Home LATEST NEWS ताजी बातमी दागिन्यांचे व्हीडिओ पोस्ट करायची ही युट्यूबर, चोरांनी 1 कोटींच्या मुद्देमालावर केला हात...

दागिन्यांचे व्हीडिओ पोस्ट करायची ही युट्यूबर, चोरांनी 1 कोटींच्या मुद्देमालावर केला हात साफ; 4 संशयित अटकेत

7
0

Source :- BBC INDIA NEWS

दागिन्यांचे व्हीडिओ पोस्ट करणाऱ्या युट्युबरच्या घरी झाली चोरी

एक महिला आपल्या घरातील दागिने, पैसे, मूल्यवान गोष्टींच्या रील्स बनवत होती. तिच्या रील्स पाहून तिच्या घरी चोरी झाली आणि जवळपास एक कोटी रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला. कन्याकुमारी जिल्ह्यात घडलेल्या या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

ती महिला ज्या रील्स बनवत होती त्यामुळे त्या महिलेचे घर कुठे आहे हे शोधणे आरोपींना शक्य झाले. रील्समधूनच त्यांना कळले की त्या महिलेची मुलगी कुठे शिकते, त्यानुसार त्यांनी त्या मुलीवर पाळत ठेवली, असं कन्याकुमारीचे पोलीस अधीक्षक अंशुल नागर यांनी सांगितले.

महिला यूट्यूबरने सोशल मीडियावर टाकलेल्या व्हीडिओंमधून घरात दागिने आणि रोख रक्कम कुठे ठेवली जाते याची माहिती मिळाल्याने चोरीचा कट रचण्यात आला.

या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

कन्याकुमारी जिल्ह्यातील नागरकोइलमधील एका महिला यूट्यूबरच्या घरातून सुमारे 110 सॉव्हरिन सोन्याचे दागिने चोरीला गेल्याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

बीबीसी तामिळशी बोलताना नागरकोइलचे डीएसपी प्रकाश यांनी सावधगिरीचा इशारा देत सांगितले, “आपल्याकडे किती दागिने किंवा पैसे आहेत, याची माहिती सोशल मीडियावर उघडपणे शेअर करणे योग्य नाही.”

जप्त केलेल्या दागिन्यांसोबत कन्याकुमारीचे पोलीस अधीक्षक अंशुल नागर

विनोद कुमार हे वित्त क्षेत्राशी संबंधित व्यवसाय करतात. वेलदोडा व्यापाऱ्यांना कर्जपुरवठा करणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. त्यांची पत्नी मधुमिता गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर सक्रिय होत्या. त्या स्वतःकडे असलेले दागिने, रोख रक्कम तसेच नव्याने खरेदी केलेले दागिने यांचे व्हीडिओ नियमितपणे पोस्ट करत होत्या.

गुरुवारी (24 सप्टेंबर) रात्री त्यांच्या घरातून सुमारे 880 ग्राम सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार विनोदकुमार यांनी राजक्कामंगलम पोलीस ठाण्यात दाखल केली.

7 पथकं आणि 160 सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांनी तपासले

मधुमिता यांचे पती विनोद कुमार यांनी तक्रारीत म्हटले, घटनेच्या दिवशी आम्ही सायंकाळी 6 वाजता शेतात गेलो होतो आणि रात्री बारा वाजता परतलो होतो. घराचा पाठीमागचा दरवाजा फोडण्यात आला. जेव्हा आम्ही वरच्या मजल्यावर गेलो तेव्हा आमच्या लक्षात आलं की आमच्या घरी चोरी झाली आहे.

पाठीमागच्या दाराने अज्ञात लोक आत आले. आत शिरल्यावर त्यांनी घराचा समोरचा दरवाजा आतून बंद करून टाकला. हा दरवाजा त्यांनी अशा पद्धतीने बंद केला जेव्हा हे दांपत्य घरी परतले तर त्यांना दरवाजा उघडताच आला नाही, असं नागरकोईलचे डीसीपी प्रकाश यांनी सांगितलं.

महिला यूट्यूबरने सोशल मीडियावर टाकलेल्या व्हीडिओंमधून घरात दागिने आणि रोख रक्कम कुठे ठेवली जाते याची माहिती मिळाल्याने चोरीचा कट रचण्यात आला.

प्रकाश यांनी बीबीसी तामिळला सांगितले की “विनोद कुमार यांना वाटलं की दरवाजा जाम झाला असेल त्यामुळे उघडत नाही. त्यामुळे त्यांनी कारपेंटरला बोलवलं. कारपेंटरने सांगितले की दरवाजा आतून बंद करण्यात आला आहे. तेव्हा ते पाठीमागच्या बाजूला गेले तर त्यांना दरवाजा फोडलेला दिसला.

“या भागात शहरातील अनेक नामवंत लोक राहतात. विनोद कुमार यांचे घर खूप मोठे आहे पण केवळ तीनच सीसीटीव्ही घरात होते. एवढ्या मोठ्या घरासाठी किमान आठ सीसीटीव्ही आवश्यक आहेत,” असे डीसीपी प्रकाश यांनी सांगितले.

चोरीच्या प्रकरणात राजक्कामंगलम पोलीस स्टेशनमध्ये केस दाखल करण्यात आली आहे. या चोरीच्या तपासासाठी पोलिसांनी सात पथकं तैनात केली.

160 सीसीटीव्हींमधील फुटेजेसची तपासणी करण्यात आली. तसेच 35 कॉल रेकॉर्ड्स तपासण्यात आल्याचे पोलिसांनी आपल्या प्रेस नोटमध्ये सांगितले आहे.

‘दोन ग्लोव्हज, एक मास्क’

फिंगरप्रिंट एक्स्पर्ट आणि श्वानपथकाच्या मदतीने घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यात आले.

“ज्या घरात घटना घडली तिथे दोन हातमोजे (ग्लोव्हज), एक मास्क आणि कटर मशीनचा ब्लेड सापडला,” असं कन्याकुमारीचे जिल्हा पोलीस अधीक्षक अंशुल नागर यांनी सांगितलं.

मंगळवारी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, ते घरात कसं शिरले, याचा तपास करण्यासाठी एक वेगळी टीम तयार करण्यात आली आहे. तसेच, घरातून बाहेर पडल्यानंतर ते कुठे गेले, याचा शोध घेण्यासाठीही दुसरी टीम काम करत आहे.

अंशुल नागर म्हणाले, “घटनास्थळाच्या आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, रात्री 11.30 ते 12.30 या वेळेत 3 दुचाकी संशयास्पदपणे फिरताना दिसल्या. यापैकी एका दुचाकीवर पोलिसांना संशय आल्याने त्यांनी तिची माहिती गोळा केली आहे.”

पोलीस अधीक्षक अंशुल नागर यांनी तपासाची माहिती देताना सांगितलं, “त्या गाडीवरील व्यक्तीने घातलेला शर्ट आणि पँटचा रंग पाहून तो दुपारी नेमका किती वाजता आला होता, याचा अंदाज आम्ही घेतला.”

अंशुल नागर पुढे म्हणाले, त्यांनी आतापर्यंत 160 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले आहेत.

“गेल्या 3 दिवसांपासून सीसीटीव्हीचे फुटेज तपासले जात आहे. नागरकोईलपासून कन्याकुमारीच्या सीमेपर्यंत आणि त्यानंतर दुसऱ्या जिल्ह्याच्या सीमेपर्यंतचे फुटेज तपासण्यात आले आहेत,” असं त्यांनी सांगितलं.

संशयितांचा असा घेतला शोध

आरोपीने वापरलेल्या दुचाकीचा नंबर आणि त्याचा चेहरा स्पष्टपणे ओळखण्यात आला असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सांगितलं.

नागर म्हणाले की, संशयिताचा तपास करताना तो थुथुकुडीमधील श्रीवैकुंटम परिसरात असल्याचे समोर आले.

“ही व्यक्ती श्रीवैकुंठमहून कन्याकुमारीला गेली होती. 28 तारखेच्या रात्री वाहनांची तपासणी सुरू असताना त्याला पकडण्यात आलं.”

संशयितांनी वापरलेली दुचाकी काळ्या रंगाची होती. पोलिसांच्या तपासानुसार, दुचाकीवर इसाक्की पांडियन पुढे बसला होता, तर मुरुगन मागे बसला होता.

ते पुढे म्हणाले, “त्यांच्या बॅगेत 5 सॉव्हरिन वजनाचे (सुमारे 40 ग्रॅम) सोन्याचे दागिने सापडले. चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. या गुन्ह्यात इसाक्की पांडियन हा मुख्य सूत्रधार होता.”

या प्रकरणाच्या पुढील तपासात पोलिसांनी मुरुगन, मुरुगेसन आणि थंगापांडी यांना अटक केली आहे.

“त्यांनी चोरलेले दागिने विकले होते. ते दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत 98 सॉव्हरिन म्हणजेच सुमारे 784 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत,” असं जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सांगितलं.

रील्स पाहून असा रचला कट

पोलिसांनी सांगितले की चोरी झाल्यानंतर पोलिसांनी कसून तपास केला आणि अटकेनंतर आरोपींकडून माहिती काढली. त्यात त्यांनी सांगितले की एक आरोपी मधुमिता यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर गेल्या चार-पाच महिन्यांपासून लक्ष ठेवून होता.

रील्समधून त्यांनी घराचं निरीक्षण केलं. कोणत्या रूममध्ये काय ठेवलंय, घरात किती सोनं-नाणं आहे, पैसे किती आहेत. त्यावरून त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला घरफोडी करता येऊ शकते.

कन्याकुमारीच्या पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की एक आरोपी या घराच्या जवळ 1 सप्टेंबरपासून रोज येत होता. रील्स पाहूनच त्यांनी हे घर कोणतं आहे याचा अंदाज घेतला.

मधुमितांच्या रीलमध्ये मुलीने युनिफॉर्म घातला होता आणि गळ्यात शाळेचे आयडी कार्ड होते. त्यावरुन त्यांनी मुलीची शाळा कोणती आहे ते शोधले. त्यांनी तिचा शाळेतून ते घरापासून पाठलाग केला. तसेच घराच्या पाटीवरुन त्यांना ओळख पटली.

रील्स पाहूनच त्यांनी हे घर कोणतं आहे याचा अंदाज घेतला.

एक आरोपी रोज पाहत होता की घराबाहेर कार उभी आहे की नाही. ज्या दिवशी कार नाहीये हे त्यांनी पाहिले तेव्हा त्या दिवशी त्यांनी चोरी केली. त्यांच्या घरातून फक्त सोन्याचे दागिने चोरीला गेले. पैशांबाबत तक्रारीत उल्लेख नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

अटकेत असणाऱ्या आरोपी सराईत गुन्हेगार आहेत का, त्यांच्या नावावर काही केसेस आहेत का असा प्रश्न पोलिसांना विचारण्यात आला तेव्हा पोलिसांनी सांगितले की त्यांच्या नावावर आधी कुठल्याही केसेस नाहीत. हाच त्यांचा पहिला गुन्हा होता.

एक आरोपी मधुमिता यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर गेल्या चार-पाच महिन्यांपासून लक्ष ठेवून होता.

बीबीसी तामिळने मधुमिता यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांना फक्त हाच प्रतिसाद मिळाला की सध्या त्या बोलण्यासाठी तयार नाहीत. त्याच वेळी या घटनेनंतर त्यांनी (26 सप्टेंबर) एक व्हीडिओ पुन्हा शेअर केला आहे. ज्यात त्या आपल्या मुलीला सुट्टी लागल्याबद्दल सांगत आहे. त्यांचे पतीदेखील या व्हीडिओत दिसतात आणि पाचशेंच्या नोटांचा मुलीच्या अंगावर टाकण्यात आल्याचे व्हीडिओत दिसते.

पोलिसांनी दिला सावधतेचा इशारा

डीसीपी प्रकाश सांगतात की मधुमिता त्यांच्या युट्युब चॅनेलवर त्यांच्या संपत्तीबद्दल, दागिन्यांबद्दल माहिती देताना दिसतात. त्यांना सोशल मीडियावर भरपूर फॉलोइंग आहे.

ही एक वेगळी गोष्ट आहे की पोलिसांनी तपास करून गुन्हेगारांना अटक केले. पण तरीदेखील काही दागिने गहाळ झाल्याचे दिसले. त्यामुळे त्यांचे नुकसान झाले.

आपल्या संपत्तीबद्दल, दागिन्यांबद्दल जाहीररीत्या सोशल मीडियावर सांगणे अयोग्य असल्याचे त्यांनी सांगितले. अशा प्रकारामुळे या प्रकारच्या लोकांना आयतीच संधी मिळते.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC