Home LATEST NEWS ताजी बातमी ‘हिंदूंनी दुर्गापूजेच्या काळात मांसाहार करू नये’, धीरेंद्र शास्त्रींनी केलेल्या वक्तव्यानंतर वाद; भाजपने...

‘हिंदूंनी दुर्गापूजेच्या काळात मांसाहार करू नये’, धीरेंद्र शास्त्रींनी केलेल्या वक्तव्यानंतर वाद; भाजपने काय म्हटले?

5
0

Source :- BBC INDIA NEWS

धीरेंद्र कृष्ण गर्ग

फोटो स्रोत, @bageshwardham

Published

वाचन वेळ: 7 मिनिटे

बागेश्वर बाबा म्हणून प्रसिद्ध असलेले धीरेंद्र कृष्ण गर्ग, म्हणजेच धीरेंद्र शास्त्री, यांनी रविवारी (6 सप्टेंबर) हावडा जिल्ह्यातील लिलुआ येथे हनुमंत कथा सांगितली. यावेळी त्यांनी दुर्गापूजेच्या काळात हिंदूंनी शाकाहारी भोजन करावं, असं आवाहन केलं होतं.

धीरेंद्र शास्त्रींच्या या आवाहनावरून पश्चिम बंगालमध्ये आता वाद सुरू झाला आहे. राज्यातील भाजप सरकार बंगालच्या संस्कृतीचा अपमान करत आहे, असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.

धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यासाठी कोलकात्यातील भवानीपूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

धीरेंद्र शास्त्री यांच्या या आवाहनावरून पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

दरम्यान, या पश्चिम बंगाल भाजपने बागेश्वर बाबांच्या विधानापासून फारकत घेतली आहे. हे त्यांचे वैयक्तिक विचार आहेत असे भाजपने म्हटले आहे.

पोलिसांना देण्यात आलेल्या तक्रारीत काय म्हटले आहे?

दक्षिण कोलकाता जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष प्रदीप प्रसाद यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात भवानीपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

त्यांनी कोलकाता पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत, धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

या तक्रारीत प्रदीप प्रसाद म्हणाले, “दुर्गापूजेदरम्यान मांस खाल्ल्याबद्दल त्यांनी (धीरेंद्र शास्त्री) बंगालींना ‘ढोंगी’ म्हटले आहे. आम्ही बागेश्वर बाबांच्या चुकीच्या माहितीवर आधारित वक्तव्याचा निषेध करतो आणि त्यांनी पश्चिम बंगालच्या लोकांची माफी मागावी.”

“लिलुआ येथे महत्त्वाचे लोक, अधिकारी आणि निवडक प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत आणि समविचारी लोकांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी असभ्य वक्तव्ये केली. ही वक्तव्ये धोकादायक स्वरूपाची असून आपल्या राज्यातील बंगाली लोकांच्या भावनांना तीव्र धक्का पोहोचवणारी आहेत. हे सर्व प्रसारमाध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. कृपया याची तात्काळ दखल घ्यावी,” असं त्यांनी या तक्रारीत म्हटलं.

काँग्रेसने केलेली तक्रार

फोटो स्रोत, INC

तक्रारीत पुढे म्हटले, “त्यांनी आपल्या राज्यातील दुर्गापूजेच्या (एक पवित्र सण आणि पूजा) काळात काय खावे आणि काय खाऊ नये याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्ये केली आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी ‘घाणेरडे जेवण’ आणि ‘ढोंगी’ यांसारखे शब्द वापरून सल्लाही दिला आहे. त्याचे म्हणणे आहे की, दुर्गापूजेदरम्यान त्यांना अशा अनेक गोष्टी आक्षेपार्ह वाटतात आणि या गोष्टी बंगाली लोकांच्या आणि दुर्गापूजेच्या भावनांच्या विरोधात आहेत.”

“आम्ही आपणास कळवू इच्छितो की, तत्काळ कारवाई सुरू करून गुन्हा दाखल करावा आणि त्यांना अटक करावी. कारण आम्हा बंगाली लोकांचा अपमान झाला आहे आणि समाजात अशांतता व फूट निर्माण केली जात आहे. हे लोकशाही आणि शांततापूर्ण भावनेच्या विरोधात आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

भाजपने काय स्पष्टीकरण दिले?

पश्चिम बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष सामिक भट्टाचार्य यांनी धीरेंद्र शास्त्रींचं नाव न घेता त्यांचं हे आवाहन फेटाळून लावलं आहे.

याप्रकरणी सोमवारी (7 सप्टेंबर) भट्टाचार्य म्हणाले होते, “बंगाली लोक मांस आणि मासे कसं खाणार नाहीत? स्वामी विवेकानंदांनीही कालीमातेला मटणाचा नैवेद्य दाखवला जाईल, असं म्हटलं होतं. त्यामुळे विवेकानंदांपेक्षा मोठं होण्याचा प्रयत्न करणे धोकादायक आहे. धीरेंद्र शास्त्रींचे ते वैयक्तिक मत आहे.”

सामिक भट्टाचार्य यांनी 30 वर्षीय धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचं नाव घेतलं नाही. धीरेंद्र शास्त्री हे बागेश्वर धामचे मुख्य पुजारी आहेत.

धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे तीन दिवसीय हनुमंत कथेसाठी पश्चिम बंगालमधील हावडा जिल्ह्यातील लिलुआ येथे आले होते.

शनिवारी (5 सप्टेंबर) राज्याचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी त्यांच्या सन्मानार्थ स्नेहभोजनाचे आयोजन केले होते.

या स्नेहभोजनाप्रसंगी कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री उपस्थित होते. रविवारी मुख्यमंत्री कार्यालयाने ‘एक्स’वर या कार्यक्रमाचे फोटो पोस्ट केले आणि या धार्मिक नेत्याचा उल्लेख ‘बागेश्वर महाराज’ असा केला.

रविवारी लिलुआ येथील कार्यक्रमात बोलताना धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले, “कृपया गैरसमज करून घेऊ नका. पण पश्चिम बंगालमधील एक गोष्ट मला आवडत नाही. नवरात्र आणि दुर्गापूजेदरम्यान पूजा मंडपाजवळ मांसाहारी पदार्थ खाल्ले जातात. तिथे वेगवेगळे अस्वच्छ अन्नपदार्थ तयार केले जातात.”

ते म्हणाले, “येत्या नवरात्रीमध्ये प्रत्येक हिंदूने जागरूक व्हावं आणि अशा लोकांना तिथून दूर करावं. हे लोक पवित्र नाहीत. ते धर्माचा अपमान करत आहेत.”

पश्चिम बंगाल

फोटो स्रोत, @bageshwardham

बंगाली हिंदूंकडून तीव्र प्रतिक्रिया

हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर बंगाली हिंदूंकडून तीव्र प्रतिक्रिया समोर आल्या. ही घटना 26 ऑगस्ट रोजी विश्व हिंदू परिषदेने केलेल्या वक्तव्यानंतर काही दिवसांनी घडली. विहिंपने दुर्गापूजेच्या मंडपांपासून मांसाहारी पदार्थ दूर ठेवावेत, असं म्हटलं होतं.

पश्चिम बंगालमधील भाजप पुन्हा एकदा बंगाली लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयींवरून वादात सापडला आहे.

यापूर्वी, मे महिन्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपच्या नेत्यांना हातात मासे घेऊन प्रचार करावा लागला किंवा सार्वजनिक ठिकाणी मासे खावे लागले.

कारण, भाजप सत्तेत आल्यास बंगाली लोकांना शाकाहारी बनवलं जाईल, असा प्रचार त्यावेळी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसकडून केला जात होता.

परंतु, सामिक भट्टाचार्य यांनी सोमवारी स्पष्ट केलं की, त्यांच्या पक्षाकडून असा कोणताही आदेश कधीही दिला जाणार नाही.

भट्टाचार्य म्हणाले, “पश्चिम बंगालमध्ये लोकांनी काय खावं आणि काय परिधान करावं, याबाबत आम्हाला काहीही सांगायचं नाही. बंगाली लोकांना त्यांना जे खाण्याची आणि परिधान करण्याची सवय आहे, तेच ते करतील. कोणाला धोती घालायची असेल तर ते धोती परिधान करतील, कोणाला लुंगी आवडत असेल तर ते लुंगी परिधान करतील. बंगाली लोक मासे कसं खाणार नाहीत? हा मुद्दा सातत्याने चर्चेला आणला जात आहे. बाहेरून कोणी येऊन इथे काय म्हणतंय, याची चिंता आपण का करायची?”

बागेश्वर धाम

ते म्हणाले, “लोकांनी शाकाहारी व्हावं, असे आवाहन करण्यात काही चुकीचं नाही. शाकाहाराचा प्रचार करणारी मोहीमही सुरू आहे. अनेक लोक आणि काही डॉक्टरही शाकाहाराचा सल्ला देतात. पण एखादा साधू किंवा राजकीय पक्ष तुम्ही तुमच्या घरात काय खावं, हे कसं ठरवू शकतो? ते देशभरात लोकप्रिय आणि आदरणीय आहेत. त्यांनी केवळ शाकाहार करण्याचं आवाहन केलं आहे.”

हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर ‘एक्स’ आणि फेसबुकवर अनेक पोस्ट करण्यात आल्या. या पोस्टमधून बंगाली हिंदूंना काय खावं, याबाबत निर्देश देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल धीरेंद्र कृष्ण गर्ग यांच्यावर टीका करण्यात आली आहे.

पत्रकार आणि लेखक अभिजीत मजुमदार यांनी ‘एक्स’वर लिहिलं, “पश्चिम बंगालमध्ये हिंदुत्वाची स्वतःची ठाम अशी ओळख आहे. हे हिंदू राष्ट्रवादाचं जन्मस्थान आणि शक्ती उपासनेचंही महत्त्वाचं केंद्र आहे. त्यामुळे दुर्गापूजेच्या मंडपांजवळ मांसाहारी पदार्थ खाऊ नयेत, असं बागेश्वर धाम यांच्याकडून केलेलं आवाहन हे बंगालच्या परंपरांची माहिती नसल्यामुळे म्हणजे अज्ञानामुळे करण्यात आलं आहे. हे आवाहन अनावश्यक आहे आणि त्याचा कोणताही परिणाम होणार नाही.”

2017 ते फेब्रुवारी 2022 या काळामध्ये अर्थ मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार राहिलेले संजीव सन्याल यांनीही धीरेंद्र शास्त्री यांच्या आवाहनाला विरोध केला आहे.

सन्याल यांनी ‘एक्स’वर लिहिलं की, “शाक्त हिंदू धर्मात मांसाहाराला महत्त्वाचं स्थान आहे. प्राचीन परंपरेनुसार मांस दुर्गा आणि कालीमातेला अर्पण केलं जातं. दुर्गापूजेदरम्यान नवमी आणि दशमीला भाविक जे प्रसाद म्हणून खातात, त्यात मांसाचाही समावेश असतो. या पवित्र परंपरेत कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप सहन केला जाणार नाही.”

पश्चिम बंगाल

फोटो स्रोत, @bageshwardham

धीरेंद्र कृष्ण गर्ग यांच्या आवाहनाने पुन्हा ‘बिरंची बाबा’ची आठवण

धीरेंद्र यांच्या या आवाहनानंतर बंगाली लोकांना सत्यजित रे यांच्या ‘महापुरुष’ या चित्रपटाची आणि त्यातील अत्यंत आत्मविश्वासाने बोलणाऱ्या धर्मगुरू बिरंची बाबांची आठवण झाली.

एका सोशल मीडिया युजरने लिहिलं, “बिरंची बाबा पुन्हा आले.”

दुसऱ्या एका व्यक्तीने विचारलं, “सत्यजित रे यांच्या ‘कापुरुष ओ महापुरुष’ चित्रपटाची आठवण येत आहे. बिरंची बाबा आठवतो का?” तर काहींनी “आजच्या काळातील बिरंची बाबा!” आणि “बिरंची बाबा… खरंच अस्तित्वात आहे,” अशा प्रतिक्रिया दिल्या.

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्यासोबत एकाच मंचावर उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी राज्यात एक केंद्र सुरू करण्याचे निमंत्रणही दिले होते.

मुख्यमंत्री अधिकारी म्हणाले होते, “दुर्गापूजे दरम्यान सरकार पश्चिम बंगाल आणि भारताची संस्कृती जपण्याचं काम करेल. बाबा महाराजजी, तुम्ही कृपया इथे एक केंद्र सुरू करा. इथे बागेश्वर धामचं एक केंद्र असायला हवं. ही संतांची आणि आध्यात्मिक जागृतीची भूमी आहे.”

यानंतर एका पोस्टमध्ये या संपूर्ण घटनाक्रमाची माहिती देण्यात आली. त्यात म्हटलं होतं की, राजशेखर बसू यांनी 1920च्या दशकात बिरंची बाबा हे पात्र लिहिलं, सत्यजित रे यांनी 1965 मध्ये ‘महापुरुष’ हा चित्रपट बनवला आणि 2026 मध्ये बंगाल सरकारने बागेश्वर बाबांचं स्वागत केलं.

बागेश्वर

फोटो स्रोत, @bageshwardham

दुर्गापूजेसाठी पश्चिम बंगालमध्ये नवीन गाइडलाइन्स

सुवेंदू अधिकारी यांनी सोमवारी सायंकाळी दुर्गापूजा आयोजकांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी यंदाच्या दुर्गापूजेसाठीचे नियम जाहीर केले.

बंगालचा सर्वात मोठा सण 16 ते 21 ऑक्टोबरदरम्यान साजरा केला जाणार आहे. परंतु, रेड रोडवर दरवर्षी होणारा पारंपरिक कार्निव्हल यंदा होणार नाही. त्याऐवजी कोलकाता आणि बंगालमधील इतर 6 ठिकाणी रोड शो आयोजित केले जातील. सर्व मूर्तींचे विसर्जन 24 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे लागतील.

कमी बजेटमध्ये दुर्गापूजा आयोजित करणाऱ्या मंडळांना पर्यायी योजनेतून 1 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळू शकते. यासाठी मंडळांनी अर्ज स्थानिक पोलीस ठाण्यात तपासणीसाठी द्यावा लागेल. त्यानंतर हे अर्ज मुख्य सचिवांच्या कार्यालयाकडे पाठवले जातील.

अधिकारी म्हणाले, “मला मुख्यमंत्रीपदाच्या अधिकारांचा गैरवापर करायचा नाही. छोट्या पूजा मंडळांना आर्थिक मदत दिली जाईल, असं मी पूर्वीच म्हटलं होतं. मोठे बजेट असलेल्या मंडळांनी सरकारी मदत घेऊ नये, अशी माझी विनंती आहे. ज्या मंडळांना आर्थिक मदतीशिवाय पूजा आयोजित करता येत नाही, त्यांना सरकार मदत करेल.”

मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाच्या सूचना

  • दुर्गा पूजा आयोजकांना मोफत वीज मिळेल.
  • मंडपांमध्ये किंवा विसर्जन मिरवणुकीदरम्यान डीजेला परवानगी दिली जाणार नाही.
  • सर्व मूर्ती विसर्जन 24 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण झाले पाहिजे.
  • महाअष्टमीच्या दिवशी बार आणि मद्याची दुकाने बंद राहतील.
  • पूजेची संकल्पना (थीम) आणि मूर्तींमुळे कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत.
  • सणाच्या काळात काय खावं, यावर कोणतंही बंधन असणार नाही, असं अधिकारी यांनी स्पष्ट केलं.
पश्चिम बंगाल

पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजेच्या नवरात्रीतही अनेक हिंदू मांसाहार करतात. याउलट, उत्तर भारतातील अनेक हिंदू या काळात उपवास करतात. एका सर्वेक्षणानुसार, पश्चिम बंगालमधील 99 टक्के लोक मांसाहारी आहेत.

पश्चिम बंगालमध्ये भाजप पहिल्यांदाच सत्तेवर आला आहे. भाजपची ओळख प्रामुख्याने हिंदी भाषिक राज्यांमधील पक्ष अशी राहिली आहे. त्यामुळे बंगालमधील भाजपच्या राजकारणावर विरोधी पक्षांकडून वारंवार प्रश्न उपस्थित केले जातात.

भाजप नेते आणि सध्या पश्चिम बंगालचे अर्थमंत्री असलेले सपन दासगुप्ता यांनी 2021 मध्ये बीबीसी हिंदीला सांगितलं होतं की, बंगालमधील हिंदुत्वाची पद्धत उत्तर भारतापेक्षा वेगळी आहे. बंगालमधील हिंदू नवरात्रीतही मांसाहार करतात.

बंगालमध्ये ‘जय श्रीराम’ ही धार्मिक नव्हे, तर विरोधाची घोषणा बनली आहे. ममता बॅनर्जी यांना ही घोषणा आवडत नव्हती, त्यामुळे भाजपने त्याचा राजकीयदृष्ट्या वापर केला. उत्तर प्रदेशात ‘जय श्रीराम’ ही हिंदू अभिमानाशी जोडलेली घोषणा असू शकते, परंतु बंगालमध्ये त्याचा वापर प्रामुख्याने विरोध व्यक्त करण्यासाठी म्हणजेच निषेधासाठी केला जातो.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC