Home LATEST NEWS ताजी बातमी मि. बिस्ट: युट्युबर ज्याची संपत्ती आहे 2,880 कोटी रुपयांच्या वर

मि. बिस्ट: युट्युबर ज्याची संपत्ती आहे 2,880 कोटी रुपयांच्या वर

3
0

Source :- BBC INDIA NEWS

मिस्टर बीस्ट

Published

वाचन वेळ: 3 मिनिटे

जर युट्युब तुम्ही बऱ्या प्रमाणात पाहत असाल तर कदाचित तुम्ही मिस्टर बिस्ट यांचं नाव ऐकलं असेल.

मिस्टर बिस्ट हे जगातील सर्वात मोठे यूट्यूबर आहेत.

यूट्यूबसह इतर मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील आकडे एकत्र केले तर मिस्टर बिस्ट यांच्या चाहत्यांची संख्या 87 कोटींपेक्षा जास्त असल्याचं दिसतं. म्हणजे भारतातील अनेक राज्यांच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही मिस्टर बिस्ट यांचे फॉलोअर्स अधिक आहेत.

सप्टेंबर 2026 च्या शेवटच्या आठवड्यात मिस्टर बिस्ट भारत दौऱ्यावर आले होते. कधी ते ताजमहालाला भेट देताना दिसले, तर कधी रणबीर कपूर आणि यश यांच्या रामायण चित्रपटाशी संबंधित कार्यक्रमात ‘जय श्री राम’ म्हणताना दिसले.

पण मिस्टर बिस्ट कोण आहेत आणि ते जगातील सर्वात मोठे यूट्यूबर कसे बनले?

मिस्टर बिस्ट यांचं खरं नाव काय आहे?

मिस्टर बिस्ट यांचं खरं नाव जिमी डोनाल्डसन आहे. भारतासह जगातील अनेक देशांतील मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये ते खूप लोकप्रिय आहेत.

1998 मध्ये जन्मलेल्या मिस्टर बिस्ट यांना त्यांच्या पहिल्या ब्रँड डीलमधून 10 हजार डॉलर मिळाले होते. मिस्टर बीस्ट यांनी ही रक्कम एका बेघर व्यक्तीला दिली होती.

मिस्टर बिस्ट यूट्यूबमधून जितके पैसे कमावतात, त्यातील मोठा हिस्सा ते दान करतात, असं सांगितलं जातं.

रणबीर कपूरसोबत मिस्टर बीस्ट

मिस्टर बिस्ट 11 वर्षांचे असल्यापासून यूट्यूबवर व्हीडिओ अपलोड करत आहेत. मिस्टर बिस्ट यांच्या एका यूट्यूब चॅनलवरील सबस्क्रायबर्सची संख्या 51 कोटी 80 लाखांपेक्षा जास्त आहे. केवळ इन्स्टाग्रामवरच त्यांचे 89 दशलक्ष म्हणजे जवळपास 9 कोटी फॉलोअर्स आहेत.

मिस्टर बिस्ट यांचे युट्यूबवरचे व्हीडिओ पाहून लोक आश्चर्यचकित होऊ शकतात आणि यापैकी बहुतांश व्हीडिओंमध्ये बक्षिसाची रक्कमही असते.

म्हणजेच या व्हीडिओंमध्ये सहभागी झालेल्यांपैकी जिंकणाऱ्या व्यक्तीला मोठी रक्कम दिली जाते.

मिस्टर बिस्ट यांची कमाई किती आहे?

मिस्टर बिस्ट यांची एकूण संपत्ती 300 दशलक्ष डॉलर म्हणजेच जवळपास 2880 कोटी रुपये आहे, असं फोर्ब्सनं जाहीर केलेल्या माहितीत होतं. फोर्ब्सच्या टॉप क्रिएटर्स रँकिंगमध्ये ते पहिल्या क्रमांकावर आहेत.

मिस्टर बिस्ट आता पर्सनल फायनान्स क्षेत्रातही प्रवेश करत आहेत.

यूट्यूबशिवाय ते अन्नपदार्थ, खेळणी आणि कपड्यांशी संबंधित लायसन्सिंग व्यवसायातही आहेत. मिस्टर बिस्ट यांचा ‘बिस्ट गेम्स’ हा शो ॲमेझॉन प्राइमवरही प्रसारित होतो.

मिस्टर बीस्ट

फेब्रुवारी 2026 मध्ये बिस्ट इंडस्ट्रीनं स्टेप नावाचं एक ॲप विकत घेतलं, हे ॲप तरुणांना गुंतवणूक कशी करावी हे शिकवतं.

याच वर्षी जुलै 2026 मध्ये मिस्टर बिस्ट यांनी थिया बूसेन हिच्याशी लग्न केलं. इन्स्टाग्राम पोस्टद्वारे त्यांनी ही माहिती देताना, “मला माझी मिसेस बिस्ट मिळाली आहे,” असं म्हटलं होतं.

मिस्टर बीस्ट त्यांच्या पत्नी थिया बुसेन यांच्यासोबत

मिस्टर बिस्ट यांचं आयुष्य सोशल मीडियावर खूप आकर्षक दिसत असलं, तरी लग्नाबद्दल बोलताना त्यांनी आपण ते खासगीच राहावं अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

मिस्टर बिस्ट यांच्या पत्नी दक्षिण आफ्रिकेच्या आहेत.

मिस्टर बिस्ट आणि वाद

एप्रिल 2026 मध्ये मिस्टर बिस्ट यांच्या मीडिया कंपनीवर एका माजी कर्मचाऱ्यानं लैंगिक छळ आणि कामाच्या स्थळी लिंगभेद केल्याचे आरोप केले होते.

मात्र, बिस्ट यांच्या कंपनीने हे आरोप फेटाळून लावले होते.

बिस्ट गेम्समध्ये स्पर्धकांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीवरुनहीही मिस्टर बिस्ट यांना कायदेशीर आव्हानांचा सामना करावा लागला होता.

मिस्टर बिस्ट त्यांच्या व्हीडिओंमध्ये करत असलेल्या गोष्टी नाट्यमय असतात आणि त्या पूर्वनियोजित असतात, असा आरोप करण्यात आला होता.

मिस्टर बीस्ट

कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) प्रभाव जगभरात दिसून येत आहे. जनरेटिव्ह AI भीतीदायक आहे आणि तो जगभरातील लाखो क्रिएटर्ससाठी मोठा धोका आहे, असं बिस्ट 2025 मध्ये म्हणाले होते.

मात्र, 2025 मध्येच AI मुळे मिस्टर बिस्ट वादात सापडले होते. कारण त्यांनी एक यूट्यूब थंबनेल जनरेटर सुरू केला होता.

यावर जगभरातील अनेक मोठ्या यूट्यूबर्सनी आक्षेप घेतला होता. हे साधन क्रिएटर्सचं काम हिरावून घेत आहे, असं त्यांचं म्हणणं होतं.

मात्र, आपला उद्देश लहान क्रिएटर्सना चांगले थंबनेल तयार करता यावेत हा होता, असं बिस्ट म्हणाले होते.

तथापि, विरोध वाढल्यानंतर मिस्टर बिस्ट यांनी हा थंबनेल जनरेटर बंद केला होता.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC