Source :- BBC INDIA NEWS

सोलापूर कारखान्याला लागलेली आग

सोलापूरमधील अक्कलकोट एमआयडीसीमधील सेंट्रल टॉवेल कारखान्याला रविवारी (18 मे) पहाटे 3 वाजता अचानक आग लागली.

या आगीत कारखान्याचे मालक उस्मान मन्सूरी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील 4 जण तसेच कामगार मेहताब बागवान यांच्या कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

मृतांमध्ये 1 वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे.

गेल्या 25 वर्षांपासून उस्मान मन्सूरी यांचा अक्कलकोट एमआयडीसीमध्ये टॉवेल बनवण्याचा कारखाना आहे. या कारखान्यात जवळपास 150 पेक्षा जास्त कामगार काम करत होते.

कारखान्याच्याच परिसरात खाली कामगारांची राहण्याची सोय करण्यात आली होती, तर वरच्या भागात कारखान्याचे मालक स्वतः राहत होते.

रात्री अचानक आग भडकली. अग्निशमन दलाच्या गाड्या बोलवण्यात आल्या. यादरम्यान अग्निशमन दलाने काही कामगारांना सुखरूप बाहेर काढले.

पहाटे 5.30 च्या सुमारास आगीतून 4 कामगारांचे मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले. मेहताब बागवान (वय- 55), त्यांची पत्नी आशाबानो बागवान (वय- 50), मुलगी हीना बागवान (वय- 33) आणि मुलगा सलमान बागवान (वय-30 ) असे चौघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

सोलापूर कारखान्याला लागलेली आग

कारखान्याचे मालक उस्मान मन्सूरी यांचे कुटुंबीय अजून देखील आतमध्ये अडकलेले होते. मात्र आग इतकी भीषण होती की, अग्निशमन दलाचे जवान आत जाऊ शकत नव्हते. आत जाताना अग्निशमन दलाचे अधीक्षक राजेश साळुंखे यांचा हात गंभीर भाजला.

14 तास आग विझवण्याचे प्रयत्न, 65 आगीचे बंब

14 तास जवळपास 65 पेक्षा जास्त बंबाने अग्निशमन दल आग विझवण्यासाठी प्रयत्न करत होते. आगीतून मार्ग काढण्यासाठी जेसीबीने भिंत फोडून बेडरुममध्ये धाव घेतली.

मात्र, बेडरुममधून उस्मान अन्सारी यांच्यासह कुटुंबीयांचे मृतदेहच त्यांच्या हाती लागले. कारखान्याचे मालक उस्मान मन्सूरी (वय- 87), अनस मन्सूरी (वय- 24), शीफा मन्सूरी (वय-22), उस्मान मन्सूरी यांचा एक वर्षाचा नातू युसूफ यांनी आगीत प्राण गमावले.

कारखान्याला लागलेली आग

आपलं बाळं तरी या आगीतून वाचावं म्हणून आईने 1 वर्षाच्या युसुफला आपल्या कुशीत घेतलं होतं. पण, आईसह चिमुकल्यानेही आईच्या कुशीतच जीव सोडला. बचावासाठी बेडरुममध्ये गेलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनाही आईच्या कुशीतलं बाळ पाहून गहिवरुन आलं होतं.

मृतांना अर्थसहाय्य

आगीच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, खासदार सुप्रिया सुळे यांनी दुःख व्यक्त केले आहे.

पंतप्रधान मोदींनी मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगीत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली. त्याचसोबत मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपये अर्थसाह्य देण्याची घोषणा केलीय.

सोलापूर आग

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं काय?

पहाटे साधारण चार वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दलाला माहिती मिळाली. त्यानंतर एमआयडीसी अग्निशमन दलातील गाडी तात्काळ या ठिकाणी बोलावण्यात आली. मात्र आगीचे स्वरूप पाहून सोलापूर महानगरपालिकेतील सर्व गाड्या तसेच अक्कलकोट, पंढरपूर, चिंचवड, एमआयडीसी एनटीपीसी या ठिकाणावरून देखील पाण्याचे बंब मागवण्यात आले.

कारखान्यामध्ये साहित्य मोठ्या प्रमाणात असल्याने आत जाण्यासाठी कोणतीही जागा नव्हती. साईड मार्जिन नसल्याने आग विझवताना अडचणी आल्या तसेच आग विझवताना दोन फायरमॅन किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती मुख्य अग्निशमन दल अधिकारी राकेश साळुंखे यांनी दिली.

सोलापूर कारखान्याला लागलेली आग विझवण्याचे प्रयत्न

आगीचे नेमके कारण काय हे अद्यापही समजलेले नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय.

मात्र, सोलापूर शहर विभागाचे कार्यकारी अभियंता आशिष मेहता म्हणतात की, घटनेची माहिती मिळताच तातडीने वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. शॉर्टसर्किटमुळे ही घटना घडली नाही.

लवकरच इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर पाहणी करतील मगच खरे कारण समोर येईल, असं मेहता यांनी म्हटलं.

महापालिका आणि पोलिस यंत्रणा निष्फळ- माजी आमदार नरसय्या आडम

सेंट्रल टेक्स्टटाईल्स हा एमआयडीसी परिसरातील फार मोठा टॉवेल उत्पादक कारखाना आहे. या कारखान्यामध्ये जवळपास 200 कामगार काम करतात. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मी यासंदर्भात पाऊल उचलण्यासाठी सांगितलं असून या ठिकाणी आग लागून जवळपास 6 ते 7 तास झाले आहेत. महापलिका आणि पोलीस प्रशासन यंत्रणा निष्फळ झालेली आहे. या संबंधी मी मुख्यमंत्री यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार असून या सर्व प्रकारची चौकशी राज्य सरकारने करावी अशी मागणी करणार असल्याचं सोलापूरचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी म्हटलं.

कारखान्याचे मालक उस्मान अन्सारी

या संबंधी महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई आणि काखण्याचे झालेले आर्थिक नुकसान भरून देण्याची मागणी करणार असल्याचंही आडम यांनी म्हटलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC