिलांच्या कागदावर बीपीए नावाचे केमिकल कम्पाउंड वापरले जात आहे. हेच केमिकल प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या आणि खाण्याच्या डब्यांमध्येही वापरले जाते.

सध्याचे आधुनिक बिल प्रिंटर शाईऐवजी उष्णतेवर चालतात. बीपीएचा थर प्रिंटरच्या अतिउष्णतेच्या संपर्कात येताच त्यावर रासायनिक प्रक्रिया होऊन कागद काळा पडतो. यामुळे अक्षरे आणि आकडे लगेच उमटतात.

मात्र प्रयोगशाळेत अंडकोषांच्या टिश्यूजवर केलेल्या चाचण्यांमध्ये असं दिसलं आहे की बीपीएमुळे टेस्टोस्टेरॉन तयार होण्याचे प्रमाण घटू शकतं.

काही इतर संशोधनांनुसार, गर्भात असताना या रसायनांच्या संपर्कात आलेल्या महिलेला मुलगा झाल्यास त्याच्या प्रजनन क्षमतेमध्ये दोष निर्माण होऊ शकतात.

बिल

फोटो स्रोत, Getty Images

लंडनच्या सेंट मेरीझ आणि हॅमरस्मिथ हॉस्पिटलमधील फर्टिलिटी एंडोक्रिनॉलॉजीचे कन्सल्टंट प्राध्यापक चैना जयसेना सांगतात की, फर्टिलिटी क्लिनिकमध्ये येणाऱ्या लोकांमध्ये बीपीएबद्दलची भीती सातत्याने वाढत आहे.

“जोडपी अनेकदा आपल्या आरोग्याच्या प्रत्येक गोष्टीबाबत फार चिंतेत असतात. त्यांना शरीर शुद्ध आणि टॉक्सिक-फ्री करायचं असतं आणि त्यासाठी ते प्लास्टिकचा वापर टाळण्याचा प्रयत्नही करू शकतात”, असं ते सांगतात,

शरीरातील हार्मोन्सची यंत्रणा बिघडवणारे बीपीएसारखे केमिकल्स फर्टिलिटीवर म्हणजेच प्रजनन क्षमतेवर परिणाम करू शकतात, असे संकेत देणारे पुरावे वाढत असल्याचं जयसेना मान्य करतात.

पण त्यांचं असंही म्हणणं आहे की, या अभ्यासांशी जोडलेले काही महत्त्वाचे प्रश्न अजूनही कायम आहेत.

जसं की, हे दुष्परिणाम शरीरावर दिसण्याआधी एखाद्या व्यक्तीचा बीपीएशी किती काळ संपर्क यावा लागतो?

“माझ्या मते तरी, यामुळे आरोग्याला संभाव्य धोका नक्कीच निर्माण होतो”, असं ते सांगतात.

बिलांमधील बीपीए विषयी संशोधन काय सांगतं?

एका संशोधनानुसार, बीपीए त्वचेतून शरीरामध्ये शोषलं जाऊ शकतं. हाताला सॅनिटायझर लावल्यानंतर पावतीला हात लावल्यास हे रसायन शरीरात अधिक वेगाने आणि जास्त प्रमाणात शोषलं जाऊ शकतं.

पण ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमधील आरएमआयटी युनिव्हर्सिटीत रसायनशास्त्राचे प्राध्यापक असणारे ऑलिव्हर जोन्स सांगतात की, तुम्ही या घटकाच्या संपर्कात किती वेळ राहता ही गोष्टही महत्त्वाची आहे.

ते यासाठी दारूचे उदाहरण देतात.

“जर तुम्ही 1 ग्लास वाइन प्यायली, तर कदाचित त्याचा शरीरावर फारसा काही फरक पडणार नाही. पण जर तुम्ही वर्षभर रोज रात्री वाइनची पूर्ण बाटली रिचवत राहिलात, तर त्याचा वाईट परिणाम नक्कीच दिसून येईल,” असं ते सांगतात.

त्यांच्या म्हणण्यानुसार, याच लॉजिकने विचार केला तर एका बिलामधून मिळणारे बीपीएचे नगण्य प्रमाण तुमच्या तब्येतीवर वाईट परिणाम करेल, याची शक्यता फारच कमी आहे.

ते पुढे स्पष्टपणे सांगतात, “खरं सांगायचं तर, तुम्ही एखादं बिल चक्क खाऊन जरी टाकलं, तरी त्यामुळे त्रास होईल एवढ्या प्रमाणात हे केमिकल तुमच्या शरीरात पोहोचणार नाही.”

रंगीबेरंगी प्लॅस्टिकचे मग, झाकणे, बाटलीची टोप्या आणि खेळणी आहेत. त्यांच्या मागे अस्पष्ट पारदर्शक प्लॅस्टिकच्या बाटल्या आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

पण मग जे कॅशियर्स नियमितपणे पावत्या हाताळतात त्यांचे काय?

एंडोक्रिनोलॉजिस्ट जयसेना सांगतात, “कॅशियर्स मोठ्या संख्येने फर्टिलिटी क्लिनिकमध्ये उपचारांसाठी गर्दी करत असल्याचं माझ्या तरी पाहण्यात आलेलं नाही.”

अर्थात कामाच्या स्वरूपामुळे किंवा पर्यावरणातील घटकांमुळे अशा केमिकल्सशी सतत संपर्क आल्यास प्रजनन क्षमतेवर नक्की किती परिणाम होतो, हे स्पष्ट होण्यासाठी अजून संशोधनाची गरज असल्याचं ते सांगतात.

जपान आणि दक्षिण कोरियामध्येही या पावत्या टप्प्याटप्प्याने बंद केल्या जात आहेत. या भागांमधील अनेक उत्पादकांनी बीपीएऐवजी बिस्फेनॉल एस म्हणजेच बीपीएसचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.

पण प्राध्यापक जोन्स यांच्या मते, हे केमिकल कम्पाउंडसुद्धा “जवळजवळ तसंच” आहे.

त्यांच्या मते, “तांत्रिकदृष्ट्या पाहिलं तर बीपीएस अधिक धोकादायक ठरू शकतं, कारण याबद्दल आपल्याकडे बीपीएइतके अभ्यास आणि पुरावे उपलब्ध नाहीत. तरीसुद्धा, एकूण विचार करता यापासून असलेला धोका खूपच कमी आहे, असंच मला अजूनही वाटतं.”

पावत्यांना स्पर्श करणं टाळायला हवं का?

तरीही तुमच्या मनात भीती असेल, तर ग्लव्ह्ज म्हणजे हातमोजे घालून किंवा ई-मेलवर बिल मागवून बीपीएचा संपर्क टाळण्यात काहीच गैर नाही.

“असं केल्याने तुम्हाला बरं वाटत असेल आणि तुमचा ताण कमी होत असेल, तर तसं करायला काहीच हरकत नाही,” असं ते म्हणतात.

जयसेना यांच्या मते, जर तुम्हाला बीपीएच्या संपर्काची इतकीच काळजी वाटत असेल, तर जीवनशैलीत असे काही बदल करता येतील ज्यांच्या बाजूने अधिक ठोस वैज्ञानिक पुरावे उपलब्ध आहेत.

शॉपिंग बिल

फोटो स्रोत, Getty Images

उदाहरणार्थ हॉटेलमधून पार्सल आणलेले प्लास्टिकचे डबे पुन्हा पुन्हा वापरणं आणि त्यात जेवण गरम करणं टाळणं, ही एक चांगली सुरुवात ठरू शकते.

कारण यांपैकी अनेक डबे मायक्रोवेव्हमध्ये गरम करण्यासाठी मुळातच सुरक्षित नसतात.

ते पुढे सांगतात, “तुम्हाला जर तुमची फर्टिलिटी चांगली ठेवायची असेल तर धूम्रपान सोडणं, दारू पिण्यावर मर्यादा ठेवणं, नियमित व्यायाम करणं आणि निरोगी बॉडी मास इंडेक्स (BMI) राखणं या गोष्टी बिलांची चिंता करण्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त महत्त्वाच्या आहेत.”

“काही गोष्टी अशा आहेत ज्या आपल्या हातांत असतात आणि ज्यांचा फर्टिलिटीवर थेट परिणाम होतो, हे सिद्ध झालेलं आहे.”

“आणि विशेष म्हणजे या यादीत पावत्यांचा कुठेही समावेश नाही.”

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन

SOURCE : BBC