Home LATEST NEWS ताजी बातमी ठाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते प्रदीप पूर्णेकर यांची हत्या; पोलिसांनी काय माहिती दिली?

ठाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते प्रदीप पूर्णेकर यांची हत्या; पोलिसांनी काय माहिती दिली?

6
0

Source :- BBC INDIA NEWS

प्रदीप पूर्णेकर हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे विभागप्रमुख होते.

ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.

पूर्णेकरांवर गोळीबार झाल्यानंतर त्यांना जखमी अवस्थेत तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.

या हत्येप्रकरणी प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांकडून काही गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

काय आहे प्रकरण?

प्रदीप पूर्णेकर हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे ठाण्यातील विभागप्रमुख होते.

त्यांच्या हत्येनंतर ठाण्यातील मनोरमा नगर परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.

या प्रकरणी 5 संशयित असून दोन संशयित आरोपांना ताब्यात घेतलं आहे.

या परिसरातील सर्व दुकाने बंद असून तीन प्राथमिक शाळाही आज बंद ठेवण्यात आल्या आहेत.

शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे परत घरी पाठवण्यात आलं आहे.

जुन्या वादातून हत्या घडवून आणल्याचा आरोप प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुबीयांनी केला आहे.

प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम प्रदीप पूरणेकर यानं माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलंय की, “सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टच दिसतंय, की कोण आलं आणि काय केलं. जोपर्यंत, माझ्या वडिलांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह इथून हलवणार नाही.”

प्रदीप पूर्णेकर यांचे भाऊ जयनाथ पुर्णेकर यांनी म्हटलंय की, “गणपतीपासून हे सर्व सुरू होतं. ते रेकी करत होते, बाळूला (प्रदीप पूर्णेकर) विश्वास ठेऊ नको असं सांगितलं होतं. शिंदे साहेबांना मी विनंती करतो, की हे काही बरोबर नाही.”

पोलिसांनी काय सांगितलं?

ठाणे शहराचे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 सप्टेंबरला रात्री साडेनऊच्या आसपास प्रदीप पूर्णेकर यांच्या ऑफिसमध्ये काही लोक हल्ला करण्याच्या उद्देशानं गेले. त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला, गोळीबार केला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.

पोलीस उपायुक्त प्रशांत कदम

“या प्राथमिक माहितीच्या आधारे आम्ही गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी 5 संशयित असून दोन संशयित आरोपांना ताब्यात घेतलं आहे. लोकल पोलीस तसेच क्राइम ब्रांच तपास करत आहे.”

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC