Home LATEST NEWS ताजी बातमी खैरलांजी हत्याकांड : 20 वर्षांनी गावात आता परिस्थिती कशी आहे? – ग्राऊंड...

खैरलांजी हत्याकांड : 20 वर्षांनी गावात आता परिस्थिती कशी आहे? – ग्राऊंड रिपोर्ट

7
0

Source :- BBC INDIA NEWS

भैय्यालाल भोतमांगे

महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या खैरलांजी हत्याकांडाला आज (29 सप्टेंबर) 20 वर्षे पूर्ण होत आहेत.

29 सप्टेंबर 2006 रोजी भंडारा जिल्ह्यातील खैरलांजी गावात दलित कुटुंबातील चौघांची हत्या करण्यात आली होती.

आता इतक्या वर्षानंतर गावात नेमकी काय परिस्थिती आहे? गावात काही बदललं का? हे पाहण्यासाठी आम्ही नागपूरहून खैरलांजीत पोहोचलो.

आम्हाला खैरलांजीत पोहोचेपर्यंत सकाळचे 11 वाजले होते. त्यावेळी गावात काही मोजकेच लोक होते.

गावातले बहुतेक लोक शेतीच्या कामांसाठी शेताकडे गेले होते. आम्ही गावात शिरताच सगळ्यांच्या नजरा आमच्याकडे वळल्या. पण कोण पाहिजे? तुम्ही कशासाठी आलात? हे कोणीच विचारलं नाही. कारण सप्टेंबर महिना आला की, आपल्या गावात बाहेरचे लोक का येतात, हे सगळ्यांना माहिती आहे.

आम्ही ग्रामपंचायतीत पोहोचलो, तेव्हा तिथं एक ऑपरेटर आपलं काम करत होता. आम्ही कशासाठी आलो हे त्यानं लगेच ओळखलं. त्याला या घटनेबद्दल आम्ही अधिक माहिती विचारली. पण ‘मला याबद्दल काहीच माहिती नाही. मी फक्त साक्षीदारांची घरं दाखवू शकतो’ असं म्हणून त्यानं तिथंच हात झटकले.

घटनेतील साक्षीदार आता काय सांगतात?

त्यानंतर आम्ही भैय्यालाल भोतमांगे यांच्या घराकडे गेलो, जिथं त्यांची पत्नी सुरेखा, मुलगी प्रियंका आणि रोशन, दिलीप अशी दोन मुलं यांची हत्या करण्यात आली होती. या जागेच्या अगदी समोरच आदिवासी समाजातील प्रेमलाल वलके यांचं कुटुंब राहतं. आम्ही त्यांच्यासोबत बोललो. ते या घटनेतील साक्षीदार होते.

सुरुवातीला प्रेमलाल बोलायला तयार नव्हते. पण आम्ही विनंती केल्यानंतर त्यांनी या घटनेबद्दल काही गोष्टी सांगितल्या.

ते म्हणतात, “आमच्या घरासमोरच राहत होते तर आम्हाला आठवण येतेच. आमच्यासोबत नेहमी बोलत होते. पण जेव्हा घटना घडली तेव्हा मी फक्त बैलगाडी बघितली होती. मारताना पाहिलं नव्हतं. मी तसाच पोलिसांसमोर जबाब दिला. तेव्हा माझ्यावर जबाब देऊ नये यासाठी दबाव होता. तुझ्यासोबतही तसंच करू अशा धमक्या यायच्या. पण आता गावात सगळं चांगलं आहे. आमच्यासोबत कोणाचं वाकडं नाही. सगळे चांगले वागतात.”

माया उके या सुद्धा या गावात आदरांजली वाहण्यासाठी जातात. त्यांनी सतत 12 वर्ष या घटनेचा फॉलो अप सुद्धा घेतला.

आम्ही प्रेमलाल यांच्यासोबत बोलत असताना आजूबाजूचे लोक घराच्या खिडक्यांमधून पाहत होते. पण कोणीही समोर येऊन बोलायला तयार नव्हतं.

या घटनेची आणखी एक साक्षीदार म्हणजे प्रेमलाल यांचे नातेवाईक मुकेश पुसाम.

पुसाम यांचं घर सुद्धा भोतमांगे यांच्या घरासमोरच आहे. आम्ही गावात गेलो तेव्हा ते घरी नव्हते. त्यामुळे आम्ही त्यांना भेटायला शेतात गेलो.

आता मला काही विचारू नका, असं ते सुरुवातीला म्हणाले. त्यानंतर विनंती केल्यावर ते बोलू लागले.

पुसाम सांगतात, झालं ते अगदी चुकीचं झालं.

“आम्ही साक्ष दिल्यामुळे दोन वर्षे राग सहन करावा लागला. पण आता सगळं व्यवस्थित आहे. आरोपी सुट्ट्यांवर येतात तर बोलतात आमच्यासोबत,” इतकं बोलून त्यांनी घटनेबद्दल अधिक भाष्य करायला नकार दिला.

दोन्ही साक्षीदारांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्टपणे दिसत होती.

घटनेची साक्ष देणारा पलंग

शेजारच्या धुसाळा गावातल्या सिद्धार्थ गजभिये यांचा खैरलांजीतल्या लोकांसोबत मजुरीच्या पैशांसाठी वाद झाला. गावकऱ्यांनी त्याच्यावर हल्ला केला. त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. यामध्ये सुरेखा भोतमांगे यांनी पोलिसांसमोर साक्ष दिली. जामिनावर सुटल्यानंतर त्या आरोपींच्या मनात राग होताच. त्यामधून गावातल्या काही लोकांनी भोतमांगेंच्या घरावर हल्ला केला.

पंचशिला शेंडे

29 सप्टेंबर 2006 ला सांयकाळच्या सुमारास गावातील एक गट भोतमांगे यांच्या घरावर धावून आला. त्यांना शिवीगाळ करू लागला. त्यानंतर त्यांच्या झोपडीवजा घरावर हल्ला केला. यामध्येच सुरेखा भोतमांगे, प्रियंका, रोशन आणि दिलीप अशा चौघांची हत्या करण्यात आली. त्यानंतर आरोपींनी प्रेत देखील कॅनलमध्ये टाकले. ते वाहत जाऊन गावापासून दूर असलेल्या गावांमध्ये भेटले.

भैय्यालाल भोतमांगे त्यावेळी घरी नव्हते. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. आपल्याला न्याय मिळावा यासाठी भैय्यालाल शेवटपर्यंत लढले. अखेर त्यांचा 2017 साली मृत्यू झाला.

आता भोतमांगे कुटुंबातील कोणीच हयात नाही. पण याठिकाणी दिसतोय या घटनेची साक्ष देणारा एक लोखंडी पलंग. या अमानुष घटनेची साक्ष देण्यासाठी तो पलंग तिथं तसाच ठेवण्यात आला आहे.

याआधी बरेच दिवस याठिकाणी त्यांची पडलेली झोपडी देखील दिसत होती. तसेच इथं कचरा वाढलेला होता. पण आता ही जागा स्वच्छ करण्यात आली असून याठिकाणी शेजारचे लोक गायी-ढोरं बांधतात.

गावातील बहुसंख्य बोलायला तयार नाही

घटनेला 20 वर्ष पूर्ण झाले तर या गावातले तरुण या घटनेकडे कसे बघतात याबद्दल आम्ही गावातल्या तरुणांसोबत बोललो. पण गावातील बहुसंख्य तरुण या घटनेबद्दल बोलणं टाळत होता. आम्हाला काहीच महिती नाही हे एकच वाक्य सर्वांच्या तोंडी होतं.

आम्ही खूप विनंती केल्यानंतर आदिवासी कुटुंबातील नितीन वलके बोलले. ते म्हणाले, “आमच्या गावात अशी घटना कधीच घडली नाही. अचानक घडली तर भीती वाटतेच ना. पण आता कोणी कोणाबद्दल काहीच बोलत नाही. गावात सगळं शांत आहे. सगळे प्रेमानं बोलतात.”

वलके हे भोतमांगे यांचे शेजारीच आहेत. भोतमांगे यांचं मुलं आणि नितीन एकाच वर्गात होते. त्यामुळे ही घटना आठवली की कधी कधी रडायला येत असल्याचं नितीन सांगतात.

त्यानंतर गावातल्या पानठेल्यावर बसलेल्या लोकांसोबत आणि तरुणांसोबत आम्ही बोललो. पण तिथंही या घटनेबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही असंच सांगत होते.

रविंद्र खंडाते हा तरुण म्हणाला की, “आता वातावरण शांत झालं. अजून काय पाहिजे? आमच्या गावात झगडे-भांडणंही होत नाहीत.”

साक्षीदार वगळता गावातले ज्येष्ठ नागरिक सुद्धा या घटनेबद्दल एकही शब्द बोलत नव्हते. गावात एक विचित्र भीती जाणवतेय. गावातील बहुसंख्य वर्ग तर घटना झाली आम्ही विसरलो. आता आम्हाला काहीच बोलायचं नाही असंच बोलताना दिसला.

गावातील दलितांच्या मनात अजूनही भीती कायम

तरुण वर्ग गावात वातावरण चांगलं आहे असं सांगत असला तरी या गावातल्या दलित कुटुंबात अजूनही भीतीचं वातावरण दिसलं.

गावात सध्या खोब्रागडे आणि मेश्राम असे दोन दलित कुटुंब राहतात. त्यापैकी खोब्रागडे यांची मुलगी पंचशिला शेंडे ज्या या गावातील अंगणवाडी सेविका सुद्धा होत्या त्या आपल्या मनातली भीती बोलून दाखवतात.

खैरलांजी हत्याकांड

त्या म्हणतात, “सध्या गावात सर्व ठीक आहे. पण, ते जे वागतात ते लक्षात नाही येऊ देत नाही. प्रेमानेच बोलतात. पण मनात वेगळं असतं. मनातलं दाखवत नाही. आम्हाला सतर्क राहून वागायला लागतं. आम्हाला कार्यक्रमात बोलावतात. आमच्या मुलांची मदत घेतात. आमच्या मुलांना सोबत नेतात. पण, त्यांना सुरक्षित वागवायला पाहिजे. आमच्या मुलांसोबत धोका व्हायला नको. त्यांनी घटना घडली तेव्हा पण लक्षात येऊ दिलं नाही. पण, घडवून दाखवलं ना. त्यामुळे आम्हाला सतर्क राहून वागायला लागतं.”

पंचशिला दरवर्षी 29 सप्टेंबरला भोतमांगे कुटुंबीयांना आदरांजली वाहण्यासाठी घटनास्थळी जातात. त्या घटनास्थळावर आता होत असलेलं अतिक्रमण पाहून देखील त्या नाराजी व्यक्त करतात. ती जागा जपायला पाहिजे असं त्यांना वाटतं.

आरोपींनी ज्या कॅनलमध्ये मृतदेह फेकले आम्ही तिथंसुद्धा पोहोचलो. गावाच्या बाहेरून एक मोठा कॅनल वाहतोय त्याला भरपूर पाणी आहे. याचठिकाणी आरोपींनी मृतदेह फेकले होते. ते पुढे वाहत जाऊन दुसऱ्या गावांमध्ये सापडले.

कॅनलच्या शेजारीच शेती असलेली महिला नाव न घेण्याच्या अटीवर आमच्यासोबत बोलत होत्या. त्या म्हणाल्या, “मृतदेह याच कॅनलमध्ये फेकले होते. त्यावेळी किती पोलिसांचा बंदोबस्त होता. ती घटना झाली तेव्हापासून तर आम्हाला पण शेतात यायला भीती वाटते. मी शेतात एकटी कधीच येत नाही.”

आरोपींचे कुटुंबीय काय म्हणतात?

खैरलांजीत दलित कुटुंबाची हत्या झाल्यानंतर जनक्षोभ उसळला होता. या घटनेनंतर भंडाऱ्यामध्ये महिला कार्यकर्त्या आणि माजी जिल्हा परिषद सभापती माया उके यांच्या नेतृत्वात पहिलं आंदोलन झालं होतं.

माया उके या सुद्धा या गावात आदरांजली वाहण्यासाठी जातात. त्यांनी सतत 12 वर्ष या घटनेचा फॉलोअप सुद्धा घेतला.

त्या सांगतात, इथं दलितांवर अत्याचार झाला. हा इतका क्रूर अत्याचार होता की फोटोही बघून किळस यायचा. प्रियांकाला तर गुप्तांगाला मारलं होतं. चौघांचाही प्रचंड छळ केला होता. आम्ही भंडाऱ्यात पहिलं आंदोलन केलं. त्यानंतर नागपुरात आंदोलन झालं आणि बघता बघता देश पेटून उठला. आरोपींना फाशी झाली पाहिजे अशी आमची मागणी होती. आम्ही त्यासाठी 12 वर्ष लढलो. भंडारा सत्र न्यायालयानं आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली. पण त्यानंतर हायकोर्टात फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात आली.

खैरलांजी हत्याकांड

या प्रकरणात 8 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली. त्यापैकी दोघांचा मृत्यू झालाय, तर सहा आरोपी अजूनही शिक्षा भोगत आहेत.

भोतमांगे यांच्या घराशेजारीच चार आरोपींची घरं आहेत. आम्ही त्यांच्या देखील घरी गेलो. आरोपी सुट्ट्यांवर घरी येतात. आम्हाला माहिती आहे आम्ही कसं जगतो असं म्हणून त्यांनी या घटनेवर बोलायला नकार दिला.

या प्रकरणात उज्वल निकम यांनी सरकारी वकील म्हणून बाजू मांडली होती. ते सांगतात, “प्रत्यक्ष साक्षीदारांच्या जबानीमुळे या सात ते आठ आरोपींना भंडारा सत्र न्यायालयानं फाशीची शिक्षा दिली. त्यानंतर हायकोर्टात ते जन्मठेपेत रुपांतरीत झाली.”

“खैरलांजी दलित हत्याकांड ही वेगळी घटना होती, ज्या दलित सामूहिक हत्याकांडानं संपूर्ण देश सुन्न झाला होता. अशा खटल्याचं कामकाज करून साक्षीदारांची मानसिकता टिकवून आरोपींना शासन करणं महत्वाचं होतं,” असंही उज्वल निकम म्हणाले.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC