Home LATEST NEWS ताजी बातमी सोनिया गांधींचं पुस्तक भारतात छापायला नकार देण्याबाबत ‘पेंग्विन’नं दिलं असं स्पष्टीकरण

सोनिया गांधींचं पुस्तक भारतात छापायला नकार देण्याबाबत ‘पेंग्विन’नं दिलं असं स्पष्टीकरण

3
0

Source :- BBC INDIA NEWS

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांचे दिवंगत वडील राजीव गांधी यांच्या जन्मदिनी या पुस्तकाचं मुखपृष्ठ सोशल मीडियावर शेअर केलं होतं.

फोटो स्रोत, Rahul Gandhi/X

Published

वाचन वेळ: 4 मिनिटे

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या बहुप्रतीक्षित ‘बिलॉन्गिंग: ए जर्नी ऑफ लव्ह’ या आत्मचरित्राच्या प्रकाशनाबाबत पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने स्पष्टीकरण दिलं आहे. भारतामध्ये आम्ही या पुस्तकाचे प्रकाशक नाही, असं कंपनीने स्पष्ट केलं आहे.

परंतु, याआधी इंग्रजी वृत्तपत्र ‘इंडियन एक्स्प्रेस’ने आपल्या एका वृत्तात पेंग्विन रँडम हाऊस इंडिया या पुस्तकाच्या प्रकाशनातून माघार घेतल्याचा दावा केला होता.

वर्तमानपत्रातील वृत्तानुसार, प्रकाशकाने सोनिया गांधींना पुस्तकातील काही भाग संपादित करण्यास किंवा काढून टाकण्यास सांगितलं होतं. परंतु, सोनिया गांधींनी त्याला नकार दिला होता.

दरम्यान, पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने आपल्या निवेदनात स्पष्ट केलं आहे की, भारतामध्ये ‘बिलॉन्गिंग’ या पुस्तकाचे ते प्रकाशक नाहीत.

पेंग्विनने नेमकं काय म्हटलं?

पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, “भारतामध्ये ‘बिलॉन्गिंग’ या पुस्तकाचे ते प्रकाशक नाहीत. लेखिकेने पुस्तकातील संपादकीय बदलांना नकार दिल्यामुळे पेंग्विन इंडियाने हे पुस्तक प्रकाशित न करण्याचा निर्णय घेतला, असं म्हणणं योग्य नाही.”

‘पेंग्विन’ने आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, पुस्तकातील माहिती तपासणे आणि पुस्तक तसेच लेखकाच्या हितासाठी आवश्यक सूचना देणे, ही प्रकाशक म्हणून आमची जबाबदारी आणि विशेषाधिकार, अशा दोन्ही गोष्टी आहेत.

'पेंग्विन इंडिया'चा लोगो

फोटो स्रोत, Penguin India

पेंग्विनने पुस्तकाबाबत दिलेल्या संपादकीय सूचना या प्रकाशन प्रक्रियेचा नियमित भाग असल्याचं सांगितलं आहे. तसेच, हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी कंपनी तयार आणि इच्छुक होती, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

पेंग्विनने म्हटलं आहे की, या पुस्तकाबाबत चर्चा सुरू असताना हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी पेंग्विन रँडम हाऊस इंडिया तयार आणि इच्छुक होती.

लेखिकेसोबत झालेल्या गोपनीय चर्चांबाबत कंपनी यापुढे कोणतीही माहिती किंवा प्रतिक्रिया देणार नाही, असंही पेंग्विनने स्पष्ट केलं आहे.

याच वर्षी होणार प्रकाशन

‘इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्तानुसार, सोनिया गांधी यांच्या या पुस्तकाचं प्रकाशन 10 नोव्हेंबरला होणार होतं. पेंग्विन रँडम हाऊसच्या अमेरिकेतील ‘अल्फ्रेड ए. नॉफ’ या विभागाने सर्वप्रथम याची घोषणा केली होती.

या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीत 1 लाख प्रती छापल्या जाणार असल्याचं नॉफनं सांगितलं होतं.

‘एक्सप्रेस’च्या वृत्तानुसार, पेंग्विनने प्रकाशनातून माघार घेतल्यानंतर अनेक प्रकाशकांनी या पुस्तकात रस दाखवला आहे. ‘हार्पर कॉलिन्स’ भारतात या पुस्तकाचं प्रकाशन आणि वितरण करण्यासाठी करार करण्याच्या अखेरच्या टप्प्यात आहे.

पेंग्विनने आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, कंपनीने पुस्तकाच्या प्रकाशनातून माघार घेतली, असं म्हणणं योग्य नाही.

फोटो स्रोत, Penguin India

नॉफने या पुस्तकाला जगातील प्रभावशाली महिला नेत्या सोनिया गांधी यांच्या आयुष्यावर आधारित रंजक आठवणींचं पुस्तक म्हटलं होतं.

“या आत्मचरित्रात प्रेम, कुटुंब आणि भारत या देशाची एक रंजक कहाणी आहे,” असंही नॉफने म्हटलं होतं.

नॉफच्या निवेदनात सोनिया गांधी यांच्या हवाल्याने म्हटलं होतं, “माझ्या कुटुंबाबद्दल खूप काही लिहिलं गेलं आहे. पण त्यांच्या प्रेरणा, त्यांनी केलेली कामं आणि त्यांच्या मानवी मर्यादांबद्दल फार कमी माहिती समोर आली आहे.

गेल्या सहा दशकांत मी अनेक सामाजिक आणि राजकीय बदलांची साक्षीदार राहिले आहे. माझ्या या गोष्टीतून वाचकांना या बदलांकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोनही मिळेल.”

पुस्तकावरून राजकीय प्रतिक्रिया

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तावरून काँग्रेस आणि काँग्रेसशी संबंधित संघटनां तीव्र प्रतिक्रिया देत आहेत.

“श्रीमती गांधींसारख्या ज्येष्ठ व्यक्तीने काय लिहावं आणि काय लिहू नये, हे प्रकाशक ठरवणार का? प्रकाशक स्वतःहून हे सांगत आहे, त्याच्यावर कोणाचा दबाव आहे?” असा प्रश्नही कमलनाथ यांनी उपस्थित केला आहे.

राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी लिहिलं, “सोनिया गांधी यांचं आगामी पुस्तक जगभरात मूळ स्वरूपात आहे, त्याच स्वरूपात प्रकाशित करण्यासाठी पेंग्विन वर्ल्डवाइड कंपनी तयार आहे. पण, भारतात हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी पेंग्विन रँडम हाऊस इंडियाला काही बदल हवे आहेत. जगभरात पुस्तक ज्या स्वरूपात प्रकाशित होणार आहे, त्याच स्वरूपात ते भारतात का प्रकाशित करता येत नाही? यामागे नेमकं कोणतं कारण किंवा कोणाचा दबाव आहे?”

सोनिया गांधी यांनी यापूर्वीही पुस्तकं लिहिली आहेत. पण, 'बिलॉन्गिंग' हे त्यांचं आतापर्यंतचं सर्वात वैयक्तिक वृत्तांत असलेलं पुस्तक मानलं जात आहे.

फोटो स्रोत, ANI

केरळ काँग्रेसने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटलं, “पेंग्विनचा मार्ग रोखणं ही केवळ कोणा एका ज्येष्ठ व्यक्तीची कल्पना आहे. ‘बिलॉन्गिंग’ हे पुस्तक तुमच्यापर्यंत पोहोचण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.”

महाराष्ट्रातील काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी ‘एक्स’वर लिहिलं, “विरोधी पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याचं आत्मचरित्र कोणतेही बदल किंवा संपादनाशिवाय प्रकाशित होऊ शकत नसेल, तर भारतातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं काय झालं?, असा प्रश्न आम्हाला पेंग्विन इंडियाला विचारायचा आहे.”

त्यांनी म्हटलं, “लोकशाहीमध्ये अस्वस्थ करणारं सत्य ऐकण्याची हिंमत असायला हवी, ते गप्प बसवण्यासाठी त्यातील मजकूर बदलण्याचा प्रयत्न केला जाऊ नये.”

दरम्यान, पत्रकार मुकेश कुमार यांनी या घडामोडींवर भाष्य करताना ‘एक्स’वर म्हटलं की, पेंग्विन इंडियाने सोनिया गांधींच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनातून मागे हटणं ही सामान्य घटना नाही. यावरून सध्याच्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कशाप्रकारची आणि किती बंधनं आहेत आणि प्रकाशन क्षेत्रावर किती दबाव आहे, हे दिसून येतं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC