Home LATEST NEWS ताजी बातमी कुणाल शाह : मुंबईत बालपण, तत्त्वज्ञानाचं शिक्षण ते आता व्हॉट्सअ‍ॅपचे नवे प्रमख;...

कुणाल शाह : मुंबईत बालपण, तत्त्वज्ञानाचं शिक्षण ते आता व्हॉट्सअ‍ॅपचे नवे प्रमख; जाणून घ्या त्यांच्याबद्दल

5
0

Source :- BBC INDIA NEWS

भारतीय फिनटेक कंपनी क्रेडचे संस्थापक कुणाल शाह यांची आता व्हॉट्सॲपच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

फोटो स्रोत, CRED

काही काळापूर्वीपर्यंत कुणाल शाह यांची ओळख प्रामुख्याने भारतामधील स्टार्टअप आणि गुंतवणूक क्षेत्रापुरतीच मर्यादित होती.

‘क्रेड’ या फिनटेक कंपनीचे संस्थापक कुणाल शाह यांनी केवळ व्यवसायातच नव्हे, तर त्यापलीकडेही स्वतःची वेगळी आणि भक्कम ओळख निर्माण केली आहे.

आपल्या पॉडकास्टमध्ये ते नेहमी विश्वास, प्रेरणा, संपत्ती निर्मिती आणि मानवी वर्तन यांसारख्या विषयांवर चर्चा करत असतात. सोशल मीडियावरील त्यांच्या पोस्टमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेपासून ते तत्त्वज्ञानापर्यंतच्या विविध विषयांचा समावेश असतो.

मेटाने व्हॉट्सॲपची जबाबदारी कुणाल शाह यांच्याकडे सोपवल्याने ते जागतिक स्तरावर चर्चेत आले आहेत. मेटाने ‘क्रेड’मध्ये 90 कोटी डॉलरची गुंतवणूक केल्यानंतर ही नियुक्ती करण्यात आली आहे.

हा निर्णय नेमका अशा वेळी घेण्यात आला आहे, जेव्हा व्हॉट्सॲप केवळ मेसेजिंगपुरतं मर्यादित न राहता पेमेंट सेवा, व्यावसायिक सुविधा आणि एआयवर आधारित नवीन सेवा क्षेत्रांत विस्तार करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

भारतीय वंशाच्या अनेक अधिकाऱ्यांनी जगातील मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांचं नेतृत्व केलं आहे. परंतु, भारतातील स्टार्टअप क्षेत्रातून पुढे आलेल्या एखाद्या संस्थापकाकडे इतक्या मोठ्या जागतिक ग्राहक प्लॅटफॉर्मची जबाबदारी सोपवली जाण्याची उदाहरणं फारच कमी पाहायला मिळतात.

जगभरात व्हॉट्सॲपचे 3 अब्जांहून अधिक युजर्स आहेत.

स्टार्टअप संस्थापक ते व्हॉट्सॲपच्या सर्वोच्च पदापर्यंत

मेटाकडून संपर्क होण्याच्या आधीच कुणाल शाह हे भारतातील स्टार्टअप क्षेत्रातील एक मोठं नाव बनलं होतं. त्यांना पहिलं मोठं यश ‘फ्रीचार्ज’मुळे मिळालं. 2010 मध्ये स्थापन झालेल्या या मोबाईल रिचार्ज प्लॅटफॉर्मचे ते सहसंस्थापक होते.

त्या काळात भारतातील इंटरनेट अर्थव्यवस्थेने नुकतंच आकार घ्यायला सुरूवात केली होती.

कंपनीची वेगाने प्रगती झाली आणि 2015 मध्ये ई-कॉमर्स कंपनी स्नॅपडीलने तिची खरेदी केली. त्या वेळी हा देशातील सर्वात मोठ्या स्टार्टअप व्यवहारांपैकी एक मानला गेला होता.

कालांतराने शाह यांची ओळख केवळ त्यांनी उभारलेल्या व्यवसायांपुरतीच मर्यादित राहिली नाही.

जगभरात व्हॉट्सॲपचे 3 अब्जांहून अधिक युजर्स आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

‘फ्रीचार्ज’ सोडल्यानंतर त्यांनी अनेक वर्षे नवीन तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचं आणि उद्योजकांना सल्ला आणि मार्गदर्शन करण्याचं काम केलं.

त्यांनी ‘वाय कॉम्बिनेटर’ आणि ‘सिकोइया कॅपिटल’ यांसारख्या स्टार्टअप क्षेत्रातील संस्थांसोबत सल्लागार म्हणूनही काम केलं.

या भूमिकांच्या माध्यमातून ते संस्थापक-उद्योजकांच्या एका संपूर्ण पिढीशी जोडले गेले. भारतातील स्टार्टअप क्षेत्र वेगाने विस्तारत असतानाच्या काळात ते तंत्रज्ञान क्षेत्रात खूप सक्रिय होते.

तत्त्वज्ञानाचे विद्यार्थी ते ‘फ्रीचार्ज’चे संस्थापक

मुंबईत बालपण गेलेल्या कुणाल शाह यांनी विल्सन महाविद्यालयात तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. देशातील अनेक प्रसिद्ध टेक उद्योजकांप्रमाणे त्यांनी प्रतिष्ठित अभियांत्रिकी किंवा व्यवस्थापन संस्थांचा मार्ग निवडला नाही.

एक्सवरील एका पोस्टमध्ये उद्योजक आणि गुंतवणूकदार संजीव बिखचंदानी यांनी एक आठवण सांगितली. कुणाल शाह यांनी ‘तत्त्वज्ञान’ (फिलॉसॉफी) हा विषय का निवडला होता याचं कारण सांगितलं होतं.

या विषयाचे वर्ग सकाळच्या सत्रात असायचे. त्यामुळे त्यांना त्यावेळी आर्थिक अडचणीत असलेल्या आपल्या कौटुंबिक व्यवसायात दिवसभर काम करता येत होतं.

शिक्षण घेत असताना विविध छोटी-मोठी कामंही केल्याचं शाह यांनी यापूर्वी दिलेल्या अनेक मुलाखती आणि पॉडकास्टमध्ये सांगितलं आहे.

त्यांच्या मते, या सुरुवातीच्या अनुभवांतूनच ‘फ्रीचार्ज’ची कल्पना समोर आली आणि याच कंपनीमुळे त्यांना राष्ट्रीय स्तरावर पहिल्यांदा मोठी ओळख मिळाली.

2018 मध्ये सुरू झालेली ‘क्रेड’ ही तुलनेने एका साध्या आणि सोप्या अशा व्यवसाय कल्पनेवर आधारित होती. वेळेवर क्रेडिट कार्डचं बिल भरणाऱ्या ग्राहकांना बक्षीस देण्याची ही संकल्पना होती.

कंपनीची सुरुवात विश्वास आणि प्रोत्साहन यांसारख्या प्रश्नांमुळे झाल्याचे शाह यांनी अनेकवेळा सार्वजनिक कार्यक्रमांमधनू सांगितलं आहे.

यानंतर कंपनीने कर्ज, विमा, खरेदी-विक्री आणि संपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित सेवांमध्येही वेगाने विस्तार केला.

कुणाल शाह यांनी अनेक वर्षे नवीन टेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आणि संस्थापक-उद्योजकांना मार्गदर्शन करण्याचं काम केलं. (प्रतीकात्मक फोटो)

फोटो स्रोत, Getty Images

रॉयटर्सच्या एका अहवालानुसार, मेटाच्या नवीन गुंतवणुकीनंतर ‘क्रेड’चे मूल्य सुमारे 4.5 अब्ज डॉलर इतके झाले आहे.

हे मूल्यांकन कंपनीच्या मागील फंडिंग राऊंडपेक्षा जास्त आहे. परंतु, 2022 मध्ये गाठलेल्या तिच्या सर्वाधिक मूल्यांकनापेक्षा कमी आहे.

‘क्रेड’ हा एक लोकप्रिय फिनटेक ब्रँड बनला आहे. याचं मुख्य कारण म्हणजे त्याच्या जाहिरातींमुळे तो चर्चेत राहिला. या जाहिरातींमध्ये विनोद, जुन्या आठवणी आणि सेलिब्रिटींचा अनपेक्षित वापर केला जात असत.

कंपनी वेगाने विस्तार करत असतानाच तिच्याबाबत काही प्रश्नही उपस्थित होऊ लागले. अनेक वर्षे तिच्या ब्रँड आणि वाढीचं कौतुक झालं, परंतु कंपनीच्या नफा कमावण्याच्या मार्गाबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित केले गेले.

गुंतवणूकदारांचा उत्साह आणि कंपनीचे उच्च मूल्यांकन हे कंपनीच्या आर्थिक कामगिरीशी सुसंगत होते का, याबाबत टीकाकारांनी प्रश्न उपस्थित केले.

मात्र, समर्थकांचं म्हणणं होतं की अनेक यशस्वी टेक कंपन्याही मोठ्या प्रमाणावर विस्तार करताना बराच काळ तोट्यात चालल्या होत्या.

गेल्या वर्षी सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे हा विषय पुन्हा चर्चेत आला. कंपनीला सातत्याने नफा होत नसतानाही उद्योजकांचं इतकं कौतुक का केलं जातं, असा सवाल त्या पोस्टमध्ये करण्यात आला होता.

याला उत्तर देताना कुणाल शाह यांनी म्हटलं होतं की, नफा कमावणाऱ्या कंपन्यांचं कौतुक व्हायलाच हवं. पण, रोजगार निर्माण करणाऱ्या आणि जोखीम घेऊन व्यवसाय उभा करणाऱ्या कंपन्यांनाही प्रोत्साहन मिळायला हवं.

भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला आकार दिला

त्यांच्या समर्थकांच्या मते, शाह हे अशा उद्योजकांचं प्रतिनिधित्व करतात ज्यांनी डिजिटल पेमेंट आणि फिनटेकच्या माध्यमातून भारताच्या आधुनिक डिजिटल अर्थव्यवस्थेला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

शाह यांच्यासोबत अनेक वर्षे धोरणात्मक विषयांवर काम केलेल्या आणि स्टार्टअप पॉलिसी फोरमच्या सीईओ श्वेता राजपाल कोहली यांनी त्यांच्या कामाच्या पद्धतीचं वैशिष्ट्य सांगितलं. “त्यांच्यात एखाद्या उत्पादनाकडे नियम-कायद्यांतील गुंतागुंत लक्षात घेऊन पाहण्याची आणि त्या उत्पादनाची रचना नियामकांच्या दृष्टीकोनातून समजून घेण्याची दुर्मिळ क्षमता असल्याचं त्यांनी म्हटलं.”

बीबीसीशी बोलताना त्या म्हणाल्या की, “त्यांची सर्जनशीलता आणि समस्या सोडवण्याची पद्धत नेहमीच प्रभावी आणि रंजक राहिली आहे.”

टीकाकारांच्या मते, शाह हे अशा स्टार्टअप संस्कृतीचे प्रतीक आहेत, जिथे अनेकदा टिकाऊ व्यवसाय उभारण्यापेक्षा कंपनीचे मूल्यांकन वाढवणं, निधी उभारणं आणि झपाट्याने विस्तार करण्यावर अधिक प्राधान्य दिलं जातं.

ही नवीन नियुक्ती शाह यांच्या कारकिर्दीतील अनेक जुन्या वैशिष्ट्यांनाही अधोरेखित करते.

व्हॉट्सॲप आता केवळ मेसेजिंगपुरतं मर्यादित राहिलेलं ॲप नाही. ते पेमेंट, ऑनलाइन व्यवहार आणि व्यावसायिक सेवांच्या क्षेत्रातही विस्तार करत आहे.

ही तीच क्षेत्रं आहेत, जिथे शाह गेल्या एक दशकांपासून उत्पादनं विकसित करणे, गुंतवणूक करणे आणि कंपन्यांना सल्ला देणे, मार्गदर्शन करणे यासाठी काम केलं आहे.

फायनान्शियल टेक्नॉलॉजीच्या (वित्तीय तंत्रज्ञान) माध्यमातून भारताच्या आधुनिक डिजिटल अर्थव्यवस्थेला आकार देण्यात कुणाल शाह यांची भूमिका महत्त्वाची असल्याचं म्हटलं जातं. (प्रतीकात्मक फोटो)

फोटो स्रोत, Getty Images

भारत ही व्हॉट्सॲपची सर्वात मोठी बाजारपेठ आहे आणि कुणाल शाह यांच्या उद्योजकीय प्रवासाचेही ते मुख्य केंद्र राहिलं आहे. या नियुक्तीमुळे व्हॉट्सॲपचे नेतृत्व करणारे ते पहिले भारतीय ठरणार आहेत.

परंतु, शाह यांच्या नियुक्तीकडे केवळ फिनटेक किंवा पेमेंटच्या दृष्टीकोनातून पाहणं योग्य ठरणार नाही, असं काही तज्ज्ञ म्हणत आहेत.

‘मीडियानामा’ या तंत्रज्ञानविषयक बातम्यांच्या संकेतस्थळाचे संस्थापक आणि संपादक निखिल पाहवा यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं की, “अनेकांना वाटतं की फिनटेक आणि पेमेंट क्षेत्रातील अनुभवामुळे शाह यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. पण माझ्या मते, हा विचार खूपच संकुचित आहे.”

“त्यांनी अनेक वर्षे उत्पादनं, ग्राहकांचं वर्तन, त्यांना प्रोत्साहन देण्याचे मार्ग आणि व्यवसायाचा विकास यांचा सखोल अभ्यास केला आहे. त्यांच्या कंपन्यांमध्ये पेमेंट हे ग्राहकांना जोडून ठेवण्याचं एक साधन ठरलं आहे, ज्या माध्यमातून त्यांना नंतर इतर सेवा आणि उत्पादनं दिली जाऊ शकत होती.”

“ही नियुक्ती केवळ पेमेंट क्षेत्राशी संबंधित असल्याचं वाटत नाही. उलट, मेटाने अशा उद्योजकाची निवड केली आहे ज्यांना ग्राहकांशी संबंधित व्यवसाय मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्याचा अनुभव आहे.”

मेटाने या भूमिकेसाठी कुणाल शाह यांची निवड का केली, हे सार्वजनिकपणे सांगितलेलं नाही.

मात्र नियुक्ती जाहीर करताना मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी त्यांच्या ‘निर्मात्यासारखी वृत्ती’ आणि ‘जागतिक दृष्टीकोन’ याचं कौतुक केलं.

या गुणांची खरी कसोटी तेव्हा लागेल, जेव्हा व्हॉट्सॲप जगभरातील अब्जावधी युजर्सला सेवा देत असताना पेमेंट, व्यवसाय साधनं (बिझनेस टूल्स) आणि एआयवर आधारित उत्पादनांमध्ये आपली उपस्थिती अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करेल.

कुणाल शाह यांच्यासमोरची आव्हानं त्यांच्या मागील अनुभवांपेक्षा बरीच वेगळी आहेत.

‘क्रेड’मध्ये ते आर्थिकदृष्ट्या सक्रिय युजर्ससाठी उत्पादनं तयार करत होते. त्यांचं कार्यक्षेत्र प्रामुख्याने संस्थापक, गुंतवणूकदार आणि तंत्रज्ञानात रस असलेल्या लोकांपुरताच मर्यादित होता.

व्हॉट्सॲपमध्ये त्यांना आता मोठ्या प्रमाणात लोक वापरत असलेल्या सेवांची जबाबदारी मिळेल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC