Home LATEST NEWS ताजी बातमी ‘आरोपी गुन्हा कबूल करतोय, पण दिल्ली पोलीस म्हणतात की नाही, त्याने गुन्हा...

‘आरोपी गुन्हा कबूल करतोय, पण दिल्ली पोलीस म्हणतात की नाही, त्याने गुन्हा केलाच नाही’

5
0

Source :- BBC INDIA NEWS

स्वतंत्र भारद्वाजवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान एका आंदोलकाच्या वडिलांवर हल्ला केल्याचा आरोप आहे.

फोटो स्रोत, Swatantra Bhardwaj/X

Published

वाचन वेळ: 7 मिनिटे

कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) एका समर्थकाच्या वडिलांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आरोपींना तातडीने अटक करा, या मागणीसाठी शुक्रवारी (4 सप्टेंबर) सीजेपीच्या नेत्यांनी पार्लियामेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनसमोर आंदोलन केले.

सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष देखील पार्लियामेंट स्ट्रीट पोलीस स्टेशन येथे उपस्थित होते. यावेळी बोलताना आशुतोष रांका म्हणाले, “जंतर-मंतरवर निदर्शने सुरू असताना आमची सहकारी निशू यांचे वडील संजयजी यांना मारहाण करण्यात आली, त्यांचं डोकं फोडलं. ही घटना भरदिवसा उघडउघड घडली आहे.”

“आम्ही जेव्हा आरोपींना अटक करण्याची मागणी करायला आलो, तेव्हा पोलीस ठाण्याबाहेर हजारोंच्या संख्येने पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला. मात्र ते गुंड उघडपणे एवढा मोठा गुन्हा करत होते, शांततेत आंदोलन करणाऱ्यांचं डोकं फोडत होते, तेव्हा मात्र एकही पोलीस मदतीला धावून आला नाही”, असं म्हणत सीजेपीने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.

सध्या सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यानंतर आंदोलनकर्त्यांवर हल्ला करणाऱ्या गुंडांना पाठीशी घातलं जात असल्याचा गंभीर आरोप दिल्ली पोलिसांवर होत आहे.

दुसऱ्या बाजूला दिल्ली पोलिसांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळले असून या प्रकरणात कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका शुक्रवारी सकाळी पार्लियामेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनसमोर आंदोलनासाठी पोहोचले.

हे संपूर्ण प्रकरण चर्चेत आलं ते एका व्हायरल व्हीडिओमुळे.

या व्हीडिओत स्वतंत्र भारद्वाज नावाची व्यक्ती उघडपणे सांगते, “मी निशूच्या वडिलांचं डोकं फोडलं. अशा परिस्थितीत माझ्यावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल व्हायला हवा होता, पण काही बड्या राजकीय नेत्यांचे फोन आल्यामुळे पोलिसांनी मला सोडून दिलं.”

दुसऱ्या बाजूला दिल्ली पोलिसांनी मात्र हा दावा फेटाळत या प्रकरणात कोणत्याही नेत्याचा दबाव किंवा हस्तक्षेप नव्हता, असा दावा केला.

निशू आझाद ही तरुणी तिचे वडील संजय कुमार यांच्यासोबत सीजेपीच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेली होती, तेव्हा हा सर्व प्रकार घडला होता.

स्वतंत्र भारद्वाजच्या त्या व्हायरल व्हीडिओवर सीजेपी आंदोलक निशू आझादने संतप्त प्रतिक्रिया दिली.

तिने म्हटलं, “आता आम्हाला दिल्ली पोलिसांकडून न्यायाची कोणतीही अपेक्षा उरलेली नाही; आता फक्त राहुल गांधीच आम्हाला न्याय मिळवून देऊ शकतात.”

निशूच्या या भूमिकेनंतर लगेचच राहुल गांधी यांनीही प्रतिक्रिया देत आपण निशूसोबत असल्याचं म्हटलं.

निशूचे वडील संजय आझाद यांनी त्या दिवशी घडलेल्या घटनेबद्दल ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं, “आम्ही जेव्हा अन्यायाविरुद्ध लढतो, तेव्हा ‘जय भीम’ची घोषणा देतो. पण काही लोकांना नेमका याच घोषणेमुळे सर्वात जास्त पोटदुखी होते. आम्ही सोशल मीडियावरही बाबासाहेबांचे विचार मांडतो, हे या लोकांना चांगलंच ठाऊक होतं.”

“तो माणूस (स्वतंत्र भारद्वाज) तिथेच हजर होता, त्याने अचानक माझ्यावर हल्ला केला. हातातील लोखंडी कड्याने त्याने माझ्या डोक्यावर जोरदार वार केला. त्यामुळे माझं डोकं दोन ठिकाणी फुटलं. मी संसद मार्गजवळील पोलीस ठाण्यातही गेलो. पण तिथल्या प्रशासनाने हल्लेखोराला पाठीशी घातलं आणि वाचवलं.”

हल्ल्यानंतर सुरुवातीला झालेल्या वैद्यकीय तपासणीचा रिपोर्टसुद्धा आपल्याला देण्यात आला नाही, असा आरोप त्यांनी केला. तक्रार नोंदवूनही स्वतंत्र भारद्वाजला अवघ्या 1 तासात पोलिसांनी सोडून दिलं, असा दावाही निशूचे वडील संजय आझाद यांनी केला.

खासदार पप्पू यादव यांनीही निशू आझाद आणि तिच्या वडिलांच्या समर्थनार्थ ठिय्या आंदोलन केलं.

यावेळी संताप व्यक्त करत ते म्हणाले, “आता मुलींवर अत्याचार होणार काय? दलितांवर असेच हल्ले होणार का? एका मुलीला टार्गेट करून तिच्या कुटुंबीयांना मारहाण केली जाणार? हा गुंडांचा देश आहे का? दहशतवाद्यांचा आणि हा हिंसाचाराचा देश आहे का?”

काय आहे नेमकं प्रकरण?

निशू आझाद यांनी ‘एक्स’वर एक व्हीडिओ शेअर करत म्हटलं, “स्वतंत्र भारद्वाज नावाच्या माणसाचा एक व्हीडिओ देशभरात बघितला जात आहे. त्यात तो स्वतः कबूल करतोय की, त्यानेच माझ्या वडिलांचं डोकं फोडलं. खरंतर यासाठी त्याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा म्हणजेच कलम 307 लावलं पाहिजे होतं.”

“जेव्हा त्याने बाबांचं डोकं फोडलं तेव्हाच आम्ही त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करायला गेलो होतो. पण पोलीस काहीच पाऊल उचलायला तयार नाहीत. ते फक्त वैद्यकीय तपासणीच्या नावाखाली आम्हाला इकडून तिकडे फिरवत आहेत.”

“दिल्ली पोलिसांकडून न्याय मिळण्याची माझी आशा आता पूर्णपणे मावळली आहे. आता फक्त राहुल गांधींकडूनच अपेक्षा आहे. मला खात्री आहे की, ते मला न्याय मिळवून द्यायला मदत करतील. ज्या लोकांच्या मनात कायद्याची कसलीही भीती उरलेली नाही, ते असे मोकाट कसे फिरू शकतात? असे लोल तुरुंगात असायला हवे.”

 दिल्ली पोलीस आरोपीला पाठीशी घालत असल्याचा सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांचा आरोप.

फोटो स्रोत, Getty Images

दुसऱ्या बाजूला सोशल मीडियावर स्वतंत्र भारद्वाजचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यात तो उघडपणे म्हणतोय, “निशूच्या बापाचं डोकं मीच फोडलं. तुम्हाला माहीतच असेल की अशा वेळी कोणतं कलम लागतं, कलम 307. डोक्याला तब्बल 7 टाके पडले होते आणि तो माणूस थेट ॲम्ब्युलन्समध्ये जात होता.”

पुढे तो तोऱ्यात सांगतो, “आणि हा स्वतंत्र दुसऱ्याच दिवशी बाहेर! अरे, आम्ही तर तुरुंगातही गेलो नाही. या संपूर्ण जगाला हे समजायला हवं की मी साध्या कोठडीतही गेलो नाही, उलट रात्रभर बाहेरच फिरत होतो.”

त्याने पुढे व्हीडिओत सत्ताधारी पक्षातील अनेक मोठ्या नेत्यांशी आपली ओळख असल्याचा दावाही केला आहे.

दुसऱ्या बाजूला, ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना स्वतंत्र भारद्वाजने असा दावा केला की, त्याने स्वतःच्या बचावासाठी हा हल्ला केला होता. जर स्वतःचा बचाव केला नसता तर जमावाने त्याला ठेचून मारले असते.

हा व्हीडिओ समोर आल्यानंतर सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांनी ‘एक्स’वर यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली.

त्यात सौरव दास म्हणाले, “जंतर-मंतरवरील आमच्या आंदोलनादरम्यान दलित बांधव संजय यांच्यावर भाजपाचे संरक्षण असलेल्या स्वतंत्र भारद्वाज या गुंडाने हल्ला केल्यानंतर नेमके काय घडले, हे मला तुम्हाला सांगायचे आहे. संजय यांचे डोके फुटले होते. जखम इतकी गंभीर होती की, एफआयआरमध्ये उघडपणे हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवला जायला हवा होता. मात्र पोलिसांनी हे कलम लावण्यास साफ नकार दिला.”

“गंभीर दुखापतीशी संबंधित कलमही लावण्यात आलं नाही. डीसीपी सचिन शर्मा आणि एसीपी अजय शर्मा यांनी हे कलम लावण्यास थेट नकार दिला आणि “जा, कोर्टाचा आदेश घेऊन या,” असं सांगितलं”, असा आरोप सौरव दास यांनी केला.

त्यांनी पुढे असाही आरोप केला की, अद्याप मेडिकल रिपोर्ट देण्यात आलेला नाही. याशिवाय या संपूर्ण प्रकरणात सहभागी असलेल्या भारद्वाजच्या इतर साथीदारांची ओळख पोलिसांनी अजूनही सांगितलेली नाही.

सौरव दास यांच्या पोस्टवर स्पष्टीकरण देताना डीसीपी नवी दिल्ली यांच्या अधिकृत ‘एक्स’ हँडलने पोस्ट करत सांगितले, “23 जूनला जंतर-मंतरवर सीजेपीच्या आंदोलनादरम्यान गाझियाबादचे रहिवासी संजय कुमार (वय 38) यांना झालेल्या धक्काबुक्कीत एका व्यक्तीच्या हातातील कड्यामुळे डोक्याला मार लागला.”

“आरएमएल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता ही दुखापत अगदी किरकोळ स्वरूपाची असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा मार कोणत्याही शस्त्राने नाही, तर कड्यामुळेच बसला होता. तसेच डोक्याची कवटी फ्रॅक्चर झाल्याचा दावा कोणत्याही तथ्याशी किंवा मेडिकल रिपोर्टशी जुळणारा नसून तो पूर्णपणे बिनबुडाचा आहे.”

पोलिसांच्या पोस्टमध्ये पुढे नमूद करण्यात आले, “संजय यांच्या जबाबावरून भारतीय न्याय संहितेनुसार संसद मार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला गेला आहे. घटनास्थळावरील संबंधित व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले. तसेच तपासादरम्यान सुरज कुमार (24) आणि स्वतंत्र भारद्वाज (21) यांना रीतसर नोटीस पाठवून त्यांची कसून चौकशी करण्यात आली. कायद्यानुसार आवश्यक ती सर्व कारवाई झाली असून लवकरच योग्य त्या कोर्टात आरोपपत्र दाखल केले जाईल.”

फाईल फोटो

फोटो स्रोत, Getty Images

दरम्यान या संपूर्ण प्रकरणात कोणत्याही वजनदार किंवा बड्या व्यक्तीचा राजकीय हस्तक्षेप होता, हा आरोप दिल्ली पोलिसांनी पूर्णपणे फेटाळला आहे.

दिल्ली पोलिसांनी आपल्या ‘एक्स’ पोस्टमध्ये म्हटले, “या संपूर्ण प्रकरणात कोणताही बाहेरील दबाव किंवा हस्तक्षेप झाल्याचा दावा साफ खोटा आणि बिनबुडाचा आहे. कायद्याची चौकट आणि ठरवून दिलेल्या नियमांनुसारच या प्रकरणात योग्य ती सर्व कारवाई केली गेली आहे.”

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनीही दिल्ली पोलिसांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत म्हटले, “आरोपी स्वतः कबूल करतोय की, मी गुन्हा केलाय, पण दिल्ली पोलीस म्हणतात की नाही, तू गुन्हा केलाच नाहीस!”

राजकीय प्रतिक्रिया

निशू आझाद यांनी व्हीडिओच्या माध्यमातून राहुल गांधी यांना न्यायासाठी साद घातली होती. या व्हीडिओची दखल घेत राहुल गांधी यांनी तात्काळ ‘एक्स’वर पोस्ट करत पाठिंबा दर्शवला.

त्यांनी पोस्टमध्ये म्हटले, “निशू, घाबरण्याची अजिबात गरज नाही. मी तुझ्या सोबत आहे. तू आपल्या समाजासाठी आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवतेस, म्हणूनच तुला लक्ष्य केले गेले आहे, हे स्पष्ट दिसत आहे.”

“अमित शाह यांच्या नियंत्रणाखालील दिल्ली पोलीस एका बाजूला विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज आणि अत्याचार करत आहे, तर दुसऱ्या बाजूला एका दलित तरुणीच्या वडिलांचे डोके फोडणारा आरोपी मात्र बिनधास्त बाहेर फिरतोय.”

राहुल गांधींनी पुढे लिहिले, “नरेंद्र मोदीजी आणि अमित शाहजी, अशा गुन्हेगाराला तुमचे आणि तुमच्या पक्षातील लोकांचे संरक्षण का आहे? आता तरी गुन्हेगारावर कारवाई होणार की त्याला असेच पाठीशी घातले जाणार? निशू हा तुझा एकटीचा लढा नाही. जोपर्यंत तुला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. जय भीम. जय संविधान.”

 राहुल गांधी यांनी निशू यांना न्याय मिळवून देण्यासाठी मदत करण्याचे दिले आश्वासन

फोटो स्रोत, Getty Images

तृणमूल काँग्रेसचे नेते साकेत गोखले यांनी दिल्ली पोलिसांच्या एक्स पोस्टला प्रत्युत्तर देताना लिहिले, “दिल्ली पोलीस, तुम्हाला जरा तरी लाज वाटते का? एका भाजप मंत्र्याने आपल्याला वाचवले आणि पोलिसांनी आपल्याला सहज सोडून दिले, असा थेट कबुलीजबाब स्वतः आरोपी व्हीडिओत देतोय.”

“ही अत्यंत धक्कादायक बाब आहे. एक व्यक्ती उघडपणे सांगतोय की, हे कृत्य त्यानेच केले आहे आणि दुसरीकडे दिल्ली पोलीस म्हणतात की त्याने असं काही केलंच नाही.”

आम आदमी पार्टीने आपल्या अधिकृत हँडलवरून पोस्ट करत म्हटले, “‘पंतप्रधान हे आमचे मोठे भाऊ आहेत.’ हे शब्द एका गल्लीबोळातील गुंडाचे आहेत. हा गुंड रोज रस्त्यावर बिनधास्त गुंडगिरी करत फिरतोय. कारण त्याला खात्री आहे की, आपल्या डोक्यावर स्वतः पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या नेत्यांचा हात आहे.”

पंतप्रधान अशा समाजकंटकांना थेट पाठबळ देत आहेत, असा थेट आरोपही ‘आप’ने केला.

दुसरीकडे ‘एक्स’वर प्रतिक्रिया देताना समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी लिहिले, “भाजप सरकार आहे की गुन्हेगारांचा वकील?”

आझाद समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांनी ‘एक्स’वर लिहिले, “शेवटी पोलिसांच्या नोंदी आणि आरोपी स्वतंत्र भारद्वाज याच्या जबाबात इतकी मोठी तफावत का आहे? आम्ही या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी घडवून आणू आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवूनच देऊ. जय भीम, जय भारत.”

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC