Home LATEST NEWS ताजी बातमी हनुमान अंश : अवघ्या 2 कोटीत बनलेल्या सिनेमाची 300 कोटींची कमाई; असं...

हनुमान अंश : अवघ्या 2 कोटीत बनलेल्या सिनेमाची 300 कोटींची कमाई; असं काय आहे या सिनेमात?

2
0

Source :- BBC INDIA NEWS

नैनिताल येथील नीम करोली बाबांच्या आश्रमाचे दृश्य (फाईल छायाचित्र)

गेल्या काही दिवसांपासून एका चित्रपटाची खूप चर्चा होत आहे. त्या चित्रपटाचे नाव आहे हनुमान अंश. याचे कारण म्हणजे या चित्रपटाने जे साध्य केलं आहे ती गोष्ट अनेक मोठ्या बॅनर्सच्या चित्रपटांना देखील साध्य होताना क्वचितच दिसते.

पाच दशकांपूर्वी या जगाचा निरोप घेतलेले एक संत, उत्तराखंडच्या डोंगरदऱ्यात बनलेला एक आश्रम आणि त्यांच्या जीवनापासून प्रेरणा घेऊन बनवण्यात आलेला एक चित्रपट.

चित्रपटाची सुरुवात एखाद्या मोठ्या हिंदी चित्रपटासारखी नव्हती. पण आता या चित्रपटाची जी सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे ती थांबता थांबत नाहीये. हनुमान अंश हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरलाय.

चित्रपट समीक्षक तरन आदर्श यांनी सांगितल्यानुसार या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील कमाई 300 कोटी रुपयांच्या जवळ पोहचली आहे. आदर्श यांनी एका पोस्टमध्येम्हटले की या चित्रपटाने गुरुवारपर्यंत 272 कोटींचा व्यवसाय केला आहे.

चित्रपट समीक्षक कोमल नहाटांनी सांगितलंय की हा चित्रपट सहज 350 कोटींच्या वर जाईल.

चित्रपटाची निर्मिती आणि चित्रपटाची कमाई सर्वांचं लक्ष वेधून घेण्याचं कारण म्हणजे या चित्रपटाच्या निर्मितीसाठी झालेला खर्च. चित्रपटाच्या निर्मात्या अनुप्रिया नागर यांनी बीबीसी हिंदीला सांगितले की या चित्रपटाचे बजेट 2 कोटी रुपयांहून कमी आहे.

चित्रपटात काय दाखवलंय?

हनुमान अंश हा नीब करौरी बाबा यांच्या जीवनावर आणि त्यांच्याबाबत असलेल्या किश्शांवर आधारित चित्रपट आहे. या चित्रपटाची सुरुवात भोसले नावाच्या व्यक्तीपासून होते जो आपल्या नातवाला बाबांसोबत झालेल्या भेटीबद्दल सांगतो. तिथून ही गोष्ट पोहचते बाबांच्या लहानपणात.

चित्रपटात दाखवलंय की लक्ष्मी नारायण आपल्या आईच्या मृत्यूनंतर घर सोडतात. जर आपण ईश्वरापर्यंत पोहचू शकलो तर कदाचित आपल्या आईची पुन्हा एकदा भेट होईल.

पुढे चालून हा शोधच त्यांना इतरांची मदत करण्यासाठी आणि उपाशी लोकांना अन्न देण्यासाठी प्रेरित करतो. या चित्रपटात ‘नीब करौरी बाबा’ यांची मुख्य भूमिका शोभिनव सत्याने साकारली आहे. अभिनयासाठी शोभिनवचे कौतुक देखील झाले आहे.

या चित्रपटाच्या निर्मात्या अनुप्रिया नागर यांनी बीबीसीला सांगितले की नीब करौरी बाबांच्या भूमिकेत शोभिनवला प्रेक्षक स्वीकारतील की नाही ही मोठी जबाबदारी त्याच्यावर होती. पण ज्या प्रकारे चित्रपटाला प्रतिसाद मिळाला आहे त्यावरुन तर हे समजतं की त्याने ही भूमिका शानदारपणे साकारली आहे.

*हनुमान अंश* चित्रपटाचे दिग्दर्शक विशाल चतुर्वेदी आणि निर्माती अनुप्रिया नागर (उजवीकडे).

द इंडियन एक्सप्रेसच्या चित्रपट समीक्षक शुभ्रा गुप्ता सांगतात की शोभिनव आपल्या चेहऱ्यावरील भाव, स्थिरता आणि शांततेनी आपल्या भूमिकेला प्रभावी बनवतात.

त्या पुढे सांगतात की या चित्रपटाची पटकथा इतक्या सफाईने लिहिली गेलीये की आपण त्या काळात पोहोचलो हे भाव प्रकट होतात. चित्रपटातील अभिनेत्यांनी चांगली भूमिका साकारली आहे.

या चित्रपटाच्या निर्मात्या रागिनी सोना या सुरुवातीपासून चित्रपटसृष्टीत आहेत. त्यांच्या नावावर 2004 साली आलेली ‘कौन है जो सपनों में आया’, ‘शुक्रिया’ आणि ‘चॉकलेट’ सारखे चित्रपट आहेत. या चित्रपटांच्या त्या निर्मात्या आहेत.

चित्रपटगृहात हनुमान अंश अधिक काळ टिकून राहण्यासाठी रागिनी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. स्क्रीनला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले की दुसऱ्या आठवड्यात थिएटर्सची संख्या खूप कमी झाली होती. पण त्यांनी आणि विशाल चतुर्वेदींनी चित्रपटगृहात चित्रपटांचे स्क्रिनिंग सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.

या चित्रपटाच्या आणखी एक निर्मात्या नम्रता सिंह आहेत. त्यांनी डिजिटल मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात काम केले आहे. 2023 मध्ये म्युझिक प्लस या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार त्या सोनीची कंपनी SETVI मध्ये डिजिटल आणि न्यू टेक्नॉलॉजी विभागाच्या प्रमुख होत्या.

त्यांनी बॉलिवुड हंगामाला सांगितले की सुरुवातीपासून या चित्रपटाची कथा तीन भागांत दाखवायचा मानस होता. पुढील दोन भागांवर काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यांनी सांगितले की हनुमान अंश चित्रपटाची शूटिंग 22 दिवसांत पूर्ण झाली. दोन दिवसांचे चित्रीकरण मुंबईत झाले आणि इतर पूर्ण चित्रीकरण चित्रकूटमध्ये झाले.

चित्रपटातील गाणे व्हायरल

या चित्रपटात असलेले एक गाणे व्हायरल झाले आहे. हे गाणे सुनील लोधीने गायले आहे. सुनील हे दोन्ही डोळ्यांनी दृष्टिहीन आहेत. त्यांचे गाणे व्हायरल झाल्यानंतर अनेक नेत्या-अभिनेत्यांनी त्यांचे कौतुक केले आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सुनीलच्या डोळ्यांवर उपचार करण्याचे आश्वासन एका मुलाखतीच्या दरम्यान दिले आहे.

भक्ती, संतांचे जीवन चरित्र आणि श्रद्धेशी निगडित भारतीय चित्रपटांनी गेल्या काही वर्षांत चांगला बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. 2024 साली आलेल्या हनु-मान या चित्रपटाने 300 कोटींचा व्यवसाय केला.

2025 मध्ये रिलीज झालेल्या महावतार नृसिंहने बॉक्स ऑफिसवर 325 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. महाराष्ट्रात देऊळबंद-2 ला देखील चांगला प्रतिसाद मिळाला आणि हा चित्रपट हिट ठरला.

कैंची धाममध्ये वाढती गर्दी, अडचणीही वाढल्या

कैंची धामच्या वाढत्या लोकप्रियतेसोबत तिथल्या पायाभूत सुविधांवरील ताणही वाढत आहे. 2025 मध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, जवळपास 74 टक्के लोकांनी पार्किंगच्या व्यवस्थेवर, तर 58 टक्के लोकांनी स्वच्छतेच्या सुविधांवर नाराजी व्यक्त केली होती.

राष्ट्रीय हरित लवादासमोर (ग्रीन ट्रिब्युनल) सादर करण्यात आलेल्या उत्तराखंड प्रदूषण नियंत्रण मंडळाशी संबंधित संयुक्त समितीच्या अहवालातही कैंची धाम येथे येणाऱ्या वाढत्या भाविकांमुळे स्वच्छता, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थेवर मोठा ताण पडत असल्याचे नमूद करण्यात आले होते.

केंद्र सरकारही येथील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी निधी देत आहे. पर्यटन मंत्रालयाच्या अधिकृत कागदपत्रानुसार, ‘चॅलेंज बेस्ड डेस्टिनेशन डेव्हलपमेंट’ योजनेअंतर्गत कैंची धाम परिसराच्या विकासासाठी 17.60 कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली आहे.

यावरून असंही स्पष्ट होतं की, कैंची धामचं आकर्षण आता केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक विषयापुरतं राहिलेलं नाही. वाढती गर्दी आणि पर्यटकांची संख्या लक्षात घेता, त्याच्या व्यवस्थापनासाठी प्रशासन आणि पर्यटन विभागालाही नियोजन करावं लागत आहे.

नीब करोरी बाबा, कैंची धाम आश्रम (फाइल फोटो)

जिथे ‘नीब करौरी बाबा’ यांचा जन्म झाला

सप्टेंबर 2026 मध्ये उत्तर प्रदेश सरकारने ‘नीब करौरी बाबा’ यांच्याशी संबंधित ठिकाणांना धार्मिक पर्यटनाच्या एका मार्गाशी जोडण्याची योजना पुढे नेली. ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, या मार्गात फिरोजाबादमधील अकबरपूर, फर्रुखाबादमधील नीब करौरी धाम, लखनऊमधील हनुमान सेतू मंदिर आणि वृंदावनमधील बाबांशी संबंधित ठिकाणांचा समावेश आहे.

हा विकास अशा वेळी होत आहे, जेव्हा ‘हनुमान अंश’ चित्रपटाच्या यशामुळे नीब करौरी बाबा यांच्याशी संबंधित ठिकाणे आणि त्यांच्या इतिहासाबद्दल लोकांची उत्सुकता वाढली आहे.

याच अकबरपूरमध्ये बाबांच्या वडिलोपार्जित घरावरूनही वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या 6 नातींनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करून, एका ट्रस्टवर या मालमत्तेचा ताबा मिळवण्याचा आरोप केला आहे. ट्रस्टने हे आरोप फेटाळले आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी फिरोजाबाद प्रशासनाने एक समिती नेमली असून, सध्या चौकशी सुरू आहे.

नवीन पिढीला इतका रस का?

नीब करौरी धाम आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वाराचा फोटो.

या प्रश्नाचं कोणतंही एकच असं ठोस किंवा सरळ उत्तर नाही. परंतु, उपलब्ध माहितीनुसार यामागची काही कारणं सांगता येतात. एका बाजूला राम दास, कृष्ण दास आणि लॅरी ब्रिलियंट यांच्यामुळे नीब करौरी बाबांची जगभर तयार झालेली जुनी ओळख आहे. तर दुसऱ्या बाजूला स्टीव्ह जॉब्स आणि मार्क झुकरबर्ग यांच्याशी संबंधित काही प्रसिद्ध आणि नोंदवलेल्या कथा आहेत.

भारतामध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांसारख्या प्रसिद्ध व्यक्तींनी तिथे भेट दिल्यामुळेही या ठिकाणाची चर्चा वाढली आहे. त्यातच ‘हनुमान अंश’ हा यशस्वी चित्रपटही या प्रवासाचा एक भाग बनला आहे..

परंतु, याच काळात भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांचा कोणताही सहभाग नसल्याबद्दल सोशल मीडियावर काही लोकांकडून टीकाही केली जात आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC