Home LATEST NEWS ताजी बातमी ‘आम्हाला फक्त शरीर म्हणून पाहू नका’ असं महिला खेळाडू का म्हणाल्या? सिडनी...

‘आम्हाला फक्त शरीर म्हणून पाहू नका’ असं महिला खेळाडू का म्हणाल्या? सिडनी स्विनीच्या जाहिरातीवरून वाद

5
0

Source :- BBC INDIA NEWS

या जाहिरातीत सिडनी स्विनी जवळपास नग्न दिसते. परंतु, तिने शरीराचा काही भाग वेगवेगळ्या क्रीडा साहित्याने झाकला आहे.

फोटो स्रोत, Novig

अभिनेत्री सिडनी स्विनीच्या स्पोर्ट्स बेटिंगच्या एका जाहिरातीवरून वाद सुरू झाला असून, महिला खेळाडूंनी या जाहिरातीविरुद्ध आवाज उठवला आहे.

ही जाहिरात ऑनलाइन व्हायरल झाली आहे. यात अमेरिकन अभिनेत्री सिडनी स्विनी विवस्त्र दिसते आणि शरीराचा काही भाग तिने वेगवेगळ्या क्रीडा साहित्याने झाकला आहे.

या जाहिरातीवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेक महिला खेळाडूंनी क्रीडा क्षेत्रातील महिलांच्या शरीराचं लैंगिक पद्धतीने सादरीकरण केल्याबद्दल टीका केली आहे.

त्यांचं म्हणणं आहे की, खेळांमध्ये महिलांच्या कामगिरीपेक्षा त्यांच्या शरीराकडे आणि दिसण्याकडे जास्त लक्ष दिलं जात आहे.

‘सिडनी स्विनी, खेळांमध्ये महिला अशा दिसतात’

एमी हंट या वर्षाच्या सुरुवातीला 4 वेळा युरोपियन चॅम्पियन बनली. रविवारी बुडापेस्टमध्ये झालेल्या अल्टिमेट चॅम्पियनशिपच्या 200 मीटर फायनलमध्ये तिने 22.10 सेकंदांची या हंगामातील सर्वोत्तम वेळ नोंदवली. ती चौथ्या स्थानावर राहिली.

शर्यतीनंतर बीबीसी स्पोर्टला दिलेल्या मुलाखतीत हंटने या जाहिरातीचा उल्लेख केला.

ती म्हणाली, “सिडनी स्विनी, खेळांमध्ये महिला अशाच दिसतात.”

मेलिसा जेफरसन-वुडनने 21.47 सेकंदांत ही शर्यत जिंकली होती. या अंतरासाठी आतापर्यंतची ही चौथी सर्वात वेगवान वेळ आहे.

ॲथलीट एमी हंटने या जाहिरातीवर टीका केली आहे.

फोटो स्रोत, Mattia Ozbot/World Athletics via Getty Images

हंटने मेलिसाचा उल्लेख करत म्हटलं, “21.4 सेकंद. मेहनतीने तयार झालेले स्नायू, घाम, अश्रू. ही एक सुंदर संध्याकाळ आहे.”

29 वर्षीय अमेरिकन अभिनेत्री सिडनी स्विनीने ‘यूफोरिया’ या टीव्ही मालिकेत काम केलं आहे. ‘एनीवन बट यू’ आणि ‘द हाउसमेड’ हे तिचे काही चित्रपट आहेत.

या जाहिरातीविरोधात आवाज उठल्यानंतर इतर खेळांमधील खेळाडूही विरोधात सहभागी झाले.

त्यांनी त्यांच्या सरावाचे, प्रशिक्षणाचे आणि स्पर्धांमधील व्हीडिओ पोस्ट केले. तसेच, करिअरमध्ये आलेल्या अडचणी आणि संघर्षांबद्दलही त्यांनी सांगितलं.

विरोधाची सुरुवात कुठून झाली?

या मोहिमेची सुरुवात अमेरिकन जिम्नॅस्ट ग्रेसी क्रेमरने केली. तिने तिच्या सरावाचा एक व्हीडिओ (मोंटाज) तयार करून पोस्ट केला.

यासोबत तिने लिहिलं, “सिडनी स्विनी काय करत होती, हे मला माहीत नाही; परंतु, खेळांमध्ये महिला अशाच दिसतात.”

क्रेमरने बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसला सांगितलं की, आपल्या पोस्टवर इतक्या प्रतिक्रिया येतील, अशी अपेक्षा मला नव्हती.

तिने सांगितलं की, मला केवळ महिलांचं मनोबल वाढवायचं होतं. अशा जाहिराती पाहायला मिळू शकतात, याची तिला जाणीव करून द्यायची होती; पण “महिलांचं महत्त्व केवळ याच गोष्टीवर ठरत नाही.”

अमेरिकन जिम्नॅस्ट ग्रेसी क्रेमरने या जाहिरातीविरोधात मोहीम सुरू केली होती.

फोटो स्रोत, Katharine Lotze/Getty Images

ती म्हणाली की, या ट्रेंडमध्ये अनेक उत्कृष्ट खेळाडू सहभागी होताना आणि एकमेकींचं मनोबल वाढवताना पाहणं खूप छान होतं.

क्रेमरने सांगितलं की, जिम्नॅस्ट म्हणून स्पर्धांमध्ये लिओटार्ड घातल्यामुळे मला पुरुषांकडून खूप अपमानास्पद, आक्षेपार्ह आणि महिलांना वस्तूसारखं दाखवणारे संदेश मिळत आले आहेत.

क्रेमर म्हणाली, “दुर्दैवाने, माझ्या संपूर्ण करिअरमध्ये मला अनेकदा एका वस्तूसारखं पाहिलं गेलं. त्यामुळे ज्यांना अशा नजरेने पाहिलं जाऊ नये असं वाटतं, अशा महिलांसाठी आवाज उठवण्याची मला प्रेरणा मिळाली. मला अनेक वर्षांपासून चालत आलेल्या या चुकीच्या विचारसरणीचा भाग व्हायचं नाही.”

‘महिलांना एका ठराविक पद्धतीने दाखवलं गेलं’

ऑस्ट्रेलियाची 4 वेळा ऑलिम्पिक चॅम्पियन राहिलेली जलतरणपटू एरियार्ने टिटमस म्हणाली, “आपलं संपूर्ण आयुष्य खेळात नैपुण्य मिळवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व महिलांसाठी ही मोठी निराशेची गोष्ट आहे. खेळाचा खरा आनंद घेणाऱ्या महिलांसाठीही हा एक मोठा धक्का आहे.”

तिने सवाल केला, “महिलांच्या शरीराचा वापर करून पैसे कमावणं आणि महिलांच्या खेळांना लैंगिक पद्धतीने दाखवणं अजूनही सामान्य असलेल्या जगात आपण कसं जगत आहोत?”

ब्रिटिश सायकलपटू आणि ऑलिम्पिक चॅम्पियन सोफी केपवेल एमबीई, रग्बी खेळाडू लिसा न्यूमन आणि एली बोटमॅन, तसेच ऑस्ट्रेलियाची वॉटर पोलो ऑलिम्पियन टिली कीर्न्स यांनीही आपले अनुभव सांगितले.

ऑलिम्पिक चॅम्पियन जलतरणपटू एरियार्ने टिटमसने जाहिरातीचा निषेध केला आहे.

फोटो स्रोत, Getty Images

आपल्या पोस्टवर लोकांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर केपवेलने बीबीसी स्पोर्टला सांगितलं, “मला वाटतं, इतक्या महिला पुढे येऊन आपलं मत मांडत आहेत, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे.”

ती म्हणाली, “या जाहिरातीत महिला खेळाडूंची एक विशिष्ट प्रतिमा दाखवली आहे. मला वाटतं, हीच सर्वात त्रासदायक आणि चिंताजनक गोष्ट आहे. खेळाशी संबंधित एखाद्या मोहिमेचा चेहरा असाच का असावा?”

“महिलेला अशा पद्धतीने दाखवण्याची गरजच काय आहे? तिला एक खेळाडू म्हणून किंवा खेळाशी संबंधित इतर कोणत्याही रूपातही दाखवता आलं असतं.”

ती म्हणाली, “मुद्दा हा नाही की, महिलांनी आपल्या इच्छेनुसार काही करण्याला लोकांचा विरोध आहे. मुद्दा हा आहे की, खेळांमध्ये महिलांना नेहमी याच पद्धतीने का दाखवलं जातं? किंवा अशाच प्रकारच्या गोष्टी सर्वाधिक लोकप्रिय होतात?”

सिडनी स्विनी

फोटो स्रोत, Getty Images

इंग्लंडची महिला रग्बी खेळाडू ॲलेक्स मॅथ्यूज म्हणाली की, स्विनीसारख्या जाहिराती पाहून तरुण महिलांनी “सगळ्यांसाठी एकाच प्रकारचं शरीर योग्य असतं”, असं मानू नये.

तिने बीबीसी स्पोर्टला सांगितलं, “लोकांना वाटतं तसं आदर्श शरीर असं काही नसतं. विशेषतः रग्बीमध्ये. सगळ्यांचं शरीर एकसारखं असतं, तर टीमच तयार झाली नसती.”

“प्रत्येक प्रकारच्या शरीराची स्वतःची अशी वैशिष्ट्ये असतात”

मॅथ्यूजने टोकियो 2020 ऑलिम्पिकमध्ये रग्बी सेव्हन्समध्ये ग्रेट ब्रिटनचं प्रतिनिधित्व केलं होतं.

तिने सांगितलं की, टोकियोतील ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये तिला वेगवेगळ्या प्रकारचे लोक पाहून खूप प्रेरणा मिळाली. तिथे वेगवेगळ्या वयाचे लोक, तरुण खेळाडू, उंच लोक आणि धिप्पाड शरीरयष्टीचे खेळाडूही होते. पण हे सर्वजण आपापल्या खेळात सर्वोत्तम होते.

सिडनी स्विनी यापूर्वीही वादाच्या भोवऱ्यात

सिडनी स्विनीने या वादावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, तिने सोशल मीडियावर इतर खेळाडूंचे कमी कपडे परिधान करून पोझ दिलेले अनेक फोटो पोस्ट केले आहेत.

हे फोटो ईएसपीएनच्या मुखपृष्ठांच्या एका मालिकेचा भाग होते. यामध्ये टेनिसपटू सेरेना विल्यम्स आणि एमएमए फायटर व रेस्लर रोंडा राउजी यांसारख्या प्रसिद्ध खेळाडूंचे फोटो होते. पुरुष खेळाडूंमध्ये एनएफएलचा माइल्स गॅरेट आणि बास्केटबॉलपटू कार्ल-अँथनी टाउन्सचाही समावेश होता.

गेल्या वर्षीही स्विनी एका वादग्रस्त जाहिरातीत दिसली होती. तिने अमेरिकन ईगलसाठी जीन्सची जाहिरात केली होती. या जाहिरातीची टॅगलाइन होती, ‘सिडनी स्विनीकडे उत्तम जीन्स आहेत.’

सोशल मीडियावर काही लोकांनी या जाहिरातीला विरोध केला होता.

या जाहिरातीतील ‘जीन्स’ (जनुके) आणि ‘जीन्स’ या शब्दांच्या वापरावरूनही प्रश्न उपस्थित झाले. यामुळे वंश आणि सौंदर्याच्या ठरलेल्या निकषांवरही चर्चा सुरू झाली होती.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC