Home LATEST NEWS ताजी बातमी हत्येआधी मुख्याध्यापिकेनं उच्चारला फक्त 1 शब्द; त्याच शब्दानं पोलिसांना संशयितांपर्यंत पोहोचवलं

हत्येआधी मुख्याध्यापिकेनं उच्चारला फक्त 1 शब्द; त्याच शब्दानं पोलिसांना संशयितांपर्यंत पोहोचवलं

4
0

Source :- BBC INDIA NEWS

रूपा रेड्डी

फोटो स्रोत, UGC

(इशारा : या वृत्तातील काही तपशील तुम्हाला विचलित करू शकतात)

‘बाबू’… पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या एका शब्दामुळेच एका भीषण हत्येचा तपास झाला आणि संशयितांपर्यंत पोहोचणे शक्य झाले.

तेलंगणा राज्यातील नलगोंडा जिल्ह्यातील कोंडमल्लेपल्ली येथील शाळेच्या मुख्याध्यापिका कल्लू रूपा रेड्डी यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी दोन विद्यार्थ्यांना अटक केल्याची घोषणा केली आहे.

“मौजमजा करण्याची सवय लागलेल्या या विद्यार्थ्यांनी पैशांसाठी मुख्याध्यापिकेची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. चोरी करण्यासाठी गेले असताना मुख्याध्यापिकेनं त्यांना ओळखल्याने मुलांनी त्यांना ठार मारलं,” असं एसपी शरथ चंद्र पवार यांनी सांगितलं.

नेमकं काय घडलं?

रूपा रेड्डी या नलगोंडा जिल्ह्यातील कोंडमल्लेपल्ली या मंडल मुख्यालयातील जेबी कॉलनीमध्ये आपल्या पती राजेंदर रेड्डी यांच्यासोबत राहत होत्या.

त्या आपल्या भागीदार राणी रेड्डी यांच्या सहकार्याने ‘नागार्जुन ग्रामर कॉन्सेप्ट स्कूल’ चालवत होत्या. रूपा रेड्डी या या शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या.

11 ऑगस्टच्या संध्याकाळी शाळेतून घरी परतल्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. पोलिसांना त्यांच्या शरीरावर चाकूनं अनेक वार केल्याचं आढळलं.

रूपा रेड्डी यांच्या घराबाहेरील गर्दी

फोटो स्रोत, UGC

या प्रकरणात 12 ऑगस्ट रोजी कोंडमल्लेपल्ली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 150/26 नोंदवण्यात आला.

हत्या घडली तेव्हा रूपा रेड्डी घरी एकट्याच होत्या. त्यांचे पती राजेंदर रेड्डी कामानिमित्त हैदराबादला गेले होते.

चहुबाजूने तपास

रूपा रेड्डी हत्या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर सुरुवातीला पोलिसांना पुरेसे ठोस पुरावे मिळत नव्हते.

घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेजमध्ये लाल रंगाचा शर्ट (हूडी) घातलेला एक तरुण संशयास्पद हालचाली करताना दिसल्यानंतर पोलिसांनी पाच विशेष तपास पथकं तयार केली.

“आम्ही सुमारे 80 संशयितांची चौकशी केली आणि 70 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली,” असं एसपी शरथ चंद्र पवार यांनी सांगितलं.

मालमत्तेचे वाद, कौटुंबिक वाद, आंतरराज्य टोळ्यांचा सहभाग; अशा विविध शक्यतांचाही तपास करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

तपासातील कळीचा तो शब्द

हत्या होण्यापूर्वी रूपा रेड्डी आपल्या धाकट्या बहिणीसोबत फोनवर बोलत होत्या, असं पोलिसांना समजलं

रूपा रेड्डी अचानक कोणाला तरी पाहिल्यासारख्या म्हणाल्या, “बाबू,” आणि त्यानंतर त्यांचा फोन बंद झाला, असं त्यांच्या बहिणीनं पोलिसांना सांगितलं.

रूपा रेड्डी

फोटो स्रोत, UGC

हा ‘बाबू’ हा शब्दच तपासासाठी पोलिसांकडे असलेला एकमेव धागा होता.

रूपा रेड्डींच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितलं की त्या शाळेतील विद्यार्थ्यांना नेहमी ‘बाबू’ असंच संबोधत असत.

यावरून पोलिसांनी या हत्येत विद्यार्थ्यांचा सहभाग असू शकतो का? या दिशेने तपास सुरू केला.

प्रकरणाचा उलगडा कसा झाला?

रूपा रेड्डी यांच्या निधनानंतर शोक म्हणून शाळेला चार दिवसांची सुट्टी देण्यात आली होती.

“शाळा पुन्हा सुरू झाल्यानंतर 13 विद्यार्थी अनुपस्थित होते. त्यापैकी दहावीतील पाच विद्यार्थ्यांबाबत आम्हाला संशय आला आणि आम्ही त्यांची चौकशी केली. तपासादरम्यान दोन विद्यार्थ्यांनी रूपा रेड्डी यांच्या मृत्यूनंतर भरपूर पैसे खर्च केले आणि पार्ट्या दिल्याचं लक्षात आलं. सुरुवातीला त्यांनी हे पैसे पालकांनी दिल्याचं सांगितलं. परंतु नंतर त्यांनी रूपा रेड्डी यांच्या हत्येची कबुली दिली,” असं एसपी शरथ चंद्र पवार यांनी स्पष्ट केलं.

शाळा

त्यांच्या म्हणण्यानुसार, पहिल्या संशयीत विद्यार्थ्याकडून 1.54 लाख रुपये रोख आणि एक आयफोन जप्त करण्यात आला. त्यानं हा आयफोन 60,000 रुपयांना विकत घेतल्याचं सांगितलं.

हे विद्यार्थी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी त्यांची नावं, मूळ गावं किंवा कुटुंबीयांची माहिती जाहीर केलेली नाही. त्यामुळे बीबीसीला त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधता आला नाही.

मातीच्या ढिगाऱ्यावरून घरात प्रवेश

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दोन विद्यार्थ्यांपैकी एक घरात शिरला, तर दुसरा बाहेर पहारा देत होता.

बीबीसीने कोंडमल्लेपल्लीतील जेबी कॉलनीमधील रूपा रेड्डी यांचं घर पाहिलं. घराच्या दोन्ही बाजूंना रिकामे प्लॉट आहेत. एका बाजूला रस्ता, तर दुसऱ्या बाजूला घर आहे.

घराच्या मागील बाजूस माती आणि दगडांचे ढिगारे आहेत. संशयीत विद्यार्थ्यानं त्यावरून आत प्रवेश केल्याचं पोलिसांना आढळलं. तो घराच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या स्वयंपाकघराच्या दरवाजातून आत शिरल्याचं सांगितलं जातं.

घरात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. मात्र विद्यार्थी ज्या बाजूने घरात शिरला त्या दिशेला असलेला कॅमेरा काही दिवसांपूर्वी दुसऱ्या बाजूला वळवण्यात आला होता, असं सध्या शाळेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळणारे जॉर्ज रेड्डी यांनी सांगितलं.

रूपा रेड्डींचं घर

बांधकामाच्या साहित्यावर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरा त्या दिशेला वळवण्यात आला होता. त्यामुळे स्वयंपाकघराच्या दरवाजाजवळील दृश्यं रेकॉर्ड झाली नव्हती.

तथापि, शेजारच्या घरांमधील सीसीटीव्हींमध्ये आरोपी विद्यार्थ्याचं फुटेज रेकॉर्ड झालं होतं.

बीबीसीने भेट दिली तेव्हा रूपा रेड्डी यांच्या घरात कोणीही नव्हतं. अंत्यसंस्कार व त्यानंतरच्या कार्यक्रमांमध्ये कुटुंब व्यग्र असल्याचं शाळेतील शिक्षकांनी सांगितलं.

“जप्त केलेल्या नोटांवर रक्ताचे डाग”

एसपींनी पत्रकार परिषदेत सांगितलं की विद्यार्थ्याकडून जप्त करण्यात आलेल्या तीन नोटांवर रक्ताचे डाग होते. प्रयोगशाळेतील तपासात ते मानवी रक्त असल्याचं स्पष्ट झालं.

हत्या होण्याच्या अंदाजे 15-20 दिवस आधी घडलेली एक घटना देखील या हत्येचं कारण असू शकते, असं पोलिसांचं मत आहे.

“आरोपी विद्यार्थ्यांपैकी एकजण शाळेच्या वसतिगृहात राहत होता. त्याच्या बॅगेत मोबाईल फोन आणि पैसे सापडल्यानंतर त्याला वसतिगृहातून काढून डे-स्कॉलर करण्यात आलं. तपासात तो मद्यपानाच्या आहारी गेल्याचं आणि मौजमजेसाठी पैसे मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याचं समोर आलं. डे-स्कॉलर केल्यामुळे निर्माण झालेल्या रागातून त्याने दुसऱ्या विद्यार्थ्यासोबत मुख्याध्यापिकेच्या घरात चोरी करण्याचा कट रचला,” असं एसपींनी सांगितलं.

“चार ते पाच दिवस रेकी”

हत्या होण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी चार ते पाच दिवस परिसराची रेकी केल्याचं पोलिसांना आढळलं.

“11 ऑगस्टपर्यंत शाळेची फी जमा होते, याची त्यांना माहिती होती. त्यामुळे त्यांनी चोरीचं नियोजन केलं. हत्येपूर्वी त्यांनी चाकू, हातमोजे आणि मास्क खरेदी केले. ते कोंडमल्लेपल्लीच्या उपनगरात भेटले. शाळा सुटल्यानंतर त्यांनी रूपा रेड्डी घरी येत असल्याचं पाहिलं आणि घराच्या मागील बाजूने प्रवेश केला. एक विद्यार्थी बाहेर थांबला, तर दुसरा आत गेला.

एसपी शरथ चंद्र पवार

फोटो स्रोत, UGC

“रूपा रेड्डी यांनी त्याला पाहिलं आणि तो घरातून पैसे घेत असताना त्यांनी ओरडण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्यावर हल्ला केला. त्याचवेळी त्यांचा फोन खाली पडला. त्या कुणाला तरी फोन करून माहिती देतील, या भीतीने विद्यार्थ्याने त्यांचा फोनही घेतला आणि घटनास्थळावरून पळ काढला,” असं एसपींनी स्पष्ट केलं.

ते दोघे चोरी करण्यासाठी गेले होते, पण ओळख पटेल या भीतीने विद्यार्थ्यानं हत्या केल्याचं तपासात समोर आलं असल्याचं त्यांनी सांगितलं.

तपासादरम्यान या दोघांनी झटपट पैसे कमावण्याचे मार्ग शोधण्यासाठी यूट्यूबवर शोध घेतल्याचंही समोर आलं. महिनाभरापूर्वी ते गोव्याला पर्यटनासाठी गेल्याचंही पोलिसांना आढळलं. रूपा रेड्डी यांचा मोबाइलही आरोपींकडून जप्त करण्यात आला आहे.

1999 पासून शाळेचं व्यवस्थापन

कोंडमल्लेपल्ली येथे नागार्जुन ग्रामर कॉन्सेप्ट स्कूलची स्थापना 1999 मध्ये रूपा रेड्डी आणि राणी रेड्डी यांनी केली होती.

याआधी दोघीही एका खासगी शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होत्या. त्यानंतर त्यांनी स्वतःची शाळा सुरू केली.

“शाळा सुरू करण्याची कल्पना मांडली तेव्हा रूपा रेड्डीही तयार झाल्या. त्यानंतर आजपर्यंत आम्ही कोणत्याही अडचणीशिवाय शाळा चालवत होतो,” असं राणी रेड्डी यांनी सांगितलं.

बीबीसीने राणी रेड्डी यांचे पती जॉर्ज रेड्डी यांच्याशीही संवाद साधला. ते पूर्वी सरकारी शाळेत शिक्षक होते आणि निवृत्त झाले आहेत.

याच घराबाहेर एक मुलगा पहारा देत होता. तर दुसरा घरात घुसला.

फोटो स्रोत, UGC

“आम्ही रूपा रेड्डींना लहानपणापासून ओळखत होतो. त्यामुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला तेव्हा आम्ही एकत्र ही शाळा सुरू केली. पूर्वी आम्ही वसतिगृहही चालवत होतो. मात्र कोरोना काळानंतर काही वर्षे ते बंद होतं. दोन वर्षांपूर्वी आम्ही ते पुन्हा सुरू केलं आणि त्याची जबाबदारी दोन शिक्षकांकडे सोपवली,” ते म्हणाले.

जॉर्ज रेड्डी यांनी सांगितलं की रूपा रेड्डी यांच्याशी त्यांचं शेवटचं संभाषण 6 किंवा 7 ऑगस्टला झालं होतं. त्यांच्या भावाच्या निधनामुळे ते स्वतःच्या कामात व्यग्र होते.

“अशी दुःखद घटना घडेल, याची आम्हाला कल्पनाही नव्हती. घटनेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी रूपा रेड्डी यांचे पती राजेंदर रेड्डी यांनी फोन केल्यानंतर आम्हाला धक्का बसला.”

“हे कृत्य विद्यार्थ्यांनी केलं असल्याचं समजल्यावर आम्हाला आणखी दुःख झालं. रूपा रेड्डी विद्यार्थ्यांशी नेहमीच खूप प्रेमाने वागत असत,” असं त्यांनी सांगितलं.

“मुलांच्या वर्तनावर सतत लक्ष ठेवायला हवं”

लहान वयात मुलांमध्ये वर्तनासंबंधी विकार (Conduct Disorder) निर्माण झाल्यास विचित्र आणि टोकाच्या प्रवृत्ती विकसित होऊ शकतात, असं हैदराबादमधील समुपदेशन मानसशास्त्रज्ञ अनिता आरे यांनी बीबीसीला सांगितलं.

ताब्यात घेतलेल्यापैकी एक मुलगा इथल्या होस्टेलमध्ये राहिला होता.

फोटो स्रोत, UGC

“लहानपणापासून सर्वकाही सहज मिळणं योग्य नाही. एखादी गोष्ट मिळाली नाही तर काही मुलं टोकाच्या वर्तनाकडे वळू शकतात. लहानपणापासूनच चांगलं-काय आणि वाईट-काय हे मुलांना शिकवलं पाहिजे. मेहनतीशिवाय काहीही मिळत नाही आणि कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही, हे त्यांना समजावून सांगितलं पाहिजे,” असं त्या म्हणाल्या.

अनिता आरे यांच्या मते, मुलांमध्ये शिस्त निर्माण करण्याची जबाबदारी केवळ पालकांची किंवा शिक्षकांची नसून सर्वांनी मिळून ती पार पाडली पाहिजे आणि त्यांच्या वर्तनावर सतत लक्ष ठेवायला हवं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC